बंगालच्या वाघिणी

स्त्री शक्तीचे प्रतीक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रूप म्हणजे कालीमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रूप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारूप पाहायला मिळाले.

सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणू इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणू आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले. बंगालचे वाघ आणि वाघिणी यांनी प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला जरब बसवली. ज्याने अत्याचार केले, क्रांतिकारकांचा छळ केला, अनेकदा निरपराधांना तुरुंगात डांबले, निःशस्त्र आंदोलकांवर क्रूर हल्ला चढवायचा, बेदम मारहाण करायची असे कृत्य करण्यात स्वतःला धन्य मानून सरकारी इतमामाचे पूर्ण मोल व इमानदारी सरकारच्या पदरात घालणारे अधिकारी या वाघ-वाघिणींना सहन झाले नाहीत. इथे आपला माज दाखवणे सोपे नाही आणि केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा आपल्याला जाब द्यावा लागेल ही जरब प्रत्येक अधिकाऱ्याला बसली. आपण एक अधिकारी ठार केला म्हणून राज्य लगेच संपणार नाही पण इथे आता ’मुकी बिचारी कुणी हाका’अशी परिस्थिती राहिली नाही, आता आपली जायची वेळ जवळ आली आहे हे सत्तेला समजून चुकले आणि ती समज देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले रक्त खुशीने सांडले.

१९३१ मध्ये पूर्व बंगालमध्ये कोमिल्ला येथे नियुक्त झालेला जिल्हाधिकारी स्टिव्हन्स हा एक मग्रूर अधिकारी. याने सविनय कायदेभंगाची चळवळ सत्याग्रहींवर अमानुष लाठीमार करून असंख्य सत्याग्रहींना जबर मारहाण केली. अर्थातच क्रांतिकारकांना तो सलू लागला व युगांतर सारख्या क्रांतिकारक संघटनांनी त्याच्या वधाचा विडा उचलला. आपले भवितव्य समजून चुकलेला तो जिल्हाधिकारी सावध झाला. त्याने बंदोबस्तात राहणे पसंत केले. त्याने सरकारी कचेरीत येणेच बंद केले, तो आपल्या बंगल्यात बसूनच सर्व कारभार बघू लागला. मात्र काहीही झाले तरी या उन्मत्त अधिकाऱ्याला यमसदनास पाठविण्याचा निश्चय क्रांतिकारकांमध्ये पक्का होता. बंगालच्या क्रांतिकारक संघटनांमध्ये मुलीही आघाडीवर होत्या. खुद्द कोमिल्ल्यात युगांतरच्या शाखेत प्रफुल्लनलिनी ब्रह्म हिने अनेक मुलींना प्रभावित केले होते.

snti[1] suniti

तिच्याच नेतृत्वाखाली शांती घोष व सुनिती चौधरी यांनी स्वत:ला झोकून दिले. शांतीचे वडील कोमिल्ला विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे शिक्षक होते, आई एक गृहिणी होती. शांतीला आपल्या पित्याकडूनच देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते. सरोजिनी नायडू यांचे १९२६ साली जेव्हा कोमिल्ला येथे भाषण झाले तेव्हा प्रारंभीचे स्तवन गीत शांतीने म्हटले होते. शाळेत तिची ओळख सुनिती चौधरी हिच्याशी झाली व पुढे दोघीही प्रफुल्लनलिनीबरोबर युगांतर मध्ये सामील झाल्या जिथे त्यांची भेट प्रख्यात क्रांतिकारक अखिल नंदी याच्याशी झाली. सुनिती चौधरी ही इब्राहिमपूरची, घरची गरिबी. हिच्या प्रमाणेच हिचे दोन भाऊ देखिल क्रांतिकार्यात शिरले होते. मात्र हे पुढे जेव्हा तिला व भावांना सरकारने पकडले तेव्हा उघड झाले, त्याआधी तिला आपले भाऊ क्रांतिकार्यात उतरल्याचे व भावांना आपली बहीण क्रांतिकारक असल्याचे माहीत नव्हते. क्रांतिकारक संघटनांमध्ये गोपनीयतेची शपथ देत असल्याने ते स्वाभाविक होते.

कोमिल्ल्यात युगांतरचे कार्यकर्ते होते शांती, सुनिती, प्रफुल्लनलिनी, बिरेन भट्टाचार्य, अखिल नंदी, ललित बर्मन, क्षितिज रॉय आणि त्यांना मार्गदर्शन करीत होते सुपती रॉय. ५ मार्च १९३१ रोजी बिरेन भट्टाचार्यांच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील टपाल कचेरीतून सरकारी खजिन्यात भरण्यासाठी जाणारी पंचवीस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातून क्रांतीसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली. क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावीत होता. साधरणत: स्त्री क्रांतिकारक तोपर्यंत थेट हल्ल्यात सहभागी न होता मदत कार्य, प्रचार कार्य व साधारण क्रांतिकारकांच्या सहायिकांचे कार्य करीत होत्या. मात्र स्टिव्हन्सला घरात शिरून मारायचा तर मुलींना प्रवेश मिळणे त्यातल्या त्यात शक्य होते तेव्हा या कामासाठी मुलींना निवडायचे का आणि त्या हे करू शकतील का असा विचारविनिमय सुरू झाला.

