शब्दार्थ, शब्दोच्चार, व्युत्पत्ती आणि संदर्भ

मनोगतींनो,
     या संकेतस्थळावर आतापर्यंत या शब्दार्थ, प्रतिशब्द, शब्दोच्चार आणि व्युत्पत्ती याबाबत प्रचंड चर्चा झाली आहे. विशेषत  या शब्दाचा अर्थ काय ही मालिका. मराठीबाबत सजग असणाया मनोगतींनी आतापर्यंत हिरीरीने केलेल्या चर्चेमुळे अनेकांच्या माहितीत भर पडली आहे.(...आणि काहींचे मनोरंजनही झालेले आहे.)
     बसल्या जागेवरून माहितीच्या देवाणघेवाणीसाठी या युगात इंटरनेटची कास धरणे गरजेचे झालेले आहे. मनोगतसाऱखी संकेतस्थळे अत्यंत मोलाची कामगिरी करीत आहेत. 
     एक बाब लक्षात घ्यावी. भारतात बारा - तेरा वर्षांपूर्वी इंटरनेट आले. त्यापूर्वीही ज्ञाननिर्मिती, ज्ञानव्यवस्थापन आणि ज्ञानाची देवाणघेवाण होत होती. त्याचे माध्यम होते ग्रंथालये.
    शब्दांबाबत येथे जशा चर्चा होत असतात, तशा चर्चा अनेक वर्षांपूर्वी झालेल्या आहेत आणि मराठी तज्ज्ञांनी त्या ग्रंथरूपात बध्द करून ठेवलेल्या आहेत. हे सर्व ग्रंथ कोशस्वरूपात ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत. 
   मात्र, ग्रंथालयापर्यंत जाण्याचे कष्ट घ्यावे लागतात.  इंटरनेट बसल्या जागेवर ज्ञान देते. 
  दोन्ही माध्यमांचे काही फायदे, काही तोटे आहेत. एक बाब निश्चित, की भरपूर अभ्यासासाठी ग्रंथालयांना पर्याय नाही.  
  
  मराठी शब्दांबाबत काही महत्वाचे संदर्भ येथे देत आहे.
१. वाड.मयीन संज्ञा-संकल्पना कोश
     संपादक - प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, सदानंद भटकळ, आशा राजवाडे, रमेश वरखेडे
     आवृत्ती - २००१
     प्रकाशक- हर्ष भटकळ, जी.आर. भटकळ फाउंडेशन, पं.मदन मोहन मालवीय मार्ग, मुंबई- ४०००३४
   
२. राजवाडे मराठी धातुकोश
      संपादक - कृ.पां.कुलकर्णी
      प्रकाशक- राजवाडे संशोधन मंडळ, धुळे 
 ३. मराठी पर्याची शब्दांचा कोश
     संपादक - मो.वि.भाटवडेकर
    आवृत्ती - २०००
     प्रकाशक - साधना प्रकाशन, ४३१, शनिवार पेठ, पुणे- ४११०३०
 ४.अभिनव मराठी-मराठी शब्दकोश
     संपादक - द.ह.अग्निहोत्री
    व्हीनस प्रकाशन - सदाशिव कृष्ण पाध्ये, तपश्चर्या, ३८१ - क, शनिवार पेठ, पुणे- ४११०३० 
५. शासन व्यवहार कोश
     भाषा संचालनालयातर्फे प्रकाशित
     आवृत्ती - १९८८
    मुद्रक - शासकीय फोटोझिंको मुद्रणालय, पुणे.
   
    उपरोल्लेखित सर्व ग्रंथ पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात उपलब्ध आहेत.
  
    केवळ जयकर नाही, तर महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व विद्यापीठीय ग्रंथालयात असे कोश बहुसंख्येने उपलब्ध असतात.
      

    - केदार पाटणकर