पंचनामा ३

अचानक झालेल्या या हल्ल्याने मास्तर गांगरले. त्या सणसणीत फटक्यांनी त्यांचा दुखरा कान वाहू लागला नि डोके भिरभिरू लागले. अवचित लाथ बसलेल्या कुत्र्याच्या पिलासारखे ते असहाय्यपणे कळवळून गेंगाटले.

मास्तरांपासून दोन हातांवर असलेल्या नंदिनीच्या लक्षात गोष्टी येईस्तोवर एवढे घडून गेले होते. अचानक तिला कानशिले गरम झाल्यासारखे जाणवले. अशी वागणूक आडिवऱ्यात कुणी गुरांना देता तरी ती खवळून उठती. इथे तर खुद्द जन्मदाता नि आयुष्यकर्ता पिता समोर होता. एडक्यासारखी मुसंडी मारून ती त्या व्हॅनमध्ये घुसली.

=====

विव्हळणाऱ्या त्या म्हाताऱ्याकडे पाहून चंडीला सूक्ष्म आनंद झाला. सात वर्षांपूर्वी तो असाच कळवळून विव्हळत होता आणि शिवपालगंजची जनता त्याला लाठ्याकाठ्यांनी झोडपत बाजारातून मिरवत होती. त्याचे डोके बोथट वस्तऱ्याने भादरले गेले होते आणि अंगाला शेण चोपडण्यात आलेले होते. त्याच्या विवस्त्र देहावरती चहूबाजूंनी धोंड्यांचा वर्षाव होत होता आणि कळवळून कळवळून त्याच्या जाणीवा बधीर होऊन गेल्या होत्या. शेवटी त्याला तुडवणाऱ्या लोकांचा उत्साह ओसरू लागल्याचे पाहून त्या पांडे दारोगाजीला दया आली, आणि "चलो हम इसे पुलिस थाने में बंद कर देते है..... सडता रहेगा.... " असे चार लोकांना समजावल्यासारखे करून त्याने चंडीला पोलिस ठाण्यात नेले. अंगाची घाण विसळायला बादलीभर पाणी देऊन मग पांडेने त्याला एक छोटेखानी व्याख्यान दिले. "छत्तरपालसिंगसे टेढा चलकर कोई बचा है आजतक गोरखपुरसे लेके यहांतक जो तुम बचोगे? कहांसे सिंग-सूंड-पूंछ निकल आयी तुम्हारी? अब सबकी सब एकही साथमे कटवा लिये ना? जिंदा बचे हो, वोभी आंखोसमेत| शुकर करो की भागलपुरवाला किस्सा नही हुवा तुम्हारे साथ| अब निकल पडो, और जिंदगीमें जहां चाहो चले जाना, यहां मत आना| एकबार बचे हो, दूसरीबार खानदानतक खो बैठोगे|"

चंडी थेट बंबईला पोचला. तिथे फूटपाथवर इस्त्र्या करताकरता त्याला कट्टा आणि गांजा या दोन्हींची लत जवळपास एकदमच लागली. गेली दोन वर्षे तो इथे पुण्यात होता. पण प्रत्येक गेम वाजवतानाच नव्हे, तर रस्त्यात आडव्या आलेल्या सायकलवाल्याला लाथाडतानाही त्याला शिवपालगंज आठवे आणि डोक्यात रक्त सळाळे.

दीनवाण्या आवाजात केकाटणाऱ्या त्या म्हाताऱ्याकडे तुच्छतेने पाहून तो त्याच्या तोंडावरच थुंकला. आणि सण्णकन त्याच्या कानशिलात एक बसली. "मेल्या, माणसासारखे वागायला शिकवले नाही का रे तुला कोणी? अरे जनावरेदेखील बरी तुझ्यापेक्षा. अशी बेमुर्वत मारझोड करीत नाही हिंडत ती". चंडीला दोन टक्केदेखिल समजले नाही. इथे मराठीशी झटायचा प्रसंग आला की तो "हो साब" आणि "जी साब" करीत वेळ निभावून नेत असे. बाकी महत्त्वाच्या गोष्टी त्याला हिंदीत सांगण्याची जबाबदारी आपली आहे हे त्याच्या मालकाला लख्ख उमजले असल्याने चिंता नव्हती.

पण या आवाजाचा उगम पाहिल्यावर त्याला डोक्याऐवजी इतरच कुठेतरी रक्त सळसळू लागले. "आह! क्या आयटेम है!! " त्याच्या तोंडून अभावितपणे शब्द निघून गेले. भावना अनावर करणारी, आणि तरीही आपण अप्राप्य असल्याची बोचरी जाणीव देणारी सळसळती ज्वाला त्याच्या समोर उभी होती. तसे पाहिले तर तिच्या कपड्यांतून एखादा चौरस इंचही त्वचा दिसली नसती. पण काय दिसू शकेल त्याची कल्पना करायला त्याचा दिमाग समर्थ होता. आणि काय दिसते ते प्रत्यक्षच पहायला त्याचे हात समर्थ होते.

तेवढ्यात शक्ती परत आला. तो कोपऱ्यावरच्या बंगल्याच्या भिंतीवर जलसिंचनाचा कार्यक्रम उरकून आला होता. शक्ती गांजाच्या मोहात नव्हता. त्याला एक चपटी खिशात नि दुसरी पोटात हा हिशेब अधिक योग्य वाटे. आणि एकंदरीतच बंगलेवाल्यांचे नि त्याचे काय वाकडे होते कोण जाणे, पण प्रत्येक बंगल्याच्या भिंतीवर (आणि शक्यतो दारात) जलसिंचनाचा कार्यक्रम उरकल्याखेरीज त्याला पुढचा घोट कडू लागत नसे. तिथे कुणी प्रश्न करायला घेतले की शक्तीचे हात चालू लागत. वाढत्या वयात तो पैलवान होता, आणि तेव्हा केलेल्या व्यायामाचे परिणाम अजूनही दंडा-खांद्यावर टिकून होते. शक्तीने थोबाड फोडले, नि एकही दात पडला नाही अशी केस शोधूनही सापडली नसती.

पण तेवढे सोडले तर शक्ती एकंदरीतच सौम्य स्वभावाचा होता. मालकामुळे आपण आहोत, आपल्यामुळे मालक नव्हे हे त्याने व्यवस्थित पटवून घेतले होते. त्यामुळे बंगल्यांची भिंती-दारे भिजवण्याखेरीज बाकी सर्व गोष्टींत तो शक्यतो मालकाची परवानगी घेऊनच पुढे होत असे.

त्यामुळे त्याने जेव्हा पाहिले की चंडीचे हात नंदिनीच्या कपड्यांपासून तिच्या देहाला विलग करायच्या प्रयत्नात आहेत (आणि त्यांना यश येण्याची शक्यता जवळजवळ शंभर टक्के आहे), तेव्हा त्याने "का कर रहै हो बबुआ, संभलके" अशी गुरगुरत्या आवाजात चेतावणी दिली. चंडी जागच्या जागी थांबला.

=====

गावाकडची निवडणुकीची आणि पुढची कथा कल्याणीला मध्यवर्ती भूमिकेत, नि मूळच्या भाषेत ("तिचा फोन यील म्हनून त्या मेदग्याला लावून दिलं परचाराकरता नि त्यानं केसानं गळा की कापला; तिचा फोन आला पन आंणांना हॉस्पिटलात न्यायलोवतो, तर कसा घ्यावा फोन मानसानं? पैल्याधरनं मिस कॉल देती #$#$, सवताच्या बापाचं चार चव्वल खरच व्हाया नकोत, आता बाप येक की दोन कुनास दक्कल) ठेवून का होईना, विजयने प्रतापला सांगायला घेतली. शिवास रीगल झाली, तरी मद्यार्क तो मद्यार्क, आणि त्याचा चेतासंस्थेवर होणारा परिणाम तसाच. त्याच्या अरळाबरळीतून प्रतापला एवढाच बोध झाला, की प्रकरण खोलवर पोचलेले आहे. दुसऱ्या पातळीवर अजूनही त्याच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा विचार रेंगाळत होताच.

हत्तीसारखा झुलणारा शक्ती पजेरोच्या दरवाजावर (त्याच्या बलदंड हातांना न शोभणारी) हलकी थाप मारून उभा असल्याचे त्याच्या लक्षात आले. शक्ती आला म्हणजे प्रतापला वैतागायला होई. साला एवढा पैलवान, पण पाणी प्यायलासुद्धा परवानगी मागायला येतो!

पण त्याने आणलेली बातमी ऐकून विजयच जास्त चेकाळला. "बाई, कोन बाई? बामनीन हाए का? पायलाच पायजेल".

झोकांड्या खात त्याने व्हॅनकडे मोर्चा काढला. त्याला संभाळायला प्रतापही लगेच पुढे सरला.

व्हॅनमध्ये बापलेकीला कोंडून चंडी त्यांच्यावर गुरगुरत हातातला कट्टा मास्तरांच्या तोंडात कोंबून बसला होता. केवळ त्यामुळेच नंदिनी धुसफुसत का होईना, गप्प बसली होती. मास्तर केविलवाणेपणे कण्हत होते. कट्ट्याचे टोक एकाच वेळेला त्यांच्या जिभेला चेमटवत आणि मागच्या दुखऱ्या दाढेला मुळापासून हालवत होते.

विजयने सर्रकन दरवाजा उघडून व्हॅनमध्ये प्रवेश केला आणि नंदिनीकडे पाहून तो थरारला. कल्याणीला तो आतापर्यंत 'ब्राह्मणी' सौंदर्याचे प्रमाण मानीत असे. पण इथे तर त्या प्रमाणाचीच पुनर्व्याख्या करायची वेळ आली होती. असा केळीच्या गाभ्यासारखा रसरशीत रंग आणि किंगफिशर बियरच्या कॅनवर असतो तसल्या निळ्या रंगाचे डोळे.... आणि ज्या प्रकारे ती धुसफुसत होती, ते पाहता ती अनाघ्रात असावी असाही एक अंदाज त्याच्या झोकांडत्या मनाने मांडला.

तेवढ्यात प्रताप येऊन पोचला. त्याने आधी चंडीला कट्टा मास्तरांच्या तोंडातून काढायला लावला. आणि विव्हळते मास्तर मूळस्थितीला यायच्या आतच त्याच्या लक्षात आले, की परवा शिक्षणमंत्र्यांना नडणारा तो खडूस म्हातारा हाच. त्या कार्यक्रमाला प्रताप हजर होता तो शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी. थेट तिकडूनच बांबू बसला तर सगळे दरवाजे फराफरा उघडतील हे त्याला उमगले होते. पण त्या कार्यक्रमामध्ये या म्हाताऱ्याने कोलदांडा घातल्याने शिक्षणमंत्री जे "हे हे हे" करत परतले, त्यात प्रतापचे अडकले. मंत्र्यांच्या पीएने "साएब घुस्सा करून बसलेत.... तर नंतरच फाहा काए ते" असे म्हणून त्याला वाटेला लावले.

या म्हाताऱ्याला इथे पाहून त्याचे डोके चालू लागले. शिक्षणमंत्री जरी आपण स्वतः पूर्वी शिक्षक असल्याची जिथेतिथे भलावण करीत असले, तरी ते नक्की कसले शिक्षक होते हे त्यांनाही सांगता आले नसते पटकन. पण हिशेबनीस म्हणून त्यांचे नाव त्यांच्या जिल्ह्यात आजही गाजत होते. कुठलाही हिशेब या ना त्या मार्गाने मिटवल्याखेरीज ते कधी राहिले नव्हते.

या म्हाताऱ्याचाही हिशेब मिटवण्याचे काहीतरी त्यांच्या डोक्यात चालू असणारच हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती. तिथे आपणच पुढे होऊन त्यांच्यावतीने हिशेब मिटवला आणि ती बातमी त्यांच्यापर्यंत पोचती केली, तर आपले काम नक्कीच होणार याची त्याला खात्री पटली.

