गदर संस्थापकाची १२४ वी जयंती

आज गदर संघटनेचे संस्थापक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची १२४ वी जयंती - हे वर्ष या महान देशभक्ताचे शतकोत्तर जयंतीवर्ष!

<kk

परदेशात राहूनही देशाला स्वातंत्र्य कसे मिळविता येईल असा ध्यास घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनी युरोपातही भ्रमण केले व अनेक क्रांतिकारी विचाराच्या भारतीयांशी संधान बांधले. १९०८ मध्ये डॉ. खानखोजे यांनी  अमेरिकेत असताना विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य संग्रामासाठी ’भारतीय स्वातंत्र्य संघाची’ स्थापना केली. १९१३ साली डॉ. खानखोजे व लाला हरदयाळ यांच्या पुढाकाराने ’सशस्त्र लढ्यासाठी’गदर’ संघटना स्थापन केली. गदरचे पहिले अध्यक्ष होते सरदार सोहनसिंग भकना. सॅन फ्रॅन्सिस्को येथून १९१३ साली ’दी गदर’ या गदर पक्षाच्या पहिल्या मुखपत्राची सुरुवात झाली. पुढे ’गदर’मोठे व्यापक स्वरूप धारण केले. गदर उत्थान हे १८५७ नंतरचे सर्वात पहिले मोठे समर म्हटले तर वावगे ठरू नये. Ghadar_Flag Ghadar_di_gunj  

पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीचा फायदा पुरेपूर उठवत गदर कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाची योजना आखली. या काळात अनेकदा नाव व वेष बदलून डॉ. खानखोजे युरोप मधील अनेक देशात प्रवास केला. याच काळात अनेक तरुण विद्यार्थी-क्रांतिकारक जर्मनीत दाखल झाले. जर्मन परराष्ट्र खाते या चळवळ्या लोकांना अनुकूल होते. डॉ. खानखोजे हेसुद्धा जर्मनीत दाखल झाले. जर्मनीतील भारतीय विद्यार्थ्यांनी बर्लिन समिती स्थापन केली. यांत वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, चंपकरमण पिल्ले व अबिनाश भट्टाचार्य याचा समावेश होता. पुढे तिचे रुपांतर ’भारतीय स्वातंत्र्य समितीत’ झाले. जर्मनांच्या साहाय्याने थेट हिंदुस्थानची सीमा गाठायची व एका रेषेत पूर्वेला सिंगापूर पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा उभारायचा व यात जर्मन सरकारने आर्थिक तसेच लष्करी साहाय्य करायचे अशी योजना घाटत होती. या सर्व योजनेला ’हिंदू-जर्मन कट’ या नावाने ओळखले जाते. या गदरचा उल्लेख इंग्रजांनी जरी ’राजकीय दहशतवादी’ असा केला तरी हिंदुस्थानी नागरिकांसाठी ते क्रांतिकारकच होते.

गदर संघटनेला हिंदुस्थानातून पंजाबातून अनेक सदस्य लाभले. युद्ध संपले व राजकीय समीकरणे बदलली तेव्हा अनेक गदर कार्यकर्त्यांना अमेरिकेत निघून जावे लागले. डॉ. खानखोजे यांच्यावर इंग्रजाचे बारीक लक्ष होते. त्यांच्यावर हिंदुस्थानात येण्याविरुद्ध मनाई हुकूम बजावला गेला. मात्र युद्धकाळात गदर उत्थान हे अत्यंत महत्त्वाचे पर्व मानावे लागेल. या संघटनेचे क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, हुतात्मा कर्तारसिंग सराबा, सोहनसिंग भकना, सरदार पृथ्विसिंग असे अनेक धाडसी कार्यकर्ते युद्धकाळात हिंदुस्थानात कार्यरत होते जे पुढे पकडले गेले व हुतात्मा झाले.

पुढील काळात डॉ. खानखोजे परत अमेरिकेस निघून गेले. तिथे त्यांचे प्रयत्न चालूच होते. पुढे डॉ. खानखोजे यांनी जीन अलेक्जांड्रियन सिंडिक या बेल्जियन महिलेशी १९३६ साली विवाह केला. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार ते मेक्सिकोमध्ये स्थलांतरित झाले. तेथे शेतकी शिक्षण घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनी मेक्सिको येथे संकरित मक्यावर शेतकी प्रयोग केले. ते मेक्सिकोच्या शेतकी विभागाचे संचालक होते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांना आपल्या मातृभूमीची ओढ लागली. मात्र सरकारने त्यांना प्रवेशबंदी असल्यामुळे विसा नाकारला! पुढे आपला मूर्खपणा लक्षात येताच त्यांना देशात प्रवेश देण्यात आला तेव्हा १९५६ साल उजाडले.

मात्र इथे आल्यावर त्यांना जी उपेक्षा सहन करावी लागली त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन ’गोरे गेले काळे आले’ असे उद्गार काढले. हा महान देशभक्त २८ जानेवारी १९६७ रोजी निवर्तला. आज त्यांच्या १२४ व्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.