रशिया-जॉर्जिया युद्धातील विरोधाभास

रशिया आणि जॉर्जियातील युद्ध आज थांबले आहे. पण जसे हे युद्ध सुरू झाले तसेच या युद्धातील विरोधाभास स्पष्टपणे दिसून येऊ लागला. मुळात रशियातील जे परदेशी नागरिक व इंग्रजी भाषा समजणारे व आंतरराष्ट्रीय मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरिक यांना तर या युद्धाने एकदमच confuse करून टाकले. त्यामुळे युद्ध सुरू करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजूनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रीय मीडिया म्हणजे सीएनएन, बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजूने बातम्या देत होता व रशियन मीडिया त्याच्या बरोबर विरुद्ध बातम्या देत होता.

एक गोष्ट मात्र नक्की की जॉर्जियाचे राष्ट्रपती मिहाईल(मायकल) साकश्विली यांनी आंतर्राष्ट्रीय मिडियाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला. मुख्य म्हणजे त्यांना इंग्रजी येत असल्याने त्यांचा पत्रकारांशी थेट संवाद होत होता व ते सतत मीडियाच्या बरोबर राहून आपली वक्तव्ये करत होते. तर त्याच्या बरोबर विरुद्ध रशियन मीडिया जॉर्जियाची कशी चूक आहे व जॉर्जियन राष्ट्रपती कसे खोटे बोलत आहेत हे दाखवत होते. एका बातमीमध्ये साकश्वीली रस्त्यावर बुलेट प्रुफ जॅकेट घालून आलेले सीएनएन, बीबीसीने दाखवले होते त्याच्या रशियन मीडियानी चांगलाच समाचार घेतला. बातमीच्या आधीच्या फुटेजमध्ये साकश्विली मनसोक्त हसताना रशियन मीडिया ने दाखवले व सांगितले की 'यांचा देश अतिशय मोठ्या संकटात आहे हे साकश्विली सांगतात आणि इथे तर मनसोक्त हसत आहेत'. मग थोड्या वेळाने साकश्विली यांनी पत्रकारांना सांगितले की रशिया कसा हल्लेखोर आहे, त्यानंतर मग आकाशातून कसलातरी आवाज आला आणि एकदम साकश्विली आणि त्यांचे अंगरक्षक पळापळ करू लागले आणि नंतर साकश्विली खाली बसले व त्यांना वरून व इतर सर्व बाजूंनी अंगरक्षकांनी गराडा घातला. यावेळी आंतरराष्ट्रीय मीडियानी सांगितले की आकाशातून जॉर्जियावर हल्ला होण्याची शक्यता आहे वगैरे. याचा समाचार घेताना रशियन मीडियानी दाखवले की हा सर्व साकश्विली यांनी केलेला स्टंट होता कारण अस इतकं लगेच घाबरून जाण्यासारखं काहीच झालं नव्हत. नंतर परत अशीही पुस्ती जोडली की साकोश्वीली सगळ्या जॉर्जियन्सना सांगत आहेत की 'घाबरू नका' आणि साकोश्विली स्वतःच घाबरले आहेत.

एकीकडे जॉर्जियन राष्ट्रपती रशिया वर सगळा दोष टाकत होते आणि असेही सांगत होते की रशियाने बीबीसीच्या पत्रकारांवर हल्ला केला त्याचवेळी रशियन मीडिया जॉर्जियावर दक्षिण आसेतियन लोकांवर जॉर्जिया करत असलेल्या 'जिनोसाईड'चा इतिहास देत होता. जॉर्जियन राष्ट्रपती असेही म्हणत होते की 'जॉर्जिया हा जगातल्या सर्वात चांगल्या लोकशाही देशांपैकी एक देश आहे' तर रशियन वरिष्ठ पत्रकार सांगत होते की जॉर्जिया जगातला सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे. जॉर्जियाने विविध देशांकडून खरेदी केलेल्या शस्त्रांची यादीही रशियन मीडिया दाखवत होता. जॉर्जियाने गेल्या ५ वर्षात आपले डिफेन्स बजेट ३० पटीने का वाढवले आहे, इतक्या लहान देशाला १ अब्ज डॉलर्स इतकं डिफेन्स बजेट कशाला लागत, तसेच जॉर्जिया जगातला सर्वात चांगला लोकशाही देश नाही तर सर्वात जास्त युद्धसामग्री खरेदी करणारा देश आहे हे सांगत होते.

यामध्ये अमेरिकेच्या भूमिकेचाही उहापोह झाला. साकश्विली अमेरिकेने यात हस्तक्षेप करावा व लष्करी मदत करावी अशी भूमिका घेत होते. त्याचबरोबर जॉर्ज बुश यांनीही रशियावर सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. रशियाने मात्र फक्त 'अमेरिका या सर्वाच्या मागे आहे' एव्हढं म्हणणंच बाकी ठेवलं होत. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकन डिप्लोमॅटस व 'एक माणूस'(वाचा-जॉर्ज बुश) यामागे आहेत असे जवळपास स्पष्ट बोलत होते तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रिय मिदवेदोव म्हणत होते की आमचे पश्चिमेकडील 'पार्टनर्स' आम्हाला समजून घेत नाहीत व त्यांनी साकोश्विलींच्या बोलण्यावर फारसं लक्ष देऊ नये. रशियाच्या युएन मधल्या ब्युरोक्रॅटनी मात्र सडेतोड उत्तर दिली. अमेरिकेचे १२३ वरिष्ठ अधिकारी जॉर्जियात काय करत आहेत, अमेरिका जॉर्जियन सैन्याला इराकमधून स्वतःच्या दळणवळणाच्या साधनांतून जॉर्जियात वापस का आणत आहेत असे सडेतोड प्रश्न विचारत होता. त्याचबरोबर रशियन मीडिया अशीही बातमी देत होते की अमेरिकेने जॉर्जियन सैनिकांना खास प्रशिक्षण दिले आहे त्याचबरोबर एक कृष्णवर्णीय अमेरिकनही यात मरण पावला आहे. तो अमेरिकेचा सैनिक असावा असे त्यांचे म्हणणे होते.

हा मूळ वाद तसा जुनाच आहे. पंधरा वर्षापूर्वी फाळणीवादी आसेतियन्सनी मोठा उठाव केला होता. रशियाचे म्हणणे आहे की त्यावेळी जॉर्जियाने हजारो आसेतियन्सचे 'जिनोसाईड' केले. त्यानंतर रशियन शांतिदूत दक्षिण आसेतियात गेले. त्यानंतर रशिया म्हणत होता की उत्तर आसेतियन्सप्रमाणे दक्षिण आसेतियन्सनाही रशियात यायचे आहे. त्यांनी जवळपास २०००० आसेतियन्सना रशियन पासपोर्ट दिले. म्हणजे थोडक्यात हे लोक रशियाचे नागरिक झाले. आधी फाळणीवाद्यांनी हल्ले करायला सुरुवात केली असे जॉर्जिया म्हणते आहे. मग जॉर्जियाने त्ष्किनवाली वर हल्ला केला ज्यात रशियाचे काही शांतिदूत व रशियाचे नागरिक(आसेतियन ज्यांना रशियाने पासपोर्ट दिले) मारले गेल्याने रशियाने प्रतिहल्ला केला. जॉर्जियाचे राष्ट्रपती म्हणत आहेत की रशियाने प्रथम हल्ला केला आणि त्यांचा उद्देश जॉर्जियावर हल्ला करून सत्ता उलथवण्याचा आहे. साकश्विली रशियन सरकारला मुख्यकरून व्लादिमीर पुतीन यांना अजिबात आवडत नाहीत कारण साकश्विलींनी पुतीन यांना 'लिलिपुतीयन' म्हणून हिणवले होते. पुतीन असेही म्हणून गेले की साकश्विली बरोबर बोलणी होऊ शकत नाहीत.

आज फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कॉझी मॉस्कोत आले व त्यांनी मिदवेदव यांच्याशी चर्चा केल्यावर रशियने शस्त्रसंधी केली. पण अमेरिका व युरोपियन देशांचा या युद्धामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नॅटो मध्ये गेलेल्या रशियन एन्व्हॉयनी मे२००८ मध्येच जॉर्जिया युद्धाच्या तयारीत आहे असे वक्तव्य केले होते. मात्र रशियात राहणाऱ्या लोकांना नक्की कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे कारण आंतरराष्ट्रीय मीडिया व रशियन मीडिया एकदम परस्परविरोधी विधाने करत आहेत.