तोवर विजयने नंदिनीकडे पाहून पुढचे बेत जमतील तसे आखायला घेतले होते. त्याच्या वखवखलेल्या नजरेतली वासना पाहून प्रतापला अंदाज आला, की याला आता आवरायला हवा, नाहीतर तो इथेच स्त्री-पुरुष संबंध या पुरातन अध्यायाचे पुढचे पान उलटायला घेईल.

"इनको लेके अपने फारमौस पे चलते है" असे त्याने चंडी-शक्तीला सांगितले. व्हॅन पजेरोच्या दारापर्यंत नेऊन त्याने सर्व सजीवांना त्यात घुसवले नि आपल्या व्हॅनच्या ड्रायव्हरला घरी परत जायला सांगितले.

पजेरो चालवायला प्रताप स्वतःच बसला, पण त्या आधी त्याने शेजारच्या सीटवर विजयला बसवून अजून एक शिवास रीगलचा खंबा त्याच्या मांड्यांमध्ये उभा खोचून ठेवला. फार्म हौसला पोचेपर्यंत त्याला चुचकारणे भाग होते.

=====

कुठलाही आवाज बाहेर जाऊ नये म्हणून पजेरोच्या खिडक्या बंदच होत्या. मास्तरांच्या तोंडात कट्टा परत खुपसला गेला होता, त्यामुळे तसा आवाज व्हायचा प्रश्न नव्हता म्हणा. खिडक्या बंद असल्याने एसी लावण्यात आला होता, नि त्याच्या थंड हवेचे झोत टाळूवर आपटून मास्तरांना दातदुखीबरोबरच डोकेदुखीचा ठणका सुरू झाला होता.

एसीच्या झोताने विजयला जरा जरा भानावर यायला झाले होते. आपल्याला हा बर्फीचा तुकडा मिळणार, आणि त्यासाठी या म्हाताऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार हे त्याला कळायला लागलेसे वाटत होते. आता म्हाताऱ्याचे काय करावे?

अचानक त्याला चंदरने, गावाकडच्या त्याच्या मित्राने, सांगितलेली युगत आठवली. ती वापरून चंदरने गावात नवीन आलेल्या पोरगेल्या मास्तराची फाकडू बायको निजवली होती (आणि दुसऱ्या दिवशी नवराबायकोने गळफास घेऊन आत्महत्या केल्यावर, "एडस का काय त्ये झाल्यालं हुतं म्हने त्या दोगास्नीबी. कायतरी पाप केल्यालं असनार मागच्या जल्मात" असे लोकांच्या लक्षात नीट येईस्तोवर इकडेतिकडे बडबडत हिंडला होता).

नगर रोड सोडून गाडी एका धाकट्या रस्त्याला लागली. खाचखळगे शोषून घेण्याची पजेरोची क्षमता बरीच होती. पण मास्तरांच्या दाढेच्या क्षमतेने राम म्हणायला घेतला होता. त्यांच्या कळवळणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत अर्धा संताप आणि अर्धी पोटाच्या खोल खोल खड्ड्यातून आलेली भीती यांच्या मिश्रणाला तोंड देत नंदिनी बसली होती.

लवकरच फार्म हाऊस आले. गाडी थेट घरात बांधलेल्या गराजमध्येच गेली. चंडी-शक्ती पटापट उड्या मारून खाली उतरले. आता कोणीही कितीही ओरडले असते तरी फार फरक पडला नसता. तसेही तो बुढ्ढा ओरडण्याच्या परिस्थितीत उरला असेल असे वाटत नव्हते.

दोघांनीही आधी सराईतपणे सगळे घर विंचरून काढले. आणि मग बाहेर बहादूर गेटला परत कुलूप घालत होता त्याच्या मकानाकडे त्यांनी मोर्चा वळवला. आता तासाभराची निश्चिंती दिसत होती. आपापली व्यसने अशी वेळेला कोपऱ्याकोपऱ्यात गाठून करायची त्यांना सवय झाली होती.

=====

आतमध्ये विजयने प्रतापला आपला बेत सांगितल्यावर आपण समजत होतो तेवढा काही हा तरळायला लागलेला नाही हे ध्यानात येऊन प्रताप खूष झाला. कारण त्या म्हाताऱ्याचे काय करायचे हा जसा त्याच्यासमोरचा प्रश्न होता, तसाच या बाईला कसे घुसळायचे हाही प्रश्न होता. त्या म्हाताऱ्याच्या इज्जतीचे धिंडवडे काढायला ते करणे गरजेचे होते. आणि शिक्षणमंत्र्यांना खूष करायचे असेल, तर या म्हाताऱ्याच्या आयुष्याचा विस्कोट होणे गरजेचे होते. बच्चूजी महाराजांनी मंगळवार कडक पाळायची ताकीद दिल्याने तो स्वतः या कामात उतरू शकत नव्हता.

विजयचे आतापर्यंतचे एकंदर घरंगळणे पाहता त्याला काही हे जमेलसे प्रतापला खरे तर वाटत नव्हते. म्हणजे चंडीला या कामगिरीवर घेणे आले. आणि चंडीने काम चोख केले असते, पण अशा कामांना 'खालच्या' लोकांना घेणे त्याला प्रशस्त वाटत नव्हते. इथे त्याचा जातीचा अभिमान, मराठीपणाचा अभिमान (काय वाटेल ते म्हणा) वर आला. आता ती कल्याणी की कोण ती तिच्या मागावर फुसांडणारा वळू आयताच मिळाला म्हटल्यावर प्रताप खूष होणारच.

एसीचे झोत फेकणाऱ्या भल्यामोठ्या दिवाणखान्यात मास्तर नि नंदिनी कुडकुडत उभे होते. प्रताप सराईतपणे पुढे झाला नि टीपॉयवरची मॅक्डॉवेल (असल्या कामाला शिवास रीगलचा उपयोग नव्हता. खरंतर संत्र्याचंच काम हे. जितका भणाणता वास, तितके यश हमखास) भरलेला ग्लास त्याने मास्तरांपुढे केला. त्या कडवट आंबूस वासाने मास्तरांना ढवळून आले. नको म्हणून बाजूला सारताना तो ग्लास प्रतापच्या हातातून 'सुटला' नि खाली पडला. विजयसिंहजीराजे बाणासारखे सुसाटत पुढे झाले. "दारू काय हिरीला येती काय रं तुज्या @#@#? येवडं नीट द्यायालोय तर कशाला माज करतो रं @#@#@#? नीट न्हाई ऐकायचास तू.... तुज्या या आयटेमला उगडी केली की भसाभस पिशील थेरड्या" असे म्हणून त्याने बेसावध नंदिनीच्या साडीला हात घालून फर्रकन ती वेगळी केली.

स्वतःच्या पोटच्या गोळ्याची अब्रू राहावी यास्तव मास्तरांनी दोनतीन ग्लास रिचवले. पण प्रत्येक वेळेला त्यांच्या जास्त जास्त भिरंगळणाऱ्या नजरेला नंदिनी अधिकच उघडीवाघडी दिसू लागली. डोके गरगरू लागले.

आणि मग तिच्या किंकाळ्या नि विजयचे भेसूर हसणे ऐकू येऊ नये म्हणून ते स्वतःहून ग्लास घोटत गेले.

प्रताप खूष होऊन हे सर्व हँडीकॅमवर चित्रीत करत होता. गरज पडली तर मंत्रीसाहेबांना पुरावा देता येईल. आणि शिवाय चोरट्या बाजारात विकून तर बक्कळ माल कमावता येईल. त्या सुटलेल्या शरीराच्या विद्रूप नेपाळी मुली असलेल्या फिल्मासुद्धा हातोहात खपत. इथे तर असला खवा माल होता की बास.

=====

तास झाला. पण किंकाळ्यांनी चेतवलेली विजयची विकृती शमायचे नाव घेईना. निघायचे कबूल करायला त्याने चार तास घेतले.

नंदिनी नि मास्तर, दोघांचीही शुद्ध हरपली होती. देहांची विटंबना झाली होती. नंदिनीच्या अंगावर तसूभरदेखिल कपडा नव्हता.

