अशीच एकदा, मला ती दिसली
बरीचशी माझ्यासारखी .....
पण तरीही खूप वेगळी
तिला विचारलं मी,
कुठून आलीस? आणि आता
कुठे चाललीस?
गाव तुझं तुला, आहे का माहिती ?
ही वाट तुझ्या, आहे का ओळखीची ?
माझ्या प्रश्नांवर, ती फक्त हसली
चमकणाऱ्या डोळ्यांनी
माझ्याकडे पहात राहिली
तीच्या उत्तराची मग,
मी वाट नाही पाहिली
घर गाठायची,
आता होती मला घाई
घर माझं होतं दूर
मग निघाले पुढे तशी
वाट ही होती अवघड
पण, पायाखालची
रस्त्यावरची माती, तशी ओळखीची
अन उन्हाची तलखी, --- रोजची सवयीची
रणरणतं ऊन, आणि निष्पर्ण वृक्ष
पण ती वाट होती माझ्या घराची
उन्हाचं त्या मला, काहीच नाही वाटलं
अन झाडांचं काय?
मला कुठे थांबायचं होतं त्यांच्या सावलीत?
चालता चालता वळले
पाहते, तर ... ती
नि:शब्दपणे, तापलेल्या मातीत उभी
मी म्हणलं, कोण गं तू?
अन अशी का पाठराखणी, करते आहेस माझी?
परत ती हसली,
पण या वेळी मात्रं बोलली
"ओळखलं नाहीस का ? "
मला ती म्हणाली
मी म्हणजे तर तूच
कालची, परवाची ... त्याच्याही आधीची
पण तूच ती
बघ पटते का ओळख तुझी?
का या निर्जन वाटेवर, विसरलीस ओळख स्वतःची ?
मग मी म्हणलं, "मी जर तू....
तर तू कालची, काल तर कालच संपला,
मग आज तू इथे कशी? "
ती खळखळून हसली...
डोळ्यातलं चांदणं चेहऱ्यावर घेऊन बोलली,
"तुझ्यासाठी.... फक्त तुझ्यासाठी .. "
या अवघड वाटेवर, नाही तुला कुठे सावली
मग मी म्हणलं ... मीच होते, --तुझी पाठराखीण !
मग मीही हसले, ... तिला म्हणाले
कशी विसरले मी ओळख तुझी?
तू तर माझ्या जीवाची सखी
तू आहेस, म्हणून चालू शकते अजून
कोणी बरोबर येवो, न येवो..
घर नक्की गाठायचं, असं पक्कं ठरवून
वाटेवरच्या वळणांना, उगीच नाही घाबरायचं
ती वळत राहिली, --तरी आपण सरळ जायचं
आलीस तू सोबत आता,
नाही कुणासाठी थांबायचं
हाक दिली कुणी तरी,
परत नाही फिरायचं
मग माझा हात, ती घेऊन म्हणाली हाती
"चल तर मग,
अजून खूप दूरपर्यंत .. वाट आहे चालायची "