प्रियतमा!

प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर संभ्रमा!

......................................
संभ्रमा!
......................................

चंद्रमुखी होशील कसी तू...
तुझा चेहरा किती जाडसर
म्हणावेत हे कसे गुलाबी?
फुकून झाले ओठ काळसर!

नव्हेसही तू तशी बावळी...
मवाळ किंवा मुळी लाजरी
खमकी बाई अशी कशी तू
जीभ तुझी ती असे कातरी!

लालबुंद तव या डोळ्यांना
मोतिबिंदुचा रंग जरासा...
तशात जडली रांजणवाडी
पापण्यातुनी स्राव झरासा...!

प्रसन्नता तुज ठाऊक नाही
स्वभाव आहे जरा मिजासी
कशी तुला मी धनीण केली...
घरी आणली विकत उदासी!

काय हवे ते, लग्नाआधी
कळले होते तुला नेमके
शोधत आहे तुझे अता मी
वर्णन करण्या शब्द शेलके!

टुकार कोणी; भिकार कोणी
तुझी पसंती ना कळणारी
शेजार्‍यांच्या उंबरठ्यांवर
सदैव तू तर घुटमळणारी!

कधी इकडची, कधी तिकडची...
कधी अशी तू... कधी 'तशी' तू...
नवरा-परका तुला सारखा...
मला पाडले पुरा फशी तू!!

अशी चंचला नको प्रियतमा
कुठून, वाटे, तुला पाहिली...
निघून तू गेलीस नि‌ सुटलो...
करेन पत्नी अता वायली!

- खोडसाळ

......................................
रचनाकाल ः २३ डिसेंबर २००८
......................................