हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ’अभिनव भारत’ हा क्रांतिदेवतेच्या मंदिराचा पाया, शचिंद्रनाथ संन्यालांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली ’हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेना’ हा त्या मंदिराचा गाभारा तर राशबिहारीबाबू व नेताजींची ’आझाद हिंद सेना’ हा मंदिराचा कळस मानावा लागेल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेतून, परिश्रमातून आणि नियोजनातून स्फोटक विद्या हिंदुस्थानात आली आणि नव्या शतकाच्या पहिल्याच दशकात कोलकत्त्याच्या माणिकतल्ला येथे पहिला हिंदुस्थानी बॉंब तयार झाला. बंगालच्या छाव्यांना जणू नवे खेळणेच सापडले. शिक्षा, तुरुंगवास, मृत्यू वगैरेचे काडीमात्र भय नसलेली बंगाली मुले या नव्या शस्त्राकडे आकर्षित झाली नसती तरच नवल.

याच शस्त्राचा वापर बंगालच्या संतप्त क्रांतिकारकांनी किंग्जफोर्ड या जुलमी न्यायाधीशावर करायचा निश्चय केला. स्वातंत्र्याची आराधना हाच सर्वोच्च गुन्हा ठरवून समोर येणाऱ्या प्रत्येक तरुणाला जास्तीत जास्त कडक व भयंकर शिक्षा देणारा किंग्जफोर्ड हा क्रूर न्यायाधीश सरकारी प्रशंसेस पात्र ठरला व बढतीवर मुझफ्फरपुर येथे नियुक्त झाला. त्याची जुलुमी कारकिर्द संपवून टाकण्याचा निश्चय बंगाली क्रांतिकारकांनी केला. ही कामगिरी उत्साहाने स्विकारली ती ’वंदे मातरम’ या शब्दाचा ध्येयमंत्र म्हणून अंगिकार केलेल्या खुदिराम बोस नावाच्या १८ वर्षाच्या युवकाने व त्याने आपला सहकारी म्हणून आपला धाडसी मित्र प्रफुल्ला चाकी याची निवड केली.

खुदिराम बोस. एक अत्यंत देशाभिमानी युवक. मात्या पित्यांचे छत्र वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच हरपले. मात्र अशा परिस्थितीत मार्ग भरकटून चुकीच्या रस्त्याला न लागता त्याने क्रांतिमार्ग अंगिकारला. "आपला भारत देश हा विद्वत्तेचा, संस्कृतिचा, ज्ञानाचा असे म्हटले जाते; मग या देशात हे लालतोंडे इंग्रज कशाला? या देशातील जनतेला आपल्या मर्जीने जगण्याचेही स्वातंत्र्य का नसावे? " या विचाराने खुदिराम अस्वस्थ झाला.

एकदा खुदिरामने एका मंदिरात काही माणसे पालथी पडलेली पाहिली. विचारले असता त्याला असे कळले की त्या माणसांना व्याधी जडल्या होत्या आणि देव दर्शन देउन जो पर्यंत व्याधीमुक्त करित नाही तोपर्यंत ते देवाला साकडे घालीत असेच राहणार होते. एक दिवस मीही असाच इथे पडलेला दिसेन असे खुदिरामने म्हणताच मित्रांनी आश्चर्याने त्याला कोणती व्याधी जडली आहे अशी विचारणा केली. खुदिराम उद्गारला ’मला, तुम्हाला आणि समस्त हिंदुस्थानवासियांना एक भयंकर व्याधी जडली आहे आणि ती म्हणजे पारतंत्र्य! " या व्याधीतून मुक्ती ही मिळवावीच लागेल. खुदिरामने स्वत:चे आयुष्य क्रांतिकार्यात झोकून दिले.

२८ फेब्रुवारी १९०६ रोजी मिदनापुरात भरलेल्या शेतकी प्रदर्शनानिमित्त साऱ्या भारतातून लोक जमले असता खुदिरामने सत्येंद्रनाथ लिखित अत्यंत प्रक्षोभक अशा ’सोनार बांगला’ च्या प्रती वाटल्या व त्याला अटकही झाली मात्र त्यातून तो सुटला. पुढे त्याने आपले क्रांतिकार्य गुप्तपणे पण नेटाने चालुच ठेवले. टपाल लुटणे, हत्यारे जमविणे वगैरे कृत्ये त्याने बिनबोभाट केली इतकेच नव्हे तर एकदा चक्क लेफ्टनंट गव्हर्नरच्या खास गाडीखाली स्फोटही घडवायचा प्रयत्न केला. बंगालच्या भडकत्या वणव्याला विझविण्यासाठी हिंदू-मुसलमान फूट पाडण्यासाठी सरकारने फाळणी घोषीत केली आणि दडपशाही आरंभिली. वंदे मातरम हे देशभक्त वर्तमानपत्र बंद करण्यात आले.

२६ ऑगस्ट १९०७ रोजी या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी बंगाली युवक रस्त्यावर उतरले होते, त्यांना पोलिसांनी प्रत्यवाय केला. आम्ही शांततापूर्ण निदर्शने करित असता आम्हाला अटकाव का असे सुशिलकुमार सेन या युवकाने विचारताच पोलिसांनी त्याच्यावर हल्ला चढवला व प्रत्युत्तरादाखल सुशिलनेही त्या पोलिसाला चोप दिला. त्याला अटक झाली व सुनावणी किंग्जफोर्डपुढे होताच त्याने सुशिलला फटक्यांची शिक्षा सुनावली. या क्रूर इंग्रजाला कंठस्नान घालण्याचा निश्चय बंगाली युवकांनी केला व तो मान खुदिरामला मिळाला.

अपुरी यंत्रणा, तुटपुंजी साधन सामुग्री, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पोलिस व गुप्तचरांची करडी पाळत यामुळे अनेक कट दुर्दैवाने फसले, मूळ योजलेल्या ऐवजी अनेकदा चुकिच्या व्यक्तिवर अनवधानाने हल्ले केले गेले व नेमकी व्यक्ती वाचली असे अनेकदा घदले. हुतात्मा खुदिरामच्या बाबतीतही नेमके हेच घडले. धाडसी हल्ला झाला खरा, पण त्या वाहनात बॅरिस्टर केनेडीची पत्नी व मुलगी होत्या, त्यामुळे किंग्जफोर्ड बचावला. मात्र त्या ह्ल्ल्याने चवताळलेल्या सरकारी यंत्रणेने घरपकड सुरू केली. प्रफुल्ला चाकी सुदैवी! त्या हुतात्म्याने पोलिसांनी पकडायच्या आधीच स्वत: वर गोळी झाडून घेतली व हौतात्म्य पत्करीत कटाची माहिती मिळवायचा पोलिसांचा मार्ग बंद केला. पाठलाग चुकवित लपत छपत निसटणारा खुदिराम मात्र पाठलागाने दमलेल्या, भागलेल्या व अत्यंत भुकेलेल्या स्थितीत बाजारात खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या हाती सापडला.

ज्या नीच माणसाने माझ्या देशबांधवांवर जुलुम केले त्याला मी मारला आणि त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आणि चाकीचीच आहे असे अखेरपर्यंत ठणकावून सांगत हुतात्मा खुदिराम बोस वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी हौतात्म्य स्विकारल्याच्या आनंदात ताठ मानेने फासावर गेला. न्यायाधिशाने फाशी सुनावल्यावर त्याला काही सांगयचे आहे का असे विचारताच तो म्हणाला, "होय! मला बॉंबची माहिती सांगायची आहे" या उत्तराने न्यायासन निरुत्तर झाले. हुतात्मा खुदिराम हसतमुखाने हातात गीता घेऊन व मुखाने वंदे मातरमचा मंत्रघोष करीत फासावर गेला. वय होते अठरा वर्षे आठ महिने नऊ दिवस. हौतात्म्य दिनांक ११ ऑगस्ट १९०८, मंगळवार. स्थळ मुझफ्फरपुर कारागृह. आज हुतात्मा खुदिरामच्या हौताम्याची शताब्द्यपूर्ती! हुतात्मा खुदिराम आणि हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांच्या स्मृतिस सादर अभिवादन.

त्या तेजस्वी बलिदानाला शंभर वर्षे पूर्ण होत असतानाच आज त्या दिवशी आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो त्या बलिदानाचे अलौकिकत्व वर्णन करणाऱ्या एका अजरामर हौतात्म्यगीताचा - ’ऍक बार बिदाय दे मा’. हसत हसत आनंदाने हौतात्म्य पत्करणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाचे मनोगत व्यक्त करणारे हे हौतात्म्य गीत बंगालच्या आबालवृद्धांच्या ओठावर दशकानुदशके राहिले तर त्यात नवल ते काय? या मूळ बंगाली गीतावर आधारीत मराठी रचना कवी कुंजविहारी यांनी केली आणि ती महाराष्ट्रात सर्वतोमुखी झाली होती - ’भेटेन नऊ महिन्यांनी’. अर्थात हे भाषांतर नव्हते तर समविचारी, नेमक्या त्याच भावना व्यक्त करणारे गीत होते.

’ऍक बार बिदाय दे माऽ’ हे गीत लोकगीतकार व क्रांतिकवी नझरुल इस्लाम यांचे आहे. बंगालमधील साहित्य क्षेत्रातील ’कल्लोल युग’ ज्या तीन कवींच्या नावे लिहिले गेले त्यापैकी नझरुल इस्लाम हे एक (ते तीन कवी होते : जितेंद्रनाथ सेनगुप्त, मोहितलाल मुजुमदार आणि नझरुल इस्लाम), कल्लोल युग हे क्रांतिकारी व बंडखोर विचारसरणीच्या कवींचे मानले जाते. या कवींच्या रचना धगधगत्या नसल्या तरच नवल! नझरुल हे स्वत: ’सेनापती’ होते व युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले पहिलेच क्रांतिकवी असावेत. कवी नझरुल यांची गाणी ’नझरुल गीती’ या नावाने बंगालात प्रसिद्ध असून त्यांचे अनेक कार्यक्रम होत असल्याचे वाचनात आहे. हुतात्मा खुदिरामच्या व हुतात्मा प्रफुल्ला चाकीच्या हौतात्म्यशताब्दी सन्मानार्थ मूळ बंगाली गीत व त्याचा भावार्थ सांगण्याचा हा एक प्रयत्न.

ऍक बार बिदाय दे माऽ, घुरे आशी!
आमी हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी

- फासावर जाणारा पुत्र आपल्या आईला सांगतो आहे, की निरोप दे आई, मी आता अलौकिक प्रवासाला निघालो आहे पण मी परत येणार, नक्की येणार. आपल्या अंतिम ध्येयासाठी कामी येणार या समाधानात मी तर हसत हसत फाशीचा दोर एखाद्या हारासारखा गळ्यात घालून घेईन आणि माझे हौतात्म्य सारे भारतवासीय डोळे भरून पाहतील (मात्र त्या क्षणी तू शोक करू नकोस)

कोलेर बोमा तैरी करे दांडियेछिलाम रास्तार धारे
बडो लाटके मारते गिये, मारलाम आर एक इंग्लंडबाशी

- काय दुर्दैव सांगू? खास बनवलेला बॉंब सज्ज करून आम्ही रस्त्याच्या कडेला दबा धरून लाटसाहेबाची प्रतीक्षा करीत होतो. तो क्षण साधला खरा पण प्रत्यक्षात चुकून तो (म्हणजे किंग्जफोर्ड) वाचला आणि भलतेच कुणी ईंग्रज मारले गेले! ज्यासाठी सगळा बेत रचला तो क्रूरकर्मा अखेर मारला गेलाच नाही तर उलट कुणी भलतेच मृत्युमुखी पडले याची खंत आहे. उगाच कुणा इंग्रजाच्या कुटुंबियांना हात लावणे हे कुठल्याही क्रांतिकारकांच्या तत्त्वात बसणारे नव्हते.

हाते दिये थाकतो छोरा, तोर खुदी कि पडतो धरा माऽगो
रक्त माश एक करिताम, देखतो जगत बाशी

- पकडलो गेलो त्या प्रसंगी जर माझ्यापाशी एखादा सुरा असता तर मी पकडलो गेलोच नसतो; उलट त्या सुऱ्याने पकडायला आलेल्या गोऱ्यांची खांडोळी केली असती आणि रस्त्यावर त्यांच्या रक्तमांसाचा सडा पडलेला दिसला असता, मी सरकारच्या हाती पडलो नसतो. इथे मृत्युचे भयही नाही आणि जीवनाची आसही नाही तर केवळ ध्येयाची आसक्ती आहे! विलक्षण योगायोग असा कि अगदी पुढच्याच वर्षी म्हणजे जुलै १९०९ मध्ये हुतात्मा मदनलाल धिंग्राने जेव्हा वायलीचा वध केला तेव्हा त्याने आपल्या पिस्तुलाव्यतिरिक्त बाहीवर एक सुराही लपविला होता. उद्देश हाच की शस्त्र हे यंत्र आहे, चुकून ते बिघडले तरी आपला कार्यभाग सिद्धिस जाणे हे महत्त्वाचे, नंतर आपले काय व्हायचे ते होवो. हुतात्मा खुदिरामच्या मनातली ती तळमळ इथे व्यक्त केली आहे. पकडला गेल्याचे दु:ख नाही पण कार्य अर्धे राहिले ते पुरे झाले नाही याचा खेद आहे. म्हणुनच हे गीत जरी हुतात्मा खुदिरामला उद्देशून असले तरी ते प्रत्येक क्रांतिकारकाच्या भावना व ध्येय व्यक्त करणारे आहे.

शनिबार बेला दाष्टार पोरे जोर्जकटेते लोक ना धारे माऽगो
होलो अभिरामेर द्वीप चालान मा खुदिरामेर फाशी

- शनिवारी सकाळी दहा वाजून गेल्यावर न्यायालयाचे काम सुरू झाले. अभियोगाच्या निकाल जाहीर होणार होता, सगळे न्यायालय तो निकाल ऐकायला जमलेल्या लोकांनी खच्चून भरले होते. माझ्यावर भरलेल्या अभियोगात मला दोषी ठरविण्यात आले आणि फाशीची शिक्षा देण्यात आली. माझा इथला प्रवास आता संपणार!

बारा लाख तेत्रीश कोटी रोईलो मा तोर बेटाबेटी माऽगो
तादेर निये घर करिश माऽ बऊदेर करिश दाशी

- आई ग, मी तर चाललो, पण उरलेले तेहेतीस कोटी बारा लाख हिंदुस्थानी जन हे तुझेच पुत्र, कन्या, जावई आणि सुना आहेत; आता तुझी सेवा त्यांच्याकडूनच घडेल. इथे कवीला दोन अर्थ अभिप्रेत आहेत. एक म्हणजे हुतात्मा खुदिराम आपल्या आईला म्हणजे भारतमातेला सांगतो आहे सांगतोय की माझी सेवा इथेच संपली तरी तुझ्या सेवेत खंड पडणार नाही; एकाहून एक सरस असे सुपुत्र तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकायला उभे राहतील. दुसरा अर्थ असा की एक मुलगा आपल्या आईला अखेरचा निरोप घेताना सांगतोय की आई आता लेकाची वा सुनेची हौस तु या उरलेल्या मुलांमध्येच पाहा कारण तुझा मुलगा तर लग्न, संसार या सगळ्या पलिकडचा आहे आणि तो तुला ते सुख या जन्मी तरी देऊ शकत नाही. १९६४ साली आलेल्या ’शहिद’ या हुतात्मा भगतसिंहांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात फाशी जाण्यापूर्वी हुतात्मा भगतसिंहाच्या भावना व्यक्त करताना प्रेम धवन लिहून गेले:

" तु न रोना के तु है भगतसिंह की मा, मरके भी लाल तेरा मरेगा नही;
घोडी चढके तो लाते है दुल्हन सभी, हसके हर कोई फासी चढेगा नही"

क्रांतिकारक हे सुद्धा सुपुत्रच होते आणि मातृऋणाची त्यांनाही जाणिव होती मात्र त्यांनी सख्ख्या आईपेक्षा हिंदमातेलाच आई मानले! जाताना आपल्या जन्मदातीला दिलासा देताना तो क्रांतिकारक म्हणतोय, की आता जातोय पण लवकरच परत येइन कारण अजून तुझी सेवा करायची बरिच बाकी आहे.

दशमाश दशदिन पोरे जन्म नेबे माशिर घरे माऽगो
ओ माऽ तॉखन जदी ना चिनते पारिश देखबे गोलाय फाशी

आई, जातोय पण दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी (म्हणजे नऊ महिने व नऊ दिवस भरल्यावर) मी मावशीच्या पोटी जन्माला येणार आहे! इथे पुन्हा आईच्याच पोटी जन्माला येईन असे न म्हणता मावशीच्या पोटी जन्माला येईन असे लिहिले आहे कारण एकतर इथे कवीला पुनर्जन्माच्या कल्पनेपेक्षा कर्तव्यपूर्तीसाठी पुनरावतार अभिप्रेत आहे. दुसरे असे की हुतात्मा खुदिरामची आई त्याच्या बालपणीच गेली होती, तेव्हा त्याला पुन्हा तीच्या पोटी जन्म घ्यायला तीच हयात नव्हती. पण स्वातंत्र्य मिळे पर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेणार आणि पुन्हा पुन्हा देशकार्यास्तव मरण पत्करणार हे निश्चित.

अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदी ना चिनते पारिश... ’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’.... अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी! किती भयंकर कल्पना आहे, की मुलगा आपल्या आईला आपल्या गळ्यावरील फाशीच्या दोराचे व्रण हीच ओळख पटवून देतोय आणि पुन्हा जन्माल्या आल्यावरही अभिमानाने गतजन्मीचे फाशीचे व्रण गळ्यावर वागवतोय आणि आपल्या आईला ती आपल्याला नव्या अवतारात ओळखायची जन्मखूण सांगतोय. ही जन्मखूण म्हणजे पुन्हा याच मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा शस्त्र धारण करून पुन्हा फासावर जाणार असल्याचेच जणू द्योतक आहे. केवळ हुतात्मा खुदिरामच नव्हे तर असंख्य क्रांतिकारकांची हीच भावना होती. म्हणूनच हे एक अजरामर हौतात्म्यगीत आहे असे मला वाटते.

दिव्य हुतात्मे आणि त्यांच्या अलौकिक हौतात्म्याचे, त्यांच्या धेयासक्तिचे, त्यांच्या मानसिकतेचे आणि वज्रनिश्चयाचे वर्णन करणारे हे अजरामर गीत लताबाईंच्या काळीज हेलावून टाकणाऱ्या आवाजात येथे ऐका. (कवी काझी नझरुल इस्लाम, संगीत अपरेश लाहिरी - बप्पी लाहिरी यांचे तिर्थरूप; चित्रपट सुभाष चंद्र)