शब्दहो, थांबा जरा...!

.................................
शब्दहो, थांबा जरा...!
.................................

शब्दहो, थांबा जरा ! मी गुंफतो मौनात गाणे !
आजच्यापुरते तरी व्हा, व्हा तुम्ही थोडे शहाणे !!

व्यक्त होतो नेहमी... अव्यक्तही थोडे असू द्या !
गूढ मौनाला मिठी घालून मज आता बसू द्या !
एवढे ऐका जरा ! होता कशाला दीनवाणे ?

सारखे माझ्यापुढे का कोडगे होऊन येता ?
माझिया निःशब्दतेला हा असा का त्रास देता ?
वैर मौनाचे नि तुमचे काय आहे कोण जाणे !

एरवी तुमची तशी आराधना करतोच ना मी ?
`व्यक्त होताना तुम्ही या, ` हट्ट हा धरतोच ना मी ?
आज मज अडवू नका पण रोजच्या सवयीप्रमाणे !

न्या, तुम्हीही आज मौनातील गाणे हे नवे न्या...!
हा निराळा-वेगळा आनंद तुमच्याही सवे न्या...!
रोज मग आहेच अपुले तेच ते येणे नि जाणे !!

- प्रदीप कुलकर्णी

..............................
 रचनाकाल ः ९ जुलै १९९८
..............................