पंचनामा १

हळूहळू पहाट-प्रकाश उजळू लागला होता. त्याच्या आणि फलाटावरच्या मिणमिणत्या पिवळ्या दिव्याच्या उजेडात सर्व आसमंत केविलवाणे दिसत होते. कडाक्याच्या थंडीमुळे सर्व चिडीचूप झाले होते. जिन्याखालची म्हातारी कुडकुडत जीवन-मृत्यूच्या सीमारेषेला भोज्जासारखे शिवून परत येत होती. तिचा जिवट आणि चिवट जीव जाता जात नव्हता, आणि त्यामुळे "या शहरात थंडीमुळे कुणीही मृत झालेले नाही" हे जिल्हाधिकाऱ्यांनी दारिद्र्य-निर्मूलन मंत्रालयाला पाठवलेले उत्तर अजून तरी खरे होते. त्या म्हातारीला स्वप्नात तिला तिने बालपणी आणि तरुणपणी पांघरलेल्या-नेसलेल्या अनेकविध ऊबदार वस्त्र-प्रावरणांची माळ गुरफटून टाकत होती, आणि त्या समजुतीच्या खेळातील समजुतीची ऊब तिला या काळ्या थंडीतही टिकून रहायला जवळजवळ पुरत होती.
=====

मोटरमन सावंतांचे डोळे चुरचुरत होते. हा युनियन-सेक्रेटरी मुरुगन त्यांच्या पुढच्या ड्यूटीला आल्यापासून असेच चालले होते. डबल ड्यूटी करणे ही इतर कुठल्याही सहकाऱ्याबरोबर सठीसहामाशी होणारी घटना आता आठवड्यातून चार वेळा होऊ लागली होती. "अम तुमारे छोकरेको नोकरीका देकता" या त्याच्या विस्कळीत आश्वासनावर अवलंबून सावंत हा गाडा रेटत होते.

मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा करून महिना त्रेचाळीसशेवर भोसरीत दिवसाला किमान दहा तास राबणाऱ्या प्रथमेशच्या नोकरीवर आपण गंडांतर आणले आहे हे बजाज कुटुंबियांना माहीत असण्याचे कारण नव्हते. पण त्याची नोकरी अशीच कायम चालू राहील, आज ना उद्या तो सुपरवायझरचा मॅनेजर होईल, जरा बरा पगार मिळेल आणि त्याचे लग्न करून देऊ या आशेवर सावंत दिवस ढकलत होते त्यांना एकदम भेदरायला झाले. बुडत्या अवस्थेतल्या त्यांना असल्या काड्यांचे आधारही खूप वाटत.

ही सहा-पंचवीस रिटर्न आणली की मग दुपारपर्यंत सुटलो म्हणून सावंत स्वतःला रेटत होते. फलाटावरून ड्रायव्हर-कॅबिनमध्ये शिरताना त्यांच्या गुडघ्याने स्व-अस्तित्त्वाची चरचरीत जाणीव करून दिली. हल्ली थंडीचे सांधे फारच बोलू लागले होते. एकदाचे प्रथमेशचे मार्गी लागले की ओरोसच्या जवळेवाडीत जाऊन स्थायिक होण्याची त्यांची मनीषा परत बळावली.

"सावंतानूं, बरा आसा मां? " म्हादबा कॅबिनमधून गरजला. हा खरेतर यार्डातला स्वीपर. पण बघून बघून गाडी चालवायला शिकला होता. आणि सावंतांचा जड गाडा पाहून त्याने आपणहून यार्डातून लोकल आणून फलाटावर लावण्याची जबाबदारी स्वीकारली होती. बदल्यात सावंतांना त्याच्याशी मालवणीत बोलावे लागे. "तू मेल्या भुतूर कित्या? लोणावळ्याक येतंस? काय चिक्की खाऊचे डोहाळे लागलंत की कांय? " सावंतांनी निःश्वास आणि बोलणे एकमेकांत गुंफून टाकले.

"लोणावळ्याक कित्या? चिक्की काय हंय मिळना न्हंय? " म्हणत म्हादबा खाली उतरला. "थंडी बाकी जाम हां. पॉटातला पाणी गोठूक इला" असे स्वतःशीच पुटपुटत परत यार्डात रवाना झाला. सावू गेल्यापासून त्याचे स्वतःशीच पुटपुटणे चांगलेच वाढले होते. चारचौघात बोलत असलेला तो, बोलता बोलता अचानक स्वतःशी पुटपुटत बाजूला होई.

