तो रस्ता दोन तीन दशकांहून जास्त जुना नव्हता. त्याचा तकाकणारा गुळगुळीत पृष्ठभाग ही तर अगदीच नवीन कमाई होती.
रस्त्याच्या वाटेत अचानक एक तळे आल्याने रस्ता उजवीकडे झुकाटला होता. पण पुढे एक टेकडी दिसल्यावर परत डावीकडे वळून त्याने तळ्याच्या नि टेकडीच्या मधून वाट काढली होती. या वाटचालीत त्याने एका नाल्याला खाली दडपले होते.
पूर्वी हा रस्ता प्रेमिकांसाठी सोयीचा म्हणून प्रसिद्ध होता. ही गोष्ट केव्हाची? तर जेव्हा हा रस्ता झाडांमध्ये लपला होता तेव्हाची. पण जळणासाठी अन घरातल्या वस्तूंसाठी लाकडाची मागणी वाढत गेली आणि वृक्षांचा अंत झाला. यच्चयावत सगळे पर्यावरणवादी एका फ्लायओव्हरला विरोध करण्यात गुंतले होते, त्यामुळे इकडे कुणाचे लक्ष गेले नाही. आणि नाहीतरी झाडं ठेवायचीच कशाला? पाऊस पडायला? पण पावसाचा नि झाडांचा काय संबंध? मा. वनमंत्र्यांनी* सांगितल्याप्रमाणे, अरबी समुद्रात एकही झाड नाही. आणि तरीही तिथे पाऊस पडतो.
प्रेमिकांनी इतर योग्य आणि आडबाजूच्या (किंवा, आडबाजूच्या आणि म्हणून योग्य) जागा शोधल्या, आणि झाडांवर वापरलेल्या निरोधच्या पताका लावणे बंद केले. त्या प्रेमिकांच्या जागी हातभट्टीचे प्रवर्तक आले. गढूळ तळ्याच्या काठी त्यांनी आपले उद्योग सुरू केले. हातभट्टी तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते, मग ते गढूळ असो वा स्वच्छ. हातभट्टी तयार करणाऱ्यांच्या, आणि पर्यायाने पिणाऱ्यांच्या, स्वच्छतेबद्दल भ्रामक कल्पना नसतात.
काही आठवड्यांपूर्वी महापालिकेकडे, कसा कुणास ठाऊक, कुठलातरी विशेष निधी आला. (परत कसे कुणास ठाऊक) त्यांनी तो चक्क रस्ते सुधारण्याच्या कामासाठी वापरायचा ठरवला. (आणि परत कसा कुणास ठाऊक) हा रस्ता त्या भानगडीत अडकला. एखाद्या योद्ध्याने आपल्या अंगावरच्या जखमा अभिमानाने बाळगाव्यात तसा हा रस्ता आधी त्याच्यावरचे खड्डे मिरवीत असे. स्वतःशीच विचार करीत तो "या खड्ड्यात आतापर्यंत सदतीस दुचाकी आणि सात रिक्षा गचकल्यात" "त्या खड्ड्यात जराशी दारू प्यायलेल्या दुचाकीस्वाराला (दिवस असो वा रात्र) थेट मोक्षाला पाठवायची क्षमता आहे" असे मनाशी बोलत बसे.
दुर्दैवाने हे सगळे आता गेले. आता रस्त्याचा पृष्ठभाग एखाद्या तरुण, नुकतेच पोटभर जेवण झालेल्या, अजगराच्या त्वचेसारखा झाला.
रस्त्याने वळण घेताना आपला पृष्ठभागही भूसमांतर न ठेवता तिरपावला होता. शाळेतले भौतिकशास्त्राचे मास्तर मुलांना इथे सहलीला म्हणून घेऊन येत, आणि "केंद्रापगामी बल" (सेंट्रीफ्यूगल फोर्स) समजावून सांगत. "जेव्हा वाहन डावीकडे वळते, तेव्हा वाहनाचे सगळे वस्तुमान त्याच्या गुरुत्त्वमध्याच्या उजवीकडे झुकते, आणि त्या वाहनावर कार्य करणाऱ्या बलांचे सदिश चित्र काढायचे झाले तर.... " असे म्हणून ते काही कंटाळवाण्या आकृत्या काढत. अशा सहली ही त्यांच्या आयुष्यातली एकुलती करमणूक होती. याच स्थळी काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या प्रेमिकेने त्यांना अव्हेरले होते, कारण जेव्हा ते तिला घेऊन इथे आले, तेव्हा आडोसा द्यायला झाडे होती पण निरोध (जो आणायचे ते विसरले होते) विकणारा कुणी दुकानदार नव्हता.
-----
ती एक गडददाट भरून आलेली संध्याकाळ होती. ढगांच्या कुंभमेळ्यातून वाट फाकत किरण पृथ्वीतलावर सोडावेत की मुकाट घरी जावे याबाबत सूर्य गेले दोन तास विचार करीत होता. अखेर मुकाट्याने निघण्याचा त्याचा निश्चय त्याने प्रत्यक्षात उतरवायला घेतला होता. पाऊस पडण्याची शक्यता ही कुठल्याही राजकारण्याने पक्ष बदलण्याच्या शक्यतेइतकीच एकाच वेळेस तेजतर्रार आणि मलूल होती.
