तो क्षण

सर्वत्र अंधुक प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशाचा रंग कुठला ते पट्कन सांगता आले नसते.

फार तर असे म्हणता आले असते, की निळा, करडा, पारवा आणि जांभळा यापैकी एक रंग श्वेतांबरा प्रेयसीच्या ओठांवर सांवरीच्या कापसाइतका हलका स्पर्श करून गेला असता, तर तिच्या मनात उमटणाऱ्या आनंदलहरींच्या क्षितिजावर जो रंग झळकला असता तो रंग स्फटिकशुभ्र हिम वितळवून केलेल्या पाण्यात बत्तीस वेळेला खळबळून काढला असता तर हा रंग उमटला असता.

अर्थात 'असे म्हणणे म्हणजे केवळ स्वैराचार आहे, ही संख्या बत्तीस नसून केवळ बावीस आहे' असे मानणाऱ्यांचा, आणि आपल्या मताच्या कडव्या अभिमानापायी हातात तळपत्या तलवारी घेऊन उभा असलेल्यांचा एक मोठा गट होताच.

रंग कुठला असेल ते असो, या प्रकाशात कशाचीही सावली म्हणून पडत नव्हती एवढे मात्र खरे.

आकाशाला कवटाळायला निघालेला, पण मध्येच अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेला असा पर्वत मान उभवून अवघडून उकिडवा बसला होता. स्वच्छ प्रकाशाचा टिपूसही वर नसताना त्याला आभाळावेरी पोचायची काय घाई झाली होती नकळे.

परिस्थितीने आणि स्वकष्टांनी घोटवलेले, पण कालाच्या ओघात उतरायला आलेले शरीर पेलत तो जोमदार पावले टाकीत हलक्या उतारावरून झपाट्याने त्या शिळेकडे जात होता. त्या शिळेचा आकार साधारण अंडाकृती चपटा होता. तिचा पृष्ठभाग ना गुळगुळीत, ना खरबरीत अशा त्रिशंकू अवस्थेत सापडलेला दिसत होता. पिंजपिंजून हल्लक केलेला कापूस जर पाण्याचा हबका मारून चेपायचा प्रयत्न केला तर जे होईल तसा काहीसा तो पृष्ठभाग दिसत होता. या धूसर प्रकाशाला साजेसाच त्या शिळेचा रंग दिसत होता. म्हणजे रंग कुठला ते कळत नव्हते.

त्या शिळेजवळ जाऊन तो थांबला. दोन खोल श्वास त्याने भिरकावल्यासारखे सभोवताली फेकले आणि खाली वाकून शिळेला हात घातला. झोपलेल्या माणसाच्या डोळ्यातले काजळ चोरणाराच्या सराईत अलगदपणे त्याने ती खांद्यावर घेतली. त्याच्या अपेक्षेपेक्षा ती जड वा हलकी होती का हे त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांमधून कळत नव्हते. कारण चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते.

भरलेल्या कावडीतले पाणी डुचमळावे तसे झुलत त्याने तो पर्वत चढायला घेतला. सुषिर वाद्याचे वाटणारे अत्यंत हलक्या आवाजातले सूर सभोवताली फेर धरू लागले. वरचा ओठ बोटभर उजवीकडे सरकवून त्याने पूर्ववत केला. बहुधा तो हसला असावा.

वर जाणाऱ्या पायवाटेला नेमस्त चढ होता. पहिला टप्पा आल्याचे सूचित करण्यासाठी त्या वाटेवर मध्येच चार झाडांनी दोन बाजूंनी मंडप घातला होता, नि तिथे जमीन पार सपाट होती. त्याने ती शिळा तिथे नीटसपणे उतरवून ठेवली आणि भुवईवरचा घाम बोटांनी निरपला. आता ते सूर नीटपणे ऐकू येत होते. यावेळेला त्याने वरच्या ओठाला पार तीन बोटे उजवीकडे सरकवले, आणि चांगले पाच-पंधरा क्षण तसेच ठेवले.

"कधी सुषिर वाद्य, कधी तंतुवाद्य, कधी तालवाद्य, कधी कंठसंगीत..... वरवर पाहता माझे मन रिझवण्यासाठी हे सगळे होते आहे असा भास होतो. पण माझे मन रिझवून कुणालाही काहीही मिळणार नाही हे मला माहीत आहे. आणि काही मिळणार असल्याखेरीज ते देव का कोण तेदेखील भक्तांच्या हाकेला ढिम्म हालत नाहीत. 'फक्त नामस्मरण पुरे, आणखी काही नको' असे म्हणणे म्हणजे 'तुमच्या वाट्याला आलेल्या जीवित क्षणांपैकी अमुक इतके क्षण माझे नाव घेण्यात घालवा' असे म्हणणे आहे खरे तर."

