मी कधी माझ्यात ही असणार नाही

माझिया सोबत कुणी उरणार नाही
मन पुढे माझे कधी हसणार नाही

कोणता आहे ऋतू तू सांग माझा
वाटते माझी कळी फुलणार नाही

खूप आता चिंब झालो मी व्यथांनी
पावसाने अंग हे भिजणार नाही

शेवटी मग घेतली ही शपथ आम्ही
तू मला अन मी तुला बघणार नाही

या जगी हरवून बसलो मी स्वतःला
मी कधी माझ्यात ही असणार नाही

                        ---स्नेहदर्शन