मराठी चित्रपटांबद्दल आस्था मराठी प्रेक्षकांना की अमराठी निर्मात्यांना?

आजच्या ईसकाळात दोन बातम्या एकामागून एक वाचून गंमत वाटली.

पहिली बातमीः यू टीव्हीची नजर आता मराठी इंडस्ट्रीकडे

ह्या बातमीतले मुद्दे -

हिंदीतील मोठमोठे बॅनर्स मराठीकडे आकृष्ट...मराठी चित्रपटांचे सॅटेलाईट आणि होम व्हिडीओचे राईटस घेण्याचे आणि भविष्यात मराठी चित्रपटाची निर्मिती आणि वितरण करण्याचा यू ट्यूब कंपनीचा विचार... मराठीतील वाढती बाजारपेठ आता हिंदीमधील मोठमोठ्या बॅनर्सना खुणावू लागली आहे...मराठी कलावंतांचा चित्रपट महाराष्ट्रातच नाही; तर आता देशातदेखील पोचणार ....

दुसरी बातमी: मराठी माणसालाच मराठीविषयी आस्था नाही - अशोक सराफ

अशोक सराफांचे विचार थोडक्यात असे ...राज ठाकरे यांनी मराठीचा बाणा लावून धरला यात त्यांची चूक नसावी ...आज मराठी प्रेक्षक हा एकमेव प्रेक्षक असा आहे, की मराठीशिवाय तो इतर भाषा बोलतो, लिहितो आणि वाचतो. मराठीबाबतचा इतरांच्या मनातला न्यूनगंड अनाकलनीय ... देशात केवळ मराठी प्रेक्षकाला आपल्या मराठीविषयीच फारशी आस्था नाही. इतर राज्यांतील प्रेक्षक त्यांच्या बोली भाषेवर नितांत प्रेम करतात. तेथे त्याच भाषेतील चित्रपट चालतात. इथे मात्र तशी परिस्थिती नाही ... मराठी प्रेक्षकांएवढे विनोदाचे अंग इतर प्रेक्षकांकडे नाही ... (मराठी चित्रपटाची) परिस्थिती अधिक चांगली होईल, त्यासाठी प्रेक्षकांची मात्र साथ वाढली पाहिजे.


ह्या दोन बातम्यात परस्पर विसंगती वाटते का?

अमराठी कंपन्या मराठीचे भले करण्यासाठी भाग घेताहेत की गुणी मराठी कलावंतांकडे (कमी गुंतवणुकीचा) कच्चामाल म्हणून पाहताहेत?

मराठी कलावंतांचे चित्रपट जर भारतभर पाहिले जाऊ लागले तर त्यांना मिळणारे पैसे हे हिंदीच्या तोडीचे असतील का?

मराठी लोकांइतकी विनोदाची जाण इतर प्रेक्षकांना नाही हे तुम्हाला पटते का?

प्रेक्षकांनी साथ दिली तर चित्रपटांची परिस्थिती अधिक चांगली होईल की चित्रपट चांगले आले तर प्रेक्षकांची साथ वाढेल?

मराठी लोकांना मराठीची आस्था नाही पण मराठी चित्रपटांची आस्था आहे (आणि म्हणून इतर निर्माते मराठीत येताहेत) असा ह्यातून अर्थ घेता येईल का? मराठी चित्रपटांना चांगली मागणी का? मराठी चित्रपट चांगले आहेत म्हणून की हिंदी चित्रपट वाईट आहेत म्हणून ?