"आणि नामस्मरण वगैरे वेडपटपणा करणारा मी नव्हे हे लख्ख कळाल्यावर कोण कशाला माझे मन रिझवायचा प्रयत्न करील? म्हणजे या स्वरांमागे काही हेतू आहे खरा. आणि तो म्हणजे येऊनजाऊन एकच. मला मोहात पाडून त्या शिळेसोबत एखाद्या ठिकाणी स्थिरावण्याला भाग पाडणे."

"मला माहीत आहे, की मला ही तथाकथित 'शिक्षा' फर्मावणारे आता फजिती पावले आहेत. शिक्षा उच्चारताना "युगानुयुगे" अशी शापवाणी लोभस वाटते खरी, पण आपण अमर्त्य असलो तरीही मर्त्य मानवांच्या आयुष्यात बदल होतात तसे आपल्याही जाणीवांत बदल होत जातात हे त्यांना आता उमगू लागले आहे. रडीचा असो वा चिडीचा, पण डाव कुठेतरी संपला तरच त्यात गंमत. किमान त्यात काही बदल होत राहावेत. "

"'युगानुयुगे' किनाऱ्यावर नुसते डोके आपटत राहायचे म्हटल्यावर लाटांनीही एव्हाना शरणागती पत्करली असती. त्यामुळे भरती-ओहोटीचा खुळखुळा पुढे करावा लागला. मग ते नाटक नीट वठवण्यासाठी चंद्रालाही पृथ्वीसोबत पावलाला पाऊल भिडवून न फिरता थोडे संथ व्हावे लागले. भरती-ओहोटी त्याच त्या वेळेला रोज आली तर त्याचाही साचाच बनून जाईल की."

"थोडक्यात म्हणजे, हे स्वर माझे मन रिझवण्यासाठी नसून मला मोहात पाडण्यासाठी आहेत हे मी नीट ओळखून आहे."

त्याने शिळा परत खांद्यावर घेतली नि चढणीवर पावले रोपायला सुरुवात केली.

"आणि तरीही आज हे स्वर नेहमीपेक्षा थोडे वेगळे, आतवर भिडणारे वाटतात हेही मला जाणवते आहे. आता असे का? या प्रश्नाचे उत्तर शोधत बसण्याचा प्रयत्न मी करेनसे वाटत नाही. ठरवून काही करायचे नाही एवढेच ठरवून ठेवले आहे. "

"अर्थात असे आतवर भिडणारे स्वर काही पहिल्यांदाच ऐकतोय असेही नाही. मागे एकदा झाले होते तसे. त्यावेळेस नुसते स्वर नव्हे, तर नुकत्याच कापलेल्या हिरव्यागार गवताचा आणि समुद्रावरचा उबट खारा असे दोन वासही जोडीजोडीने मला भुलवायला आले होते. माहीत असलेल्या सर्व समुद्रांच्या सफरी केलेला मी, मला समुद्राचा खारा वास आयुष्याचे अंगच बनून गेल्यासारखा भासे. आणि समुद्रावर नसेन तेव्हा पार क्षितिजापर्यंत पसरलेल्या गवताळ कुरणांमधून घोडा दौडवत हिंडणे हे आयुष्याचे दुसरे अंग. त्यामुळे हे दोन्ही वास म्हणजे मला भुलवण्यासाठी मंत्रून मारलेला बाणच. "

"पण त्यालाही दाद दिली नाही मी."

"एकदा शिक्षा सुनावण्याआधी काय तो विचार करायचा. नंतर असे चोरपावलांनी त्याला फाटे फोडायचे नाहीत. मला व्यापारी, स्वैराचारी, दर्यासारंग, रक्तपिपासू, जहागीरदार अशी अनेकानेक विशेषणे मिळाली. पण जे असेल ते स्पष्ट बोलल्यानंतर त्यात हळूच बदल करत बसण्याचा भ्याडपणा मी कधी केला नाही. आणि माझ्या ज्या तथाकथित 'चुकी'करता मला ही 'शिक्षा' झाली, ती 'चूक' म्हणजे तरी काय होते? कुणा एकाने लपूनछपून केलेले कृत्य मी स्वच्छ शब्दांत बोलून दाखवले इतकेच ना? आता तो कुणी एक 'देव' होता, 'मानव' होता की 'दानव' होता याचा विचार मी कशाला करू?"

"शिक्षा सुनावण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असे मी भेकत बसलो नाही. आणि त्या शिक्षेला माझ्या मनाप्रमाणे वळवून घ्यायलाही मागेपुढे पाहिले नाही. शिळा ढकलत वरपर्यंत न्यायची यात काही अंतर खांद्यावरून न्यायची असा बदल केला. शेवटी काय, ती परत गडगडत खाली आली की झाले ना? शिळेशी बोलत वर जायचे हाही बदल मीच केला. थोडक्यात, शिक्षा झाली असली, तरीही माझ्या परिघात राहून मी त्यांना नाक खाजवून दाखवलेच!"

आता चढण जाणवण्याइतकी अंगावर येऊ लागली होती. त्याने शिळा एखाद्या कसलेल्या मल्लाच्या आविर्भावात खाली जमिनीपर्यंत नेली आणि अलगद टेकवली. आता तिला रेलून तो ती ढकलू लागला.

"पण, कितीही नाही नाही म्हटले, तरी आज जे हे आतवर पोचणारे सूर अस्वस्थ करताहेत ते का? असा प्रश्न छळतो आहे हे मान्य करायला हवे. माझ्या दृष्टीने समुद्र आणि कुरण हे मला मोहात पाडू शकणारे दोनच अजगर होते. त्यांनाही दाद दिली नाही मी. आणि आज हे सूर असे का आतपर्यंत पोचताहेत? अट्टहास सोडून या कथेला पूर्णविराम देऊन टाकावा असे का वाटते आहे? पूर्णविराम देणे 'त्यां'ना शक्य नाही, कारण त्यांच्या कपाळावर ते अमुकतमुक असल्याची उठलेली तप्तमुद्रा. पण तरीही मी जर का पूर्णविराम दिला, तर त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करण्याची 'त्यां'ची तयारी आहे हे मला मागेच कळले होते. पण मी का म्हणून तडजोडीला उतरू? "

"खरं तर मला ही शिक्षा 'शिक्षा'च वाटेनाशी झाली आहे. इथून सुटलो तर काय करणार आहे मी? रक्तवारुणीचे घुटके घेत संगीत ऐकत बसणे, पाताळ-भूलोक-अवकाश या परिघात उगाचच लगबगीने हिंडणे, लढाया करीत लोकांची मुंडकी उडवीत हिंडणे, वंशसातत्य या नावाखाली काही शारीरिक क्रिया करणे, हे आणि असेच ना? हे तर मी इथे येण्याआधी करून घेतलेले आहे मनसोक्त. आता परत त्यातच जाण्यात काही अर्थ दिसत नाही. "

"त्यापेक्षा इथे शिळेला उचलून आणि ढकलत वर घेऊन जाणे, नि अटळपणे परत खाली येणे या गोष्टीतच गंमत वाटू लागली आहे. किती वेळेला मी हे केले ते मोजत बसण्याचा मूर्खपणा मी अर्थातच करत नाही. कारण संख्या आल्या की त्यामागोमाग अपेक्षाही लगोलग येतात. आणि मग विचार करणे बंद होऊन तक्ते भरायचे हिशेबनिसी काम सुरू होते."

"माझ्या समुद्रसफरींत एकदा असा चिंतातुर जंतू माझ्या जहाजावर खलाशी म्हणून आला होता. तो तर येणारे प्रत्येक बेट व्यापाराच्या दृष्टीने किती नफ्याचे ठरले याचाच हिशेब सदानकदा मांडून बसे. एकदा त्याला मी धुवांधार वादळातूनही लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत आणि शिडे अर्धी उतरवून हवी तशी दिशा पकडत मार्ग काढून दाखवला होता. तर तो महापुरुष म्हणाला, त्यापेक्षा त्या ताम्रांच्या बेटावर आपला उरलेला माल विकायला थांबलो असतो तर धनही मिळाले असते आणि वादळातही सापडायला झाले नसते."

"उफाळणाऱ्या समुद्राकडे पाहूनही ज्याच्या डोक्यातला सुवर्णमुद्रांचा हिशेब जात नाही, त्याला जगायचा काय अधिकार? पण असल्या चिलटांना चिरडले की लगेच 'रक्तपिपासू' म्हणून माझ्या बिरुदांत एकाची भर घालायला सर्वजण उत्साहात येत."

"थोडक्यात, या आवर्तातच आता मला जीवनहेतू दिसू लागला आहे. आणि मला 'शिक्षा' करणाऱ्यांचा मुखभंग झाला आहे. चारचौघांत शापवाणी उच्चारून दिलेली 'शिक्षा' परत घ्यायची म्हणजे लाज वाटते. आणि परत न घेतली, तर मी या 'शिक्षे'मध्येच जीवन रुजवून घेतले आहे, आणि त्यामुळे ही 'शिक्षा'च उरलेली नाही ही खंत वाटत राहते."

"पण हा 'त्यां'चा प्रश्न झाला. मी कशाला विचार करत बसू त्याबद्दल? "

आता पर्वताचा माथा येऊन ठेपला होता. कुशीवर पहुडलेल्या व्यक्तीने अचानक मस्तक उभवून वर पाहावे तसा तो माथा तिरका वर गेला होता. त्याच्या सगळ्यात वर एखादा बोकडही नीटपणे उभा राहील अशी जागा नव्हती. तिथवर शिळा नेली की मग तिचा परतीचा प्रवास सुरू व्हायला काहीच अडचण नसे.

ही शिळा रेटत त्याने त्या माथ्यावर नेली.

आणि अचानक, झाडाच्या खोडातून स्रवलेल्या डिंकाला बेसावध भुंगा चिकटून बसावा तशी ती शिळा त्या माथ्यावर घट्ट चिकटून बसली.

तो अंतर्बाह्य थरारला.

आणि जिवाच्या कराराने तिला खाली ढकलायचा प्रयत्न करू लागला.