मसाला खिचडी (डाळ-तांदूळ)

  • तांदूळ सव्वा वाटी
  • मुगाची/मसुराची डाळ पाव वाटी
  • कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी
  • सोललेली लसूण २५ मध्यम पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या चार
  • तेल दोन डाव
  • फोडणीचे साहित्य
  • मीठ
४५ मिनिटे
तीन जणांना पोटभर

शेंगदाणे बुडून वर दोन बोटे पाणी राहील असे भिजत घालावेत. पाच पाच मिनिटांनी पाणी बदलावे.

डाळ-तांदूळ धुऊन कोरडे करायला ठेवावेत.

लसूण सोलून घ्यावी. मिरच्या पेराच्या आकाराच्या कापून घ्याव्यात.

हे सर्व होईस्तोवर वीस मिनिटे होतील.

तीन वाट्या पाणी मंद आचेवर ठेवावे.

कुकरमध्ये तेल घालून ज्योत मोठी करावी. धुरावल्यावर ज्योत बारीक करून (स्टेनलेस स्टीलचा कुकर असल्यास शेगडीवरून बाजूला काढावा आणि पाच सेकंद थांबावे, नाहीतर फोडणी जळते) मोहरी, हळद, (स्टेनलेस स्टीलचा कुकर असल्यास आता परत बारीक ज्योतीवर ठेवावा) मिरचीचे तुकडे आणि ठेचलेली लसूण टाकावी. ज्योत मोठी करून चटाचट हलवावे. लसूण जराशी जळकटल्याचा वास आल्याबरोबर ज्योत बारीक करावी आणि भिजलेले शेंगदाणे टाकावेत. ज्योत मोठी करून हलवत राहावे.

दाणे खमंग व्हायला लागले की ज्योत बारीक करावी. त्यात भिजवून कोरडे केलेले डाळ-तांदूळ टाकावेत. परत ज्योत मोठी करून हलवत राहावे. तेल-मसाला सगळ्या डाळ-तांदळाला लागेलसे पटापट हलवावे.

पाणी एव्हाना उकळायला आले असेल. ते घालून पटकन झाकण लावावे आणि दोन शिट्ट्या होऊ द्याव्यात.

वाढताना गरजेप्रमाणे मीठ भुरभुरावे.

यासोबत म्हणून बटाट्याची कोशिंबीर आणि पोह्याचा भाजलेला पापड घ्यावा.

बटाट्याच्या कोशिंबिरीसाठी चार (मध्यम) बटाटे कुकरमध्ये एक शिटी काढून घ्यावेत. सोलून एका (मध्यम) बटाट्याचे चार काप करावेत आणि निर्लेपच्या तव्यावर ठिपकाभर तेल घालून बाहेरचे आवरण कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यावेत. ते कुस्करावेत. त्यात दाण्याचे कूट घालावे. जिऱ्याची तुपात फोडणी करून या कुस्करणावर घालावी. त्यावर दोन वाट्या सायीचे घट्ट दही घालावे आणि चिमटीभर मीठ घालून सारखे करावे.

स्वप्रयोग