कलाटणी

"सारिका चल, मी निघतेय गं. जास्तीतजास्त रात्रीपर्यंत येऊन जाईन परत. जेवायला वाट बघू नको. मी जेवूनच येईन आईबाबांसोबत. " असे बोलत मी आईने आणलेला डाळिंबी रंगाचा ( कपड्यांसाठी हा माझा खास आवडीचा रंग हे आई पक्के हेरून आहे! ) सलवार कमीज घालून आणि श्रद्धाने ( माझी लहान बहिण, दागिन्यांची एकदम शौकीन ) आणलेले त्यावरील मॅचिंग दागिने घालून तयार होऊन माझ्या सो कॉल्ड 'दाखवण्याच्या' कार्यक्रमाला सज्ज झाले आणि आईबाबाश्रद्धासोबत त्यांनी दिवसभरासाठी ठरवून आणलेल्या कारमध्ये बसून ठाण्याकडे रवाना झालो.

'दाखवणे'वगैरे कार्यक्रम अगदी उत्तमप्रकारे पार पडला आणि त्यांच्याकडून त्वरीत होकार मिळाला असला तरी आपल्या लेकीचे ( खरेतर दिवटीचे! ) खरोखर काय मत आहे हे असे घाईगडबडीने ठरवणे बरोबर नाही असे आईचे मत पडले आणि "उद्या सकाळी घरी पोहोचलो की दुपारपर्यंत फोन करून उत्तर कळवतो अशी हमी भरून आम्ही तिथून निघालो. माझा मूड खरेतर सटकलेला असायला हवा होता ( जो नेहमीच अशा नको त्या परेडीनंतर होतो ) पण मी खूष होते माझ्या नवीन ड्रेसवर आणि जवळपास ३ महिन्यांनी मिळालेल्या दिवसभराच्या का असेना आईबाबांच्या आणि खासकरून श्रद्धाच्या सान्निध्याने. माझ्या डोक्यावर भलीमोठ्ठी जबाबदारी ( सुयोग्य कारण देऊन या स्थळाला नकार देण्याची ! ) पडली होती खरी पण मला त्याहीपेक्षा श्रद्धाशी अंताक्षरी खेळण्यात, जोक्स आणि शेरोशायरी करून हसतखेळत वेळ घालवण्याचेच जास्त पडले होते. त्रयस्थ ड्रायव्हरसमोर इतका खाजगी विषय आईबाबा काढणार नाहीत याची पक्की खात्री असल्याने ती एक सुटकेची बाब होती. खिडकीशेजारी कोणी बसायचे यावर तिच्यामाझ्यात परत एक न टाळणेबल कोल्ड वॉर झाली आणि नेहमी जिंकायची तशी याहीवेळेस ती वॉर तीच जिंकली आणि एकीकडे ती, दुसरीकडे आई आणि मध्ये मी अशी आमची सेटींग झाली. बाबा नेहमीप्रमाणेच ड्रायव्हरला जास्त जोरात ( म्हणजे ४०च्या पुढे! ) जाण्यापासून रोखण्यासाठी आणि रस्त्यावर नजर ठेवण्यासाठी त्याच्या शेजारच्या सीटवर बसले होते. ड्रायव्हरला गोंगाटाची सवय नसावी बहुतेक पण तरीही तो बिचारा गपगुमान गाडी चालवत होता आणि आम्ही दोघी अगदी फुल्टू गुंगलो होतो एकमेकींवर कुरघोड्या करण्यात. वेळ कसा उडून गेला आणि आम्ही परत पुण्याच्या हद्दीत कधी येऊन पोहोचलो कळले देखील नाही. आईबाबा अनपेक्षितरित्या शांतशांत बसले होते.. कदाचित त्यांचा 'भोप्या' ( म्हणजे मी! ) लग्न करून गेल्यावर कसे होईल वगैरे विचारात गुंगले असावेत. तेवढ्यात उसाच्या रसाची गाडी दिसली आणि मी चेकाळले, "चला, रस पिऊया थोडासा आणि मग जाऊ पुढे. " माझा हा प्रस्ताव बिनबोभाट मानला गेला आणि आळोखेपिळोखे देऊन २ ग्लास रस गटकावून परत कारमध्ये बसायची वेळ आली.
"श्री, आता मला बसू दे खिडकीशेजारी. अर्ध्या तासाने मी उतरूनच जाणार आहे एवीतेवी मग तूच तू आहेस आईबाबांसोबत. " माझा क्षीण प्रयत्न होता हवे ते मिळवण्याचा पण यावेळी उगाचच भावूक झालेल्या बाबांनी अचानकपणे दिलेल्या पाठिंब्याने माझे नशीब फळफळले आणि चक्क खिडकीशेजारी बसायचा गोल्डन चान्स मिळाला. मी अत्यंत खूष झाले होते एकंदरीतच त्यामुळे नव्या जोमाने गाणे म्हणणे चालू झाले.
"'ज'.. 'ज' टिक टिक वन.. " श्रद्धा.
"अगं हो, थांब जरा. मला विचार तर करू दे जरा. लगेच काय टिकटिक? "असे म्हणून मी खिडकीबाहेर बघून 'ज'पासून सुरू होईलसे गाणे आठवायला लागले. गाणे आठवून मी, "जब कोई बात बिगड.. "इतकेच म्हणायचा अवकाश होता की मला काहितरी झाले आणि मी 'आऽऽईऽऽ गंऽऽ' असे काहीसे बरळून बेशुद्ध पडले. कारमधल्या कोणालाच काही कळायला मार्ग नव्हता अचानक काय झाले ते. शेजारी बसलेल्या श्रीच्या खांद्यावर माझी मान लुडकली होती. तिला आधी वाटले की मी काही जोकच करतेय.. पण 'ताई.. ताई.. ' असे तिने कितीदातरी हाक मारूनही मी उठत नाही म्हणता ती एकदम 'आऽऽईऽऽ, ताईला काय झालं बघ.. ती उठतच नाहीये' असे म्हटले. एव्हाना ड्रायव्हरने गाडी बाजुला घेऊन बाबा गाडीतून बाहेर आले होते. त्यांची सट्टीपट्टी गुम झाली होती तरीही ते, 'वेदश्री, ए बेट्या, उठ तर. ' असे म्हणत होते. आईने वॉटरबॅगमधून पाणी घेऊन माझ्या तोंडावर शिंपडले आणि मी डोळे उघडले. सण्णकन डोक्यात सणक गेली आणि अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, "आई, मला या डोळ्याने काहीच दिसत नाहीये. आऽऽईऽऽ! " तो धक्का मला इतका भयंकर होता की जसे काही सगळे आयुष्यच संपले असे झाले मला. आई, बाबा, श्रद्धा, ड्रायव्हरच काय पण रस्त्यावर काय होतंय ते बघायला थांबलेले लोकदेखील माझ्याकडे बघून पांढरेफटक पडल्यागत दिसत होते! बाबा पहिले शुद्धीवर आले आणि शेजारच्या एका माणसावर किंचाळले, "इकडे जवळपास कुठे दवाखाना आहे का? "
"दवाखाने तर म्होप हैत जी पन रैवारच्या दिशी त्येबी सांच्याला.. व्हय व्हय.. समोरच्या पेट्रोलपंपाजवळ हाये बगा येक. पर त्यो डोळ्यांचा न्हाई, जनरल हाये. "
त्याचे शेवटले वाक्य ऐकायला तिथे आम्ही नव्हतोच. गाडी एव्हाना त्या दवाखान्याजवळ थांबली होती. "माझी ३० तारखेला परीक्षा आहे, ती मी आता कशी देणार? माझे पीएचडी गेले बोंबलत.. संऽऽपलं सगळं.. सगळंच संपलंय.. " अशा शब्दात माझा आक्रोश-रडणे चालले होते. डाव्या हाताने डोके गच्च धरून वेदना कमी होतायत असे मला उगाचच वाटत होते की काय पण तसे करून तरीही भोकाड का काय म्हणतात ते मी पसरले होते. माझ्यासोबतचे सगळेचजण एव्हाना थरथरायला लागले होते. तो डॉक्टर नेमका कुठेतरी बाहेर गेला होता, तो येईतोचा वेळ ब्रह्मांड आठवून देत होता मला. अर्थात तो येऊनही फरक पडला नाहीच कारण आल्याआल्या त्याने माझ्याकडे एक नजर टाकली आणि तो म्हणाला, "ही पोलीसकेस आहे. मी काही करू शकत नाही. "
आई एव्हाना बऱ्यापैकी सावरली असावी कारण तिने मला पोटाशी धरले होते.. अर्थातच माझ्या उजव्या बाजूकडून पण मला खूपच गुदमरल्यासारखे होत होते. मी बाबांना म्हणाले, "जाऊ दे, बाबा. सगळं संपलंय एवीतेवी! " ते माझ्यावर कधी नव्हे ते चिडले. रडवेल्या आवाजात बाबांनी त्या डॉक्टरकडे खूप विनंती केली पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. बाबांनी त्याला ५०० रुपये दिले तेव्हा कुठे त्याने ५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या निरामय हॉस्पिटलचा रस्ता दाखवला! त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्रायव्हरने माहिती दिली नाही तोवर हॉस्पिटलवाल्यांनी माझ्यासाठी एका खुर्चीची व्यवस्था झाली. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तसं म्हटले तर बरेच चालत जायला लागणार होते.. पोलिओग्रस्त बाबांना तितके चालता येणार नाही म्हणूनच खुर्ची आली असावी असा माझा अंदाज झाला. प्रत्यक्षात जेव्हा खुद्द मलाच त्यात बसवून नेले गेले तेव्हा 'बाबांची सोय करा. ' असे सांगणाऱ्या माझ्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते! आई आणि श्रीसोबत मी लिफ्टमधून दवाखान्याच्या कुठल्याशा मजल्यावर पोहोचले. डोळ्याच्या डॉक्टरांना बोलवण्याची गरज पडली नाही कारण एका रांगत्या वयाच्या मुलीने विणकामाची सुई डोळ्याखाली खुपसून घेतल्याची केस माझ्या अगोदरच तिथे आलेली असल्याने त्यांना बोलावले गेलेले असून तिची तपासणी चालू होती! १५-२० मिनिटांनी ड्रायव्हरचा हात धरून थरथरत्या अवस्थेत बाबा तिथे येऊन पोहोचले! त्यांना तसे येताना पाहून मला अत्यंत अपराधी वाटले. माझी अवस्था अत्यंत वाईट झाली होती. डॉक्टरांनी मला आत बोलावले तेव्हा आम्ही चौघे आत गेलो. माझ्याकडे पाहून ते म्हणाले, "तू काय त्या छोटुलीसोबत टीम-अप केलंस का काय डोळ्याला इतकं दुखवून घेऊन? कुठे धडपडलीस? " त्यांच्या अत्यंत शांत, संयमी आवाजाने आणि एकदम कॅज्युअल बोलण्याने मी काहीशी सावरले. ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी ना माझ्याकडे एका मृतवत व्यक्तीकडे पाहावे तसे पाहिले होते ना की माझ्याकडे पाहून पांढरेफटक पडल्यासारखे ते दिसत होते!
"डॉक्टर, माझी ३०ला प्रवेशपरीक्षा आहे पीएचडीसाठीची. मी ती देऊ शकेन ना? "
माझ्या या प्रश्नावर मात्र त्यांची त्रिफळा उडाल्यासारखी दिसली पण त्वरीत नॉर्मल होऊन त्यांनी सांगितले, "नाही. आज ४ तारीख आहे.. कुठला जादुगार जरी अवतरला तरी ३० तारखेपर्यंत तुला परीक्षा देण्याच्या स्थितीपर्यंत तो तुझ्या डोळ्याला आणू शकणार नाही. याला किमान २ ते ३ महिने तरी लागतील. "
"काऽऽऽय?????!!!! २ ते ३ महिने???????!!!!!!! " मला धक्का बसणे साहजिकच होते. आईबाबांचे स्थळं बघणेच इतके जोशाने चालले होते की मी त्यांच्यापासून लपवून हा परस्पर कारभार केला होता. परीक्षेत पास झालो की चकीत करून टाकू असा उद्देश होता माझा. त्यांना यातले काहीच माहिती नव्हते त्यामुळे आणि म्हणूनच माझे दुःख त्यांना समजणेच शक्य नव्हते.
"मग काय करायचेय या डोळ्याचे ठीक करून? " अशा माझ्या बोलण्यावर डॉक्टर म्हणाले, "परीक्षा दरवर्षी होत असेल ना? पुढच्या वर्षी दे. त्यात काय एवढं बाऊ करण्यासारखे? "
आता मात्र डॉक्टरांचा तो शांत, संयमी आवाज आणि ते कॅज्युअल बोलणे मला सहन होत नव्हते. ते माझी चेष्टा करतायत असे वाटले. आईबाबांकडे रागाने कटाक्ष टाकून मी बोलून गेले, "यांना आत्ताच नकोशी झालेय मी. आणखीन एक वर्ष???!!!! " डोक्यात वेदनांच्या सणकेचे घणाघात बसत होते त्यामुळे की या नव्याने झालेल्या कंफर्म्ड वर्स्ट न्यूजने माहिती नाही पण मला पोटात डुचमळल्यासारखे व्हायला लागले. जगणेच नकोसे झाले. आईचा प्रेमळ धीर देणारा हात अचानक तीव्रतेने नकोसा झाला. मला मरणप्राय यातना होत असताना सगळं जग माझ्यावर खो खो हसतंय असे वाटायला लागले. आईबाबा डॉक्टरांशी काय बोलले आणि काय नाही याच्याशी मला काहीच घेणेदेणे उरले नव्हते. मला कळले ते इतकेच की मला दवाखान्यातल्या एका पलंगावर झोपवण्यात आले आणि डॉक्टरांनी माझ्या डाव्या डोळ्यात ( ज्याने मला काहीच दिसत नव्हते ) काहीतरी ओतले ( बहुतेक मलम असावे ) आणि मला डोळे बंद करून जमेल तसे डोळे फिरवायला सांगितले! त्या सगळ्या भीषण परिस्थितीत मी आईचा हात गच्च धरून ठेवला होता. गंमत पाहा.. एकाचवेळी ती मला तीव्र नकोशी झाली होती आणि आत्यंतिक हवीशीही! माझे रडणे आता हातपाय झटकण्यासोबत वाढले होते. आईचा पुकारा तर थांबता थांबत नव्हता. तिला मी किंचाळून सांगत होते, "मला विष दे हवेतर पण डोळ्यात काही टाकू नको! " आईबाबांचीच नाही तर श्रीची परिस्थिती काय झाली असेल ते तर मी विचारच करू शकत नाही आता.
डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि सांगितले, "तुम्ही पुण्याचे दिसत नाही. आता अजून २-३ दिवसतरी जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला मी लिहून दिलेल्या ड्रॉप्स आणि गोळ्यांव्यतिरिक्त काही सांगू शकत नाही.  त्यामुळे तुम्हाला इथे रहायला सांगून तसे पाहता काही उपयोग नाही. तुमच्या औरंगाबादलादेखील डोळ्यांचे खासे तज्ञ आहेत ज्यांची ट्रीटमेंट तुम्ही अगदी आरामशीरपणे घेऊ शकता. " बाबांनी  एव्हाना कोणालासे फोन करून पुण्यातच पैशांची व्यवस्था होईलसे बघायला सांगितले होते शिवाय दादालाही उडत कल्पना दिली होती. डॉक्टरांचे असे मत बघता बाबांनी अगदी सुटकेचा निश्वास टाकला. अगोदरच्या त्या ५०० रुपयेवाल्या डॉक्टरचा अनुभव बघता त्यांनी पुण्याचा एकंदरीत धसकाच घेतला होता पण पोरीपुढे पैसा महत्त्वाचा नाही हे मत त्यांचे पक्के झाल्याने ते त्यालाही तयार झाले होते! त्यांच्या तात्त्विक मतांना पाहता त्यांचा असा निर्णय म्हणजे... उपमाच नाही माझ्याकडे काही! डॉक्टरांच्या पायाच पडणे बाकी राहिले होते आईबाबांनी.

तिथल्या औपचारीक गोष्टी कशा निपटल्या गेल्या आणि काय मला माहिती नाही. माझ्या दर मिनिटाला वाढत्या रडाबोंबलेतून वाट काढून, मला समजवत-रागवत दोन बिस्किटे आणि आणलेल्या गोळ्या माझ्या घशाखाली घालायला आईला काय द्राविडीप्राणायाम पडला तो तिचा तिलाच माहिती. सगळ्यांच्याच संध्याकाळच्या जेवणाला फाटा देत औरंगाबादचा रस्ता धरला आम्ही. ड्रायव्हरला आता वेगावर नियंत्रण ठेवायला सांगण्यापेक्षा बाबा आता ब्रेकवर नियंत्रण ठेवायला सांगत होते! श्री एव्हाना खिडकीबिडकी सगळे विसरून बाबांजवळ कशीतरी अवघडून बसली होती आणि मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी होते मागे! गाडीचे हादरे माझ्या डोक्यात हादरवत होते मला. उलथे नाही की कुठल्या कुशीवर नाही.. कसेही ठेवले तरी कळा सहनशीलतेच्या पलिकडे होत्या माझ्या. आई रडत मला तब्बल २ तास सांगत होती, "हो, आता १५-२० मिनिटात पोहोचतोचे आपण नगरला. "

नगरच्या जवळ गाडी पोहोचत नाही तर मला झोपून राहणे अगदीच अशक्य झाले. पोटातली कालवाकालव वाढली होती.
"आई, मला मळमळतंय गंऽऽ" मला अशी सारखी भुणभुण लावायला अजिबात आवडत नाही, हे जणू त्या रात्री मी विसरूनच गेले होते. असं मी म्हणत नाही तोवर मला उलट्यांवर उलट्या झाल्या. सकाळी जे काही गिळले असेलनसेल ते सगळे बाहेर पडले. गाडी जवळच्या ढाब्याजवळ थांबवून तिथून पाण्याचे मोठाले जग घेऊन येऊन आईने श्रीच्या मदतीने तो सगळा राडा साफ केला! तोवर मला बाबांनी कुशीत घेऊन समजवायचा प्रयत्न केला की सगळे काही ठीक होईल. मी काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. माझेच मला जास्त झाले होते! ते सगळे आटोपून भरधाव वेगाने परत आमची गाडी औ'बादच्या दिशेने निघाली. माझ्या सततच्या आक्रोशाने कोणाला जेवू तर दिले नाहीच पण झोपूही दिले नाही.  बसत-झोपत, रडत-बोंबलत अशी ती माझी वरात औ'बादला येऊन धडकली. वेळ अडनिडी झालेली असल्याने लगेचच कुठल्या डॉक्टरला गाठणे शक्य नव्हते आणि जरूरीचेही नव्हते.  उर्वरीत रात्रभर मला आरामशीर कसे वाटेल याबद्दलच आईबाबा प्रयत्न करत होते. तसे करण्यासारखे काही नव्हते म्हणा पण ते दोघे माझ्या जवळ असण्याला महत्त्व होते.. मग ते माझे लागट बोलणे ऐकायला का असेना! ते जणू काही माझे गार्डीयन एंजल्सच झाले होते.

सकाळी दादावैनी आले समीरला घेऊन. वैनीनेच मग चहा वगैरे केला. आईला तर मी एक क्षणही माझ्यापासून दूर जाऊ देत नव्हते. कसेबसे तोंड धुतले असेलनसेल तशीच तयारी करून आम्ही देशपांडेकाकांकडे गेलो. ते आमचे फॅमिली डॉक्टरच आहेत डोळ्यांसाठीचे. घरात इथूनतिथून जवळपास सगळेच चश्मिष असल्याने त्यात काही नवीन असे नाहीच! दादाने त्यांना तसा आधीच फोन करून साधारण कल्पना दिलेली असल्याने वाट वगैरे अशी काही बघावी लागली नाही. आई-दादा आणि मी अशी त्रयी गेलो होतो.
"काय म्हणतेय आमची झाशीची राणी? " काकांचे नेहमी असेच असते. आईसोबत जेव्हाही कधी गेले होते आधी तिच्या डोळ्यांबाबतच्या प्रश्नांसंबंधी तेव्हा माझी प्रश्नांची टकळी अखंड चालू असायची. हे असे कशाने होते तिला? औषधाने बरे होईल ना? काही चिंताजनक नाही ना? तुम्ही मागाहून दादाला फोन करून खरे काय ते सांगणारे आणि आम्हाला अळंटळं सांगताय का? वगैरे वगैरे.. तेव्हा माझ्यात्यांच्या पहिल्या ओळखीपासून ते मला झाशीची राणी म्हणायला लागले होते!
माझे उत्तरादाखल फक्त रडणेच चालले होते. ते तिघे काहीबाही बोलत होते माझ्या डोळ्याबद्दल तर मला त्याचा अतीव रागयुक्त कंटाळा आला होता. मला झोपायचे होते पण डोळ्याने काही त्राण शिल्लक ठेवायचा नाही माझ्यात असे योजल्यागत चालले होते. निरामयच्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या साईड इफेक्टमध्ये ऍसीडीटी घेऊन आलेल्या होत्या ज्याचा मला अतोनात त्रास. माझी ऍसीडीटी कुठल्याच औषधाने दबत नाही, ती ओकावीच लागते मला. या धबडग्याने पोटात काहीच राहत नव्हते. शेवटी 'झाशीच्या राणी'ला सलाईनवर ठेवून झोपेचे औषध दिले गेले! मी झोपलेली असले तरीही २-२ तासांनी ते ड्रॉप्स टाकणे चालूच होते! एक दिवस की दोन दिवस सलाईनवर होते कोण जाणे पण मग मला घरी सोडलं. मी निपचित पडलेली असताना कोण कोण येऊन पाहून गेले त्याचा काही पत्ताच नाही मला. जागेपणी आई मला सदोदित नजरेसमोर दिसत होती जे मला पुरेसे होते. आजारी पडायची मला बापजन्मी सवय नव्हती त्यात आणि हॉस्पिटल? नोऽऽऽ वेऽऽऽ

घरी आले आणि मग खरे मरणयातनांचे दिवस सुरू झाले. २-२ तासाला ते ड्रॉप्स जे अगदी डोळ्यात ड्रिलींग मशीन लावल्यासारखे चुर्रर्रर्र करत डोक्यात घुसायचे. पापण्यांच्या कडांनासुद्धा त्या ड्रॉपचा स्पर्श झाला तर जीव क्षणभर माझी कुडी सोडून गेला तर अत्यंत बरे होईल असे वाटायचे. विष द्यायची विनंतीवजा आज्ञा आईला कितीवेळा मी केली असेन ते कोणाला माहिती कोण जाणे! भेटायला येणाऱ्या लोकांची अगदी रीघ लागली होती, जे आणिक मला जीवावर येत होते. माझ्या अपयशावर (?! ) मीठ चोळायला ते लोक येत आहेत अशीच माझी समजूत होऊन मी अतिशय तिरसटासारखी वागत होते. एरव्ही 'बडबडीचा धबधबा' असा नावलौकीक (??!!! ) मिळवलेली मी अत्यंत तटकतोड बोलायला शिकले होते.  सगळेचजण माझ्या तिरसटपणालाही अत्यंत समजुतीन घेत होते याचा मला न जाणो का आणखीनच जास्त राग येत होता. त्यातल्या त्यात समजलेली एकच बातमी माझ्यामते अत्यानंदाची होती की मुंबईच्या त्या स्थळाला बाबांनी फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर त्यांनी रक्तगट जुळत नसल्याचे कारण सांगून नकार कळवला होता.

मी हॉस्पिटलमध्ये सलाईनवर होते तेव्हा बाबा भ्रमित झाल्यासारखे वागत होते असे इतरांच्या बोलण्यातून मला कळले. आईबाबा माझे सगळ्यात जीवलग दोस्त आहेत, मी त्यांच्याशी अशी कशी वागू शकते, ही ट्यूबलाईट माझ्या डोक्यात पेटली. मग मी काहीशी माझ्या कोशातून बाहेर आले. मी माझी परीक्षा देऊ शकणार नव्हते यात तसे म्हटले तर आईबाबांचा काय दोष होता? त्यांना तर ती गोष्ट माहितीदेखील नव्हती. माझ्या त्या असंबद्ध बोलण्यातून ते कळल्यावर बाबांना त्याबद्दल जरी काही वाटले नसले तरी आईला अतोनात दुःख झालेले दिसले की मी तिलाही त्याबद्दल बोलले नाही. लग्नाचे संकट तूर्तासतरी दूर ढकलले गेले होते, 'कारणे दाखवा' नोटीशीला उत्तर न देताच! एकूणात माझ्या डोळ्याशिवाय माझे काहीच बिघडलेले नव्हते. डोळा बरा होईतो जसे मला माझ्या करीअरच्या भवितव्याच्या दृष्टीने काही करता येणार नव्हते तसेच ते माझे एक मस्त साधन झाले होते लग्नाला नकार मिळवण्यात! एक अजबसे विचित्र समाधान माझ्या मनात पसरले होते. मनाला मी मारून टाकल्याने आता केवळ शारिरीक वेदनाच काय ती बाकी होती. माझे तिरसट बोलणे बंद झाले होते. मी परत मूळ पदाला येत होते.

देशपांडेकाकांना एका बाजुने आनंद झाला की त्यांची झाशीची राणी परत 'बोलती' झाली पण दुसऱ्या बाजुने माझ्या अखंड प्रश्नांना उत्तरे देताना त्यांच्या नाकी नऊ आले.
"काका, ऑपरेशन करावे लागेल का? "
"आत्ताच नाही सांगता येणार, बेटा. "
"का बरं? "
"डोळ्यात नक्की काय तुटफुट झालीये ते दिसलं तर पाहिजे ना आधी. तुझा अख्खा डोळा साकळलेल्या रक्ताने झाकोळला गेलाय अत्ता. बाहुली तर सोडच पण पांढरा भागपण दिसत नाहीये! "
"काका, माझ्या डोक्याला काही झाले असेल का? माझे डोके खूप दुखतेय. "
"डोके दुखतेय कारण डोळ्याचे कनेक्शन्स आहेत डोक्यात. तेही दुखावले असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण लगेच घुमाबाई होऊ नको कारण आत्ताच काही बोलणे अवघड आहे, काही दिसत नसल्याने. ड्रॉप्सने रक्त खाली बसेल २-३ दिवसात, मग कळेल काये ते.. "
"तो दुसरा ड्रॉप चालेल, काका, त्याने शांत वाटते. हा नरकातून इंपोर्ट केलेला ड्रॉप नको पण. "
"हाहाहा... दुसऱ्या ड्रॉपचा काही उपयोग नाही हव्या त्या परिणामासाठी.. हाच ड्रॉप लागेल.. पण फक्त ३-४ दिवस. "
"तुम्ही बघा ना घालून तुमच्या डोळ्यात म्हणजे कळेल सांगणे किती सोपे आणि भोगणे किती अवघड आहे ते! "
ते काय करतायत कळल्यावर मी नको नको म्हणत असतानाही त्यांनी माझ्यासमोर त्या ड्रॉपचे ३-४ थेंब त्यांच्या स्वतःच्या दोन्ही डोळ्यात टाकले!
"खुश? "
"पण काका.. तुम्हाला काहीच झालं नाही?! "
"नाही! झाशीच्या राणीचा काका आहे मी.. मला काही होत नाही. " मी अवाक होऊन पाहतच राहिले त्यांच्याकडे. परत त्या ड्रॉपबद्दल त्यांच्याकडे तक्रार करायची माझी ती काय बिशाद लागून गेली होती?  

"शाब्बास! झाशीची राणी खरंच धाडसी आहे की आमची. इतके दिवस प्रत्येक दोन तासाला नरकातून इंपोर्ट केलेले ड्रॉप्स सहन करायला. मान गये! "
"तुम्हाला काय माहित की मला सहन करावे लागले ते? तुम्हाला तर काहीच झाले नाही ते ड्रॉप्स टाकल्यावर. "
"साहजिक आहे कारण माझ्या डोळ्यांना तुझ्या डोळ्याला झाला तसा अपघात कुठे झाला आहे? "
"यूऽऽऽऽ! यू आर अ चीटर, काका! "
"हाहाहाहा... एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हिअर आय ऍम सपोज्ड टू डील विथ बोथ! इजंट इट? "
"आता झाला ना पण डोळा स्वच्छ? मग आता सांगा.. नाही करावे लागणार ना ऑपरेशन? "
त्यांच्या त्या जडजंबाळ मशिन्समधून माझ्या डोळ्याची तपासणी झाली.
"करावे लागेल कॅटॅरॅक्ट ऑपरेशन कारण लेन्स तुटली आहे. तुटलेली काढायची आणि नवीन घालायची. बस्स! "
"मला नाही करायचे ऑपरेशन! राहू दे तो डोळा तसाच. मला नैसर्गिक रहायचे आहे.. अंगाला कात्री नाही लागू द्यायची मी माझ्या. आता दुखणेही बऱ्यापैकी सहन करता येतेय मला. "
"तुझे डोळे मोठे आहेत मान्य आहे मला पण म्हणून काय मी शिवणकामाची कात्री घेऊन डोळा कापणार आहे का तुझा?! "
"कुठलीही असो.. कात्री ती कात्रीच.  मला नाही करायचे ऑपरेशन. दॅटस इट. "
"आणि मी म्हणालो की कात्री लागणारच नाही तर? "
"कसं शक्य आहे? "
"ते माझ्यावर सोड. "
"उम्म्म्म.. "
"मग चालेल? हो ना? चला.. डोळ्याचं वजन करून घेऊन मुहूर्त काढुया. "
"लक्षात ठेवा काका.. गाठ माझ्याशी आहे बदमाशी केलीत तर. "
डोळ्याचे टेन्शन का काय असते ते खासेच जास्त असल्याने ते कमी करण्यासाठी ड्रॉप्स दिले जे नरकातून आणलेले नव्हते! हव्या त्या रेंजमध्ये डोळ्याचे टेन्शन ( असाच काहिसा शब्द होता तो. चुकला असल्यास सोडून द्या. ) आल्यावर १० तारखेचा मुहूर्त निघाला. मी कुठल्या लढाईवर निघाले असल्याप्रमाणे घरातले झाडून सगळेजण माझ्या दिमतीला दवाखान्यात हजर, समीरसकट  ! समीर भिरभिरत्या नजरेने सगळ्यांकडे बघत होता कारण त्याला समजत नव्हते की त्याच्या ताईआत्याच्या डोळ्याला हाबू कसा काय झाला ते! जे काय झाले होते ते त्याला अजिबात आवडलेले नव्हते कारण त्याची ताईआत्या औबादेत असूनही कोणी त्याला तिच्याजवळ जाऊ देत नव्हते..

ऑपरेशनच्या आधी काकांची मुलगी मला येऊन कसलीशी राख देऊन गेली. कसलासा प्रसाद आहे म्हणे! झाऽऽलं माझं डोकं सटकलं.. ऑपरेशन करायचं नाही ह्या पाढ्यावर पुनरागमन झालं माझं! आता मात्र काका समजवून सांगायच्या मूडमध्ये नव्हते. जबरीच मला थिएटरमध्ये नेलं तर मी जवळच उभ्या असलेल्या दादाचे मनगट घट्ट धरून ठेवले. दादासकट मी ऑपरेशन थिएटरमध्ये! माझी टकळी चालूच पण काका काही उत्तर द्यायच्या ऐवजी काहितरी पुटपुटत होते.
"काका, ती पुडकी कसली होती? "
"रक्षा होती ती प्रसादाची. "
"कसला प्रसाद? आणि कशाला? तुम्हाला जमणार नसेल तर तसं का नाही सांगत? देवाची मदत कशाला? "
"गप्प बस. जितकं कमी बोलशील तितकं तुला त्रास कमी होईल. "
"त्रास कसा काय होईल पण? ऍनास्थेशिया नीट दिला नाहीये का? "
"संजय, हिच्या तोंडाला चिकटपट्टी लाव रे जरा. "
दादा कसली चिकटपट्टी लावतोय, तो स्वतःच पांढराफटक पडला होता माझे प्रत्यक्ष डोळे दिसतात त्याच्या कितीतरी पट मोठे आहेत ते पाहून. माझ्या डाव्या डोळ्याव्यतिरिक्त बाकी सगळीकडे आच्छादन टाकलेले असल्याने मला त्याला बघता आले नाही नसता मजा आली असती. सगळे मला चिडवायचे की तुझ्या डोळ्यांची गोटी फिट करताना देव चुकला नाहीतर तुझे डोळेही आमच्या डोळ्यांइतकेच आहेत. आता मला कळले होते की चूक काही नव्हती.. इट वॉज दॅट वे ओन्ली! दादाची परीस्थिती मला कळली नसल्याने चिकटपट्टी खरोखरच लावली जातेय का काय याची मी गप्प बसून दहा-एक मिनिट वाट पाहिली. तसे काही होत नाहीसे पाहून मी परत सुरू झाले.
"तुमचा देवावर विश्वास आहे का? "
"हो. "
"का बरं? "
"तुझा माझ्यावर विश्वास आहे का? "
"प्रतिप्रश्न नका विचारू हो. "
"सांग तर.. "
"हो. आहे. "
"का बरं? "
"कारण... कारण तुमच्याकडे आय स्पेशालिस्ट असल्याची डिग्री आहे आणि इतके सगळे पेशंटस तुमचे कौतुक करताना मी स्वतः पाहिले आहे. दादाचाही ( जो मेडीकल दुकानदार आहे ) तुमच्यावर विश्वास आहे म्हणून. "
"मग माझेही देवाबद्दल असेच काहीसे आहे असं समज. "
"कोड्यात नका बोलू हो. सरळ काय ते सांगा. "
"तू फार बोलतेस! "
"ते मला माहितेय. उत्तर सांगा. "
"ते तुला कळेल आपोआप. "
"कधी? " मी हे विचारेतो माझा डोळा पॅक करून काका नदारद!
बाहेर जाऊन ऑपरेशन यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा आईबाबांचे डोळे भरून आले होते. माझाही अनपॅक्ड डोळा भरून आला होता! दादाचा रंग परत नॉर्मलला आला होता!!!

दोनेक महिन्यांनी मलाही चष्मा लागला ( म्हणजे असे देशपांडेकाकांचे म्हणणे आहे. मी कधी वापरला नाही! ) आणि माझे जीवन दोन महिन्यांपुर्वी होते त्याच पटरीवर परत नव्याने धावायला सुरूवात झाली. जीवनाची पटरी जरी तीच तशीच होती तरी या अपघाताच्या कलाटणीने खडखडाट होत का होईना पण माझ्या पळण्याची दिशा मात्र अंतर्बाह्य बदलून गेली होती. ही अमोघ कलाटणी खरोखरच सर्वार्थाने अवर्णनीयच!  या कलाटणीला माझा सलाम...