दादा...

क्रिकेट म्हटलं की ज्याचं रक्त उसळत नाही तो खरा  भारतीय माणूसच नाही अशी क्रिकेटची व्याख्या केली तर ती अतिशयोक्ती ठरू नये. आईच्या जिवाला घोर लावून ऐन परीक्षांच्या काळात रात्री जागून मॅचेस पाहण्यापासून ते अभ्यासाच्या टेबलापाशी सचिन तेंडुलकरचं पोस्टर लावून त्या पोस्टरचाच जास्त अभ्यास करण्यापर्यंत क्रिकेट आम्ही अनुभवलं. सचिन - द्रवीड - गांगुली ही त्रिमूर्ती खरोखरच देवत्वाला पोहोचलेली आम्ही पाहिली. आमची पिढी या लोकांबरोबरच मोठी झाल्यामुळे त्या सोनेरी दिवसांमधल्या बऱ्याचशा रोमहर्षक क्षणांचं श्रेय निःसंशयपणे या लोकांना जातं.
या त्रिदेवांमधला दादा आता निवृत्त होणार आहे अशी बातमी नुकतीच वाचली. पदार्पणातच लॉर्डस वर शतक झळकवणाऱ्या आणि सचिनबरोबर सलामीला येऊन धावांची अक्षरशः लयलूट करणाऱ्या दादाला २००३ च्या विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीतल्या ढिसाळपणाबद्दल मी कधीच क्षमा करू शकणार नाही. तरीसुद्धा दादा निवृत्त होणार हे ऐकल्यावर कसंतरीच वाटलं.
फुटबॉल हे पहिलं प्रेम असणाऱ्या दादाला कॉलेजमध्ये असताना गणिताचं सुवर्णपदक मिळालेलं आहे असं त्याच्या एका मुलाखतीत पाहिल्यावर मला त्याच्या बहु-आयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रचंड आदर वाटला होता. आणि 'नाटवेस्ट' च्या फायनलमध्ये लॉर्डसच्या बाल्कनीत उभं राहून अंगातला शर्ट काढून फेकणाऱ्या दादाला पाहून 'कशी जिरवली फिरंग्यांची! असंच पाहिजे' असंही वाटलं होतं. (अर्थात हा शर्ट जर २००३ विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यानंतर फिरवला असता तर अभिमानाने त्याची एकच काय अण शंभर एक देवळं सहज बांधली गेली असती... जाऊदे काही गोष्टींचं दुःख मोठं असतं)
आमच्या बाबा-काकांनी सुनील गावसकर, कपिल देव प्रभृती लोकांवर असंच प्रेम केलं आहे. ' गांगुली क्रीजवर टिकतो त्यापेक्षाही कमी वेळात आमच्या नूडल्स शिजतात आणि तो जेवढ्या धावा काढतो त्यापेक्षाही कमी किमतीला त्या विकत मिळतात ' अशी एका कंपनीने जाहिरात करून त्याची टिंगल केल्यावरसुद्धा त्याने आता निवृत्त व्हावं असं कधी वाटलं नाही. उलट याचा फॉर्म परत येऊ दे असंच वाटायचं. गेल्या पिढीतले काही दुष्ट लोक य तिघांना एकदा(चं ! ) निवृत्त करून टाका असं सारखं म्हणत असतात. आता त्यांना इच्छापूर्तीचं समाधान लाभलं असेल  
हे तिघं कधी निवृत्त होणं शक्यच नाही अशी काहीशी खात्रीच होती त्यामुळे आता यांच्याशिवाय क्रिकेट निदान काही दिवस तरी सुनं सुनं वाटेल
या प्रिन्स ऑफ बेंगालबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरूर लिहा (यापुढे अशी संधी मिळायची नाही! )
--अदिती