सावंतांनी गार्डाच्या कॅबिनमध्ये वाजणारी बेल वाजवून यादव आला आहे की नाही ते तपासले. असल्या तिरपागड्या वेळेच्या ड्यूटीवर येताना तो 'ओसी'ची क्वार्टर पोटामध्ये किंवा खिशामध्ये घालून येत असे हे सर्वांनाच माहीत होते. पण केवळ आडनावामुळे, आणि मुर्दाड प्रच्छन्नपणे त्याचा वापर करण्याच्या सवयीमुळे अजून त्याला मेमो देण्याची हिंमत कुणी केली नव्हती.

ती बेल परत वाजवून प्रतिसाद देण्याऐवजी यादवने त्याच्या बाजूचा भोंगा केकाटवला. फलाटाच्या छपराच्या कोपऱ्यात दिवसाच्या निजेला सज्ज होत असलेली दोन वटवाघळे पंख फडफडावत झपाट्याने बाहेर पडली. जिन्याखालच्या म्हातारीला त्या भयाकारी आवाजाने अजून ऊब मिळाली आणि अर्ध-बेशुद्धावस्थेतून परत येताना तिचे दात थडथडू लागले.

"मायझंया, इलास की नाय तां इचारला तुका. स्वताच्या बापाशीचा लगीन असल्यागत कित्या किचाटतंस? " सावंत भडकले. पण त्यांचे भडकणे नेहमीप्रमाणे त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले. यादव शुद्धीत आहे की नाही ते पाहून त्याचा रिपोर्ट करण्याची कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नाही.

अजून पंधरा मिनिटे काढायची म्हणून त्यांनी खिशातले ब्रिस्टॉलचे पाकीट तपासले. दोनच शिल्लक होत्या. एक लोणावळ्यात दिवाडकराचा वडा खाल्ल्यानंतरच्या चहाबरोबर, आणि एक घरी परतल्यानंतर झोपण्याआधी झाड्याला जाताना. ही वेळी-अवेळीची जाग्रणे सुरू झाल्यापासून त्यांचा कोठा भलताच जड झाला होता; सिग्रेटशिवाय मुळी साफच होत नसे.

त्यांनी पाकीट परत आत ठेवले, आणि खिशाच्या कोपऱ्यातून निघालेला लवंगेचा तुकडा दाताखाली सारला. तेवढाच तोंडाला चाळा.

=====

फलाटाचा जिना आपल्या दुखऱ्या गुडघ्यांना विचारत विचारत उतरणाऱ्या छायाकाकूंना समोर लोकल दिसली आणि त्यांनी कुकरच्या शिट्टीसारखा दीर्घ निःश्वास सोडला. उरलेले एक वटवाघूळ बहिर्गमन करते झाले.

कुठेही वेळेआधी पोचण्याची छायाकाकूंची सवय त्यांच्या सुनेला अजिबात नव्हती. आणि तेथपासूनच त्यांच्या तंट्यांची सुरुवात होई. "पोचले म्हणजे झाले" म्हणणारी त्यांची शिकली-सवरलेली सून त्यांच्यासारख्या चाळीत जन्मलेल्या, वाढलेल्या आणि जगलेल्या बाईला झेपवणे कठीणच होते. त्यात तिचे ते राहुलला 'अरे-तुरे' करणे त्यांना अधिकच खटके. हल्ली तर तिने ताळतंत्रच सोडला होता, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. पण जन्मल्यापासून मुखदुर्बळ असलेला राहुल काही बोलायला तयार नसे. त्याला अरे-जारे तरी तिने करू नये असे त्यांचे मत त्याने ओशाळे हसत टोलवले होते, आणि तेव्हापासून छायाकाकूंचे मत फिरले होते.

आता वडगावच्या कुसुमात्त्याच्या पुतण्याचा साखरपुडा म्हणजे घरचेच कार्य ना? पण तिथे जाताना या बयेचे सत्राशे प्रश्न. राहुल त्याच्या ऑफिसाच्या कामाला म्हणून ऑनसाईट की कायसा गेला होता गेले चार महिने आणि या बयेचा काच सुरू झाला. महिन्याचे खर्चाचे पैसेसुद्धा चार वेळा मागून घ्यावे लागत. आणि "कोण कुणाचा नातेवाईक.... आलूचा मालू तो माझा पिलू करत कशाला जायला पाहिजे इकडे नि तिकडे" असे ऐकून घ्यावे लागे. स्वतः नोकरी करीत होती, राहुलहून जास्त पगार मिळवत होती, आणि हे बोलबोलून दाखवत होती. पैसा आला की माणुसकी जाते हेच खरे. गोऱ्यापान राहुलला ही सावळी मुलगी शोभून दिसणार नाही असे त्यांना त्या वेळीच वाटले होते. पण राहुलचे लग्नाचे वय होऊन चालले होते. राहुल नववीत असतानाच रत्नाकरराव गेले होते आणि त्याचे सगळे छायाकाकूंनीच केलेले होते. लग्नाला उभा राहिला तेव्हा त्याला नोकरी होती, पण ती पगाराकडून एवढीशी मोठी नव्हती, आणि केवळ त्यामुळेच मोठी स्थळे सांगून येत नव्हती. आता अंगात धमक असली की झाले, पैसा काय, आपणहून येतो. पण हे लोकांना कळेल तर ना..... खऱ्याची दुनिया नाही हेच खरे!

आता रत्नाकरराव गेल्यावर त्यांनी जे उद्योग केले, त्यात चार घरच्या पोळ्या लाटण्याबरोबरच मुले संभाळण्याचाही उद्योग होता. त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रेशनिंग-क्लार्क सुशीलाकाकूंचा सुधीर त्यांच्या हातावर मोठा झाला. आता त्याचे लग्न झाले आणि सोन्यासारखी धम्मक केतकी तितकेच सोने लेवून त्यांची सून झाली, याचा आनंद व्हायला नको? पण ही बया म्हणे कशी, "त्यांच्या घरातलं ते त्यांच्या घरातलं ना शेवटी? आपण कशाला चावंढळपणा करायला जायला पाहिजे? ". तिचे स्थळ ज्यांनी सांगून आणले त्या निळूभाऊंना छायाकाकूंनी मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली. एव्हाना शिव्यांचा कोटीजप होऊन गेला होता म्हणा.

हल्ली त्यांना आम्लपित्ताचा त्रास सुरू झाला होता. त्या अँटॅसिडच्या गोळ्यांनी त्यांच्या घशाला तोठरा बसे. मग कुणीतरी सांगितले की ज्येष्ठमधाचा तुकडा तोंडात ठेवला की त्रास कमी होतो. मग त्यांनी ज्येष्ठमधाची खांडे जवळ बाळगणे सुरू केले होते. परत गोळ्या आणायच्या म्हटल्या की या बयेचे प्रश्न सुरू होणार. "ऍसिडिटीचा त्रास होतो, गॅसेसचा त्रास होतो, तर जरा तोंडावर ताबा ठेवावा, अरबट-चरबट खाऊ नये" असे ऐकायला लागणार. आता माझा मुलगा कमावतो नि मी खाते, त्यात तुझं काय गेलं गं? म्हणतात ना, राजा देतो नि कोठावळ्याचे पोट दुखते.

पायऱ्या उतरून त्या लोकलपाशी आल्या. या सकाळच्या लोकलमुळे गर्दी तरी नव्हती, निवांत बसून जाता आले असते. म्हणून तर त्या दुपारच्या साखरपुड्याला इतक्या सकाळी निघाल्या होत्या. वडगांवपर्यंत उभे राहून जाण्याइतके आता गुडघे तल्लख राहिले नव्हते.

डब्यात चढायला घेणार तोच त्यांना पॅसेजमध्ये पडलेला तो देह दिसला. आंबूस वास आणि माश्या त्याच्या तोंडाभोवती घोटाळत होत्या. नाक दाबून त्यांनी तोंडातले ज्येष्ठमधाचे खांड त्यांनी या गालातून त्या गालात सरकावले, आणि पलिकडच्या डब्यात आपला देह खिडकीजवळच्या जागेत रिचवला. बाक जरा कुरकुरले. तो लालू का कोण तो आल्यापासून रेल्वेची वाट लागली होती. रेल्वेची कशाला, देशाचीच वाट लागली होती. भाजपचे राज्य होते तेव्हा किती चांगले होते. हं!

त्यांनी पिशवीतून सकाळ काढला आणि वाचायला सुरुवात केली. आता त्याच्यावरून ही बया बडबडायला घेणार. स्वतः लोळत पडणार सात सात वाजेपर्यंत, आणि राणीसाहेबांना हातात पेपर पाहिजे. रात्री उशीरापर्यंत कामं असतात असं म्हणून केव्हाही बेरात्री यायचं, आणि मग लोळत पडायचं. कसली कामं असतात इतकी कोण जाणे. तसा राहुलही येतो की उशीरा कधी कधी, पण तो साडेसहाच्या वर कधी झोपलेला आठवत नाही. शेवटी शिस्तच तशी लावलीय ना.

