औटघटकेचं राज्य... (भाग - ३)

दत्ताला आता ताईंच्या युनिट मधला म्हणूनच ओळखायला लागले होते.  सासवडचं चित्रीकरण संपल्यावर दोन दिवस मध्ये मोकळीक होती आणि मग पुण्यातलं शेड्यूल होतं.  मग वाई आणि पाचगणी.   युनिट त्या त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच दत्ता त्या लोकेशनवर पोहोचायचा.    युनिटची सारी व्यवस्था करायचा. अगदी झाडलोट करण्यापासून ते कलाकारांच्या कपड्याच्या घड्या घालण्यापर्यंत जी पडतील ती कामं दत्ता अगदी बिनबोभाट करत रहायचा.    त्याला त्यात अतीव समाधान मिळायचं.

डेक्कन जिमखान्यावरच्या मित्रांच्या भेटी गाठी आजकाल कमी झाल्या होत्या.    पण जेव्हा भेटायचा तेव्हा तो त्यांना शुटींगच्या गंमती जंमती सांगायचा.    कुठल्याही कलाकाराविषयी बोलताना तो त्याला एकेरीतच संबोधायचा.    मोठमोठ्या कलाकारांचे आणि त्याचे कसे घनिष्ठ संबंध आहेत ते ऐकवत रहायचा.   

"परवाच सेटवर मी सीमाला सरळ सांगितलं.... "

"कोण सीमा? " एखादा मित्र न कळून विचारायचा.    हा कोण बावळट आहे असा एक दृष्टिक्षेप त्याच्या कडे टाकून दत्ता बोलत रहायचा.

"अरे बाबा सीमा महणजे सीमा उसगावकर.    एवढं कळत नाही का?    आज इंडस्ट्रीतली एक नंबरची हिरोईन आहे ती बाबा.    हां, तर तिला सरळ सांगितलं, ही कुठची साडी नेसून आलीयेस? टेक थांबवला आणि तिला साडी बदलून यायला लावलं... " मित्र विस्मयतेनं ऐकत रहायचे.

घरची परिस्थिती मात्र अगदी या उलट होती.   नाट्य मंदिरातल्या येणाऱ्या पगारात निदान दत्ताचा स्वतःचा खर्च तरी भागायचा.   पण आता तर त्यालाच घरातनं पैसे घ्यायला लागत होते  आणि त्याला देण्यासाठी तरी घरात पैसे कुठे होते?   मग त्यावरून भांडणं, आरडा ओरड, रडारड होत होती.   दत्ताचा भाऊ अजूनही त्याच्यासाठी प्रयत्न करत होता.   अजूनही त्याला वाटत होतं की याला योग्य मार्गावर आणावं.   अन दत्ताला मात्र याचं काहीच सोयर सुतक नव्हतं.

अनुताईंचं एक पिक्चर पूर्ण झालं होतं आणि आता दुसऱ्याची तयारी तयारी करायची होती.   पण त्याला थोडा अवकाश होता.   म्हणजे मध्ये सहा एक महिने घरीच बसावं लागणार होतं.   म्हणजे मिळकत तर सोडाच घरातलं खायला आणखी एक तोंड वाढणार होतं.   म्हणजेच घरात भांडणानाही आणखी तोंडं फुटणार होती.  

दत्ताचं अन त्याच्या भावाचं आज पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं.   भावानं त्याच्यासाठी अजून एक नोकरी शोधली होती आणि पुन्हा एकदा दत्ताला ती नोकरी करायची नव्हती.   ही कंपनी चांगली होती आणि सहा महिने घरी बसण्यापेक्षा दत्तानं या कंपनीत रुजू व्हावं असं त्याच्या भावाला वाटत होतं.   दोन्ही भाऊ अगदी एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे भांडले.   शेवटी म्हातारी आई मध्ये पडली.   ती दत्ताच्या अक्षरशः हातापाया पडली आणि तिनं दत्ताला ही नोकरी घेण्यासाठी कसंबसं राजी केलं.

