आध्यात्मिक उन्नती (भाग - १)

(अंतोन चेकॉव्ह यांच्या 'द हाऊस विथ द मॅन्सार्ड' या कथेवरून)

माझं आजोळ कोकणातलं. देवगड तालुक्यातलं.  अगदी खास कोकणातलं कोकणपण असलेलं.  लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जाताना एसटीनं फोंडा घाट उतरला की कोकणाचा खास दरवळ नाकात शिरायचा आणि कोकण आल्याची मनाची खात्री पटायची. 

कोकणातल्या गावांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा दरवळ येतो.  अन मला कोकणात जायची संधी मिळाली की अगदी छाती भरभरून मी तो दरवळ पिऊन घेतो.  अगदी मनसोक्त. आंब्या फणसांची मोठ्या खोडांची झाडं, उंच उंच माड अन पोफळी, पायाखाली पडलेल्या वाळलेल्या पानांचा सडा, आडातून उपसून बागेत सोडलेलं पाणी, त्याच्यासाठी केलेले छोटेछोटे पाट, घरांपुढची शेणानं सारवलेली स्वच्छ खळी, घराच्या जवळपासच असलेला दोन चार गुरांचा गोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुद्रावरून किंवा खाडीवरून येणारा वारा.  या सगळ्या वासांचं मिश्रण म्हणजेच तो कोकणचा खास दरवळ.  मनाला अगदी वेड लावणारा...

त्यावेळी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जायचं हे ठरलेलंच. आता पूर्वीसारखं दरवर्षी जायला मिळतंच असं नाही, पण कोकणचा आजही माझ्या मनावर एवढा प्रभाव आहे की आजही कोकणात जायची एखादी जरी संधी मिळाली तरी मी त्याचा पुरेपूर फायदा उठवतोच.  तसा माझ्या आठवणीतला शेवटचा मी कोकणात गेलो होतो - म्हणजे अगदी मनसोक्त रहायला असं गेलो होतो - त्यालाही आता कित्येक वर्षं उलटली.

तेवीस चोवीस वर्षाचा असेल मी त्यावेळेस.  काही महिने माझ्या मामाकडे जाऊन राहिलो होतो.  नुसताच.  म्हणजे अमुक असं काहीच करत नव्हतो.  सकाळी उशीरापर्यंत झोपायचं, नदीवर तासनतास डुंबत रहायचं, पत्ते खेळत बसायचं किंवा पुलावर जाऊन आबाच्या हाटिलातला कडक लाडू खायचा आणि उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत रहायचं.  असं काहीही.  आमचा मामा मात्र पहाटेच उठायचा.  आणि घरभर चालणारी त्याची आणि  मामीची लगबग अंथरुणावर पडल्या पडल्या जाणवत रहायची.  मामा जातीवंत कोकणी.  वरकरणी तिखट स्वभावाचा पण आतून प्रेमळ.  त्याचं नशीब त्याला कधीच साथ देत नाही अशी त्याची कायमची खंत.  अन कधी कधी सकाळीच उठून मामा देवगडला जायचा.  साधा स्वच्छ सुती झब्बा अन स्वच्छ पायजमा घालून.  खांद्यावर छोटासा नॅपकीन किंवा पंचा टाकून. 

माझं मात्र आळशासारखंच सगळं चालायचं.  एक दिवस संध्याकाळी मी असाच पुलावर फिरायला गेलो आणि मनात आलं, चला आज घाटी चढून सड्यावर जाऊ आणि सड्यावरनं जी गाडीवाट गावाच्या दुसऱ्या टोकाकडे उतरलीये तिकडन घरी येऊ.  नाहीच सापडला रस्ता तर शोधून काढू किंवा विचारू कुणाला तरी.  घाटी चढून मी सड्यावर पोहोचलो.  इथपर्यंतचा रस्ता माहितीतलाच होता.  आता गाडीवाटेनं परत खाली उतरायला लागलो.  दोन तीन मैल वेडीवाकडी वळणं घेत घेत वाट बरीच खाली आली अन अचानक वाटेच्या थोडसं खाली डाव्या हाताला एक सुंदर कौलारू घर दिसलं. 

वाट हलकेच उजवीकडे वळली होती अन तिथच गडग्याला तीन बांबू लावून आखाडा केला होता.  माणसांसाठी आत जायला अन गुरांना अडवायला.  आखाड्यातून आत त्या सुंदर कौलारू घराकडे गेलेली लाल चुटुक पाऊलवाट, तिच्या दोन्ही बाजूला पडलेल्या आंब्याच्या वाळलेल्या पानांच्या आणि राठ गवताच्या मधून उठून दिसत होती.  पाऊलवाटेच्या उजव्या हाताला गडगा अन गडग्याच्याही उजव्या हाताला थोडी वरती माझी वाट.  पाऊलवाटेच्या डाव्या हाताला मात्र उंच गेलेल्या जुन्या आंब्याच्या १५-२० कलमांची रांग.  गडग्याच्या बाहेर आखाड्यापाशी म्हणजे या पाऊलवाटेच्या सुरवातीच्या टोकापाशी उभं राहून बघितलं तर पाऊलवाटेच्या पलिकडच्या टोकाशी ते टुमदार  कौलारू घर उभं होतं.  स्वच्छ आणि टापटीपीचं.  घरापुढे नीट सारवलेलं खळं, खळ्याला चहू बाजूंनी बनवलेली पेळव, पेळवेच्या पुढे छोट्या छोट्या फुलझाडांची गर्दी, त्याच्या पुढे उतारावर दोन तीन माड, पपया अन शेवग्याची दोन झाडं - बारिक बारिक नाजूक पांढऱ्या फुलांनी डवरून गेलेली.  पाऊलवाटेच्या डाव्या हाताला असलेल्या आंब्यांच्या खोडांमधून बघितलं की दिसत होते त्यापुढच्या उतारावर ओळीनी लावलेले अननस, तिथून आणखी थोडं खाली उतरल्यावर असलेली भातं, भातांच्या शेवटाला छोटीशी पुळण, पुळणीच्या पलिकडची माडांची सरळसोट रांग, त्यानंतर बांध, बांधापलिकडे पसरलेली कलत्या उन्हात चमचमणारी भली थोरली खाडी, खाडीच्या पार पलिकडच्या तीरावरचा नीट बांधलेला दगडी बांध, बांधावरचे माड, त्यामागे उभा चढत गेलेला गर्द हिरव्या झाडीची चादर घेतलेला डोंगर अन त्या डोंगरात डोकावणारी लाल चुटुक घरं. 

माझ्या मागे पश्चिमेला, लांब, खाडीच्या समुद्राकडच्या टोकाशी सूर्य अस्त पावत होता.  मावळत्या उन्हाच्या पिवळ्या सोनेरी किरणांमध्ये ते सारं दृश्य एवढं मोहक झालं होतं की स्तिमित होऊन किती वेळ ते बघत मी खिळलो होतो कुणास ठाऊक.  मी मंत्रमुग्ध झालो होतो. 

कसल्याशा आवाजानं माझं लक्ष विचलीत झालं.  कौलारू घराच्या खळ्यात दोन तरूण मुली उभ्या होत्या.  एक मोठी.  असेल बावीस तेवीसच्या आसपासची, थोडीशी जाड पण लक्षणीय सुंदर आणि दुसरी तिच्यापेक्षा जरा लहान.  सतरा अठराच्या आसपासची. गोरीपान, लहानसर, नाजूक, दोन वेण्या घातलेली... दोघीजणी खळ्यात उभ्या राहून माझ्याकडेच प्रश्नार्थक नजरेनी बघत होत्या.  काही न बोलता मी पुन्हा  माझी वाट पकडली.  थोड्याच वेळात अंधार पडायला लागणार होता.  मी भराभर पावलं उचलली.  मी घरी पोहोचलो तेव्हा मला असं वाटत होतं की जणू मी एखादं स्वप्नच बघून आलोय.  त्या दृष्याची गोड अनुभूती मनात आत खोलपर्यंत भिनली... 

आठ दहा दिवसांनंतरची गोष्ट.  दुपारचा मामाबरोबर रमीचा डाव टाकून बसलो होतो.  गडग्यातून कुणीतरी आत येताना दिसलं.  मामाच्या घराच्या पुढच्या खळ्याभोवती पुरुषभर वाहलेली तुळशीची रोपं होती, त्यामुळे गडग्यातून आत आलेलं माणूस जवळ येईपर्यंत नीटसं दिसायचं नाही.  जवळ येणारी आकृती स्पष्ट होत गेली तसं कळलं,  आठ दिवसांपूर्वी कौलारू घराच्या खळ्यात दिसलेली मुलगीच आत येत होती.  थोरली.  साडी नेसलेली. जाडसर पण दिसायला आकर्षक.  आत आल्या आल्याच तिनं मामाशी भराभर बोलायला सुरुवात केली.  माझ्याकडे न बघताच.  ती कसलीशी वर्गणी मागायला आली होती. कानवलीला मागच्या आठवड्यात लागलेल्या आगीत बुद्धवाड्यातल्या किती झोपड्या जळाल्या, किती लोकांचं काय नुकसान झालं याचा पाठ केल्यासारखा साद्यंत पाढा तिनं मामाला वाचून दाखवला.  कानवलीतल्या संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी केलेल्या कसल्याश्या कमिटीची ती मेंबर होती.

काहीतरी बराच मजकूर लिहिलेल्या एका कागदावर मामाची सही घेऊन उठता उठताच ती म्हणाली " काका, आजकाल आमच्या घराकडं येणं विसरलात का? या नं एखाद दिवशी सवड काढून. " आणि माझ्याकडे मानेनंच निर्देश करून "बरोबर यांना पण आणा.  यांचं नाव एवढं ऐकलंय... हे घरी आले तर आईला खूप आनंद होईल.  चला, येते मी.  अजून दोन चार ठिकाणी जायचंय... " असं म्हणत पटकन उठून आली तशीच झर्रकन निघूनही गेली ती.

"मामा, कोण रे ही? " तिनं आखाड्याच्या बाहेर पाय टाकल्या टाकल्या मी विचारलं. माझ्या डोळ्यासमोर त्या सुंदर कौलारू घराचं सुंदर चित्र अजूनही ताजं होतं.

"अरे, ही उषा.  कुळकर्ण्यांची मुलगी.  कुळकर्णी देवगडात सरकारी नोकरीत होते.  पाच वर्षांपूर्वी गेले.  आता घरात तीनच माणसं.  ही, हिची आई आणि धाकटी बहीण.  घरची थोडी शेती आहे, दोन अडीचशे कलमं आहेत.  त्यामुळे खाऊन पिऊन सुखी आहेत तिघीजणी". मामा.

"कुठल्या आगीबद्दल सांगत होती ती? "

"अरे त्यांच्या घरासमोरच्या खाडीच्या पलिकडे दिसते ना ती कानवली.  अगदी छोटसं गाव.  परवा तिकडे मोठी आग लागली होती.  ही उषा कानवलीच्या शाळेत शिकवते आणि बरोबरीनं बरीच समाजसेवा पण करते... कानवलीतल्या लोकांसाठी.  दोन्ही मुली आणि आई तिघीही फार चांगल्या आहेत.  आपण जाऊ एखादे दिवशी त्यांच्याकडे गप्पा मारायला. "

- क्रमश: