शर्टाची बटणे

शर्टाची बटणे

ही शर्टाची दोनच बटणे
तीही उदास व्याकुळलेली..
मनात त्यांच्या अजून सलते
 रेशिमगाठ  कुणी विणलेली

सदा संशयी नजर तयांची 
अन्  उंच झेपही  बुद्धीची
अजुन आहे ओळख त्यांना
त्या कोमल लाडिक  बोटांची

स्वभाव त्यांचा तसाच कायम
चोरून गुपिते सर्व ऐकती
दूर लोटले तया म्हणोनी
उलटा  रागही माझ्यावरती!

बंद ठेवले अलमारीसी
म्हणून आता करती कुरकुर!
आठवुनी ती विशाल छाती-
बळकट बाहू...... दाटे काहुर.....

बसते त्यांना जवळ धरुनी
मोजत माझे एकाकीपण
(नाही कौतुक स्वातंत्र्याचे 
नवीन मजला देती दूषण !)

संतापाने म्हणते त्यांना-
विसरलात का बंध पुराणे?
उत्तर त्यांचे नसे  निराळे..
ओठी अमुच्या जुने तराणे...........