"या गुरुवारी पाणीपुरवठयात कपात" ही त्यांना थेट भिडणारी बातमी त्यांनी चवीने वाचायला घेतली.

=====

मागून तिकीट काढून येत असलेली मृणाल इकडे तिकडे माना वेळावत येत होती. आईला एकटीला सोडत जाऊ नकोस म्हणून दादाने बजावून बजावून सांगितले होते. केवळ दादाने सांगितले म्हणून ऐकणाऱ्यांतली खरे तर मृणाल नव्हती. पण पैशाचा मुख्य स्त्रोत दादा असल्याने तिला मुकाट ऐकणे भाग होते. तशी वहिनीही कमावत होती म्हणा. पण तिला माजच फार. एकदोनदा तिच्याकडे पैसे काय मागितले, तर लगेच "कशाला हवेत" नि "इतके कशाला हवेत" असले प्रश्न सुरू झाले. दादा कसा, मुकाट काढून देई.

आज वडगांवला जाऊन तसे ती पकणारच होती. पण कोण जाणे, कुणी तिथे भेटेल, आणि वर्गातल्या त्या ठाणेदारांच्या शिल्पासारखे आपलेही जमून जाईल या आशेवर ती चालली होती. शिल्पा तर याच वर्षी वर्गात आलेली होती मुंबईहून, आणि तरीही तिचे पटकन जमून गेले होते. मृणाल एस वाय ला चार वर्षे डेरा टाकून बसली होती तो निघायचे चिन्ह दिसत नव्हते. त्यावरून वहिनीचा भोचकपणा सुरू झाला की दादा हळूच तिची बाजू घेई. म्हणजे वहिनीसमोर तोंड उघडून बोलत नसे फारसा, पण गुपचूप पैसे मात्र लागतील तेवढे पुरवी. आता अमेरिकेला जाण्याआधीही त्याने हळूच तिला आयसीआयसीआय मध्ये खाते उघडून दिले होते. त्यामुळे स्टेट बँकेतल्या नि महाराष्ट्र बँकेतल्या सर्वांना ज्ञात खात्यांखेरीज वेगळ्या पैशांची तरतूद झाली होती. उगाच वहिनीसमोर तोंड वेंगाडायला नको.

आज घरापासून येताना तिने रिक्षात बसल्याबसल्या रस्त्यावरच्या लोकांचे निरीक्षण सुरू केले, आणि तिला जाणवले की तिच्या दृष्टीने 'योग्य' असा एकही माणूस रस्त्यावर सकाळी सहाला नव्हता. या आयटीतल्या लोकांना जाग्रणं फार करावी लागतात. मग सकाळी लौकर कुठून उठणार ते? एस वाय पार करण्याची जरी परिस्थिती नसली, तरी आयटीमधल्या लोकांकडे भारंभार पैसा असतो एवढे तिला कळत होते. आणि आपले सगळे शौक पुरे करायला असलाच नवरा हवा हे तिला पक्के कळले होते.

आता वडगावसारखा खेड्यात असा आयटीवाला माणूस कुठून येईल या प्रश्नाला तिच्याकडे उत्तर नव्हते. पण आईसारखाच तिचाही चमत्कारांवर विश्वास होता. 'असेल नशिबात माझ्या तर येईल तिथे' असा विचार करत तिने पाय फलकावत जिना उतरायला सुरुवात केली.

तिला अचानक जाणवले, की जिना उतरताना होणारी पायांची हालचाल (आडवी आडवी पावलं), आणि हिंदकळणारी छाती यामुळे आपण एकदम फॅशन टीव्हीवरची मॉडेल असल्यासारखे वाटू लागले आहे. कित्ती मज्जा! त्यांना तर कितीच्या किती पैसा मिळतो, आणि सतत परदेशी हिंडायलाही मिळते. दादा आत्ता अमेरिकेत गेला आहे तर जाताना लंडनला स्टॉपओव्हर होता तर तो बाहेर जाऊन हिंडून आला म्हणत होता. पण ते किती, जेमतेम चार तास. असले भाकड हिंडणे सोडून आपल्याला थेट लंडनमध्ये राहता येईल!

उड्या मारतच तिने उरलेला जिना पार केला आणि आई कुठे बसली आहे ते बघायला सुरुवात केली.

=====

"प्यारेलाल रामप्रकाश अगरवाल" अशी पाटी मिरवणाऱ्या फलाटावरच्या स्टॉलवर लगबग सुरू झाली. बहराईचहून पोट भरण्यासाठी आलेला उमेशकुमार (उच्चारी उमेसकुमार) उठून सिग्नल कॅबिनच्या पुढे जाऊन पोट साफ करून आला होता. त्याने आता बटाटवडे आणि समोसे यांच्यात सारण म्हणून जाणे हे जीवित्कार्य असलेले बटाटे उकडायला लावले आणि मिरच्या कापायला घेतल्या. मिरच्यांचा तिखटपणा हातात चांगलाच मुरतो, तो निघण्यासाठी आधी बटाटे कुस्करताना त्यात, आणि वडे करताना बेसनात हात चांगले घुसळून घ्यावे लागतात हे तो इथेच शिकला होता. त्याने दिवसाला पुरतील एवढ्या मिरच्यांचे काम केले आणि कांदे कापायला घेतले.

इथे येऊन वर्ष होत आले, तरीही त्याने स्टेशनाबाहेर एक किलोमीटरही मजल मारली नव्हती. एकदाच अगरवालशेटचा माणूस त्याला शिर्डीला घेऊन गेला होता. सांई सांई.... आठवण होताच त्याने जमतील तेवढे हात जोडले. सबका मालिक एक. तो मालिक आपल्याला परत गावी कधी पाठवेल? निवडणुकीच्या वादातून उमेसच्या वडिलांचा भर चावडीवर खून झाला होता. आणि "इस हरामी चंदरपालका वंस मिटा देंगे" ही खुन्याची आरोळी ऐकताच उमेसच्या आईने त्याला तातडीने बाहेर धाडले होते. जीव मुठीत धरून ती कशीबशी जगत होती. तिला थेट पैसे पाठवणे म्हणजे आपला पत्ता 'त्यां'ना कळवण्यासारखे होते. त्यामुळे तो मनिऑर्डरी कायम नॉयडातल्या टंडन मामाजींना करत असे.

अचानक का कुणास ठाऊक, त्याला हुंदका दाटून आला. आत्ताच्या आत्ता निघून जावे, कुठेही, कसेही, आणि जातच राहावे असे त्याला तीव्रतेने वाटले. समोर उभ्या असलेल्या लोकलकडे त्याने आसुसून पाहिले. पण ही लोणावला की लोनावला इथपर्यंतच जाते म्हणे. बंबईला जाणाऱ्या एखाद्या गाडीत बसून गेले पाहिजे.

खोल नि:श्वास टाकून त्याने चहाचा पहिला घाणा करायला घेतला. जिन्याखालच्या म्हातारीला पहिला चहाचा कप देण्याची पद्धत गेले तीनचार आठवडे पडून गेली होती. त्या म्हातारीत त्याला अगदी लहानपणी पाहिलेली गोंड्याची नानी दिसत असे. त्यामुळे तिचे नामकरणही त्याने 'नानी' असेच करून टाकले होते.

नानी उठली की नाही हे पहायला त्याने पाऊल उचलले आणि बटाट्यांचे पाणी फसासून उतू जायला लागले. पटकन त्याने पाऊल आवरले.

=====

यादवच्या भोंग्याचा आवाजाने जागृतावस्थेच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केलेल्या वत्सलाताईंनी बराच पल्ला गाठला होता. आता थंडी हाडापर्यंत भिनलेली जाणवू लागली होती. संवेदना परत येऊ लागल्या होत्या.

वांझोळ्याच्या वैद्यांच्या घरची सून आणि मग कर्ती सवरती बाई आज इथे फलाटाच्या जिन्याखाली कशी पोचली याचा फिरफिरून येणारा विचार त्यांना हुंदका दाटून आणू लागला. कूस वांझ निघाली म्हणावी तर तसे नव्हते. चांगले गोकुळ होते. सासुरवास म्हणावा तर त्या थोरली सून म्हणून घरात आल्या होत्या, आणि लग्न होतानाच सासू नव्हती. दिवसाला पन्नास माणसांचा तरी स्वयंपाक लागे असे नांदते घर. घरात पिढीजात चालत आलेली सावकारी. पार पेशव्यांना कर्ज देण्याची ऐपत असलेला घराण्याचा मूळ पुरुष.

पण मुंबईला जाऊन सट्टा खेळायचा नाद त्यांच्या यजमानांना लागला आणि चित्रातले रंग पाहता पाहता ओसरून गेले. "जास्तीचीच तर आहे.... एवढी देखभाल झेपवतेय कुणाला" असे म्हणत माळावरची आंब्यांची वाडी विक्रीला निघाली, आणि मग सावकारीऐवजी विक्रीचे दुकानच सुरू झाले. पार त्यांच्या हातातल्या बांगड्यांपर्यंत आणि त्यांच्या राहत्या घरापर्यंत तो वणवा पाहता पाहता भडकला. पती परागंदा झाला. थोरल्या लेकाने विष खाऊन जीव दिला. धाकटा मिल्ट्रीत का नेव्हीत गेला आणि त्याने घराचे नाव साफ टाकले. दीर भावजयांनी आपले अंग शिताफीने सोडवून घेतले.