या कामासाठी आपण तयार आहोत आणि ही कामगिरी आपल्यालाच मिळावी अशी मागणी शांती घोष आणि सुनिती चौधरी यांनी केली आणि सगळे चकित झाले. या दोघींचे वय होते फक्त चौदा वर्षे! इयत्ता आठवीची परीक्षा नुकत्याच दिलेल्या या विद्यार्थिनी. सगळेच स्तिमित झाले. सहा फूट उंचीचा तो आडदांड गोरा समोर उभा राहिला तर या थरथर कापतील, या त्याला काय मारणार अशी शंका व्यक्त होताच त्या वाघिणींनी ठासून सांगितले की त्या ही कामगिरी पार पाडतीलच असा त्यांना ठाम आत्मविश्वास आहे. मग त्या दोघींनी उलट आपल्या प्रमुखांना सवाल केला की कधी कधी पुरुष क्रांतिकारकांचे हल्लेही यशस्वी ठरले होतेच की, मग आता या दोघींना संधी का मिळू नये? अखेर ज्येष्ठ नेत्यांनी परवानगी दिली.

सर्वांना निरुत्तर करीत त्या अवघ्या १४ वर्षांच्या वीरांगनांनी ती जबाबदारी उचलली. गोळ्या झाडण्यासाठी गावाबाहेरील कोटबारीच्या जंगलात सराव झाला. या लहान मुलींनी पिस्तूल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढायला शिकव! ही शक्कल लागू पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केला. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळून झाडायच्या होत्या.

आणि प्रत्यक्ष कृतीचा दिवस उजाडला - दिनांक १४ डिसेंबर १९३१. कडाक्याची थंडी पडली होती. अखिलदांनी पडदे लावलेल्या घोडागाडीतून त्या दोघींना बंगल्याच्या जवळ पास नेऊन सोडले. त्या काळी मुसलमान स्त्रिया पडद्याच्या गाडीतून जा ये करीत असल्याने कुणी शंका घेतली नाही. फाटकापाशी उतरल्यावर या दोघींनी नोंदपुस्तिकेत आपली नावे मीरा व इला अशी लिहिली व आपण ढाक्यात मुलींसाठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित होत असून त्या संदर्भात परवानगीसाठी साहेबाला भेटायला आल्याचे सांगितले. कुणाला संशय आला नाही. दोघी थेट बंगल्यात गेल्या. स्टिव्हन्स बाहेर वरांड्यात येताच दोघींनी आपण ढाका येथून आलो असून पोहण्याच्या स्पर्धांमध्ये कोमिल्लच्या मुलींना भाग घेण्यास परवानगी द्यावी यासाठी आपण अर्ज आणला असल्याचे त्यांनी सांगत अर्ज काढून दिला. हा अर्ज घेऊन स्टिव्हन्सने वाचला व त्याने सांगितले की याबाबत मुलींनी मुख्याध्यापिकेला भेटावे. तो तसा शेरा लिहिण्यासाठी आतल्या खोलीत जाताच या दोघींनी शाली दूर सारून आत लोकरी पोलक्याच्या आंत लपविलेली पिस्तुले बाहेर काढून सज्ज केली व अर्ज घेऊन स्टिव्हन्स बाहेर येताच सुनितीने थेट त्याच्यावर अवघ्या ५-६ फूट अंतरावरून नेम धरीत धडाधड चार गोळ्या झाडल्या. काय होताय हे समजायच्या आंतच स्टिव्हन्सला गोळ्या बसल्या. त्याने सावरून पळायचा प्रयत्न केला पण सुनितीच्या गोळ्यांनी आपले काम चोख बजावले होते. तो जागीच कोसळला व गतप्राण झाला. आवाज व किंकाळ्या ऐकताच आंत धावलेल्या नेपाळ सेन या सहायक अधिकाऱ्यावर शांतीने गोळ्या झाडल्या पण त्या मध्ये आलेल्या एका शिपायाला लागल्या. शिपायांनी वेढल्यावरही प्रतिकार करणाऱ्या या वाघिणींना शिपायांनी हाती येताच बेदम मारहाण केली. अवघ्या चौदा वर्षाच्या मुलींनी एका क्रूरकर्म्याला कंठस्नान घालून नवा इतिहास लिहिला, त्यांचा पराक्रम सर्वतोमुखी झाला. कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ या व्रताला जागून त्यांचा निषेध केला.

अवघ्या नऊ दिवसात त्यांच्यावर अभियोग उभा केला गेला व त्यांना ’दयाळूपणे’ फक्त जन्मठेपेची’ शिक्षा फर्मावण्यात आली. शांती घोषने निकाल ऐकताच न्यायाधीशाला सुनावले की ’दावणीला बांधलेल्या जनावराप्रमाणे सडण्यापेक्षा आम्हाला फासावर लटकायला आवडेल’. या दोघींनी आपला झुंजार बाणा तुरुंगातही सोडला नाही. अंधारकोठडीला न जुमानत त्या दोघींनी आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांचा ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नसत्याग्रह केला. एकदा तुरुंगपर्यवेक्षिकेशी अनैतिक संबंध असलेला एक तुरुंगद्वारपाल जेव्हा वारंवार स्त्री विभागात चकरा मारू लागला तेव्हा त्यांनी त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्या व आवाज उठवूनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली.

१९३९ साली आयुष्याची कोवळी वर्षे तुरुंगात करपून गेल्यानंतर अनेक राजबंद्यांबरोबर त्यांचीही सुटका झाली. दरम्यान दोघींच्याही घरची वाताहात झाली होती. मात्र त्यांनी न डगमगता नव्या आयुष्याला सुरुवात केली. सुनिती चौधरी १९४९ मध्ये डॉक्टर झाल्या व त्यांनी वैद्यकीय पेशा स्वीकारून गरीबांची सेवा केली. त्यांनी प्रद्योतकुमार घोष या क्रांतिकारकाशी विवाह केला. शांती घोष यांनी मात्र स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारणात सक्रिय भाग घेतला.

अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहीत नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन.