पंचनामा २

कानठळ्या बसवणारा भोंगा गर्जवत आणि साखळदंडांचा लोखंडी खणखणाट करत जयगडच्या बंदराला बोट लागली आणि गणेशमास्तरांनी आपली पिशवी उचलली. ऐन विशीत मॅट्रीक उतरल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली होती. नीट लिहितावाचता येते एवढ्या बळावर फिनिक्स मिलमध्ये त्यांना टाईमकीपर म्हणून नोकरी मिळाली. दोनतीन वर्षातच त्यांनी पगारकारकून होण्यापर्यंत मजल मारली. दहा वर्षात ते मुख्य सुपरवायझरचा उजवा हात होऊन गेले. दरम्यान रीतीप्रमाणे त्यांचे लग्न झाले. बायको आडिवऱ्याला आणि नवरा परळच्या लक्ष्मी कॉटेजमध्ये बाप्यांबरोबर हेही रीतीप्रमाणेच झाले. गणपती-शिमग्याला घरच्या वार्या आणि त्यांत मिळालेल्या नितकोर सहवासातही निसर्गाने चोख बजावलेले काम हेही रीतीप्रमाणेच झाले.

रीतीवेगळे झाले ते हे, की मुलीचे नाव त्यांच्या आईने सुचवल्याप्रमाणे अनुसूया किंवा मालती ठेवण्या ऐवजी मुलीच्या आईने सुचवल्याप्रमाणे नंदिनी ठेवले. दुसरी रीतीवेगळी झालेली गोष्ट म्हणजे मुंबईत आता वेगळी खोली सहज परवडत असूनही पैसा गाठीला राहण्यासाठी त्यांनी अजूनही बायको आडिवऱ्याला आणि आपण एका खोलीतल्या चार बाप्यांपैकी एक अशीच विभागणी अजून ठेवली. तिसरी रीतीवेगळी झालेली गोष्ट म्हणजे लक्ष्मी कॉटेजच्या त्यांच्या खोलीत त्यांनी सुरू केलेल्या विनामूल्य शिकवण्या. जेमतेम लिहिण्यावाचण्याची अक्कल असलेली माणसे कोंकणातून बिगारी म्हणून येतात आणि घरी मनीऑर्डरी करताना पोस्टातल्या लिखाण-कारकुनासमोर ओशाळगत बसतात हे त्यांना खटकले. चौथी रीतीवेगळी झालेली गोष्ट म्हणजे दहा वर्षांत जमतील तितके पैसे नेटाने साठवून त्यांनी परत गावी येण्याचा निर्णय घेतला. घरचे उत्पन्न दोन वेळेस पुरेसे एवढे होते. साठवलेल्या पैशातून स्वतः शाळा काढण्याचा त्यांचा विचार होता.

सुमतीने साथ दिली आणि तो तडीसही गेला. पहिली दहा वर्षे तर शाळा त्यांच्याच मांगरात भरली. फी अशी नव्हतीच. पण शाळेतल्या मुलांच्या पालकांनी 'जमेल ते' या सदराखाली लाल तांदळापासून नाचणीपर्यंत आणि काजूच्या बोंडांपासून घोळाच्या पालेभाजीपर्यंत गणेशमास्तरांच्या घरात भरले. हलव्याची जोडी आणि माडीचा शिसा देऊ करणार्या भंडाऱ्यांच्या प्रकाशला मात्र नाराज करावे लागले.

सुमतीची साथ त्यांना फार काळ लाभली नाही. तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, तेव्हा रोग तिसऱ्या टप्प्यात होता. फार हाल हाल न होता ती गेली एवढेच काय ते समाधान.

नंदिनी त्याच शाळेत शिकली, थेट दहावीला बसली, जिल्ह्यात पहिली आली, बारावीला तर बोर्डात पहिली आली आणि बी ए करायला रत्नागिरीला गेली. बी ए नंतर तिने बी एड केले आणि वडिलांच्या शाळेत शिकवायला ती घरी परतली. एव्हाना ती चांगलीच उफाड्याची झाली होती. डोळे आणि रंग तिने आईकडून घेतला होते. निळेभोर डोळे आणि सोन्यासारखे झळाळणारे गोरेपण.

