शब्दहो, याना जरा...!

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता शब्दहो, थांबा जरा...!

.................................
शब्दहो,  याना जरा...!
.................................

शब्दहो, याना जरा! मी गुंफतो वृतात गाणे!
आजच्यापुरते तरी पाडू नका मजला उताणे!!

मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या!
गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या!
एवढे ऐका जरा! मी विनवतो रे दीनवाणे

सारखे माझ्यापुढे का कोडगे होऊन येता?
आणि मज निःशब्दतेने का असा हा त्रास देता?
वैर माझ्याशीच  तुमचे काय आहे कोण जाणे!

एरवी तुमची अशी आराधना करतो कुठे मी?
`व्यक्त होताना तुम्ही या, ` हट्ट हा धरतो कुठे मी?
आज मज अडवू नका पण रोजच्या सवयीप्रमाणे!

द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!
हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!
रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!

- केशवसुमार

..............................
 गुंफणकाल ः २० जून २००८
..............................