हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाउन’ गाडीवर लखनौ पासून सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालून सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतून वाहून नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटिश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतिकारकांनी जणू सरकारी खजिना लुटून सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचारपूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहून लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजिना चढवताना पाहिला. त्यांनी गाडीचा तपशील लक्षात ठेवला व सुरक्षेची पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले की पहारा सहज भेदता येईल.

क्रांतिकार्यासाठी, शस्त्रांसाठी पैसा आवश्यक. तो मिळवायचा कसा? समजा लूटमार केली कुणा सावकाराला, जमीनदाराला लुटले तर क्रांतिकारक हे नाहक लुटारू म्हणून बदनाम होणार व त्यांच्या कार्याचा प्रसार होण्याऐवजी बदनामी होणार व जनाधारही नाही मिळणार. मग यावर उपाय काय? तेव्हा हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांनी दिशा दाखविली. ते म्हणाले की सरकारी खजिना लुटायचा व सरकारचे धन कार्यासाठी कारणी लावायचे. त्यांनी ही योजना आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगितली व सगळे चर्चेअंती तयार झाले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी ८डाउन मध्ये हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अष्फाकऊल्ला, हुतात्मा राजेंद्र लाहीरी या गाडीत प्रवासी म्हणून शिरले. गाडी काकोरी स्थानक ओलांडून जाताच या पैकी दोघांनी गार्डला आपले काही सामान स्थानकावर राहिले असल्याचे सांगत गाडी थांबवायची विनंती केली. गार्डने ती अव्हेरताच त्याला बेसावध गाठून त्यांनी आडवा केला व साखळी खेचून गाडी थांबविली. गाडी थांबताच इतर क्रांतिकारकांनी वेगाने हालचाल केली. काहींनी गार्डला आडवा पाडून ठेवला, काहींनी खजिन्याच्या डब्याच्या दारावरील पहारेकऱ्यांना लोळवून आत प्रवेश केला व तिजोरी बाहेर ढकलली. काही क्रांतिकारकांनी बाहेरचा ताबा घेतला व पिस्तुलाने हवेत गोळ्या झाडून घबराट निर्माण केली. मात्र हे सर्व होत असताना क्रांतिकारकांनी ओरडून सर्व प्रवाशांना सांगितले की ते दरोडेखोर नसून क्रांतिकारक आहेत, ते देशकार्यास्तव केवळ सरकारी खजिना लुटणार असून जनतेला काही अपाय करणार नाहीत वा लुटणारे नाहीत; त्यांनी प्रवाशांना बाहेर डोकावणे धोक्याचे असल्याचे सांगून गाडीतच बसून राहायचे आवाहन केले. गाडीतून बाहेर फेकलेली भरभक्कम तिजोरी सहज फुटत नव्हती. अचानक समोरून एक गाडी भरवेगाने येताना दिसली आणि आता गाडी आपण थांबविलेल्या गाडीवर आदळणार या कल्पनेने सगळे धास्तावले. मात्र ती गाडी बाजूने निघून गेली, ती डेहराडून एक्सप्रेस होती. सर्वांचा जीव भांड्यात पडला. अखेर तिजोरी फोडून गाठोड्यात पैसे घेऊन सगळे रात्रीच्या अंधारात पसार झाले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांनी सुमारे तीन मण पैशाचे ओझे सायकल वरून २४ मैल वाहून नेले. दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्वत्र पसरली. या बातमीने इंग्रज सरकार हादरले व चवताळलेही.

देशभरात काकोरीचे नाव गाजले व त्या क्रांतिकारकांची नावे सर्वतोमुखी झाली. हे क्रांतिकारक होते

हुतात्मा चंद्रशेखर आझाद
हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल
हुतात्मा अशफाकऊल्ला खान
हुतात्मा ठाकूर रोशन सिंह
हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी
श्री. मन्मथनाथ गुप्त
श्री. केशब चतर्जी
श्री. बनवारी लाल
श्री. मुकुंद लाल
श्री. सचिंद्रनाथ बक्षी

कानशिलात बसलेली ही थप्पड सरकारला सहन होण्यासारखी नव्हती. पोलिस यंत्रणा चवताळून उठली व काकोरी परिसरातील एक अन एक गांव पिंजून काढले गेले. सर्व आरोपींवर मोठी इनामे घोषित केली गेली. प्रलोभन व धाकदपटशा अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न सुरू झाले. अखेर वाचाळता व फितुरी यांनी घात केला व २६ सप्टेंबर रोजी हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल पकडले गेले. पाठोपाठ हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी, हुतात्मा ठाकुर रोशन सिंह व अनेकजण पकडले गेले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागासाठी ५४ जणांची धरपकड झाली. हुतात्मा अशफाकऊला खान दहा महिने भूमिगत राहण्यात यशस्वी ठरले. त्यांचा दिल्लीतून कागदपत्रे मिळवून रशियात निसटून जायचा बेत होता. मात्र या कामात मदत करण्याचा बहाणा करीत एका पठाणाने त्यांचा घात केला व ते अखेर पकडले गेले. मात्र अखेरपर्यंत हुतात्मा चंद्रशेखर आझाद व एक अन्य असे दोघेजण अखेरपर्यंत सरकारच्या हाती लागले नाहीत.

अभियोग सुरू होताच देशभरात खळबळ माजली. सर्वत्र प्रचंड जनजागृती झाली. या खटल्यात देशभक्तांच्या बचावासाठी संयुक्त बचाव समिती स्थापन झाली जिचे सदस्य होते मोतीलाल नेहरू, डॉ. गणेश शंकर विद्यार्थी, गोविंद वल्लभ पंत इत्यादी नेते. लाला लजपतराय व जवाहर लाल नेहरू हे क्रांतिकारकांना तुरुंगात भेटून गेले तर प्रसिद्ध साहित्यिक मुन्शी प्रेमचंद देखिल अभियोगाच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहिले होते. ’प्रताप’ दैनिकाने तर अग्रलेख लिहिला "देशाची मौल्यवान रत्ने सरकारी कोठडीत". हा साधासुधा खटला नव्हता तर सम्राटाच्या सत्तेला आव्हान दिल्याबद्दल उभारलेला राजद्रोहाचा महाअभियोग होता.

काकोरी प्रकरणात प्रत्यक्ष घटनेच्या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत खरेतर फक्त एक जण मृत्युमुखी पडला होता, पण तरीही सर्वांना जास्तीत जास्त क्रूर सजा देऊन रुजणारी क्रांती नष्ट करायचा सरकारचा आटोकाट प्रयत्न होता. या खटल्यातील प्रत्येक आरोपी सरकारच्या डोळ्यात आधीपासूनच सलत होता. प्रखर देशभक्ती, हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली व इंग्रजी भाषा अवगत असणारे व साहित्यिक असलेले प्रखर नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेले रामप्रसाद बिस्मिल ज्यांनी हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचला होता, त्यांना सरकार आपला महाशत्रू मानत होते. पंडितजी गोरखपूर तुरुंगात असताना हुतात्मा सरदार भगतसिंह प्रभृतींनी त्यांना तुरुंगातून बाहेर काढायची योजना आखली होती. भूमिगत असलेले हुतात्मा चंद्रशेखर आझाद वेष पालटून मोटारहाक्याच्या रूपात वावरत होते. मात्र सरकारला कुणकुण असल्याने पहारा कडक होता. अनेक क्रांतिकारकांनी त्यांना नावे व वेष बदलून भेटायचा प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न सुरू असूनही काही होत नाही असे दिसताच पंडितजींनी एका शेराच्या माध्यमातून अखेरचा निरोप श्री. विजयकुमार सिन्हा यांच्या हस्ते सहकाऱ्यांना इशारा म्हणून धाडला:

’मिट गया जब मिटनेवाला, फिर सलाम आया तो क्या!
दिल की बरबादी के बाद, उमका पयाम आया तो क्या! ’

म्हणजे आता वेळ थोडा उरला आहे, काय करायचे ते लवकर करा अन्यथा फार उशीर झालेला असेल. साहित्यिक व शायर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या हुतात्मा बिस्मिल यांचे नाव घेताच ’सर फरोशी की तमन्ना’ हे गीत ओठी येते. ही हुतात्मा रामप्रसाद यांच्या ओटी असलेली रचना, मात्र ही त्यांची आहे की हसरत मोहानींची यात काहीसा संभ्रम आहे.