तो रिक्षाचालक पार थकून गेला होता. आपल्या सासऱ्याचे और्ध्वदेहिक उरकून तो कालिकतहून वेगवेगळ्या राज्य परिवहन मंडळांच्या बसेस बदलत छत्तीस तास प्रवास करून आला होता. तेवढा काळ त्याला झोप मिळाली नव्हती हे उघड होते. आता या नवीन कॉलनीतल्या किराणा दुकानदाराकडे एवढा माल टाकला की त्याला पाचेक तास झोप मिळणार होती. मग त्याला मध्यरात्रीची पॅसेंजर रिक्षा चालवायची शिफ्ट होती. तो निरक्षर होता, त्याला चार मुले होती, जी त्यांच्या आईसोबत कारवारला राहत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, 'केंद्रापगामी बल' हे काय लचांड आहे याबाबत तो ठार अनाभिज्ञ होता.
त्या सिटीबस ड्रायव्हरचं टाळकं सरकलं होतं. सतत पाचव्यांदा त्याच्या (त्याने) मानलेल्या सासऱ्याने त्याचा प्रत्यक्षातला सासरा व्हायला नकार दिला होता. आणि नुसता नकार देऊन तो @@@@, ##### थांबला नव्हता, तर त्या ड्रायव्हरच्या मातोश्रींच्या काही अवयवांबद्दल त्याने एखादा क्रांतिकारी भडक नवकवीही लाजेल अशा भाषेत जाहीर घोषणा केल्या होत्या.
ही त्याची दिवसाची शेवटची फेरी होती. एकदा ही बस रामनगर टर्मिनसच्या कंट्रोलरसमोर नेऊन उभी केली की मग तो परत जाणाऱ्या कुठल्याही बसमध्ये शिरून तळ्याकाठी उतरणार होता. आणि तिथे मिळणारे कडक आणि सणसणीत आगपाणी पोटात घालून तो त्याच्या मानलेल्या सासऱ्याच्या मातोश्रींच्या शरीररचनेबाबत काही गोष्टी त्याच्या ग्लासमेटसना शक्य तेवढ्या सरळ जिभेने नि:संदिग्ध भाषेत सांगणार होता.
आता टर्मिनस यायलाच झाले होते. "शेवटचा स्टॉप, शेवटचा स्टॉप" कंडक्टर गरजला. ड्रायव्हरला समोर दुधाळ रंगाचे द्रव्य भरलेली बाटली दिसू लागली. त्याने स्टिअरिंग गरागरा उजवीकडे वळवले. रस्त्यावरचे दिवे बंद होते, आणि बसचे दिवे एखाद्या कंदिलापेक्षा थोडे(च) जास्त प्रखर होते या बाबी त्याने मनावर घेतल्या नाहीत. रस्त्याच्या डाव्या बाजूला राहायला हवे हे मनावर घेतले नाही. आणि मिणमिणत्या प्रकाशात का होईना, समोर एक रिक्षा उमटते आहे हेही मनावर घेतले नाही. शिवाय त्याला 'केंद्रापगामी बल' हे झेंगट माहीत नव्हते.
अशा रीतीने 'केंद्रापगामी बल' हे प्रकरण माहीत नसलेल्या दोन व्यक्ती दोन चल यंत्रांमधून एकमेकांसमोर आल्या. निर्विकारपणे केंद्रापगामी बलाने आपला बळी मिळवला.
बसच्या धडकेने रिक्षाचा वरचा चार पंचमांश भाग सपाट झाला. 'केंद्रापगामी बल' हे लफडे माहीत नसताना त्या रिक्षात असण्याची किंमत त्या रिक्षाच्या ड्रायव्हरला चुकवावी लागली. त्याच्या हाडामांसाचे पार पिठले होऊन गेले.
मानलेल्या सासऱ्याच्या खऱ्या आईच्या खऱ्या अवयवांबद्दल स्पष्ट बोलण्याचा बेत त्या बसड्रायव्हरला रद्द करावा लागला, कारण कितीही सुधारणा झाल्या असल्या तरी अजूनही पोलिस ठाण्यातल्या कच्च्या कैद्यांना आगपाणी मिळत नाही. उलट झोपेच्या अभावामुळे चिरडीला आलेल्या एका कॉन्स्टेबलने आपल्या नाल ठोकलेल्या बुटाच्या टाचेने त्या ड्रायव्हरचेच काही अवयव इतक्या स्पष्टपणे चिरडले की दुधाळ रंगाचे द्रव्य भरलेली बाटली दिसण्याऐवजी त्या ड्रायव्हरच्या नजरेसमोर भडकलाल रंगाची बेशुद्ध करणारी वेदना उमटली.
-----
एका भिजक्या सकाळी, कारवारमधल्या शाळेत, एका मुलाने मास्तरांना विचारले, "सर, सेंट्रीफ्यूगल फोर्स म्हणजे काय हो? "
*(ही चेष्टा नव्हे, तर केरळमधील सिद्दीकी नामक एका वनमंत्र्याने हे प्रत्यक्ष केलेले विधान आहे)