मक्षिका

मिलिंदपंतांच्या राधिका या अत्यंत बहारदार गझलेवरून स्फूर्ती घेऊन केलेला (चिव चिव चिमणी छतात... छापाचा) हा विडंबनाचा एक फुटकळ प्रयत्न आहे. गोड मानून घ्यावा. आमच्या सर्व विडंबन - सद्गुरूंच्या स्मृतींना सादर समर्पण
(आमचा हा प्रयत्न पाहून आमचे सर्व गुरू बहुधा भिंतीवरच्या तसबिरीमध्ये खांबाच्या मागे उभं राहणं पसंत करतील.... असो. 'शिष्यदिच्छेत् परायजयम् ।'  याचा अर्थ ' शिष्याने गुरूला लाजेने मान खाली घालायला लावावी अशी गुरूंचीच इच्छा असते ' असाही केला जातो आजकाल  )

इथे तिथे बोंब ठोकणारी टुकार मोकाट होळिका तू,
असे जिचा कंठ रेकणारा अशीच साक्षात सारिका तू ॥

कषाय पेला भरून वाटे घसा करावा उगाच ओला,
कपात मारोनिया उडी तेवढ्यात मेलीस मक्षिका तू ॥

न रूप तुजला कसे जराही? भयाण भेसूर हासशी का?
पशू जिला लाजतील सारे निलाजरी क्रूर त्राटिका तू ॥

सदा जगाचा करून हेवा धरून पोटी सदा असूया,
वखार जी फक्त सर्पणाची मनात काळीच 'मळ्ळिका' तू ॥

किती ठिकाणी किती जणांचे तुला हवे हे कितीक टेकू,
तरी तुझे पाय सोनियाचे, तरी स्वयंभूच नायिका तू ॥

--अदिती (८ जुलै २००८,
आषाढ शु. ६ शके १९३०)