त्या माहेरी चिपळुणास गेल्या. पण भाऊ अपघातात निवर्तल्यावर त्याच्या बायकोने परत दरवाजा दाखवला. मग कराड. त्या जरी मॅट्रीक पास होत्या, तरी लग्न झाल्यावर त्या शिक्षणाचे लोणचेच झाले होते. बाहेर पडल्यावर पोळपाट लाटणे हाती घेण्यावाचून गत्यंतर नव्हते.

पन्नाशी उलटून गेली असली तरी त्यांचा देह अजूनही स्त्रीचाच होता. वासनांध पुरुषांना आठ ते ऐशी या वयोगटातील कुठलीही स्त्री 'मादी'च दिसते. अशांनी त्यांना सवयीने कोंडीत गाठले. खोटा चोरीचा आळ आणून फौजदारानेच त्यांना पोलिस ठाण्यात नासवले. मग गावभरच्या फुकट फौजदारांनी 'बामणाची रांड' म्हणून त्यांच्या देहात उरलेली विजीगीषा पार चोखून, चोळून, तुडवून काढली.

हळूहळू त्यांना दिवस नि रात्र यातील फरकही कळेनासा झाला. कुठले देहधर्म कुठे उरकावेत याबाबत निरिच्छता उमटू लागली. आणि "वेडी" म्हणून त्यांची कराडच्या स्टेशनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आपण वेडे नाहीत हे सांगायचाही त्यांना कंटाळा आला, आणि त्या भूमिकेत त्या शिरू लागल्या.

तिथून इथे आपण कसे आलो हे काही त्यांना संगतवार कळत नव्हते. पण सकाळी सकाळी चहा देणाऱ्या त्या पोरगेल्या मुलाकडे पाहून काहीतरी आठवते आहे, आपणही माणूस आहोत, अशा शंका त्यांना येऊ लागल्या होत्या.

=====

नायब सुभेदार सतबीरसिंग कोहली वेटिंग रूममधून पळतच बाहेर पडला. सकाळच्या सह्याद्रीपर्यंत थांबले तर थेट रिपोर्ट करायला जायचीच वेळ झाली असती. या लोकलने गेले की तास-दीडतास तरी घरी मिळाला असता. मुन्ना आता त्याला 'डॅडी' म्हणू लागला होता, आणि ते ऐकायला मिळावे म्हणून सतबीरसिंग गुरुद्वारातूनही लौकर परतला असता.

छे..... छे! वाहेगुरूंसमोर कुठला मुलगा नि कुठली बायको? सतबीरसिंगने कानाच्या पाळ्यांना हात लावला, "सतनाम वाहेगुरू, सत श्री अकाल" पुटपुटला आणि आपली भलीथोरली काळी ट्रंक सावरत जिना उतरू लागला. उतरल्या उतरल्या समोरच असलेल्या कँटीनमध्ये चहा घेण्याइतका वेळ आहे का हे त्याने फलाटावरच्या घड्याळात मान वाकडी करून पाहून घेतले. "लौकर उठव" असे सांगूनही त्या वेटिंग रूममधल्या चपराशाने उठवले नव्हते. हे वॉरंटवर प्रवास करणारे मिलिट्रीवाले बख्शीश देत नाहीत हे त्याला माहीत होते बहुधा. असू दे, पुन्हाच्या वेळेला अख्खी बटालियन हलेल तेव्हा पाहून घेऊ त्याला.

नुकतीच मिसरूड फुटलेला तो पोरगा चहाची मोठी किटली भरतच होता. "बेटा, एक चाय दे दे जल्दीसे गरमा गरमवाली" या सतबीरसिंगच्या मऊ आवाजातल्या वाक्याला त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. सदैव नाकाच्या शेंड्यावर असलेला राग पटकन सतबीरसिंगच्या डोक्यात गेला. "ऍ, सुनाई नही देता है क्या कान से? "

तो पोरगा त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून एक कप भरून पळत जिन्याखाली गेला. लोकलचा भोंगा झाला. चहाचा मोह सोडून सतबीरसिंगने आपली ट्रंक समोरच असलेल्या डब्याच्या दारात सरकवली. पॅसेजमध्येच पलिकडे पडलेला तो म्हातारा त्या खरखरीनेही हलला नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करून सतबीरसिंगने ट्रंकेवरच आपली बैठक जमवली.

=====

धापा टाकत नामदेव जिना चढू लागला. लोकलचा भोंगा ऐकल्यावर त्याच्या चालण्याचे पळण्यात रूपांतर झाले. थंडीतनं त्याच्या मायेला लौकर उठून त्याचा डबागिबा करून देणं दिवसेंदिवस जड जात होते. लग्नाचा तिचा आग्रह आता बळावत चालला होता. पण नामदेवला अजून म्हाताऱ्याचे उरलेले कर्ज फेडल्याशिवाय एखाद्या मुलीला आपल्या गरिबीच्या संसारात ठिगळ लावायला आणण्याची कल्पना रुचत नव्हती. त्याचा म्हातारा सखाराम काटवाटे हा टीबीने खोकखोकून हल्लक झाला, आणि कर्ज करकरून मुलाला जडभारी करून गेला.

नामदेवचा शाळेत हुशार म्हणून कधीच दुर्लौकिक नव्हता. त्यामुळे दहावीनंतर शाळा सोडावी लागली याचे त्याला दुःख वगैरे काही झाले नाही. एका प्रिंटरकडे हरकाम्या म्हणून नोकरीला सुरुवात करून तो कष्टाने पै पै जोडत राहिला, कर्ज फेडत राहिला. तिथे असताना त्याला एका शिक्षणसम्राटाने उचलला आणि स्वतःकडे शिपाई म्हणून ठेवला. इतका कष्टाळू, प्रामाणिक आणि पैशांच्या बाबतीत नावाप्रमाणेच संतपदाला पोचलेला माणूस मिळणे कठीण नव्हे, अशक्य होते. मे-जून-जुलै या हंगामात डोनेशनचे आलेले पन्नास पन्नास लाखांचे पीक तो निरीच्छ वृत्तीने संभाळत असे. एकदा इंकम टॅक्सची धाड पडणार असल्याची खबर आली तेव्हा तर नामदेवच्या नाना पेठेतल्या तीनखणी घरात कोट्यवधी रुपये मुक्कामाला आले होते. पण त्यातील पाचशेची एखादी नोटही (याहून लहान रकमेच्या नोटा त्यात नव्हत्या) उडवण्याची कधी नामदेवला इच्छा झाली नाही.

आता त्या शिक्षणसम्राटाने लोणावळ्यात हातपाय पसरायला घेतले होते. आणि तिथल्या एकंदर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नामदेवइतका योग्य माणूस त्याला सापडला नाही.

त्यात आणखीन एक पदर असा होता, की तो शिक्षणसम्राट एकपत्नीव्रताचे कागदोपत्री पालन करीत असला, तरी प्रत्यक्षात 'एकाला दोन असलेल्या बऱ्या, तीन असल्या तर उत्तमच' असे त्याचे धोरण होते. त्यामुळे कॅंपसगणिक त्याची विश्रांतीस्थाने असत. लोणावळा कँपसमध्ये असलेले प्रेमपात्र आपल्या अपरोक्ष पैशांचे काही वेगळेच व्यवहार करते असा त्याला संशय होता. बिछाना आणि कामाचे टेबल यांच्यात तो शिक्षणसम्राट गल्लत करणारा नव्हता. नाहीतर तो या पदाला पोचलाच नसता. पण केवळ संशयावरून अशी फडफडीत पापलेटसारखी बाई सोडायलाही तो तयार नव्हता. त्यावर उपाय म्हणून नामदेवची तिथे 'बदली' करण्यात आली होती. आणि तो आपल्या खास मर्जीतला आहे याचा कुणालाही सुगावा लागू नये म्हणून नामदेवला जाण्यायेण्यासाठी लोकल, आणि नंतर तीन किलोमीटर पायपीट असा क्रम आखून देण्यात आला होता. पगारात साडेसहाशे रुपयांची घसघशीत वाढ मिळाल्याने नामदेवही खूष झाला होता. आता त्याच्या म्हाताऱ्याचे कर्ज दीड-दोन वर्षात फिटले असते.

जिन्यावरून दोन-तीन पायऱ्या एकेका झेपेत उतरत त्याने डब्यात जो सूर मारला, तो ट्रंकेवर बसलेल्या मिलिट्रीवाल्या सरदारजीच्या गळ्यातच पडला. "क्यों बे डफ्फरकी अवलाद, दिखाई कम देता है क्या आँख से? " सरदारजी भडकला. रात्रीच्या रमचा शिळा वास भपकन नामदेवच्या नाकात घुसला. "सॉरी पापाजी, गलतीसे मिष्टेक होगयी" असे म्हणून नामदेवने सरळ सरदारजीचे बूट धरले. 'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती' ही उक्ती नामदेवइतकी कुणीही सार्थ केली नसेल. दुसऱ्यांच्या पाया पडून आपले डोके वाचत असेल तर ते करायला त्याची तिळमात्र ना नसे. स्वाभिमान, आत्मभान असली पिलावळ जन्माला घालणारी घरे वेगळी असतात, आणि आपले घर त्यातले नव्हे हे त्याला पक्के ठाऊक होते.

सरदारजी एकदमच पटकन निवळला. "जरा देखके चला करो बेटा, भागादौडीमे एकाध हाथपांव तोड लोगे..... " असे म्हणून त्याने नामदेवला सावरून उभे केले.

पलिकडे दोन फुटांवर कॉरिडॉरमध्येच आडव्या पडलेल्या म्हाताऱ्यावर याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसले नाही.

=====

कुठल्यातरी लांब पल्ल्याच्या गाडीला निरोप देण्याकरता स्टेशनावर सनई लावली होती. तोच आपल्यालाही निरोप असे मानून गचका देऊन गाडी सुरू झाली. आउटर जेमतेम क्रॉस केला आणि पेंटोग्राफची घरघर सुरू झाली. मालधक्क्याजवळच्या झोपड्यांतून कोठा साफ करायला बाहेर पडलेल्या लोकांना बाजूला करण्यासाठी सावंतांनी भोंग्याचा मनसोक्त वापर केला.

मागे गार्डच्या कॅबिनमध्ये यादव डोके फिरवून बसला होता. "ये साले सावंतको एकबार आडे हाथ लेना चाहिये| बहुत ऊधम मचाता है हरामी| एक तो जरा चैनसे पीनेका फुर्सदभी नही मिलता ये रेल्वेके स्टाफरूममे| घर जाओ तो बीबी हाथ फैलाये बैठी रहेगी.... ये चाहिये, वो चाहिये.... पनौती है पनौती| ये साला सावंत का समझता है, इंडियन रेल्वे इसके बलबूतेपे चलता है? का जरूरत है इतना फुदकनेका? गाडी चलती रहेगी, कभी लेट होती रहेगी..... लेट तो डेक्कन क्वीनभी होती है पांचदस मिनट इधर उधर.... " पण या सगळ्या स्वगतामध्ये खूपच व्यत्यय येत होते. कारण भानगड अशी होती, की चालत्या गाडीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे राहिले तर खोल खोल दरीत कोसळून कुठल्याही क्षणी आपल्या डोक्याच्या ठिकऱ्या होतीलसे वाटे. आणि त्या दिशेला तोंड करून उभे राहिले तर मग सगळे कंट्रोल्स पाठीमागे राहत. शेवटी खिशातून क्वार्टर काढून त्याने एक थेट जळजळीत घोट घेतला. आता जरा जग स्थिरावल्यासारखे वाटू लागले.

प्रातर्विधी या संस्कृतप्रचुर नावाखाली रुळांच्या दोबाजूंना चाललेले उद्योग आसमंतात दरवळत होते. छायाकाकूंना ढवळून आल्यासारखे झाले. त्यांनी घाईघाईत आपली पर्स चापसून अजून एक ज्येष्ठमधाचे खांड काढले आणि दोन गालात दोन खांडे ठेवून गायीसारखे दाभाड हलवायला सुरुवात केली.

मृणालचा सर्व डब्याचा सर्व्हे करून झाला होता. आणि चमत्कारांवर तिचा विश्वास असला, तरी अजून कुठलाही चमत्कार झालेला नाही हे तिला उमगले होते.

सतबीरसिंगने कॉरिडॉरच्या भिंतीला पाठ आणि डोके टेकून एक डुलकी काढता येईल का याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली.

नामदेवने कॉरिडॉरच्या भिंतीला उभ्या उभ्या पाठ लावली, आणि डावा पाय दुमडून मागे लावला. असे आलटून पालटून करत राहिले म्हणजे पाय दुखत नसत.

शिवाजीनगरला प्लॅटफॉर्म ट्रॅकला गाडी घेताना खडखडाट झाला, गाडी आता रुळावरून उतरते की काय असे कलंडायला आली आणि परत सरळ झाली. चाकांचा खडखडाट, पेंटोग्राफचा घरघराट आणि भोंग्याचा भणभणाट यांचे एक मिश्रण रटरटू लागले.

(क्रमशः)