भेटले भेटले 'ते' मला भेटले

भेटले भेटले 'ते' मला भेटले
आज ना राहती भूवरी पाउले ।ध्रु।

सृष्टि, मजसाठि कर आज तू एवढे
आज वेणीत तू मोति गुंफून दे
दुःखतम लोपला विश्व तेजाळले
आज ना राहती भूवरी पाउले ।१।

ते दिसेनात मज मी बने बावरी
ओळखे त्यांज मी जन्मजन्मांतरी
ना जगी मी असे पाहिले ऐकले
आज ना राहती भूवरी पाउले ।२।

जन्मभरच्या तपस्येस फळ लाभले
भेटता दृष्टि दृष्टीस प्रीती फुले
श्वासश्वासात मी त्यां स्मरू लागले
आज ना राहती भूवरी पाउले ।३।




टीपा

. पाठभेद : ना जगी मी कधीही असे पाहिले

२. ह्या ओळीचे भाषांतर करतना स्वातंत्र्य घेतलेले आहे.

३. पाठभेद : भेटले भेटले मज कुणी आपले

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  ) गालगा गालगा गालगा गालगा (किंवा राधिका राधिका राधिका राधिका ( वृत्त = स्रग्विणी? उदा. रंग माझा तुला गंध माझा तुला। बोल काहीतरी बोल माझ्या फुला. ... ही चाल फक्त वृत्त समजण्यासाठीची आहे. गाताना असे गाऊ नका. मूळ चालीतच गा!)

(भाषांतर करताना चालीत बसेल इतपत केलेले आहे.)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.)... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )