तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
अंगावर ये तोच शहारा पुन्हा एकदा
(तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
गोड आठवे घडला होता गुन्हा एकदा
रोज तापसी दुपार होता अरे शापिता
सावलीत ये बैस जरासा उन्हा एकदा)
आठवांतले कुठे मिळावे तिचे गाव ते
कोण मांडतो जुना पसारा पुन्हा एकदा
जेमतेम तो करारनामा पुरा वाचला
तोच वाजला तोच नगारा पुन्हा एकदा
केस मोकळे नकोच सोडू सखे आज तू
वाट पाहतो उनाड वारा पुन्हा एकदा
पाहण्या तुझे नीलम-पाचू,मेघ दाटले
करी नर्तना,ढाळ पिसारा पुन्हा एकदा
नाव-गावही वाहुन गेल्यावरी आज हे
कोण शोधते तुझा किनारा पुन्हा एकदा