मिलँकोविच सिद्धांत

भाग२ - मिलँकोविच सिद्धांत



मिलुतिन मिलँकोविच ह्या सर्बियन गणितज्ज्ञाने दीर्घकालीन हवामान बदलाची (climate change) खगोलीय कारणे सांगणारा सिद्धांत मांडला. भूतकालीन हवामानाचा अभ्यास करताना मिलँकोविच सिद्धांताची माहिती करून घेणे आवश्यक आहे.


मिलुतिन मिलँकोविच चा जन्म २८ मे १८७९ रोजी सर्बियातील दैज ह्या गावी झाला. डिसेंबर १९०४ मधे विएन्ना तंत्रज्ञान विद्यापिठातून त्यांनी तांत्रिक विज्ञानामधे पांडित्य मिळविले. ऑक्टोबर १९०९ रोजी ते बेलग्रेड विद्यापिठामधे प्रायोगिक गणित ह्या विषयासाठी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मिलँकोविच ने त्यांची संपूर्ण प्राध्यापकीय कारकीर्द एका गणिती सिद्धांतावर संशोधन करण्यात व्यतीत केली. ह्या संशोधनाचा विषय होता 'पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणार्‍या सूर्यप्रकाशाच्या (येथे प्रकाश हा शब्द radiation ह्या अर्थी घ्यायचा आहे) राशीमधे (amount) ऋतूनुसार व अक्षांशानुसार (latitude) होणारे बदल दर्शविणारा गणिती सिद्धांत विकसित करणे'.


मिलँकोविच सिद्धांतामधे पृथ्वीवरील हवामानात होणाऱ्या दीर्घकालीन बदलांसाठी कारणीभूत अशा तीन खगोलीय घटनांचा समावेश होतो. ही तीन कारणे पुढील्प्रमाणे -
१. वक्रतेतील बदल - पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या वक्रतेमधे (eccentricity) होणारा बदल
२. अक्षकलामधील बदल - पृथ्वीचा अक्ष सध्या साडेतेवीस अंशातून कललेला आहे (कल =  tilt). ह्या कलामधे होणारा बदल.
३. अक्षरोखातील बदल - पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षाचा रोख सध्या धृवतार्‍याकडे आहे. ह्या रोखामधे होणारा बदल (precession).


ह्या तीन बदलांसाठी लागणारा कालावधी भिन्न आहे. पृथ्वीच्या हवामानीय बदलाचा आलेख काढल्यास तीन शिखरे मिळतात ज्यांच्याशी वरील तीन कारणे संबंधित आहेत. ह्या तीन कारणांचे सखोल विवेचन पुढील भागात.


क्रमशः...