औटघटकेचं राज्य... (भाग - ४)

डीडीची गाडी फिल्म सिटीत पोहोचे पोहोचेपर्यंत अकरा वाजून गेले होते. डीडीची मूर्ती ठेंगणी जाडसर असली तरीही नवीनच खरेदी केलेल्या चकचकीत कपड्यांत रुबाबदार दिसत होती. मागच्या काही दिवसांत डीडीनं मनसोक्त खरेदी केली होती. ऍलन सोली, व्हॅन ह्युसेनचे शर्ट, सत्या पॉलचे टाय, फ्लोअरशाईमचे बूट, रीड अँड टेलरचे सूट, पीअर कारदांची चश्म्याची फ्रेम आणि काय न काय. स्टुडिओच्या दरवाज्यात उभ्या वॉचमननं डीडीला कडक सलाम ठोकला. स्टुडिओत एका श्रीमंती बंगल्याच्या दिवाणखान्याचा भला प्रचंड सेट लावण्याचं काम चाललं होतं. मुहूर्ताचा शॉट या सेटवरच होणार होता. उजव्या हाताला मेकप रूमच्या बाजूला चार खुर्च्या टाकून अनुताई दोन तीन तंत्रज्ञ नेपथ्यकार, निर्मिती सहाय्यक मंडळींबरोबर चर्चा करण्यात गुंतल्या होत्या. डीडी आल्याचं त्यांनी त्यामुळे बघितलंच नाही. एका तंत्रज्ञानानं त्यांना खुणेनंच डीडी आल्याचं सांगितलं.

"हाय डीडी! कधी आलास? "
"हाय, ब्यूटिफूल लेडी! हाऊ आर यू? " डीडीनं फिल्मी भाषा अन संकेत पटकन आत्मसात केले होते.
"माझं अरे लक्षच नव्हतं. मी या सेट बनवणाऱ्या लोकांबरोबर बोलत होते. हा खूपच मोठा सेट आहे त्यामुळे त्यांना सगळे डीटेल्स देत होते. कुठे उगाच चूक रहायला नको आणि तुझीही तशी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शनच आहे ना! " अनुताई डीडीच्या जवळ जात लाडिकपणं म्हणाल्या.
"चल तुझं त्या लोकांशी बोलणं संपलं असलं तर आपण हिंडून सगळा सेट बघून घेऊ. संध्याकाळी मुहूर्ताच्या वेळेच्या आधी सगळा सेट तयार पाहिजे. उगाच हे राहिलं आणि ते राहिलं असलं नको. "

सेटचं काम जोरात चालू होतं. दिवाणखान्याच्या उजव्या बाजूला चारच पायऱ्या वर चढून डायनिंग हॉल बनवला होता. तिथल्या डायनिंग टेबलला पॉलिश करण्याचं काम चालू होतं. डायनिंग टेबलाभोवती ठेवायच्या खुर्च्या पलिकडे एका रांगेत मांडून ठेवल्या होत्या.

"अरे हे काय, थांबा थांबा, या खुर्च्यांचा आणि डायनिंग टेबलाचा रंग वेगवेगळा कसा काय? हे काम कोण करतंय? " डीडीनं टेबलाचं चाललेलं काम थांबवलं.

अनुताईंनी मगाशी त्या बोलत बसल्या होत्या त्यातल्या एका निर्मिती सहाय्यकाला पटकन हाक मारली,
"दत्ता, इकडे ये. " धावतच तो माणूस तिथे आला. "मी तुला सांगितलं होतं ना, की टेबल, खुर्च्या आणि डायनिंगच्या भागातलं सगळ्या फर्निचरला रोजवूड फिनिशच पाहिजे. मग हे काय. सगळ्याची शेड वेगवेगळी का दिसते आहे? " अनुताई.
"ताई, टेबल, खुर्च्या, साईड टेबल्स सगळ्याची शेड एकच होईल. अजून पॉलिशचं काम चालू आहे. खुर्च्या दुसऱ्या सेटवरच्या आहेत म्हणून त्यांची शेड वेगळी आहे" समजावणीच्या स्वरात सहाय्यक म्हणाला. पण त्याच्या सांगण्यानं डीडीचं समाधान झालं नाही.
"दत्ता, तू स्वतः इथे उभा राहून हे काम करून घे आणि हे बघ तीन वाजे पर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे. काम पूर्ण झालं की मला येऊन सांग. मी स्वतः येऊन ते बघणार आहे. कळलं? " दत्ताच्या चेहेऱ्याकडे डीडी निरखून बघत होता त्यात दत्तात्रय देशपांडेची झाक असल्यासारखं त्याला वाटलं, पण क्षणात त्यानं स्वतःला सावरलं आणि अनुताईंबरोबर बाकीची कामं बघायला तो पुढे झाला.

"अरे इथे या व्हाजमध्ये फुलं का ठेवली नाहीयेत? "

"सर संध्याकाळी मुहूर्ताच्या आधी ताजी फुलं येतील, तीच ठेवणार आहोत. "

"छे, अरे प्लास्टीकची फुलं ठेवा नाहीतर उद्या परवाच्या शूटींगला कंटीन्यूटीचा प्रॉब्लेम येईल. "

किंवा

"ही फ्रेम काढा. यातले रंग फार ब्राईट आहेत. एखादी डल रंगांमधली फ्रेम इथे पाहिजे. "

अशा सूचना तो आणि अनुताई जागोजागी देत होत्या. अनुताई तर पूर्णपणे अनुभवी आणि व्यावसायिक निर्मात्या दिग्दर्शक होत्याच पण डीडीनंही आपलं सारं कसब या चित्रपटासाठी पणाला लावायचं ठरवलं होतं. सेटचा प्रत्येक भाग अगदी कोपरा अन कोपरा, त्यावरची प्रॉपर्टी आणि सारं नेपथ्य, त्यानं प्रत्येक गोष्टीचं नीट निरिक्षण करेपर्यंत दुपार झाली. जेवण करून तो आणि अनुताई पेपरवर्क करायला बसले. ते आवश्यक होतं आणि त्यात खूप वेळही जाणार होता. संपूर्ण चित्रपटाचं, चित्रीकरणाचं, खर्चाचं साऱ्या गोष्टींचं ते होतं नियोजन. अनुताई त्यात निष्णात होत्या. डीडीला यातलं अजून बरंच काही शिकायचं होतं. दोघंही त्या कामात एवढे बुडून गेले की कुणीतरी येऊन मुद्दाम आठवण करून दिली तेव्हाच साडेपाच वाजून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

सात वाजता मुहूर्त होता. डीडीनं आणि अनुताईंनी काम आवरतं घेतलं. सव्वासहा साडेसहापासून लोक यायला सुरवात होणार होती. खूप लोकांना बोलावलं होतं. इंडस्ट्रीतले दिग्गज, अनुताईंच्या चित्रपटांमध्ये कामं करून गेलेले कलाकार, दिग्दर्शक, गायक, संगीतकार यांना सगळ्यांना तर बोलावलं होतंच शिवाय पत्रकार, मोठ्या वृत्तपत्रांचे संपादक, फोटोग्राफर्स सगळे हजेरी लावणार होते. अनुताईंनी सगळ्यांशी तेवढे जिव्हाळ्याचे संबंधही ठेवलेले होते आणि डीडीलाही या साऱ्या लोकांशी नातं निर्माण करायचं होतं. त्याच्यासाठी ही फार मोठी संधी होती.

सातचा ठरलेला मुहूर्त साधता साधता जवळ जवळ आठ वाजून गेले. आलेल्या पाहुण्यांसाठी मुहूर्ताच्या बरोबरच ड्रिंक्स आणि डिनर पार्टी पण ठेवली होती. या इंडस्ट्रीचा हा रिवाजच होता. चित्रपट यशस्वी होण्यासाठी हे सारं करणं आवश्यकच होतं. अनुताई या गोष्टींमध्ये वाकबगार होत्या. त्यांनी खास या पार्टीसाठी पंधरा हजारांची साडी मुद्दाम विकत घेतली होती. आज त्यांचं सौंदर्य अक्षरशः ओथंबून वाहत होतं अन इथल्या संकेतांप्रमाणंच त्यांची मित्रमंडळी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांची तोंड भरून स्तुती करत होती. स्टुडिओमध्ये पाहुण्यांची चिकार गर्दी झाली होती, अभूतपूर्व धमाल उडून गेली. मोठ्या आवाजात संगीत चालू झालं होतं, श्रीमंती रंगी बेरंगी कपडे, अहमहमिकेनं अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रिया, कडक सूट बूट, झुळझुळीत साड्या, उंची सेंटचा दरवळ, दांभिक गर्विष्ठ बोलणी, स्त्रियांबरोबर केलेले आंबट विनोद, त्यांची अतिरिक्त अंगलट, वाहत असल्यासारखी वाटली जाणारी शँपेन, इतर उंची मद्यं, मोठमोठे दिवे लावून केल जाणारं पार्टीचं चलतचित्रण, फोटोग्रफर्सचे फ्लॅश, कलाकारांच्या पोजेस, मुलाखती, खोट्या हास्याचे फवारे...

डीडीसाठी हे सारं नवीन नसलं तरी आज पहिल्यांदाच तो या साऱ्यांच्यातला एक होता, इतकंच नाही तर उत्सवमूर्ती होता, पहिल्यांदाच प्रत्येक जण येऊन त्याच्याशी हस्तांदोलन करत होतं, त्याचं अभिनंदन करत होतं, त्याच्याशी दोन मिनिटं हसून बोलत होतं. पहिल्यांदाच पत्रकार लोक त्याच्या मुलाखतीसाठी त्याची वेळ मागत होते. अनुताई स्वतःहून वेगवेगळ्या लोकांची डीडीशी ओळख करून देत होत्या. ऐश्वर्य त्याच्या पायाशी लोटांगण घेत असल्यासारखं डीडीला वाटलं. या साम्राज्याचा तो औटघटकेचाच का होईना पण तो सम्राट झाला होता.

"हे सारं अनुताईंच्यामुळे घडलंय. त्यांनीच मला या समाजात प्रवेश मिळवून दिलाय. त्यांच्या मुळेच या साऱ्या लोकांनी मला आपलसं केलंय. माझे उद्या वर्तमानपत्रात फोटो येतील, माझी कीर्ती सर्वदूर पोहोचेल. सारं सारं फक्त अनुताईंच्यामुळे... " डीडीला भावनावेग आवरेनासा झाला. त्यानं अनुताईंना हाक मारली. अनुताई जवळ आल्या. डीडीला पटकन काय बोलावं कळेना. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं, भावनातिरेकानं त्यानं अनाहूतपणं अनुताईंना हलकेच आलिंगन दिलं. क्षणार्धात शेकडो फ्लॅशेसचा लखलखाट झाला.......

"खाड, खाड, खाड, खाड" जोरजोरात कुणीतरी दार खडखडावत होतं. क्षणात डीडीची तंद्री भंग पावली. काच तडकावी त्याप्रमाणे थाडकन समोरच्या चकाकत्या समुद्राला तडा गेल्यासारखं वाटलं. आपण कुठे आहोत त्याला काहीच पत्ता लागेना. दारावर अजूनही थापा पडत होत्या. त्यानं धडपडत जाऊन दार उघडलं.... बाहेर पोलिसांची जणू फौजच उभी होती. हा सारा काय प्रकार आहे? मी कुठे आहे? ही खोली कुठली आहे? आणि अनुताई, पार्टी सारं अचानक कुठे गायब झालं? त्याचा पुरता गोंधळ उडाला.. हे स्वप्न आहे का ते आलिंगन, मुहूर्त, पार्टी, अनुताई ते सारं स्वप्न होतं?? गोंधळानं डोक्यात गरगरल्यासारखं वाटायला लागलं.

"दत्ता देशपांडे तुझं नाटक बास झालं भडव्या आता... " पोलिसांच्या फौजेतून करड्या आवाजात उद्धार झाला... "त्याच्या बखोटीला पकडा रे. सोडू नका हं भडव्याला... " डीडीला अजूनही काहीच कळत नव्हतं. तो शून्यात बघितल्यासारखा भकासपणे पोलिसांकडे बघत होता.

आणि अचानक अनुताईच तिथे आल्या... आणि बघता बघता पाठोपाठ मुहूर्त पार्टीतली सारी रंगीबेरंगी मंडळी... डीडीला बेंबीच्या देठापासून खदखदून हसू यायला लागलं आणि अचानक अरे हे काय... सगळी रंगारंग पार्टी त्याच्या भोवती फेर धरून नाचायला लागली आणि पोलिसही त्यांच्यात सामिल झाले... पार्टीतले रंगीबेरंगी झुळझुळीत कपड्यातले लोक, तंग कपड्यातल्या स्त्रिया, अन खाकी कपड्यातले पोलिस सगळेच मोठ्या संगीताच्या तालावर हातात हात घालून नाचायला लागले... डीडी अजून जोरजोरात हसायला लागला... आणि एवढ्यात आला त्याचा मोठा भाऊ, पारखी साहेब, भरत नाट्य मधले त्याचे सहकारी आणि डेक्कनवर भेटणारे त्याचे मित्र.. हे सारेही सगळ्या गर्दीबरोबर लागले नाचायला... हसता हसता दत्ता रडायला लागला... बघता बघता अनुताईंनीही त्याच्याभोवती फेर धरला... दत्ता रडता रडताच हसायला लागला... त्याला अनुताईंना पकडायचं होतं... पण त्या गोल गोल फिरत होत्या... त्यांचा वेग वाढतच होता अन दत्ताच्या हाताला त्या लागत नव्हत्या... त्यांच्या वेगाबरोबर दत्ताचे डोळेही गरगर फिरत होते... आता सगळी गर्दीच बेभान होऊन नाचत होती... दत्ताचे डोळे चमकत होते... त्याला हसू आवरेनासं झालं होतं.... "हा:हा:हा:हा:हा:... " "हा:हा:हा:हा:हा:... " "हा:हा:हा: हा: हा:... " "हा:हा:हा:हा::.. "

- समाप्त