ऐन उमेदीत अर्धपोटी, अर्धझोपी काढलेले कष्ट आता गणेशमास्तरांना जाणवू लागले होते. पण मुलगी हाताशी येताच त्यांचा हुरूप आणखीनच वाढला. चारच वर्षांत त्या दोघांनी मिळून शाळेचा लौकिक अख्ख्या महाराष्ट्रात पसरवला. नंदिनीने तर लग्न न करता शाळेलाच वाहून घेण्याचा निर्णय घेतला. गणेशमास्तरांनी आडकाठी आणायचा प्रश्न आला नाही. कारण या एका बाबतीत नंदिनीने नेहमीची अदबशीर वागणूक सोडून दिली. आणि मास्तरांना 'विचारण्या'ऐवजी 'सांगितले'.

वयाची साठी पार करत असतानाच मास्तरांना राज्य शासनाचा विद्या महर्षी पुरस्कार जाहीर झाला. अख्खी पंचक्रोशी उत्साहाने उफाळून उठली. मास्तरांचे जागजागी सत्कार झडले. नंदिनीने त्यांच्या बरोबर मुंबईला पुरस्कार सोहळ्याला जायचे आणि तिथून बापलेकीने पुणे दौरा करायचा असे ठरले. गिरणीत कामाला असतानाही मास्तरांना पुणे घडले नव्हते. नंतर त्यांनी गेल्या तीस वर्षांत आडिवरे आणि जयगड एवढेच काय ते त्यांनी प्रवासले होते. आणि नंदिनीने तर आडिवरे, जयगड, रत्नागिरी हा त्रिकोण कधीच भेदला नव्हता.

पुरस्कार वितरण सोहळा यथातथाच होता. शिक्षणमंत्री त्यांच्या प्रथेप्रमाणे उशीरा आले. मग त्यांनी शिक्षकांना बरेच उपदेशामृत पाजले. गुरुजींनी तंबाखू खाऊ नये, चांगले संस्कार करावेत इ इ. त्यांच्या भाषणानंतर समारंभ संपणारच होता. त्याप्रमाणे निवेदकाने आभारप्रदर्शनाचे दळण दळायला घेतले. एवढ्यात गणेशमास्तर ठाम पावले टाकत माईकपाशी गेले, आणि म्हणाले, "मी या पुरस्काराबद्दल परत एकदा आभार मानतो, आणि दोन शब्द बोललो तर ऐकून घ्याल अशी आशा करतो. आज मला हा पुरस्कार मिळाला, आनंद आहे. पण या पुरस्काराचे अनेकानेक मानकरी अजूनही अंधाऱ्या कोपऱ्यांत, दुर्गम खेड्यांत विखुरलेले आहेत. शिक्षकांनी काय करावे हे शिक्षकांखेरीज प्रत्येकजण सांगत असतो. त्यातील 'मास्तरांनी व्यसने करू नयेत' हा मुद्दा अजिबात विवादास्पद नाही. पण यातून इतर सर्व लोक व्यसने करायला मोकळे हा जो अर्थ ध्वनित होतो तो निश्चितच आक्षेपार्ह आहे. शिक्षकाइतकेच महत्त्वाचे, किंबहुना, लोकशाहीमध्ये त्याहून वरचे, स्थान लोकप्रतिनिधींचे आहे. तर लोकप्रतिनिधी हा व्यसनमुक्त असावा, शुद्ध चारित्र्याचा असावा, भ्रष्टाचारी नसावा या अपेक्षा ठेवणे गैर नसावे. दुर्दैवाने प्रत्यक्षात तसे घडताना अगदी अभावानेच दिसते. अशा या लोकप्रतिनिधींचा कुठेही कार्यक्रम असला की शाळेतले विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा तासंतास उन्हातान्हात झेंडे घेऊन उभे, आणि शिक्षक त्यांच्यावर देखरेख करताहेत हे दृष्य जिथे जावे तिथे दिसते. शिक्षकांचे पगार महिनोन महिने होत नाहीत. गावकऱ्यांनी वर्गणी काढून शिक्षकाला जगवण्याची पाळी येते. या वेळेवर न मिळणाऱ्या पगारातही शाळेचा निकाल जर कमी लागला तर कपात होते. कामाला हाताशी आलेला मुलगा शाळेतून काढून घरातली उपासमार कमी करू पाहणार्या शेतकऱ्यांमुळे शिक्षकाच्या घरात उपास का पडावेत? मी इथे व्यसनांचे समर्थन करायला उभा नाहीये. मी स्वतः एकही व्यसन करीत नाही, केले नाही आणि करणारही नाही. पण शिक्षकांसारखी जबाबदार व्यक्ती जेव्हा छोट्या-मोठ्या व्यसनांच्या आहारी जाते, तेव्हा त्या घटनेचे अति-सोपेकरण करून शिक्षकांना उठसूट झोडपू नये एवढीच विनंती. शिक्षकही याच समाजात जगतो, त्यामुळे त्यालाही समाजात बोकाळलेले दोष चिकटले तर त्यात केवळ त्याचाच दोष आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे? असो. कुणाला दुखवण्याचा हेतू अजिबात नाही. तरीही यात काही अधिक वावगे वाटले तर माफ करा".

पूर्ण सभागृह चटकन उठून श्वास रोखून थांबले. गणेशमास्तर खाली बसल्यानंतर हलक्या हाताने टाळ्या वाजल्या. त्यांच्या आवाहनाला धक्का लागू नये इतक्या हळुवारपणे.

राजकारणात येण्याआधी आपण मूळचे शिक्षकच असल्याची भलावणी जिथे तिथे करणारे शिक्षणमंत्री अंगभूत निर्लज्जपणे हसत निघून गेले.

=====

मुंबईच्या मुक्कामात मास्तरांनी नंदिनीबरोबर हिंडून जुन्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला. पण गिरणगावची झालेली अवस्था पाहून ते मनोमन हादरले. गिरणी-कामगार संपाच्या कहाण्या नि हकिकती त्यांनी वाचल्या-ऐकल्या होत्या. पण समोर दिसणारी चाळींची थडगी पाहून त्यांना भडभडून आले. हरवल्या नजरेने ते लक्ष्मी कॉटेजसमोरच्या फ्लायओव्हरखाली खूप वेळ उभे राहिले. अखेर नंदिनी त्यांना हात धरून सिंहगड एक्स्प्रेसमध्ये बसण्यासाठी व्हीटीला घेऊन गेली.

पुण्याला पोचल्यानंतरही मास्तर गप्पगप्पच होते. प्रभात लॉजमध्ये खोली घेऊन ते समोर दिसणारा वाहनांचा अथांग सागर पाहत बसले. दुसऱ्या दिवशी फर्ग्युसन कॉलेज आणि विद्यापीठ पाहून यायचे, संध्याकाळी तुळशीबाग, बेलबाग करून मग तिसऱ्या दिवशी देहू-आळंदी करायचे असा बेत ठरला.

==============================

विजयचे डोके फिरले होते. आपली म्हणवणारी माणसे केसाने गळा कापतात हे अण्णांचे लाडके मत एवढे खरे होईल असे त्याला वाटले नव्हते. आणि ते अण्णांसमोरच खरे झाले होते ही आणखीनच नामुष्की.

अण्णा गेली तीस वर्षे आमदार होते. गेली वीस वर्षे मंत्री होते. तालुक्यातले तिन्ही साखर कारखाने त्यांच्या इशाऱ्यावर नाचत. दूध उत्पादक संघ, द्राक्ष बागायतदार संघ, कुक्कुट उत्पादक संघ या तर त्यांनीच भविष्याची चाहूल घेऊन स्थापन केलेल्या संघटना. केवळ ऊस एके ऊस न करता शेतकर्याला या ना त्या मार्गाने चार पैसे मिळावेत ही त्यांची कळकळ. असा शेतकरी मग पिढीजात त्यांचा मतदार होई यात नवल नव्हते.

अण्णांना एकच मुलगा. मुलगी नाही. पुतण्या नाही. भाचा नाही. म्हणजे विजयचा मार्ग संपूर्णतया निष्कंटक. आता एवढे सहज सुटणारे गणित समोर असताना कुणाला जरा मजा करावीशी वाटली तर त्यात गैर काय?

विजयला एफ वाय पासून शिकायला पुण्याला ठेवले होते. पहिल्या वर्षी बुलेटवर खूष असलेला तो, दुसऱ्या वर्षापासून मारुती झेनमध्ये वावरू लागला. प्रत्येक वर्ष वेळच्या वेळी पास होत गेला याचे अण्णांना कौतुक होते. परीक्षेला स्वतःऐवजी दुसऱ्यालाच बसवण्याची विजयची युक्ती त्यांना माहीत असली तर तसे त्यांनी दाखवले नाही.

हळूहळू अण्णा आपल्याबरोबर त्यालाही नेऊ लागले. 'विजय'चे विजयसिंह व्हायला वेळ लागला नाही. पुढे विजयसिंहराजे झालेच. त्यातून एक फाटा फुटून विजयसिंहजीराजे असा गेला, तर दुसरा विजयसिंहराजेसाहेब असा गेला. "येऊन येऊन येणार कोण? @@@ शिवाय आहेच कोण? " या सदाबहार घोषणेत बसवायला ही नावे फारच लांबलचक होती हे खरे आहे. पण मग तिथे "आमच्या शिवाय" अशी तोड काढण्यात आली.

तर हे विजयसिंहराजे (फाट्यावरच थांबतो) पुण्यात शिकायला असल्यापासून त्यांचा पुण्यात स्नेहबंध चांगलाच जुळलेला होता. बरोबर शिकायला असलेल्या स्थानिक मुलांनी त्याचे पुण्याच्या भूगोलाचे आणि शरीरशास्त्राचे शिक्षण चांगलेच मन लावून केले. कॉलेज संपायच्या आतच त्याचे कल्याणीबरोबर लागेबांधे निर्माण झाले.

पदवीधर झाल्याझाल्या अण्णांनी गावाकडे बोलावून घेतले म्हणून नाईलाजाने तो गेला. त्यात अण्णांना हार्ट ऍटॅक आला, आणि "पुढची निवडणूक लढवणार नाही" असे ते जाहीर करून बसले. एव्हाना टाटा सफारी जाऊन पजेरो आली होती. त्यातून तर पुणे तीन तासांत गाठता येई. पण तेवढाही वेळ मिळताना मारामार. इकडे पुण्यात कल्याणीने फारच जिवाला घोर लावला होता. वेळीअवेळी विजयच्या मोबाईलवर तिचे फोन येत. म्हणजे, 'मिस्ड कॉल' येत. उलटे फोन करण्याची जबाबदारी तोच पार पाडे. पदवीधर झाल्यानंतर कल्याणी शपथेपुरती कुठल्यातरी सामाजिक संस्थेत जाऊन बसत असे (तिने बी ए ला सोशियोलॉजी घेतले होते; विजयने घेतले होते म्हणून). पण विजयला फोन करून दिवसातले दोन-तीन तास तरी गप्पा मारणे हेच तिचे मुख्य वेळ जाण्याचे साधन होते.

विजय आपल्याशी लग्न करेल असे तिला खरेच वाटत होते का, हा संशोधनाचा विषय ठरला असता. जरी 'ती' मर्यादा तिने विजयला ओलांडू दिली असली, तरी ती ओलांडणारा विजय पहिला पुरुष थोडाच होता? अर्थात विजयला हे माहीत नव्हते. गावाकडे गेल्यावर केवळ नाईलाजाने त्याने आपल्या शारिरीक गरजांच्या मोहरा उमटवायला सुरुवात केली असली, तरी त्याच्या दृष्टीने कल्याणी पहिले प्रेम होते. आणि काही ना काही युक्ती करून आपण तिच्याशी लग्न करू अशी त्याला आशा होती.

त्याची भीती एकच होती. कल्याणी ब्राम्हण होती. आणि या विरोधी पक्षांनी आधीच अण्णांच्या समाजवादी प्रतिमेविरुद्ध काहूर माजवायला सुरुवात केलेली होती. ते सच्चे मराठा नव्हेत असा प्रचार सुरू झाला होता. त्यात या बामणाच्या मुलीशी लग्न करणे धोकादायक ठरले असते. विशेषतः सोंडूरच्या घोरपड्यांची मुलगी सांगून आलेली असताना.

पण सोंडूरच्या घोरपड्यांची ती पालीसारखी पांढरीफटक, बेळगावातल्या घरी राहून फक्त परीक्षांना कॉलेजात जाऊन पदवीधर झालेली, उठताबसता 'जी, जी' करणारी सौदामिनिराजे त्याला फ्रीजमध्ये ठेवून ताजेपणा टिकवलेल्या काकडीसारखी भासली. तिच्यात कल्याणीसारखे घायाळ करणारे आवाहन नव्हते. च्यायला, लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीपण ही "जी, जी" करत @$#@$#@$#@$#@$#!!

कल्याणीचा गेले दोन दिवस नवीनच सूर लागला होता. "लौकर काय ते ठरव. मला फार थांबता येणार नाही. बाबा माझं लग्न करून द्यायला निघालेत. त्यांना आत्तापर्यंत हे ना ते सांगून थांबवलं. पण आता थांबवता येणार नाही. त्यांनी तर त्यांच्या बाजूने एक मुलगा पक्कासुद्धा करून टाकलाय" असे म्हणून तिने जे नाव घेतले, ते ऐकून विजयसिंहजीराजेसाहेब संतापाने हिरवे-पिवळे झाले. त्यांच्या घराण्याचे पिढीजात दुश्मन असलेले ते घराणे. निष्ठेने विरोधी पक्षात टिकून त्यांनी पार खासदारकीपर्यंत मजल मारली होती, मग ती राज्यसभेतली का असेना. ते घराणे म्हणजे अण्णांच्या उरातला सलणारा काटा होता. आणि त्या घराण्यातल्या संग्रामसिंहराजे नावाच्या.....!

खरेतर ऐकल्या ऐकल्या सुसाट निघून यावे अशी ही बातमी. पण तो दिवस होता नेमका पंचायत समितीच्या निवडणुकांचा. तालुक्यात विजयला पुढे करण्यासाठी अण्णांनी तो मुहूर्त शोधला होता. म्हणजे थांबणे आले. आणि दुसऱ्या दिवशी निकाल. निकालाचे पेढे भरवताना अण्णांना हळूच ही कल्पना द्यावी असा विजयचा विचार होता. पण निकालाचे पेढे वाटण्याची संधी त्याला मिळाली नाही. अण्णांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवून विजयसिंहजीराजेसाहेब साफ आपटले. अगदी डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. आणि अण्णांनी त्यांच्या प्रेमयुक्त जरबेच्या सुरात निवडक ज्येष्ठ लोकांकडे विचारणा केली, तर "अण्णासाब, तुमी राजकारणात हाईसा, आनिक आमास्नी दिसरात नदरंस पडतासा. बाळराजांच्या गाडीची तीन टायरं कायमची पुन्यात आनिक येकच हितं. मग जंतेनं त्यांना तुमचा वारस म्हनून कसं वो मानायचं? आनिक झालंच तर तुमी चारित्राकडून येकदम शुद्द. बाळराजंबी असत्याल शुद्दच, पन लोकं कायबाय बोलाय लागलं, पुन्यात त्यांचं असं न्हाय तसं हाय म्हनाय लागलं, त्यानं बिथारली बगा जनता" असे सरळसोट उत्तर आले. अण्णांना जिल्ह्याच्या हॉस्पिटलात दाखल करावे लागले. आता त्या गडबडीत कल्याणीचे दहा मिस कॉल येऊन गेले, पण घेणार कसे? शेवटी डॉक्टरांनी "आता धोका नाही" असे जाहीर केल्यावर अखेर त्याने पजेरो सुसाटवली.

आतापर्यंत तिच्या सहवासात काढलेले वेगवेगळ्या लॉजमधले दिवस (रात्री ती कधीच त्याच्याबरोबर राहिली नाही), आणि तिची ती वेगवेगळी जीवघेणी तंत्रे..... छे! राजकारण गेलं @#@त! अण्णांनी पुरेसं कमवून ठेवलं आहेच.... फक्त हिच्याशी लग्न करावे आणि आयुष्यभर... विचारांनीच त्याची कानशिले तापली. पँटच्या खिशात ठेवलेला चांदीचा चपटा फ्लास्क त्याने काढला आणि त्यातील शिवास रीगलची रेशमी धार गळ्याखाली उतरवली. खरेतर कल्याणीबरोबर याची लज्जत शतगुणित होई. पण आज त्याला अगदीच राहवेना. आणि मागे बॅगेत दोन फुल पडलेल्या होत्याच. हळूहळू त्याच्या रक्तातून आसक्ती वाहू लागली.

कल्याणीच्या घरी तो आत्तापर्यंत केव्हाच गेला नव्हता. काही ना काही कारण काढून तिने ते टाळले होते. एकदा केव्हातरी पत्ता तेवढा अतीव नाइलाजाने सांगितला होता. पुण्याच्या एका प्रतिष्ठित मध्यमवर्गीय वस्तीतला तो पत्ता होता.

तिथे गेल्यावर त्याला "या नावाची मुलगी, स्त्री वा वृद्धा इथे राहत नव्हती, आणि नाही" असे सडेतोड उत्तर मिळाले. उत्तर देणारा विजयच्या तोंडाकडे रोखून बघून नाक वाकडे करायला विसरला नाही.

त्याला आपण जिवंत आहोत की नाही हेच क्षणभर विसरायला झाले. तिला फोन केला तर तिने चक्क कट केला. आणि त्यानंतर तो स्विच ऑफ असल्याचा संदेश येऊ लागला. साली @#@# गेली की काय त्या संग्रामच्या पुढ्यात पालथी पडायला? वासना आणि संताप यांच्या मिश्रणाने त्याला सरळ दिसेनासे झाले. त्याने सरळ प्रतापला फोन लावला. प्रताप हा त्याचा पुण्यातला, सर्व भानगडी निस्तरायची क्षमता असलेला विश्वासू साथीदार. तो इथेच राहून महापालिकेत जाण्याच्या तयारीत कुसाळकर पुतळ्याजवळ कार्यालय थाटून बसला होता. त्याच्याकडे कुठल्याही प्रसंगी हातपाय तडफेने हलवू शकतील अशा साथीदारांचा अखंडित पुरवठा असे.

प्रतापने एका नवीन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे काम करायला घेतले होते. शंभर ठिकाणांहून हजार परवानग्या आणता आणता त्याला फेसाटायला झाले होते. आणि एवढे सगळे होऊनही गोष्टी पहिल्या घरातून पुढे सरकल्याच नव्हत्या. कुठूनतरी एखादा दणकट बांबू लावल्याखेरीज हे बाबूलोक जागचे हालणार नव्हते, नि अशा बांबूच्या शोधात प्रताप वणवण करीत होता. आत्ता तो दिवसभराचे काम संपवून घरी जाण्याच्या बेतात होता. आज मंगळवार होता, नि बच्चूजी महाराजांनी सांगितल्यापासून प्रताप कडक मंगळवार करू लागला होता. दारू नाही, मटण नाही नि बाई नाही.

प्रतापने लगेच येण्याचे कबूल केले. गाडी अजून जरा बाजूला घेऊन विजयने काळ्या काचा वर केल्या, आणि फ्लास्कच्या तुटपुंज्या पुरवठ्यावर अवलंबून न राहता थेट मागच्या सीटवरून एक खंबाच काढला. शिवास रीगलला पाणी-सोडा-चकणा लागत नाही हे त्याचे लाडके मत होते.

=====

दिवसभराचे फिरणे झाले तरी मास्तरांना ते कमीच पडले. आडिवऱ्याला बोल बोल म्हणता मैलोन मैल तुडवायची सवय, इथे रस्ते माहीत नसल्याने सगळीकडे बसने हिंडावे लागले. आणि बसस्टॉपवर उभे राहूनच पाय जास्त दुखायला लागले. तुळशीबाग, बेलबाग करून ते परतले तेव्हा सूर्यास्त जेमतेम होत होता.

"ऐकलेस गो? जरा येऊ या काय चार पावले टाकून? दिवसभर चालणे असे झाले नाही, जरा जडसे वाटते आहे" मास्तरांनी प्रस्तावना केली. नंदिनीने अलगद हुंकार दिला. मास्तर एकभुक्तच होते. नंदिनीलाही भूक अशी नव्हती. तिने कोपऱ्यावरच्या कुठल्यातरी हाटेलात मँगो मिल्क शेक घेतला. एक तर त्यावर ठेवलेला तो चेरी नावाचा प्रकार तिला रुचला नाही. आणि एकंदर चव घेतल्यावर तिने तिचे इवलेसे नाक मुरडून घेतले. "मरीमर साय घातल्ये फेटून..... नि साखर..... कचकचतेय दातांखाली..... आणि आंबा मात्र तोतापुरी! ". पैसे दिले आहेत या शुद्ध भावनेने तिने तो मोठाला पेला संपवला आणि दोघेही निघाले.

=====

प्रतापचा एवढ्याएवढ्यात गेम होताना वाचला होता. त्यामुळे प्रताप आला तो मारुती व्हॅनमधून, आणि दणकट माणसे बाजूंना बसवून. पजेरोत शिरल्यावर त्याला अंदाज आला, की प्रकरण खूपच चिघळले आहे. वासना अनावर झाल्यावर तिची पूर्ती झाली नाही, तर पुरुष जनावराच्या पातळीवर उतरायला वेळ लागत नाही हे प्रतापला माहीत होते. तो काही नंपुसक नव्हता की आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेऊन बसला नव्हता. प्रेम वगैरे गोष्टी भरल्यापोटी चघळायला बऱ्या असतात, पण नर-मादी या पातळीवर जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा त्याला एकच सनातन उपाय असतो हे त्याला पक्के कळले होते.

त्यामुळे वासना आणि मद्य यांनी तरबत्तर झालेल्या विजयला त्याने तत्परतेने रेश्मा आणि झीनत हे दोन पर्याय सुचवले. तो स्वतः त्या दोघींकडे जात असला, तरी त्यांच्यावर मालकीहक्क स्थापित करण्याचा मूर्खपणा त्याने केला नव्हता. या बायका मालकीहक्क किमान दुहेरी स्थापन करायला बघतात, आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर आपल्या गळ्यात बांधलेल्या साखळीत होते हे त्याला उमजले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या मित्राला आपण पैशांची मदत करावी वा आपली गाडी देऊ करावी वा आपले मंत्रालयातले काँटॅक्टस देऊ करावेत वा त्याचा गेम होणार असल्याची टीप द्यावी तितक्याच निर्लेपपणे त्याने ही मदत देऊ केली.

विजय एकदमच भडकला. "ओह शिट! केवळ @#$#@ साठी कशाला आलो असतो इथे? " (कल्याणीच्या समोर थिटे पडू नये म्हणून त्याने हा आंग्लाळलेला ब्राह्मणी लहेजा जिभेत भिनवून घेतला होता). "तिकडे गावाकडे काय @#$ नाहीशा झाल्यात काय? अरे, जाऊ देत ना.... तुला नाही कळायचं ते..... अरे नुस्तं @#@#@ नव्हे, ब्राम्हणी पाणी होतं ते, ब्राम्हणी....    तुझ्यासारखा या @#@#@ बायांच्यात नाही मला @#@#@".

प्रताप शांत बसला. बाई, बाटली आणि सिगारेट याबाबतीत जरी कुणी आपल्या ब्रँडला नावे ठेवली तरी त्यावरून गरम होण्यात काही मजा नसते हे त्याला कळले होते.

अचानक विजय ढसढसा रडू लागला. "I want her, dammit, I want her", चिरडीला येऊन त्याने गर्जना केली. आणि वखवखलेल्या नजरेने तो आसपास पाहू लागला. प्रतापने त्याला शांत करायचा प्रयत्न करत विजयच्या गावकडची खबरबात घ्यायला सुरुवात केली.

=====

आडिवऱ्याला लौकरच निवासी शाळा सुरू करावी असे नंदिनीचे आग्रही मत होते. मास्तरांना तो पैशांचा अपव्यय वाटत होता असे नव्हे, पण एकंदरीतच हातरूण पाहून पाय पसरावे असे त्यांचे आग्रही मत होते. निवासी शाळेचे खटले आपल्याला निभावणार नाही असे त्यांना मनापासून वाटत होते. स्वतःचे झालेले वय हा त्यातला एक मुद्दा होताच.

नंदिनीचा 'सावध ऐका पुढल्या हाका' असा आग्रह होता. गेल्या दशकभरात झपाट्याने झालेल्या बदलांबद्दल तिने वाचले होते. त्यातले काही तिने मुंबईत पाहिले होते. पुण्यामध्ये "ओंध", "बनेर", "सिंघड", "एफ सी कॉलिज रोड" अशी भाषा बोलत हिंडणारी आणि आपण सगळे भूमंडळ विकत घेतल्याच्या थाटात वावरणारी मंडळी ती पाहत होती. या सगळ्यात माझे आडिवऱ्याच्या पाटवाड्यातले साहिल घडशी नि राहुल कांबळे कुठे बसतील असा ती विचार करू लागली होती. घरी दर सायंकाळी दारूमाडी खाऊन लास झालेला नि कवटपोळीत मीठ कमी पडले म्हणून आयशीला झोडपणारा बाप असताना त्यांनी कसा विज्ञान प्रकल्प करावा नि कशी चंद्र उगवण्याच्या वेळांची प्रत्यक्ष निरिक्षणे घेऊन त्यातले बावन्न मिनिटांचे अंतर मोजावे? त्यांच्यासाठी निवासी शाळाच हवी. नाहीतर कोकण पहिल्यासारखे रामागडी पुरवठा केंद्र एवढे आणि एवढेच राहिले असते.

बोलता बोलता तिच्या लक्षात आले की त्या गल्लीतल्या रस्त्यावरचे दिवे चालू नव्हते. आडिवऱ्याला नि रत्नागिरीला राहिल्याने तिला लोडशेडिंग नावाच्या राक्षसाची चांगलीच जानपछान झालेली होती. पण इथे वेगळेच काहीतरी दिसत होते. घराघरांत दिवे दिसत होते, फक्त रस्त्यावरचे दिवे गायब होते.

मास्तर रातांधळे असे नव्हते, पण अंधारात त्यांना जरा सामधामीच दिसे. त्यांना उगाच कुठे ठेचकळायला होईल म्हणून परत फिरण्याचा तिने विचार केला. मास्तर बोलण्याच्या तंद्रीत हात पाठीमागे गुंतवून हळूहळू चालत होते. तिचा विचार शब्दांत उतरेपर्यंत ते त्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या वाहनावर धडकलेच. त्यांच्या अस्फुट किंकाळीने त्या वाहनाचा दरवाजा सर्रकन उघडला आणि आतून "दिखता नही है का मा@@@? " अशी आरोळी गरजली.

=====

गेम होताहोता वाचल्यापासून प्रताप माणसे बरोबर ठेवून हिंडू लागला होता. त्यात किमान दोन तरी बिहारी असावेत असा त्याच्या राजकारणातल्या गुरूंनी आग्रह धरला होता. "मराठी मानसं बोलाला ठीक असतेत.... गरज पडेल तर कट्टा काडून गेम वाजवाला भिहारीच पायजेत. त्येंना फुडं काय असा इचार नस्तो. समदी भिहारीच भरली तर भासेचा प्रॉब्लेम करतेत म्हनून येकदोन मराठे ठिवून दी" असा त्यांचा शब्दशः सल्ला होता. तो पाळून प्रतापने चंडी आणि शक्ती (अनुक्रमे चंडीप्रतापसिंह आणि शक्तीप्रतापसिंह)  असे दोन तिखट बिहारी पाळले होते. कुणीही आडवा जाण्याची शक्यता दिसली की आधी त्याची आयमाय काढून मगच पुढची चौकशी करण्याची त्यांची पद्धत इथे परिणामकारक ठरली होती. हिंदीत शिवीगाळ करायला घेतली की बहुतेक माणसे शेपूट घालतात हा महाराष्ट्रभर चालत आलेला पायंडा चांगलाच फळाला आला होता.

गाडीवर थेट कुणीतरी धडकल्याचा आवाज ऐकून चंडीचे डोके चटकन सरकले. त्याने व्हॅनचा दरवाजा सर्रकन उघडून "दिखता नही है का मा@@@? " अशी आरोळी गरजवली. आणि समोर दिसलेल्या देहाला उसळी मारून कवेत घेतले. तो देह एका म्हाताऱ्याचा आहे हे जाणवेपर्यंत सवयीने चंडीने त्या देहाला व्हॅनच्या आतमध्ये खेचून दोन सणसणीत कानफटात वाजवल्या.

(क्रमशः)