आता पुढचा बेत म्हणजे दोघांनाही अशा सार्वजनिक ठिकाणी फेकणे, की जिथे सापडले गेल्यावर आत्महत्या करण्यावाचून त्यांना गत्यंतर उरणार नाही.

पण इथे विजयने पटकथा बदलायला घेतली. "त्या थेरड्याची इल्हेवाट लाव काय ती. अजून एकदोन येळेला हा आयटेम वाजवूनच घेतो". प्रतापने नाईलाजाने कबूल केले.

मास्तरांना यार्डातल्या लोकलच्या डब्यात फेकण्यात आले.

शिवाय अंगावर उरलेली मॅक्डॉवेल ओतण्यात आली.

नंदिनीचा देह घेऊन विजयसिंहजीराजेसाहेब परत आपल्यातल्या अमानुषतेला जागवायला निघाले.

==============================

शिवाजीनगरला गाडी डुचमळत थांबली तसे मास्तरांना जाणीव जागृत झाल्यासारखे वाटू लागले. डोक्यात घणाचे घाव पडत होते. घसा भाजलेल्या वाळूसारखा कोरडा पडला होता. गाडी परत निघाल्यावर पेंटोग्राफची घरघर पुन्हा सुरू झाली नि त्यांची शुद्धीवर येण्याची प्रक्रिया जलद झाली.

गाडी खडकीहून निघाली तशी त्यांना पेंटोग्राफची घरघर असह्य झाली. चेहर्याभोवती भणाणणाऱ्या माशा असह्य झाल्या. भिजलेला कोट नि धोतर असह्य झाले. 'काय उपयोग या साऱ्या कपड्यांचा? माझ्या पिलाला तो लांडगा ओरबाडत होता, मांसखंड लचकावून काढत होता, पिलू बिचारे विव्हळत होते, तेव्हा मी काय करत होतो? काय उपयोग या जगण्याचा? ' त्यांचे अंतर्मन त्यांची निर्भत्सना करू लागले. ते ताडकन उठून बसले.

=====

"ओय, ये तो जिंदा दिखता है ठीकसे" म्हणत सतबीरसिंगने टुणकन ट्रंकेवरच इंचभर उडी मारली.

नामदेवने पाय बदलला.

छायाकाकूंनी पेपर दुमता-तिमता करून पिशवीत सारला. हे लोकलमधले लोक वाचायला म्हणून घेतात, नि परत देत नाहीत हा त्यांचा अनुभव होता.

मृणाल शिवाजीनगरला चढलेला 'तो' आयटीवाला असेल का या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर "हो" असे आले (कारण त्याने सेलफोन काढून "प्रेझेंटेशन", "क्लायंट", "डेडलाईन" असले शब्द बडबडायला घेतले) आणि ती खुषावली. आता त्याला आपली जागा दिली तर ते आईच्या खूपच नजरेत भरेल का ह्याचा विचार करू लागली.

यादव गार्डला जग बरेच ताळ्यावर आल्यासारखे वाटू लागले. खिशातून क्वार्टर काढून त्याने अजून एक जळजळीत घोट मारला.

=====

तुकड्यातुकड्यांनी का होईना, मास्तरांना काल रात्रीच्या घटना स्मरल्या. गाडी पुलावर असतानाच त्यांनी आवेगाने उसळी घेऊन देह लोटून दिला. डब्याच्या दारातून तो देह थेट खाली मुळेच्या पात्रात गेला. आणि पडण्याच्या आघातानेच त्यातला तोळाभर जीव उडून गेला.

खाली पात्रात पडलेल्या, गोऱ्या वर्णाच्या, पाच फूट एक इंच उंचीच्या, छातीवर आणि मांड्यांवर चटक्यांच्या खुणा असलेल्या, साधारण पंचविशी-तिशीतल्या वस्त्रहीन स्त्री देहाचा पंचनामा करायला घेतलेल्या हवालदार यशवंत गेनबा दाभाडे (बक्कल नं १७५५८) याला अजून एका पंचनाम्याचे काम लागले.