यांची खुर्ची काढा,त्यांना लाल दिव्याची द्या गाडी
राजकारणी रोजच चढती हिरव्या नोटांची माडी
प्रेताच्या टाळूवर लोणी,गिधांडास पर्वणी जणू
'कसाब करणी'संपताच एकामेका लाथा हाणू
घुसखोरांची काय जरूरी? घरभेदी कडवे असता
नत'द्रष्ट्यां'ची नजर आंधळी इथे तिथे दिसते सत्ता
निष्कलंक ते सीतामाई जोवर देती साथ मला
साथ सोडली की शुर्पणखा जोरदार करतो हल्ला
विरोधकांनो शोधा कोलित, जाळपोळ विध्वंस करू
सर्व देश ओसाड होउ द्या तुम्हास मग अभिषेक करू
जे जे होइल ते ते पाहू सोशिक सारेजण 'सिंधू'
जबाबदारी झटकून टाकू बळीस बकरेही शोधू
मतदारा इतकेच ठरव तू वीट हवी की दगड हवा
निवडणुका या कपाळमोक्षा साठीचा पर्याय नवा