औटघटकेचं राज्य... (भाग -१)

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक असून, यातील पात्रांचा कुठच्याही जिवंत वा मृत व्यक्तिशी संबंध किंवा साधर्म्य हा निव्वळ योगायोग समजावा.)

पारखी साहेबांनी पाठवलेला खरमरीत मेमो वाचताना दत्ताच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. साहेबांच्या बुद्धीची त्याला कीव करावीशी वाटत होती.
"संध्याकाळी काम संपल्यावर ऑफीसमध्ये येऊन मला भेटल्याशिवाय जाऊ नका" असा साहेबांचा निरोपही मेमोच्या बरोबर आला होता. त्यावरही दत्तानं नुसतेच खांदे उडवले. पारखी साहेब त्यांच्या कामात अतिशय निष्णात होते.  पण दत्ताची मात्र काम करण्याची, विचार करण्याची तऱ्हा काही वेगळीच होती.  आणि म्हणूनच त्या दोघांचे नेहमी खटके उडत.     

"हं.. संध्याकाळी परत साहेब शिव्या घालणार. हे साहेब मला इतर सगळ्या लोकांसारखंच का समजतात? आणि त्यांना इतरांमधला आणि माझ्यातला फरक जर कळत नसेल तर तर ह्यात माझी काय चूक? हे सगळं अजून किती दिवस सहन करत राहावं लागणार कुणास ठाउक? " दत्ताच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली होती.

दता - दत्तात्रय दिगंबर देशपांडे. वय असेल पंचविशीच्या आसपास. ठेंगणी, जाडसर अंगकाठी. केस फार मोठे नाहीत पण चांगला फॅशनेबल भांग पाडून बसवलेले, मोठं कपाळ, जाड भुवया, थोडेसे बटबटीत पण निस्तेज डोळे, सरळ नाक, रूंद जिवणी, जाड मिशा, वरचे दात पुढे आलेले आणि तोंडातून थोडेसे बाहेर डोकावणारे. ड मोठ्ठा आवाज आणि सारखं घसा खाकरल्यासारखं करून बोलायला सुरुवात करण्याची विचित्र ढब.  दत्ता पुण्यातल्या गुरूवार पेठेतल्या एका वाड्यात दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात रहायचा. घरची गरिबी. दत्ता शाळेत असतानाच दत्ताचे वडिल वारलेले. घरी आई. कॉलेजला जाणारी धाकटी बहीण आणि नोकरी करणारा मोठा भाऊ. हा मोठा भाऊ बिचारा सरळ मार्गी, मेहनती. आपण बरं आपलं काम बरं. याच्या मिळणाऱ्या पगारावरच घर चालत होतं.     

दत्तानं दहावी सुद्धा पूर्ण न करताच शाळा सोडली होती. त्या काळात भरत नाट्य मंदिरात त्यानं डोअर कीपरची नोकरी पत्करली होती. ही नोकरी फक्त संध्याकाळचीच होती पण दत्ताला ही नोकरी मनापासून आवडायची. नाटकांना, गाण्याच्या कार्यक्रमांना येणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या बसायच्या खुर्च्या दाखवण्याचं काम तो अगदी मनापासून करायचा.  जसं काही त्याच्या घरातलं एखादं कार्य असल्यासारखंच तो आलेल्या प्रेक्षकांचं हसून स्वागत करायचा, त्यांना त्यांचं आसन स्वतः नेऊन दाखवायचा.     

उंची भपकेबाज कपडे घालून येणारे लोक, मखमली सळसळीत साड्या नेसून येणाऱ्या आकर्षक बायका, सुगंधी अत्तरांचे दरवळ,     कार्यक्रमातल्या मुख्य कलाकारांची ऐट, त्यांचं मोहक व्यक्तिमत्व, त्यांचं खानदानी पद्धतीनं वागणं बोलणं, चालणं या साऱ्यानं दत्ता हरखून जायचा. कोट टाय, काळे कुळकुळीत चकाकणारे बूट घालणाऱ्या किंवा सोन्याच्या बटणांचा रेशमी पायघोळ अंगरखा घालणाऱ्या किंवा रेशमी, जरतारी, पैठणी किंवा अश्याच किंमती साड्या नेसणाऱ्या अन तसल्याच कापडांचे रूंद गळ्यांचे ब्लाऊज घालणाऱ्या, किंवा गोऱ्या पान गळ्यांवर टपोऱ्या मोत्यांच्या माळा घालणाऱ्या - अशा देखण्या स्त्री-पुरुषांकडे तो विस्फारित नजरेनं बघत रहायचा. नाटकातल्या मुख्य कलाकारांची अदबीनं जाऊन चौकशी करायचा. कुणीही न सांगता त्यांना काय हवं नको ते बघायचा.   गायकांना त्यांच्या बैठकीवर नेऊन बसवायचा, त्यांना कसलीही तोशीस पडत नाहीना याची खात्री करून घ्यायचा... एक साधा डोअर कीपर हे सारं मनापासून करायचा म्हणून नाट्य मंदिराचे मॅनेजर, येणारे जाणारे प्रेक्षक आणि कलाकारही त्याच्यावर खूष असायचे. औपचारिकता म्हणून त्याची चौकशी करायचे, त्याच्याशी दोन गोड शब्द बोलायचे.  दत्ता त्यानं सुखावून जायचा.

आपणही खरं तर याच समाजाचे घटक आहोत, केवळ परिस्थितीमुळे आपण आज यांच्या सारखी श्रीमंती ऐट करू शकत नाही, परंतु आपली मानसिकताही पूर्णपणे याच लोकांसारखी आहे असं दत्ताला मनोमन वाटे. तो स्वतःला यांच्यातलाच एक समजे. आणि म्हणूनच यांच्याशी वागताना यांच्यासाठी दरवाजा उघडून धरताना, त्यांना आसन दाखवताना किंवा कलाकारांची छोटी छोटी कामं करताना त्याला आत्मीयता वाटायची.   

आणि या समजापायीच त्यानं शाळेला रामराम ठोकला होता. ती शाळेची दगडी इमारत, अंधारे वर्ग, चुना आणि काव यांचा वापर करून रंगवलेल्या भिंती, लांबलचक व्हरांडे, जुनाट बाक या साऱ्याचा त्याला तिटकारा आला होता. करारी स्वभावाचे, धुतलेला सदरा अन पांढरं धोतर नेसणारे, गृहपाठ केला नसल्यास छडीनं मारणारे शिक्षक आणि सुती साड्या नेसणाऱ्या, चेहेऱ्यावर स्वतःच्या ओढगस्तीची चिंता वाहणाऱ्या अन सतत विद्यार्थ्यांवर करवादणाऱ्या शिक्षिका.  हे शिक्षक, या शिक्षिका, त्यांची शिकवणूक आणि त्यांचे विचार यात दत्ताला कुठलाही रस वाटायचा नाही.    स्वतःला तो या सगळ्यापासून वेगळा समजे आणि म्हणूनच शाळेतला त्याचा रस फारच लवकर संपला होता. त्याच्या वाड्यातल्या, आळीतल्या, गुरुवार पेठेतल्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्येही दता कधी फारसा मिसळायचा नाही. हे सारे लोक वाड्यांमधून एक खोली, दोन खोल्यांची खुराड्यासारखी घरं असणारे. निम्न मध्यम वर्गीय किंवा त्याहीपेक्षा गरीब. छोट्या मोठ्या नोकऱ्या करणारे. कुणी पोस्टात, कुणी छपखान्यात, कुणी शाळा मास्तर, कुणी दुकानात सेल्समन तर कुणी सरकारी कारकून लेखनिक. सगळे पोटार्थी. आहे त्यात कसंबसं भागवणारे, मिळालेल्यात समाधान मानणारे, महत्त्वाकांक्षा नसणारे आणि परिस्थितीनं पिचलेले. दत्ताला या संपूर्ण समाजाची घृणा होती.  तो कायम या समाजाची आणि उच्चभ्रू समाजाची तुलना करत रहायचा.   

नाही म्हणायला डेक्कन जिमखान्यावर त्याचे चार मित्र होते. त्यांना अधून मधून भेटायला तो जायचा. त्यांच्या बरोबर इराण्याच्या हॉटेलात बसून सिगरेटी ओढायचा अन गप्पा ठोकायचा.  नाट्य मंदीरातल्या गंमती जंमती त्यांना सांगायचा.  मोठ्या मोठ्या लोकांच्या कलाकारांच्या गोष्टी सांगायचा. त्याची त्या सगळ्यांशी कशी दोस्ती आहे ते ऐकवायचा. मित्रही हे सारं विस्मयतेनं ऐकायचे. सिगरेट चहा बरोबर चघळायला असल्या गोष्टी त्यांनाही मनोरंजक वाटायच्या. वेळ चांगला जायचा. अर्थातच यात यापुढे काहीच नसायचं.   

नाट्य मंदीरातली नोकरी दत्तासाठी एकूण सुखनैव चालू होती. ही नोकरी जरी अर्धवेळ असली तरीही दत्ता जवळ जवळ दिवसभर तिथेच असायचा.  खरं तर या नोकरीच्या पगारात त्याचा स्वतःचाही खर्च जेमतेमच भागायचा पण पगार पैसे असला विचारच दत्ताच्या डोक्यात यायचा नाही.  दत्ताची विधवा म्हातारी आई अन त्याचा भाऊ मात्र या त्याच्या नोकरीवर नाराज होते.    घरात त्यावरून कायम वाद विवाद व्हायचे.   

दत्ताचा मोठा भाऊ दत्ताला काहीतरी चांगलं काम, नोकरी मिळावी म्हणून खटपट करत रहायचा. दत्तानं एखादा छोटासा उद्योग सुरू करावा म्हणूनही तो दत्ताला समजावत रहायचा. पण दत्ताला कष्ट करायचे नव्हते. तो उडवा-उडवीची उत्तरं द्यायचा.   

"दत्ता काल माझ्या एका ओळखीच्यानं तुझ्यासाठी एक चांगला धंदा सुचवलाय. " दत्ताचा भाऊ एकदा उत्साहानं म्हणाला.

"कसला धंदा? आणि हा सुचवणारा शहाणा कोण आहे? " दत्तानं त्रासिकपणे विचारलं.

"कुणी सुचवलंय ते जाऊ दे. लोक आपलं भलं चिंततात म्हणूनच अशा गोष्टी ते आपल्याला सुचवतात. " भावानं समजवायचा प्रयत्न केला.  

"हे भलं चिंतणाऱ्या गृहस्थाचं नाव सांगतोस का जरा? म्हणजे त्याची विचारांची कुवत कितपत आहे ते सांगतो मी तुला... " दत्ता.

"दत्ता हे बडबडण्यापेक्षा धंदा काय आहे ते समजून घे. ते तुझ्या दृष्टिनं जास्त महत्त्वाचं आहे. दोन पैसे मिळवलेस तर आयुष्यात कदाचित स्वतच्या पायावर उभा रहाशील आणि घरगाडा ओढायलाही थोडीफार मदत होईल. " भाऊ वैतागला होता पण तरीही परिस्थितीपोटी तिडीकेनं बोलत होता.

"बरं बरं. आत्ता मला जरा भरतवर जायचंय. आपण उद्या बोलू. " एवढं बोलून पायात चपला सरकवून दत्ता तडक घराबाहेर पडला.   मोठा भाऊ आणि आई अगतिकतेनं बाहेर पडणाऱ्या दत्ताला फक्त पाहत राहिले. हे नेहमीचंच होतं.   मोठा भाऊ हताश होत रहायचा आणि आई कोपऱ्यात बसून आसवं गाळत रहायची. त्या छोट्याश्या खोलीतलं दारिद्र्य आणखीनच करूण झाल्यासारखं वाटायचं.   

- क्रमश: