स्वामी अभिनयाचा 'ऑफर'विना भिकारी!

चित्रपटसृष्टी फार निर्दय आहे. ती नको त्याला डोक्यावर बसवते आणि गरज असेल त्याला बाहेर फेकून देते. याच नियमानुसार एका अतिशय गुणी, प्रतिभावंत कलाकारावर सध्या अन्याय होतोय. गेली काही वर्षं तो पडद्यावर फारसा दिसत नाहीये. पडद्यावर काही वेळा दिसतंय, ते फक्त त्याचं नाव. तो आता (अभिनयाला कंटाळून की काय? ) निर्माता झालाय. 'खेल', 'रक्त', 'भागम भाग', 'मिशन इस्तंबूल'सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे (म्हणजे परदेशात चित्रित झालेले) चित्रपट त्यानं काढलेत. एखादा अपवाद वगळता ते फारसे कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही, हा भाग वेगळा. पण त्याची चित्रपटसृष्टीवरची निष्ठा वाखाणण्यासारखी आहे. देव आनंद, सावनकुमार, अर्जुन रामपाल, सेलिना जेटली यांची अभिनयावरची निष्ठा कौतुकास्पद आहे ना, तशीच! विशेषतः जी गोष्ट आपल्याला काही केल्या शक्य नाही, तिच्यासाठी आयुष्य खर्ची घालणं, याला निष्ठा म्हणायचं नाही, तर काय?
तर आपण त्या अभिनेता कम निर्मात्याबद्दल बोलत होतो. बलदंड शरीरयष्टीचा हा महामानव एकेकाळी उभा ठाकला, की अख्खा पडदा व्यापून जायचा. नायिका, खलनायक, त्याचे पित्ते त्याच्यासमोर चिल्लर वाटायचे. त्याच्या बलदंड शरीरयष्टीकडे (चेहऱ्याचा सन्माननीय अपवाद वगळता) पाहत राहावंसं वाटायचं. तोंडात रवंथ केल्यासारखे शब्द चघळून तो संवाद थुंकायचा. त्यांचा अर्थ लावण्यासाठी खलनायकालाच काय, प्रेक्षकांनाही महिनोन महिने घालवावे लागायचे.
पडद्यावरचं खलनायकांच्या धुलाईचं युग संपल्यानंतर तो विनोदी भूमिकांची धुलाई करायला लागला. हेही आपल्याला जमतंय, असा साक्षात्कार त्याला प्रेक्षकांच्या दुर्दैवानं झाला आणि तो तिथंही धुमाकूळ घालायला लागला. गेल्या तीन-चार वर्षांत तर तो चक्क निर्माताच झाला. चारपैकी तीन चित्रपट आपटल्यानंतर तरी हा आपला प्रांत नाही, हे त्याला कळलं असेल, असा प्रेक्षकांचा भ्रमाचा भोपळा त्यानं नुकताच फोडून टाकलाय. तो आणखीही चित्रपट निर्माण करणार आहे. या नरपुंगवाचं नाव सुनील शेट्टी आहे, हे तुम्ही आतापर्यंत ओळखलंच असेल!
गेल्या दोन वर्षांत अभिनेता म्हणून चांगल्या चित्रपटांच्या ऑफर आल्या नसल्याची खंत त्याला आहे. त्यामुळं आपण 'चूझी' झालेलो नाही, तर चांगले चित्रपटच नाहीत, असं त्यानं जाहीर करून टाकलंय. चला, आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो दोन म्हणतात ना, ते हेच!
निर्माता म्हणून नाही, पण निदान अभिनेता म्हणून या 'बलवाना'च्या तावडीतून प्रेक्षकांची सुटका होवो, हीच सदिच्छा!
----------