वक्रतेतील बदल

टीपः पृथ्वीच्या दीर्घकालीन हवामानबदलासाठी कारणीभूत अशा तीन खगोलीय घटनांचा उल्लेख मागील भागामधे आपण वाचलात. ह्या तीन घटनांविषयी अधिक माहिती ह्या भागात वाचा. ह्या तीनपैकी काही घटनांचा चंद्राच्या महत्वाशी संबंध नाही, परंतु तरीही तीनही घटनांबद्दल व त्यानुषंगाने येणार्‍या इतर गोष्टींबद्दल सविस्तर माहिती लिहिण्याचा विचार आहे.


भाग ३ - वक्रतेतील बदल 


(पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या वक्रतेमधे (eccentricity) होणारा बदल)


ज्याप्रमाणे सर्व चौरस हे आयत असतात, परंतु सर्व आयत चौरस नसतात त्याप्रमाणे, सर्व वर्तुळे ही लम्बवर्तुळे (ellipse) असतात, परंतु सर्व लम्बवर्तुळे वर्तुळे नसतात. वर्तुळ आणि लम्बवर्तुळ ह्यामधे वक्रतेच्या प्रमाणात फरक असतो. वर्तुळाची वक्रता (eccentricity) शून्य मानली, तर वक्रता शून्य व एक च्या दरम्यान असल्यास त्या भुमितीय आकृतीस लम्बगोल म्हणतात. वक्रता एक असणार्‍या आकृतीस हायपरबोला व वक्रता एक पेक्षा जास्त असणार्‍या आकृतीस पॅराबोला म्हणातात (पूर्वी मला  हायपरबोला व पॅराबोला साठी मराठी शब्द माहित होते, आता आठवत नाहित, कुणास माहित असल्यास कृपया सांगा). लम्बवर्तुळाची वक्रता जेवढी शून्याच्या जवळ, तेवढा त्याचा आकार वर्तुळाच्या जवळ जातो, तर वक्रता जसजशी वाढत जाईल त्यानुसार लम्बवर्तुळ पसरट होत जाते.


पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लम्बवर्तुळाकार आहे. ह्या लम्बवर्तुळाच्या एका केन्द्रबिंदुवर सूर्य आहे. कक्षा लम्बवर्तुळाकार असल्याने पृथ्वी कधी सूर्याच्या जवळ असते (perihelion) तर कधी सूर्यापासून लाम्ब (apohelion) असते. मात्र ह्या लम्बवर्तुळाची वक्रता जास्त नसल्याने पृथ्वी सूर्याच्या जवळ असतानाचे अंतर व ती सूर्यापासून दूर असतानाचे अंतर ह्यामधे केवळ तीन टक्के फरक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणारी सौरऊर्जा ही सूर्य-पृथ्वी अंतरावर अवलम्बून असते, अर्थातच, पृथ्वीच्या कक्षेची वक्रता बदलल्यास सूर्य-पृथ्वी अंतर बदलते, त्यानुसार पुथ्वीला मिळणारी ऊर्जाराशी बदलते व त्याचा पृथ्वीवरील हवामानावर परिणाम होतो.


पृथ्वीच्या कक्षेची वक्रता सुमारे एक अब्ज वर्षांमधे ०.०००५ ते ०.०६०७ च्या दरम्यान बदलते. सध्या जानेवारी महिन्यामधे पृथ्वी सूर्याच्या सर्वात जास्त जवळ असते. त्यामुळे उत्तर गोलार्धातील थंडी ही दक्षिण गोलार्धातील थंडीच्या तुलनेत सौम्य असते. सध्याची पृथ्वीकक्षेची वक्रता ०.०१६ एवढी आहे. पृथ्वीस मिळणार्‍या सौरऊर्जेमधे जानेवारी (पृथ्वी सूर्याच्या जवळ, perihelion) ते जुलै (पृथ्वी सूर्यापासून जास्तीतजास्त दूर,  apohelion) दरम्यान ६.७  टक्के वाढ होते. कक्षावक्रतेतील बदलामुळे पृथ्वी-सूर्याच्या जवळ वा लाम्ब असण्याच्या काळात तसेच सूर्य-पृथ्वी अंतरामधे बदल होतो, ज्याचा पृथ्वीच्या हवामानावर परिणाम होतो.