आध्यात्मिक उन्नती (भाग - ३)

"आज देवगडला खासदार आले होते.  त्यांच्या पुढे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मी अगदी ठामपणे मांडली." आत येता येता उषा सांगत होती.

" पण मला नाही वाटत हे सरकार कानवलीसाठी काही करेल. " आणि मी तिथेच आहे म्हटल्यावर म्हणाली "आपणही आलेला आहात वाटतं?  अर्थात आपल्याला या असल्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नसेल ना? "

"देणं घेणं नाही कसं? अगदी जरूर आहे.  पण आजपर्यंत माझं मत कधी ऐकून घेतलयस तू? मला तर खरंच वाटतं की हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे."

"खरंच? "

"आणि माझ्या मते कानवलीत प्राथमिक आरोग्य केंद्र नसणंच महत्त्वाचं आहे. " मी थोडा चिडलो होतो. 

"मग काय लँडस्केप पेंटींग असणं महत्त्वाचं आहे? " उषा.

"नाही, लँडस्केप पेंटींग नाही पण तिथे काहीच नसणं महत्त्वाचं आहे."

उषाचा पाराही किंचीत चढला होता पण आवाजावर ताबा ठेवत ती म्हणाली "तुला माहितीये मागच्या आठवड्यात त्या कोयंड्यांची मुलगी अनिता बाळंत होता होता गेली.  जवळपास एखादं आरोग्य केंद्र किंवा डॉक्टर दवाखाना काही असतं तर अनिता नक्कीच वाचली असती.  माणूस चित्रकार असला तरीही त्याला वाईटही वाटू शकतं अशा घटनांचं. अर्थात हृदय असेल तर." उषानं एव्हाना आरामखुर्चीत बसून पोस्टानं आलेलं वर्तमानपत्र उघडलं होतं.

"वाटतं ना.  जरूर वाईट वाटतं." माझ्या बोलण्यात आपल्याला काही रस नाही असं दाखवण्यासाठी उषानं पूर्ण वर्तमानपत्र उघडून समोर धरलं होतं.  पण मी अर्थातच माझा मुद्दा पुढे रेटला, "आताच्या परिस्थितीत शाळा, ग्रंथालय, दवाखाना असल्या गोष्टी म्हणजे कानवलीतल्या लोकांना या गोष्टींचं गुलाम बनवण्यासारखं आहे.  ही त्यांना जखडणारी एक एक साखळी आहे.  आणि तू जे करतीयेस ना ते म्हणजे या लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासारखं नसून, या साखळीची पकड घट्ट करण्यासारखं आहे." उषानं पेपर किंचीत बाजूला करून माझ्याकडे बघितलं.  तिला चूक म्हणणारा बहुतेक मी पहिलाच होतो. 

"अनिता बाळंतपणात मेली हा महत्त्वाचा प्रश्नच नाहीये.  तिच्यासारख्या कित्येक अनिता, सुनिता रात्रंदिवस काबाडकष्ट करत राहतात, त्यांच्या पोराबाळांना भरवण्यासाठी.  काही दुखलं खुपलं तर आपलं आपणच घरच्या घरी औषधपाणी करतात आणि पुन्हा कामाला जुंपून घेतात.  का तर काम केलं नाही तर पोरं खाणार काय? आणि मग एक दिवस कुपोषणानं, एखाद्या जर्जर रोगानं सडून मरून जातात.  आणि त्यांची पोरं? त्यांचंही तेच होतं.  मिळेल ते शिळं पाकं, घाणेरडं खाऊन ही पोरं मोठी होतात आणि तसंच परत कष्ट करकरून करकरून मरून जातात.  गेली शेकडो वर्षं हेच चाललंय.  कुत्र्याचं जिणं सुद्धा या लोकांएवढं घाणेरडं नसतं.  सतत काम, सतत हाल अपेष्टा, सतत दडपण - का तर भाकरीच्या एका तुकड्यासाठी... एखादा डोंगराचा कडा अंगावर कोसळावा तसं लहानपणापासूनच या लोकांवर काम असं कोसळतं की त्याखाली हे लोक भरडून जातात. स्वतःला विसरतात.  आपण माणूस आहोत हे विसरतात.  स्वतःबद्दलचा विचार, आपल्या आवडींचा विचार, मानसिक जडण घडण, स्वतःची अध्यात्मिक उन्नती या गोष्टी यांच्या गावीही नसतात.  कसली आलीये अध्यात्मिक उन्नती? फरक काय यांच्यात आणि प्राण्यांच्यात? आणि तुम्ही लोक याही पुढे जाऊन यांना दवाखाना, ग्रंथालय, शाळा असल्या गोष्टींचे गुलाम बनवता.  ग्रंथालयाची वर्गणी घेता, औषधांचे पैसे घेता.  म्हणजेच यांच्यावरचा भार आणखी वाढवता... "

उषाचा पेपर बाजूला झाला होता आणि ती एकटक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत होती.  करारी पणाचा बुरखा नकळत उतरला होता. पण तात्पुरताच.  " हे बघ मला काही तुझ्याशी वाद घालायचा नाहीये.  आम्हाला जे जमतं ते आम्ही करतो.  भलेही त्याच्यात काही चुकत का असेना.  दुसऱ्याला मदत करणं हा आमचा धर्म आहे आणि आम्ही तेच करत आहोत.  नुसती इथे बसून बडबड नाही करत."

"बरोबर आहे गो उषा, बरोबर आहे" आईनं नेहेमीप्रमाणेच पुस्ती जोडली.

"शाळा आणि दवाखाने काढून तुम्ही यांच्या गरजा आणि त्याबरोबर देणी वाढवताय. त्यांच्या आयुष्यात अशी ढवळाढवळ करून त्यांच्या आयुष्यातला अंधार वगैरे कसा काय मिटवणार तुम्ही? " मी.

"हो पण आपल्याला काहीतरी तरी केलंच पाहिजे ना? " नक्की काय बोलायचं ते न कळून उषा वैतागून म्हणाली. 

"अगदी निश्चित करायला पाहिजे.  लोकांच्या मानेवरचं हे कष्टाचं जोखड उतरवायला पाहिजे.  आयुष्यभर फक्त चूल किंवा कष्ट किंवा त्रास... स्वतःकडे कधी बघणार?  स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या मनाकडे, स्वतःच्या आत्म्याकडे...?  त्यांच्या मेंदूच्या आध्यात्मिक विभागाची प्रगती कधी होणार? आध्यात्मिक उन्नती म्हणजे ईश्वर, अंतिम सत्य आणि आयुष्याचा खरा अर्थ... ऋतंभरा प्रज्ञा... स्वतःबद्दलचं ज्ञान, खरं ज्ञान... आयुष्यातला थोडासा का होईना वेळ त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मोकळा करून द्या... माणसाला त्याच्या स्वत:विषयी, स्वतःच्या आत्म्याविषयी, स्व-धर्माविषयी जागृती आली तर मग तुमच्या शाळा दवाखाने त्या सगळ्या समोर फुटकळ ठरतील.  धर्म, शास्त्र, कला, साहित्य, ध्यान, चिंतन, मनन माणसाला आत्मिक समाधान देऊ शकतात, दवाखाने नाही. "

"लोकांना कष्टातून मुक्त करा? " उषा छद्मी हसून म्हणाली "हे शक्य तरी आहे का? "

"का नाही?  तू एवढे सगळे उद्योग करतेस आणि माझ्या मते वेळ वाया घालवतेस.  त्या ऐवजी त्या वेळेत त्या लोकांचं काम तू का करत नाहीस? निदान तेवढा वेळ तरी त्यांना मोकळा होईल.  मी तर म्हणतो माणसाच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी करायचं उत्पादन, सगळ्यांनी - गरीब, श्रीमंत, शहरी, खेडवळ सगळ्यांनी - मिळून करायचं ठरवलं तर मला वाटतं प्रत्येकाला रोज जेमतेम फक्त दोन तासच काम करावं लागेल.  त्याही पुढे जाऊन हे उत्पादन करणारी यंत्र शोधून काढावीत, आपल्या गरजा कमी कराव्यात, थोडीफार भूक किंवा थोडा फार थंडीवारा सहन करण्याची ताकत स्वतःत निर्माण करावी, दारू - सिगारेट वगैरे गोष्टींचं उत्पादन बंद करून टाकावं आणि मग बघ वेळच वेळ असेल माणसाकडे.  उरलेल्या वेळात माणसांना एकत्रितरित्या खूप काही करता येईल.  जसं एखादं गाव एकत्रितपणे श्रमदान करून गावासाठी एखादं धरण बांधतं, तसं माणसांना एकत्रितपणे काम करून संपूर्ण मानव जातीसाठी आनंद-डोह बांधता येईल, शास्त्र आणि कलेचा अभ्यास करता येईल.  जीवनाचा अर्थ आणि अंतिम सत्य यावर अधिक संशोधन करता येईल.  माणसाची ही सततची तडफड, भीती, मृत्यूची भेसूरता यापासून आणि कदाचित साक्षात मृत्यूपासूनही मुक्ती मिळेल.... " मी अखंड बोलत होतो.

"पण एकीकडे तू म्हणतोस शाळा साक्षरता याचा उपयोग नाही आणि दुसरीकडे तू म्हणतोस शास्त्रांचा अभ्यास झाला पाहिजे.  तूच तुझ्या विरोधात बोलतोयस. "

"छे, आपल्याला शाळा आणि अंध-साक्षरतेची जरुरीच नाहीये.  आपल्याला विद्या देणाऱ्या पीठांची जरूरी आहे."

"आणि दवाखाने, औषधं... ते पण नको? "

"नाही, ते पण नको.  कारण आपली औषधं आजार बरी करण्यासाठी असतात.  आजाराचं कारणच नष्ट केलं की आजार होण्याचा प्रश्नच उदभवत नाही.  आणि आजाराचं मुख्य कारण म्हणजे कष्ट, दडपण आणि तणाव.  जे नुसतं बरं करतं त्याला मी शास्त्र मानतच नाही.  कारण खरं शास्त्र तात्पुरतं, अर्धंमुर्धं बरं करत नाही तर वैश्विक ध्येयापर्यंत घेऊन जातं.  सत्य, आयुष्य, ईश्वर, आत्मा या गोष्टींचा अर्थ खरं शास्त्र समजावून सांगतं.  पण जेव्हा हेच शास्त्र माणसाच्या भौतिक गरजा आणि रहाटगाडग्याच्या चक्रासाठी वापरलं जातं, दवाखाने आणि ग्रंथालयांमध्ये बांधलं जातं, तेव्हा हेच शास्त्र तुमचं आयुष्य अधिक गुंतागुंतीचं बनवतं.  पण हे सगळं सोडून मनुष्य आज  जास्त जास्त लोभी, घाणेरडा आणि दुर्दैवी होत चाललाय.  आपल्या आयुष्यातली हवस, भोग लालसा आपल्याला नरकाकडेच ढकलतीये.  असल्या घाणीत कोण काम करणार?... सगळी साली हवस... " माझा श्वासोश्वास जोरजोरानं होत होता. 

उषाला माझ्याबरोबर नक्की तात्त्विक वाद घालणं जमत नव्हतं.  त्यामुळे मूर्ख बायकी पद्धतीनं हा वाद मिटवला.  माझ्याकडे लक्षच न देता आईकडे वळून पुन्हा तिचा मूळ गंभीर आवाज लावून उषा म्हणाली "खासदार साहेबांशी बराच वेळ चर्चा केली आम्ही, पण मला नाही वाटत हे सरकार आपल्या लोकांसाठी काही करेल."

माझी कानशिलं तापली.  दोन तास जीव तोडून मी काय सांगत होतो? माझ्या सारं लक्षात आलं... मी जायला उठलो.

रात्र खूप झाली होती.  कानवली शांत झोपली होती.  खाडीच्या पाण्यावर चंद्रप्रकाश पडून छोट्या छोट्या लाटा चमकत होत्या.  गार वाऱ्याच्या झुळूकांबरोबर वृक्षराजी मंद सळसळत होती.  मी आखाड्याच्या बाहेर आलो. शानूही माझ्या पाठोपाठ.  आखाड्याबाहेर अंधार निस्तब्ध पसरला होता.  वातावरणात थंडी चांगलीच जाणवत होती.  शानूनं दोन्ही हात छातीशी घट्ट बांधून धरले होते.  कुजबूजत्या आवाजात जणू शांततेला धक्का न लागू देता ती म्हणाली "मला वाटतं तू जे बोलत होतास ते बरोबर होतं. सर्व मानवजातीने मिळून आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न केले तर त्यातून सगळ्यांचीच दुःखापासून सुटका होण्याची शक्यता आहे."

"अर्थातच.  आपण मानव आहोत. देवानं आपल्याला बुद्धी दिली आहे.  पण त्याचा योग्य उपयोग केला नाही तर आपल्यात आणि प्राण्यांच्यात फरक तो काय?"  दोन मिनिटं पुन्हा स्तब्धतेत गेली.  मधूनच थंडीनं शानू थरथरत होती.  "चल, उशीर खूप झालाय.  उद्या कधी येशील? " शानू.

"शानू दोन मिनिटं थांब ना.  दोन मिनिटांनी जाऊ... " नाजूक शानू रात्रीच्या शांततेत अधिकच हळुवार, कोमलांगी दिसत होती.  मला वाटतं मी शानूच्या प्रेमात पडलो होतो.  तिला सोडून जावसं मला वाटत नव्हतं.  नक्कीच ती पण माझ्यावर प्रेम करायला लागली होती.  मी हलकेच पुढे सरकलो आणि दोन्ही हातानी शानूला माझ्या जवळ घेतलं... अगदी जवळ... अन अलगद पणे मी तिच्या कपाळावर माझे ओठ टेकले.  कपाळ, गाल, नाक, डोळे, कान, ओठ, हनुवटी, मान... मी शानूवर अलगद चुंबनांचा वर्षाव केला.  शानू माझ्या घट्ट मिठीत होती.  तीही सुखावली होती...

"उद्या भेटू.  मला घरी जाऊन उषाला आणि आईला हे सांगायचंय.  आईचं ठीक आहे पण उषा काय म्हणेल कुणास ठाऊक... अच्छा... " स्वतःला हलकेच सोडवून घेऊन शानू आत गेली.  आखाड्याच्या बाहेर उभं राहून मी शानूच्या गेलेल्या आकृतीकडे बराच वेळ पाहत उभा होतो.  थंडी वाढली तसा मी घराकडे जायला वळलो.

"आरोग्य खात्याशी... खात्याशी... या संदर्भात... या... संदर्भात... आम्ही आजपर्यंत... आम्ही... "

दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुळकर्ण्यांकडे पोहोचलो त्यावेळेस आतून उषाचा आवाज येत होता.  ती तिच्या सहकाऱ्याला पत्र सांगत होती.  मी खळ्यापाशी पोहोचण्यापूर्वीच एका छोट्या मुलानं पळत पळत येऊन माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली.

"मी आणि आई आज सकाळच्या बसने मुंबईला जातोय.  बहुतेक कायमचेच... उषाला मी आपल्या प्रेमाविषयी सांगितलं.  पण तिनं मला तुझ्यापासून दूर जायला सांगितलंय.  मला क्षमा कर.  मी तुझी माफी मागते, पण उषाची आज्ञा मला मोडता येत नाहीये...  मी आणि आई रात्रभर रडत होतो...  जाऊ दे.  मला विसरून जा. "

ऍटमबाँबच्या आवाजांप्रमाणे माझ्या मेंदूत प्रचंड मोठे स्फोट झाले ... आणि नंतर एकदम सुन्न...

"दवाखान्याच्या... दवाखान्याच्या... इमारतीसाठी... येणारा खर्च... येणारा... खर्च... " उषाचं पत्र कथन चालूच होतं.  आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत होऊन मी कुळकर्ण्यांच्या टुमदार घरातून बाहेर पडलो.

- समाप्त.