दत्ताच्या भावाचे साहेब आणि पारखी साहेब एकमेकांचे अगदी जवळचे मित्र होते. त्यातूनच ही नोकरी चालून आली होती.   पारखी साहेबांचा बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांना साईटवर कामगारांवर लक्ष ठेवणारा, त्यांची हजेरी, पगार सांभाळणारा, माणूस हवाच होता. दत्तासाठी खरंतर हे अगदी योग्य काम होतं.

दत्ता या नोकरीवर रुजूही झाला होता पण पहिल्या दिवशीपासूनच त्याचं कामावर धड लक्ष नव्हतं. त्याच्या डोक्यात सतत अनुताईंचे विचार घोळत रहायचे.  अनुताई, त्यांचं सौंदर्य, त्यांची कंपनी, चित्रीकरणाच्या वेळची धमाल, मोठमोठ्या कलावंताची श्रीमंती, त्यांचा बडेजाव याच गोष्टींची उलघाल त्याच्या डोक्यात चाललेली असायची.   नोकरीतल्या कामात त्याचं मन रमायचं नाही.   अर्थातच हातून चुका व्हायच्या. त्यामुळे पारखी साहेब चिडायचे.   जवळ जवळ रोज दत्ताला बोलणी खायला लागायची.  

आणि आजही नेमकं तसंच झालं होतं. सकाळी मेमो मिळाला आणि दत्ता संध्याकाळी साहेबांना भेटायला गेला तर साहेबांनी त्याच्यावर भरपूर तोंडसुख घेतलं.   साहेब इतर कशामुळे तरी आधीच भडकलेले होते आणि त्यातच दत्ता समोर आल्यावर सारा राग त्याच्यावरच निघाला.   दत्ता पण मनातून भडकला होता.   साला रोज रोज या माणसाच्या शिव्या खायच्या म्हणजे काय?   माझी लायकी काढतो लेकाचा.   रागानं दत्ताची कानशिलं लाल झाली होती.   दत्ता त्या तिरीमिरीतच घरी आला.   रात्री खूप उशीर झाला तरी दत्ताला झोप लागेना.   रागानं अंगाची नुसती लाही लाही होत होती.   याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे...

दुसऱ्या दिवशी एक तारीख होती. सकाळी ऑफीस मध्ये पोहोचला तरीही दत्ताच्या डोक्यातली तिडीक कमी झालेली नव्हती. आज कामगारांचा पगाराचा दिवस होता.   पारखी साहेबांना बाहेर जायचं असल्यामुळे त्यांनी दत्तासाठी निरोप ठेवला होता की त्यानं पगारपत्रक तयार करून त्याची कॉपी अकाऊंटंटकडे द्यावी आणि त्याने ते तपासल्यावर त्याप्रमाणे बँकेतून तशी रोख रक्कम काढावी.  शिवाय काल एका गिऱ्हाईकानं मोठी रोख रक्कम आणून ठेवली होती ती बँकेच्या विशिष्ट खात्यात भरावी.   बँकेतून पैसे काढण्यासाठी कोऱ्या चेकवर सही करून साहेबांनी तो स्वतःच्या टेबलाच्या खणात ठेवला होता अन खणाची किल्ली विशिष्ट ठिकाणी ठेवली होती.   दताला हे सारं माहिती होतं कारण असं बऱ्याच वेळा व्हायचं.   पारखी साहेबांनीच, त्यांना काही महत्त्वाच्या कामासाठी असं ऐनवेळेस बाहेर जावं लागलं तर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली होती.   दत्तानं पगारपत्रक तयार केलं आणि अकाऊंटंट कडे तपासयला दिलं.   साहेबांच्या केबीन मध्ये  जाऊन त्यानं ड्रॉवर मधून गिऱ्हाइकानं दिलेली संपूर्ण रक्कम  अन साहेबांनी सही करून ठेवलेला कोरा चेक बाहेर काढला.

एवढी सारी रक्कम आणि त्या चेक कडे बघता बघताच दत्ताच्या डोक्यात लख्खकन वीज चमकल्यासारखं विचारांचा लखलखाट झाला आले आणि त्याच्या चेहेऱ्यावर छद्मी हास्य उमटलं.   रक्कम आणि चेक घेऊन हसतच दत्ता ऑफिसच्या बाहेर पडला आणि रस्त्यावरच्या गोंगाटात सामिल होऊन गेला...

       _______________________________________________  

       
ओबेरॉय हॉटेलच्या एकविसाव्या मजल्यावरच्या अलिशान खोलीच्या खिडकीत उभं राहून डीडी मस्तपैकी आपल्या आयरिश कॉफीचे घुटके घेत होता. परत परत डोळ्यासमोर येणाऱ्या आपल्या काळ्या भूतकाळाला त्यानं महत्प्रयासानं बाजूला सारलं होतं.  त्याला तो सारा भूतकाळ विसरायचा होता आणि समोर दिसणाऱ्या सोनेरी भविष्यात, मनमोहक स्वप्नरंजनात रममाण व्हायचं होतं...  समोर अरबी समुद्राचं महाविस्तीर्ण पात्र पसरलं होतं. पूर्वेची सूर्यकिरणं समुद्रावरनं परावर्तित होऊन डोळे दिपवून टाकायला लागली होती. भरतीला नुकतीच सुरवात झाली होती. एका संथ लयीत लाटा फेसाळत येऊन किनाऱ्यावर फुटत होत्या आणि परत जात होत्या. मरीन लाईन्सवरनं मुंगीसारख्या दिसणाऱ्या छोट्या छोट्या गाड्यांची लगबगीनं ये जा सुरू झाली होती. डी डी बारकाईनं त्या गाड्या न्याहाळत होता. त्याच वर्दळीत त्याची काळी भपकेबाज बीएमडब्ल्यू भरगाव वेगानं पळताना त्याला दिसली.

"फिल्म सिटी पहुंचनेकेलिए और कितना टाईम लगेगा? " डीडीनं ड्रायव्हरला विचारलं. "सर और एक देढ घंटा लगेगा. "  ड्रायव्हरनं आरश्यातनं डीडी कडे बघत उत्तर दिलं.

डीडीच्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताचं चित्रीकरण आज होणार होतं. एवढ्या लहान अवधीत कुठून कुठे पोहोचला होता तो. या चित्रपटासाठी अनुताईंशीच भागीदारीचा करार केला होता त्यानं. चित्रपटासाठी लागणारं बीज भांडवल डी डी स्वतः घालणार होता आणि बाकी सारं भांडवल फायनान्सर मार्फत उभं करायचं ठरलं होतं. शिवाय एनडीएफसीची मदत वगैरे अपेक्षित होतीच. निर्मिती आणि दिग्दर्शनाची मुख्य जबाबदारी अनुताईंवर असली तरीही अनुताईंच्या बरोबरीनं डीडीचाही निर्मितीत पूर्ण सहभाग होताच.    एकतर तो त्याचा पहिलाच चित्रपट होता म्हणून तर त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नजरेखालनं जायलाच हवी होती आणि दुसरं आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे त्याला अनुताईंचा सहवासाही भरपूर लाभणार होता, त्यांच्या बरोबर एकत्र प्रवास करायला मिळणार होता, त्यांच्या सौंदर्याचं अगदी जवळून रसग्रहण करायला मिळणार होतं आणि कदाचित...  अनुईंनाही हे सारं चांगलं ठाऊक होतं, त्यामुळेच डीडीशी बोलताना पदर सावरायचं भानही कधी कधी त्यांना रहायचं नाही किंवा जाणून बुजून तसं भान त्या ठेवायच्या नाहीत!

- क्रमशः