आय. सी. यू. चा मॉनिटर
जणू सुतार पक्ष्याची टकटक
वाजवितो म्रुत्यू आपलेच गाणे.
व्हेंटीलेटरचा आवाज
वाजवितो म्रुत्यू आपल्याच घंटा!
आय. सी. यू. त चालते सारखीच गडबड,
नर्सेसची लगबग नि डॉक्टरांची धावपळ,
सगळ्यांचे प्रयत्न या तीरावर अडकविण्यासाठी
जीवाला घाई पैलतीर गाठण्यासाठी !
मधला तो काळाशार अंधार,
आणि समुद्राचा आवाज,
गुदमरून टाकणारा अन श्वास कोंडून ठेवणारा.
हे कोण कुजबुजले कानाशी,
''चल, येतेस का सफरीला?
जाऊन येऊ तिरुपतिला ! ''
'छट , मला नाही वेळ,
इथलीच कामे पडली आहेत,
साऱ्यांचीच देणी द्यायची आहेत,
कांही वचनेही पाळायची आहेत. '
''ठीक आहे. मर्जी तुझी''
'माझ्याच बागडणाऱ्या मुलांसाठी
मला जगायचे आहे. '
मॉनिट्र टकटकतो आहे,
'आ. सी. यू. '
मी पाहत आहे बरे,
एकवार संधी दिली आहे''
एक सत्य मात्र मला उमगले आहे
मॉनिटरवरच सर्व जग जगते आहे,
त्याच्या असण्यानसण्यावरच जीवन फुलते आहे !
मी आय. सी. यू. त दाखल झालेले असताना माझ्या मनातील विचार मी मुक्तकाच्यारुपाने मांडले आहेत.