एक तितली मातकट तपकिरी

एक तितली मातकट तपकिरी

नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या.
संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे.
घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत,
बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे.
गुहेत येताच, अंगावरचे घामाने थबथबलेले राखाडी पिवळे रकटे
यासीम ओरबाडून फ़ेकून देतो.
त्या छोट्याशा जागेत आधीच,
त्याच्या सारखी वीस एक अर्धीउघडी शरीरे
जागा मिळेल तिथे पडली आहेत.
रोज दुपारचे सुखे मटन चावून झाल्यावर मिळणारी
अर्धा तासाची विश्रांती सगळ्यांना खूप मोलाची आहे.

उकाडा आणि तहानभूक ह्यांनी आलेली ग्लानी
यासीमच्या डोळ्यात उतरून त्याची द्रष्टी जडावली आहे.
तशातही, त्याचा उघडा बाहू कुरदणारी मक्खी त्याला दिसते.
भयंकर त्वेषाने तो पंज्याचा एक फ़टकारा मारून तिला चिरडतो.
खूप पुर्वी सरहदपार पाहिलेल्या शोले मधील गब्बरसिंगच्या त्वेषात!
कितीतरी साल लोटले फ़ील्लम पाहून.
****द अमेरिकनांनी दबाव वाढवल्यामुळे,
पर्बत सोडून जाणेही धोक्याचे झाले आहे.
केव्हा त्यांच्या मिसाईल्स सारे तहसनहस करतील, काही नेम नाही.
***द...... यासीम पुन्हा एक अर्वाच्च्य शिवी थुंकतो.

तो उकाडा, ती वाळू विखूरलेली गुहा, दाढ्या वाढलेले, घामात लोळणारे मुजाहिद,
यासीम सगळा उदासवाणा नजारा घृणाभरल्या नजरेने पहातो.
खिडकीच्या गजांवर त्याला एक क्षीणसा फ़डफ़डाट नजर येतो.
मातकट तपकिरी रंगावर मोठे काळे ठिपके असलेले पंख.
वाळवंटी फ़ुलपाखरू. साधारण मुठीयेवढे.
***द आमच्या नशीबात तितली सुद्धा रंगबिरंगी नाही.
कश्मीर घाटीत पाहिलेली रेशमी गर्द चमकत्या रंगांची मुस्कुराती फ़ुलपाखरे यसीमला अचानक वेडावून जातात.
खिडकीजवळ मंदशी हालचाल करणार्‍या तितलीचा
त्याला तीव्र द्वेष येतो.
तितली जर जवळपास असती, तर मघाच्या मक्खीसारखीच चिरडली असती.

यासीमला आता स्वत:चीच चीड येते.
लढून दुष्मनची कतल करण्याऐवजी आपण,
ह्या वाळवंटी भट्टीत छुपून, चिल्लर मक्खी आणि तितली चिरडीत बसलो आहोत!
थ्थू!
आता तो तितली कडे असुयेने पहात आहे.
निदान ह्या तितलीला तरी मिसाईलपासून बचण्यासाठी
छुपून रहावे लागत नाही.
जेव्हा वाटेल तेव्हा खुल्लेआम उडायला ती आज़ाद आहे.
यासीमला आता मातकट तपकिरी तितलीचा खूप प्यार येतो.
तिचे मऊमऊ पंख एकदा तरी छुवावे म्हणून उठून तो खिडकीजवळ येतो.

यासीम तिथे पोहोचण्या आधीच, तितली उडून बाहेरच्या दगडी पाळीवर बसली आहे.
खिडकीजवळ येऊन, यासीम तितलीच्या पंखावरील काळी रांगोळी बघतो.
उन्हात चमचमणारे पंख नायलॊनचे असावे असा भास होतो.
साली दलीद्दर काली तितलीभी आपल्याला जवळ करीत नाही....
पचकन थूंकून तो आत वळतो. त्याला खबरही नसते........

तितलीच्या नांग्यांमधून, ठीकाणाचा पत्ता दूरवर पोहोचला असतो.
आणि ह्या क्षणी भारी शक्तीचे एक मिसाईल
डोंगरात दडलेल्या मुजाहिदांना तहसनहस करायला
वेगाने झेपावत असते...........................