मलेशिया हा नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त लाभलेला एक देश! जगभरातले लोक येथे पर्यटनस्थ्ळ म्हणून येतात. हा सर्व भाग सदाहरित वृक्षराजीने नटलेला. ह्या मलेशियातील एका खेडेगावात (कांपुंग) जाऊन तेथील लोकजीवन पाहण्याचा सुयोग आला त्याचीच ही कथा. स्वप्नाच्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कांही दिवस कांपुंगमध्ये राहून खेडूतांना वैद्यकीय सेवा पुरविणे हा अभ्यासक्रमाचाच एक भाग असतो. शेवटी फेअरवेल पार्टी आयोजित केली जाते. त्या समारंभाला सूनबाइसह मीही हजर राहिले होते.
गाव साधारणपणे कारने तासभर अंतरावर होते. रात्री ९ वाजता गावात पोहोचलो. गावाचे नाव तेपी सुंगाइ. गर्द झाडी. गाव समुद्राच्या किनारी वसलेले. समुद्र एका हांकेच्या अंतरावर.
पलीकडील एका बाजूला 'पीनांग' शहरातील दिव्यांचा लखलखाट मन वेधून घे होता. मुख्य म्हणजे गाव ''सुनामी''च्या भयंकर लाटांनी हादरलेले!! पण २-४ पडकी घरे सोडली तर सुनामींचा मगमूसही नाही. ना गावात ना लोकांच्या नजरेत!! सरकारने सर्वाना पक्क्या व समान बांधणीची घरे बांधून दिली आहेत. घरे अतिशय नीट नेटकी वाटली.
गाव शंभर एक घरांचे असेल. सर्व वस्ती कोळ्यांची. लोकांचा व्यवसायही तोच. पण माशांचा वासही येत नव्हता. आपल्याकडील कोळीवाडा आठवला आणि अंग शहारले.
कार्यक्रम गावातील कम्युनिटी सेंटरमध्ये होता. आम्ही तिकडेच गेलो. सर्व गावकरी आतुरतेने आमची वाट पाहत होते. मुखिया(पालांग)ने आणि त्याच्या बायकोने(मालांग) सुहास्यवदनाने आमचे स्वागत केले. भिंतीवर केडाचा राजा, पंतप्रधान ह्यांचे फोटो दिमाखात झळकत होते. केडाचा ध्वजही फडकत होता. आपल्याकडे फार महत्त्वाचे पाहूणे आले आहेत असा भाव सर्वांच्याच नजरेत दिसत होता.
त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून तो प्रतीत होत होता. मुखिया मलाया मध्ये जे काही बोलला ते समजणे शक्य नव्हते पण त्याचा भावार्थ मात्र कळला. नंतर विद्यार्थी आणि गावकरी यांनी पारंपारीक गाणी व नाच सादर केले. अर्थ कळतनसला तरी मन लोभावून टाकणारे होते हे नक्कीच!
त्यानंतर अर्थातच डिनर! गाव कोळ्यांचे आणि आम्ही शाकाहारी. तेव्हां घरी जाऊनच जेवण करावे लागणार असे वाटतहोते पण अहो आश्च्र्यर्यम! आमच्यासाठी खास सर्वानाच शाकाहारी बेत होता, ३-४ प्रकारच्या नूडल्स(कोएत्यो, मेऊन, इ. ), बटाट्याचे सारण भरलेल्या करंज्या, केळी, रामबुतान,
कसलीतरी हिरव्या रंगाची पाने टा़कून केलेल्या गोड वड्या आणि त्यावर कहर म्हणजे फ्रूट ज्यूस म्हणून शहाळ्याचे पात्तळ काप टाकलेले गोड, सुमधुर शहाळ्याचे पाणी! 'अमृततुल्य 'असेच वर्णन करावे इतके गोड. सर्वजण आग्रहपूर्वक, मन; पूर्वक विचारीत होते. स्वयंपाक केलेल्या गॄहिणीला आम्ही बोलाविले. ती आली. आपल्या कोंकणातल्या प्रेमळ आजीसारखीच वाटली. 'आवडले' असे खाणाखुणा करींत सांगितले. म्हातारी ने रंगात येऊन 'रेसिपी' सांगितली. आम्हीही माना डोलवित राहिलो. नंतर फोटो सेशन. पोट आणि मन दोन्ही भरून गेले होते. मलेशियन खेडूतांच्या प्रेमळ आदरातिथ्याने आणि वागणुकीने मन भारावून गेले. वाटले, 'अरे, जात, धर्म, देश सब झूठ है, आपण सर्व एकाच पृथ्वीमातेची लेकरे आहोत हेच सत्य आहे'. त्या लोकांच्या आचरणातून त्यांनी हे दाखवून दिले.
परत येताना प्रोफेसरसाहेब सांगत होते, 'हे आमचे विद्यार्थी जाताना खूप कुरकुर करतात. पण आल्यावर खुप बदललेले असतात. 'वर्तनात अपेक्षित बदल'हीच शिक्षणाची व्याख्या येथे फिट्ट बसते. माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय अनुभव मला परदेशात घेता आला हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे.
आणखीन फोटो इथे बघता येतील -
http://www.flickr.com/photos/28971280@N07/