या अभियोगात हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अशफाकऊल्ला, हुतात्मा ठाकूर रोशन सिंह व हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मन्मथनाथ गुप्त व शचिंद्रनाथ बक्षी यांना काळ्यापाण्यावर जन्मठेपेची तर इतर अनेकांना सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या.

तुरुंगातून आपली सुटका होणे शक्य नाही हे समजताच पंडितजींनी निरवानिरवीला सुरुवात केली, त्यांना काकोरी कटातील धन व वापरलेली शस्त्रे यांची माहिती आपल्या हिं. प्र. स. च्या साथीदारांना द्यायची होती. त्यांनी तुरुंगात गुपचुप कागद जमा करून आपले आत्मचरित्र लिहिले व अनेक भागात ते जमेल तसे बाहेरही पाठविले. या आत्मचरित्राचा अखेरचा भाग त्यांनी आपल्या हौतात्म्याच्या अगदी दोन दिवस आधी म्हणजे १७ डिसेंबर १९२७ रोजी लिहिला व बाहेरही पाठवला. त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे जमा करून त्यांच्या पश्चात त्यांचे आत्मचरित्र पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले व सरकारने त्यावर तत्परतेने बंदीही घातली. अखेरच्या भेटीत आई व वडिलांबरोबरच आईने आपल्या भाच्यालाही येउद्या अशी गळ घातली व तुरुंगाधीकाऱ्यांनी ती मान्य केली. तो भाचा म्हणजे हिं. स. प्र. से चे श्री. शिव वर्मा हे वेषांतरात गेले होते. त्यांना शस्त्रे व पैसा कोठे लपविला आहे ते जाणून घ्यायचे होते.

सहा फूट उंचीचे हुतात्मा अशफाकऊल्ला खान हे अत्यंत साहसी वृत्तीचे. ते उत्तर प्रदेशतील शहाजहानपूरचे. तेही शेरोशायरी करीत असत. त्यांची देशभक्ती प्रखर होतीच पण ते द्रष्टे होते. धूर्त इंग्रज हिंदू-मुसलमान यात फूट पाडीत आहेत ज्यायोगे त्यांना राज्य करणे सोपे जाईल हे त्यांनी ओळखले व त्यांनी समाजाला सातत्याने धर्म विरहीत राष्ट्रवादाचा महिमा सांगितला. फोडा व झोडा या नितीचा अवलंब करणाऱ्या इंग्रजांनी तोच प्रयोग अशफाकऊल्लांवरही करायचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिस अधिक्षक तसाद्दक हुसेन याची नेमणुक केली. धर्मांध व हिंदुद्वेष्ट्या तसाद्दकने हुतात्मा अशफाक यांना फोडायचा प्रयत्न केला. त्यांनी असे सांगितले की बिस्मिल हा पंडित. तो हिंदू देशासाठी लढतोय. पण तुझे काय? तु तर पाक मुसलमान! तुला या हिंदू राज्याचा काय उपयोग? समजा स्वातंत्र्य मिळाले तर तुला हिंदुंचा गुलाम व्हावे लागेल. यावर हुतात्मा असहफाकसाहेबांनी शांतपणे सांगितले की पंडितजी हिंदुंसाठी नव्हे हिंदुस्तानसाठी लढत आहेत. मी हिंदू नाही पण हिंदुस्थानी आहे, आणि गोऱ्यांच गुलाम होण्यापेक्षा मला आझाद हिंदुस्थानी होणे अधिक चांगले वाटते. बहुधा हुतात्मा अशफाकऊल्ला खान हे स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले पहिले मुसलमान आणि त्यांना त्याचा विलक्षण अभिमान होता.

हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी हे बालपणापासुनच ध्येयाने प्रभावित झालेले. ते ’युगांतर’ चे सक्रिय कार्यकर्ते होते. ते संघटनेच्या कार्यातून हुतात्मा बिस्मिल यांच्याकडे आकर्षित झाले व त्यांनी काकोरी प्रकरणात पुढाकार घेतला. ते मूळचे पूर्व बंगालच्या पाबना जिल्ह्यतील मोहनपूर गावचे. (आताचा बांग्लादेश). त्यांच्यावर बंगालमध्ये ही क्रांतिकारक कारवायांसाठी खटला भरला गेला होता व त्यांनी तुरुंगवासही भोगला होता (दक्षिणेश्वर बॉंब खटला).

हुतात्मा ठाकूर रोशनसिंह हे शहाजहानपूर जिल्ह्यातील नवादा या गावचे ठाकुर. घरचे गडगंज श्रीमंत. हुतात्मा रोशनसिंह हे नेमबाजी व कुस्तीमध्ये प्रविण होते. त्यांना असहकार आंदोलनात दोन वर्षे शिक्षा झाली. मात्र आपला तुरुंगवास कारणी लावत ते इंग्रजी शिकले. पुढे अर्थातच आंदोलनाचे वैफल्य लक्षात येताच ते सशस्त्र क्रांतीकडे आकर्षित झाले.

हे चारही हुतात्मे अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच असहकार आंदोलनात सर्वस्व त्यागून झोकून दिलेले. मात्र ’एक वर्षात स्वातंत्र्य देतो, मला सहकार्य द्या’अ से सांगत अनेक तरुणांना सरकारी शाळा सोडून आंदोलनात भाग घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या गांधींनी अचानक आंदोलन मागे घेतले अणी हे सर्वजण आंदोलने व निषेधघोष यांचे मिथ्यापण लक्षात येऊन अखेर ’रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या? ’ या उक्तीवर अढळ झाले. या चारही जणांनी आनंदाने फास गळ्यात ओढला. मात्र या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले व फाशी दिले गेले.

सर्वात पहिला मान हुतात्मा राजेंद्रनाथ लाहिरी यांचा. scan0001 ते गोंडा येथे १७ डिसेंबर १९२७ रोजी ’मृत्यू ही तर जीवनाची दुसरी अवस्था आहे, त्याचे भय वा दु:ख का करावे’ असे सांगत फासावर गेले.

हुतात्मा ठाकूर रोशनसिंह १९ डिसेंबर १९२७ रोजी एका हातात वीणा घेऊन दुसऱ्या हाताने आपल्याच गळ्यात दोर चढवून अलाहाबाद येथे फाशी गेले. scan0002

हुतात्मा अशफाकऊल्ला हे १९ डिसेंबर १९२७ रोजी ’माजे हात कुणाच्यही रक्ताने भरलेले नसताना मला इंग्रज सरकार अन्यायाने फाशी देत आहे, मात्र मी देशासाठी फासावर जाणारा पहिला मुसलमान क्रांतिकारक आहे याचा मला विलक्षण अभिमान वाटतोअ असे सांगत हाती कुराण घेऊन फैजाबादच्या तुरुंगात फासावर गेले.ashfaq1

"तुमच्या साम्राज्याचा सर्वनाश हीच माझी पहिली व अखेरची इच्छा आणि तिच्याखातर मी पुन्हा पुन्हा पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा पुन्हा फासावर जाईन" असे ठणकावून सांगत हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल १९ डिसेंबर १९२७ रोजी गोरखपूर तुरुंगात फासावर गेले.

मात्र जाताना हुतात्मा बिस्मिल जुलमी सरकारला इशारा देऊन गेले Bismil

मरते ’बिस्मिल’, ’रोशन’, ’लाहिरी’, ’अशफाक’ अत्याचारसे
होंगे पैदा सैंकडो इनकी रुधिर की धारसे

काकोरीपर्वातील या चार महान हुतात्म्यांना आज त्यांच्या ८१ व्या हौतात्म्य दिनी विनम्र अभिवादन.