आणि एक दिवस दुपारचं जेवण झाल्यावर मामा म्हणाला "चल, कुळकर्ण्यांकडे जाऊ. येतोस?"
उषा, आई आणि उषाची धाकटी बहिण तिघीही घरातच होत्या. मला बघून उषाच्या आईला आनंद झाला. "एवढी सुंदर सुंदर चित्रं काढता, आमच्या या कानवलीच्या तरीचं एखादं चित्र काढा की..." माझ्यासमोर दरवाजाच्या चौकटीला रेलून उभं राहत आई म्हणाली.
उषा मात्र गंभीर चेहऱ्यानं मामाशीच बोलत राहिली. कानवली गावातले प्रश्न, तिथल्या लोकांची दुरावस्था, इत्यादी, इत्यादी. "काका, तुमच्या सारख्यान खरं तर आम्हाला या कामात मदत करायला पाहिजे, निदान मार्गदर्शन तरी"
"बरोबर आहे गो उषा" आई म्हणाली. मला वाटतं उषाच्या आईला या समाजसेवेतलं वगैरे फारसं काहीच कळत नव्हतं. परंतु आपली मुलगी फार हुषार आहे आणि जगावेगळं काहीतरी चांगलं करतीये, एवढीच जाणीव होती. निव्वळ त्या जाणीवेपोटी ती उषाला "बरोबर आहे गो, बरोबर आहे" असा दुजोरा देत राही.
"हा संपूर्ण तालुका काँग्रेसच्या ताब्यात आहे. " उषानी परत चालू केलं आणि माझ्याकडे बघून म्हणाली "तुमचे मामा काँग्रेस कमिटीचे इथले चिटणीस. या लोकांनी आपली लोकं सरकारी खात्यात चिकटवण्यापलिकडे काही केलं नाही. समाजासाठी, इथल्या लोकांसाठी खरं काम बीम तर काहीच नाही. आपण तरुणांनीच त्यामुळे या लोकांना विरोध केला पाहिजे. आणि घोषणाबाजीनं काही होणार नाही. आपणच काम करून जगाला दाखवून दिलं पाहिजे की समाजासाठी खरं काम म्हणजे काय ते. " उषा प्रेरीत होऊन बोलत होती.
धाकटी बहीण शानू. तिचं खरं नाव शांता. पण तिला घरात शानूच म्हणायचे. झोपाळ्यावर शांत बसून मोठ्या बहिणीचं बोलणं ती ऐकत होती. उषाच्या मते - आणि अर्थातच त्यामुळे आईच्याही मते- शानू अजून लहान होती आणि म्हणून मोठ्या लोकांच्या मध्ये तिनं बोलणं योग्य नव्हतं. म्हटलं तर शानू खरंच अल्लड होती. थोड्या वेळातच अगदी जुनीच ओळख असल्यासारखं तिनं मला त्यांच्या घरातल्या जुन्या फोटोंचा अल्बम दाखवला. "हे माझे काका... ही काकू... आणि हा चुलत भाऊ". मला टेकून उभं राहून निरागसपणे शानू मला सांगत होती. शानू उषाएवढी मोठी नसली तरीही लहान पण नव्हती. त्यामुळे तिचं मला असं टेकून उभं राहणं फारच सुखद होतं.
मामानं म्हटल्याप्रमाणे कुळकर्णी लोक स्वभावानं खरंच साधे आणि चांगले होते. मला त्यांच्या घरात बरं वाटत होतं. माझं त्या तिघींशी सूत पण चांगलं जुळलं होतं. आम्ही त्यांच्याकडे खूप वेळ बसलो होतो. गप्पा पण खूप मारल्या. अर्थातच सगळ्यात जास्त बडबड उषाचीच होती आणि तीही समाजसेवा, कॉंग्रेस आणि कानवली या विषयांवरच. एखाद्या अभ्यासू माणसाबरोबर वाद घालणं मामाला जमायचं नाही. अशावेळी एकतर तो गप्पच व्हायचा किंवा तिरसटासारखं काहीतेरी बोलायचा. उन्हं थोडी कलल्यावर आम्ही त्यांच्या बांधावर फिरायला गेलो. अंधार पडायला लागला तसा आम्ही त्यांचा निरोप घेतला.
"मामा त्या तिघीही खरंच चांगल्या आहेत." मी. "हो हो निश्चितच. पूर्वी उषाचे वडिल होते ना त्यावेळेस अगदी नित्यानं मी त्यांच्याकडे जायचो. पण आताशा जमतच नाही रे कामामुळे. किती काम, किती काम." आमच्या मामाचं अगदी ठाम मत होतं की शेतात कष्टाच्या प्रमाणातच पीक येतं. त्यामुळे जेवढं जास्त राबावं तेवढं जास्त चांगलं पीक. पण हे काही अगदी तितकसं बरोबर नव्हतं. मामाच्या नशिबी कष्टच खूप होते आणि त्याला कारणही बऱ्याच प्रमाणात मामाच होता. देवगडला जाताना पोस्टात म्हणून टाकायला घेतलेलं पत्र मामाच्या खिशात कित्येक दिवस तसंच रहायचं! मामाची कामाची अशीच पद्धत होती म्हणून त्याच्या कपाळी कष्टही खूप होते!
आताशा कुळकर्ण्यांकडे मी वरचेवर जाऊ लागलो होतो. कित्येक वेळा खळ्यातल्या झोपाळ्यावर एकटाच बसून मी विचार करत राही. माझ्या आळसटलेल्या आणि निरर्थक जीवनाचा मला कंटाळा येई. चीडचीड होई. त्याच वेळेस त्या तिघींच्या हालचालींचे किंवा उषाच्या वाचन लिखाणाच्या कागदांचे आवाज बाहेर ऐकू येत. कित्येक वेळा दुपारी उषा कानवलीत किंवा देवगडला कामासाठी जाई आणि संध्याकाळी परत आल्यावर मोठ्या आवाजात काही बाही बोलत राही. त्यात जर का कानवलीचे प्रश्न वगैरे असला काही विषय असला तर माझ्याकडे वळून म्हणे "हं तुम्हाला यात रस नसायचाच... " उषा सुंदर होतीच पण तिचा चेहेराही तेवढाच करारी होता. तिचा धाक वाटायचा. माझ्या चित्रांमध्ये मी कानवली किंवा तिथले सामाजिक प्रश्न हे विषय कधीच घ्यायचो नाही. उषाला याबद्दल राग होता. मला तिच्या समाजसेवेशी काहीच देणं घेणं नव्हतं. पण नेमक्या याच कारणामुळे मी उषाला कधीही आवडायचो नाही. अर्थात तिच्या मनातली माझ्याबद्दलची तिडीक मला जाणवू न देण्याचा ती प्रयत्न करायची पण अधून मधून ती माझ्या लक्षात आल्या वाचून रहायची नाही. कधी कधी झोपाळ्यावर बसल्या बसल्या मानसिक त्रास झालेला असेल तर मी म्हणायचो सुद्धा की भरल्यापोटी समाजसेवा करणं म्हणजे कडक इस्त्री केलेला भरजरी शालू नेसून मिरवण्यासारखंच आहे.
शानूचं मात्र असं नव्हतं. खरं तर तिचं अमुक असं काहीच नव्हतं. माझ्यासारखंच. दिवसातला बराच वेळ ती काहीबाही वाचत रहायची. मी आल्यानंतर मात्र तिचा चेहेरा खुलायचा. आल्या आल्या ती मला दिवसभरात काय काय घडलं ते सांगत रहायची. "राधा गाभण होती ना तिला खोंड झाला आणि त्याच्या कपाळावर चांद आहे" किंवा "काल रात्री आम्ही केळफुलाची भाजी केली होती. इतकी मस्त झाली होती." असं काहीही. कधी कधी ती आणि मी बांधावर फिरायला जायचो किंवा बांदेकराला कुकारे घालून बोलवायचो आणि त्याच्या होडीतून चक्कर मारून यायचो. कधी कधी खळ्यात पेळवेवर बसून मी चित्र काढायचो आणि माझ्याशेजारी ती ते बघत उभी रहायची. शानू खूप नाजूक होती आणि गव्हाळ गोरी सुंदर. माझं पूर्ण आयुष्य असंच चालू राहू शकलं असतं तर... लोक, परिसर, निसर्ग, हवामान सगळंच उत्तम... आणि शिवाय स्वच्छंदी जगणं... अजून काय हवं!
"खोतांची आजी माहितीये? एवढे दिवस आजारी होती. मुंबईच्या डॉक्टरांचं पण औषध आणलं होतं, तरीही बरी होत नव्हती. आणि आबा महारानं निरगुडीचा पाला घेऊन तिच्यावर काहीतरी मंत्र घातला आणि ती खडखडीत बरी झाली. काय चमत्कार आहे नं? " मी एक दिवस सकाळी आल्या आल्याच शानू मला म्हणाली.
"हॅः , शानू चमत्कार नेमके म्हाताऱ्या आणि आजारी लोकांचेच कसे काय होतात? हे सगळं वेडगळपणाचं आहे. माझ्या मते आयुष्य हाच एक पुरेसा मोठा चमत्कार आहे. जे आपल्याला नीटसं उमगत नाही तो म्हणजे चमत्कार."
"पण आपल्याला जे उमगत नाही त्याची तुला भीती नाही वाटत?"
"छे, भीती कसली? मला जे समजत नाही त्यापासून मी अजिबात दूर जात नाही, उलट धैर्यानं त्याला सामोरा जातो. माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे या विश्वातला. वाघ, सिंह, आकाशातले तारे, निसर्ग, या सगळ्या पेक्षा आणि आपल्याला समजणाऱ्या न समजणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा मानव श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच त्याला मानव म्हटलं जातं, उंदीर किंवा बेडूक नाही. "
शानूला वाटायचं की मी चित्रकार असल्यामुळे मला सगळं कळतं. त्यामुळे ती मला विश्व, अंतिम सत्य, जीवन, ईश्वर या गोष्टींबद्दल शंका विचारत रहायची. तिला नेहेमी वाटायचं की मी तिला स्वर्गात किंवा तत्सम एखाद्या अदभूत जगात - जिथं तिला वाटायचं मी नेहमीच विहार करत असतो अशा ठिकाणी - एक दिवस घेऊन जाईन. मी जे काही बोलायचो, शानू त्यावर भाबडेपणानं विश्वास ठेवायची.
"आपली उषा किती हुशार आहे ना? मला तर ती इतकी आवडते की तिच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण मला एक सांग... " माझ्या शर्टाची बाही पकडून ती म्हणाली "तू उषाशी बोलताना एवढा चिडचिडा का होतोस? तुझे आणि तिचे सारखे वाद होतात. "
"कारण उषा जे करतीये ते चुकीचंच आहे. "
"तुझं बोलणं बऱ्याच वेळेस अगम्य असतं बाबा.. " त्याचवेळेस उषा नुकतीच घरात शिरत होती. उन्हानं लाल झालेला तिचा चेहेरा अधिकच सुंदर दिसत होता. शानू आणि आई जेवढ्या एकमेकींच्या जीवलग मैत्रीणीं सारख्या होत्या तेवढी उषा नव्हती. कारण उषाचा घरात एक प्रकारचा दरारा होता. ती कायम गंभीर चेहेऱ्यानं बोलायची. कानवलीतले लोक त्यांच्या अडचणी सांगायला किंवा त्यांच्यातल्या आजाऱ्यांना घेऊन उषाकडे येत. उषाची हुशारी, व्यासंग आणि जनसंपर्कामुळे आईला आणि शानूला तिच्याबद्दल आदर होता, भीती होती.
एक दिवस उषा आसपास नाही असं बघून तिची आई मला म्हणाली "आमच्या उषासारखी हुशार आणि सुंदर मुलगी शोधून सापडायची नाही. पण मी म्हणते ही पुस्तकं, ती शाळा, ते काम यातून तिनं थोडं तरी डोकं वर काढायला पाहिजे. आपलं स्वतःचं म्हणून काही बघायला नको का? आता तेवीस पूर्ण झालीत तिला... तिच्या लग्नाचं काहीतरी बघायलाच पाहिजे... "
आज कुळकर्ण्यांकडे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत माझा दिवस फारच छान गेला होता. हे कुटुंब मला जवळ जवळ त्यांच्यातलाच एक मानायला लागलं होतं. परत येताना मात्र मन उदास झालं होतं. वाटत होतं जगात, आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच? कोकणात आल्यापासून पहिल्यांदा असं वाटायला लागलं होतं की कॅनव्हास समोर ओढून चांगली मनमुराद पेंटींग्ज करावीत... अगदी सारे रंग संपून जाई पर्यंत... मी प्रेमात तर पडलो नव्हतो?
- क्रमश: