चांद्रगोष्टी

भाग ८ - चांद्रगोष्टी


फार पूर्वीपासून मानव हा अवकाशस्थ गोष्टींबाबतच्या निरीक्षणाचा विविध प्रकारे उपयोग करून घेत आहे. हवामानाचा अंदाज करून बियाणांची पेरणी होत असे तसेच हवामानाचा अंदाज बांधून कोळी मासेमारीसाठी आणि दर्यावर्दी दर्यारोहणासाठी कधी व कोणत्या दिशेने जायचे ते ठरवत. हा हवामान अंदाज वर्तवण्यासाठी उपयोगी होते आणि आहेत ग्रह-तारे, चंद्र-सूर्य आणि ढग. अल्पकालावधीतील हवामान अंदाज वर्तवण्यासाठी सूर्य-चंद्राला पडलेले खळे, चांदण्यांची स्पष्टास्पष्टता, पहाटेच्या आणि संध्याकाळच्या आकाशाचा रंग अशा गोष्टींच्या निरिक्षणाचा फायदा होतो, जे आपल्या पूर्वजांनी ओळखलेले होते. 


अल्प कालावधीसाठी हवामानाचा अंदाज करण्यासाठी चंद्र-सूर्याला पडलेले खळे उपयोगी पडू शकते. आकाशात सिरस् (Cirrus) व सिरोस्ट्रॅटस्~~ प्रकारचे ढग बऱ्याच उंचीवर असतात. त्यांच्यामधील पाणी हे हिमस्फटिकांच्या रूपात असते. हे हिमस्फटिक छोट्या त्रिकोणी लोलकाप्रमाणे कार्य करतात. ह्यामुळे हे ढग असताना, दिवस असल्यास आणि सिरस ढगांची दाटी असल्यास सूर्याला व रात्र असल्यास चंद्राला खळे पडलेले दिसते. हिमस्फटिकांच्या त्रिकोणी लोलकांमधून प्रकाशकिरण जात असल्याने काही वेळा हे खळे थोडे रंगीत दिसते. असे हे खळे पडलेले असल्यास उबदार हवामानाचा अंदाज वर्तवता येतो. पृष्ठीय दाब कमी होण्याचा व काही प्रमाणात पर्जन्य/हिमवर्षावाचा अंदाजही वर्तवता येतो. हे खळे जेवढे अधिक तेजस्वी तेवढा हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता अधिक.


चंद्र लालसर रंगाचा दिसत असेल तर पुन्हा थोड्याच वेळात पर्जन्याची शक्यता अधिक. वातावरणात धुळीचे प्रमाण वाढल्यास चंद्रकिरणांचे पुनःपरावर्तन (dispersion, ह्या शब्दासाठी मराठी शब्द कृपया सांगा) होऊन चंद्रप्रतिमा लालसर रंगाची दिसते. ह्या धुळीच्या कणांभोवती बाष्प जमा होत होत काळे ढग तयार होतात, ज्यांच्यामुळे पावसाची शक्यता वाढते.


चंद्रकला ही चंद्र व सूर्याची पृथ्वीसापेक्ष स्थिती दर्शवते. चंद्राचे पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेचे प्रतल पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या प्रतलाशी ५ अंशाचा कोन करते. पौर्णिमेला (सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी अशी स्थिती) आणि अमावस्येला (सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र अशी स्थिती) सूर्य, पृथ्वी व चंद्र एकाच रेषेत असतात. मात्र इतर दिवशी सूर्य-पृथ्वी रेषा आणि पृथ्वी-चंद्र रेषा ह्या एकमेकांना छेदतात. ह्या दोन रेषांमधील कोन हा चंद्राच्या कक्षीय स्थानावर अवलम्बून असतो. अमावस्येला चंद्र व सूर्य पृथ्वीसापेक्ष एकाच बाजूला असल्यामुळे दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा एकत्रित परिणाम होऊन समुद्राला येणाऱ्या भरती-ओहोटीला जास्त जोर असतो, तर पौर्णिमेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र पृथ्वीसापेक्ष विरुद्ध दिशेला असल्याने भरती-ओहोटीचा जोर कमी असतो. इतर दिवशी चंद्र-सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष स्थितीवर भरती-ओहोटीचा जोर ठरतो. भरती-ओहोटीचे हवामानावर होणारे परिणाम आपण आधीच्या भागात बघितले आहेतच. चंद्र -सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष स्थितीनुसार चंद्राच्या कोरीचा आकार अर्थात चंद्रकला बदलते. म्हणून चंद्रकला ही भरती-ओहोटीच्या जोराची निर्देशांक मानली जाऊ शकते.


अशा ह्या चांद्रगोष्टींचा हवामानावर प्रत्यक्ष परिणाम होत नसला तरी ह्या चांद्रगोष्टींचा उपयोग पृथ्वीय हवामानाचा निर्देशांक म्हणून होऊ शकतो.  


~~ ढगांचे ढोबळमानाने चार प्रकार आहेत. १) क्युम्युलस वा ढीगाप्रमाणे दिसणारे ढग. ह्या ढगांमधे पाणी बाष्प व द्रव रूपात असून पाण्याचे प्रमाण कमी असते. ह्या ढगांची भूपृष्ठापासूनची उंची जास्त नसते. हे सहसा चमकदार पांढऱ्या रंगाचे असतात ('कापूस पिंजून ठेवलाय जसा' वाला ढग). २) निंबस वा पावसाळी ढग. हे ढगही ढिगाप्रमाणे दिसतात आणि त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण खूप अधिक असल्याने काळे दिसतात व जास्त उंचावर नसतात. हे ढग पाऊस देतात. ३) सिरस वा पिजलेल्या दोऱ्याप्रमाणे वा पिंजारलेल्या केसांप्रमाणे दिसणारे ढग. हे क्युम्युलस वा निंबस ढगांपेक्षा अधिक उंचीवर असतात. ४) स्ट्रॅटस वा स्तरित ढग. हे पांढरे असून विरळ चादरीप्रमाणे दिसतात. ह्यातील पाणी हे हिमकणांच्या रूपात असते. हे वातावरणाअमधे बऱ्याच उंचीवर असतात. ह्या चार प्रकारातील काही प्रकार मिळून तयार होणारे ढग उपप्रकारात मोडतात. सिरोस्ट्रॅटस हा उपप्रकार सिरस व स्ट्रॅटस प्रकारचे ढग मिळून तयार झालेला असतो.