२६ नोव्हेंबर!

......................................
२६ नोव्हेंबर!
......................................

अरे माणसा साध्या, नाही तुला कुणीही त्राता!
वाचवायचा जीव तुझा तू, तुझाच तू रे, आता!

मिटून डोळे बसलेल्यांच्या झोपेवर हा घाला...
तरी न आली जाग... शेवटी घरात शत्रू आला...  
देश अखेरी दहशतवाद्यांच्याच हवाली झाला...
'घटना ही किरकोळ.. 'तरीही ऐकू आल्या बाता!


कळूनही गाफील राहणे, हा खाक्या सरकारी...
दिसूनही काहीच दिसेना... अंध जसे अंधारी...!
शास्ते कसले? हे तर केवळ मतांचेच व्यापारी...
मनात आहे नवसत्तेचा हिशेब जाता-जाता!

शूर वीर लढले; पण कसली शस्त्रे त्यांच्या हाती...!
डगमगले नाहीत तरीही, दिलेर त्यांची छाती...
चारलीच गनिमांना त्यांनी अखेरशेवट माती...
धनुष्य होते जरी मोडके; रिताच होता भाता!


निलाजऱ्यांनी मात्र कोडगे असे खुलासे केले...
मोजदाद प्रेतांची झाली... कुठे फारसे मेले!
जो मेला तो निघून गेला, काय कुणाचे गेले?
कुठे मुसमुसे लहानगा; तर निश्चल कोणी माता!

--------------------------------------------


- प्रदीप कुलकर्णी

रचनाकाल ः ३० नोव्हेंबर २००८