नॉस्ट्राडेमसच्या हिंदू विश्वनेत्याची रोजनिशी (भाग - २)

३० सप्टेंबर २००१

हल्ली बँकेच्या कामात लक्षच लागत नाही.  आवश्यक सुद्धा नाहीये म्हणा. कारण एकदा का या जगाचा सार्वभौम राजा मी झालो की मला बँकेची नोकरी करायला वेळ थोडाच मिळणार आहे? कानामागच्या भुंग्याची कटकट आजकाल फारच वाढलीये. मी डोकं जोरजोरानं हलवून मागे टपला मारायला लागलो की बँकेतले लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघायला लागतात. तरी मी त्यांना आपली म्हणही सांगितली 'कानामागून आला आणि भुंगा झाला!' हॅः, पण कुणाला त्याचा अर्थच कळला नाही. न कळू दे म्हणा.  या लोकांबरोबर आपले संबंध आता कितीसे राहणार आहेत? एकदा का मी या जगावर प्रभुत्व मिळवलं की सगळे साले रोज येऊन मुजरा घालतील.  अकौंटंटचाही मग चांगला वचपा काढू.   

नीत आजकाल बँकेत आली तरी माझ्याकडे बघतही नाही. रुसलीये वाटतं माझ्यावर. आज तिचा अकौंट ओपनिंग फॉर्म काढून त्यातून तिच्या घरचा पत्ता शोधला. एक दिवस तिच्या घरी जावं लागणार. तिची समजूत काढायला पाहिजे आणि पुढचे सगळे प्लान्सही तिला सांगावेत. नको... एवढत्याच तिला सारं काही सांगायला नको. फक्त तिची समजूत काढू आणि तिला धीर धरायला सांगू... हे करणं फार आवश्यक आहे.  कारण एकदा का तिसरं महायुद्ध सुरू झालं की मला तिच्यासाठी वेळ मिळणं अवघडच होईल.   

दोन महिन्यापूर्वीची तारीख आज पुन्हा एकदा आली.

हल्ली मी बँकेत जाणं सोडून दिलंय.  जागतिक राजकारणाचं प्लानिंग करता करता बँकेत जायला वेळच मिळत नाही.  आईला काय झालंय कळतच नाही. आजकाल सारखं रडू येत असतं तिला. पण मी दिसलो की माझ्यापसून लपवायचा प्रयत्न करते. सारखी देवासमोर तरी बसते किंवा काम करत असली की व्यंकटेश स्तोत्र म्हणत राहते.  

आज आईबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश आले होते. त्यांनी आल्या आल्याच माझ्याशी अगदी प्रेमळ हस्तांदोलन केलं. मी मनात म्हटलंच "यानंही नॉस्ट्राडेमस वाचलेला दिसतोय. म्हणूनच तर त्या ओसामा बीन लादेननं पळता भुई थोडी केल्यानंतर आता आलाय बच्चमजी बरोबर माझ्याकडे."  अर्थात मी वरकरणी तसं काहीच दाखवलं नाही. उलट हसत हसत म्हटलं

"बोला बुश साहेब आज कसं काय येणं केलंत? "

पण त्यांनीही मोकळेपणानं उत्तर दिलं, तुमचं सहकार्य मागायला आलोय.   तुमच्या सहकार्याशिवाय हा प्रॉब्लेम सोडवणं अशक्य आहे."  मग मात्र मी त्यांना ऐकवलं.   म्हटलं

"बुश साहेब आम्ही सहकार्य करू पण आधी आमचं मांडलिक्त्व पत्करा.   अहो नाहीतरी शेवटी सर्व जगाचं सार्वभौमत्व आमच्याकडेच येणार आहे. त्यामुळे तुमची मस्ती आता सोडा त्यातच तुमचा फायदा आहे."  

बुशनंही मग जास्त आढेवेढे न घेता माझं म्हणणं मान्य केलं.   निघायच्या आधी बुश मला म्हणाला

"जीभ दाखवा."

मी मनात म्हटलं ही उत्तम संधी आहे.   म्हणून लगेच जीभ दाखवून मी त्यांना वेडावलं. तर ते हसायलाच लागले. म्हणाले

"तसं नाही. आSS करून जीभ दाखवा." तसा म्हणे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलच आहे.   मला सत्तेवर आल्यावर पहिलं म्हणजे असले सगळे संकेत बदलावे लागणार. मी त्यांना आSS करून जीभ दाखवली. माझ्या डोळ्याच्या पापण्या वर करून त्यांनी आत काहीतरी डोकावून बघितलं. आता आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलच आहे म्हटल्यावर मीही त्यांची जीभ बघितली आणि त्यांच्या डोळ्याच्या पापण्या वर उचलून आत डोकावून बघितलं.   बुशच्या डोळ्यांच्या आत मला बरंच काही दिसलं.   क्लिंटन नंतर या महाशयांच्याही डोक्यात लेविन्स्कीचे विचार घोळतायत!   निघायच्या आधी बुशसाहेबांनी - छे, आता तर त्याला नुसतं जॉर्जच म्हटलं पाहिजे - म्हणजे जॉर्जनं डॉक्टर बघतात तसं माझं ब्लड प्रेशर बघितलं आणि कानाला स्टेथोस्कोप लावून छातीची स्पंदनं पण ऐकली. एक दुसऱ्या राष्ट्रांचे नेते असं असं एकमेकांचे ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके पण तपासून बघतात हे मला माहिती नव्हतं. मलाही आता एक स्टेथोस्कोप आणि एक ब्लड प्रेशरचं यंत्र विकत घ्यायला पाहिजे. निघण्यापूर्वी जॉर्जनं अगदी पूर्ण कबूली दिली की माझ्या रक्तदाबावरून आणि हृदयाच्या ठोक्यांवरून अगदी सारं काही त्याच्या व्यवस्थित लक्षात आलं आणि म्हणूनच आमचं मांडलिकत्व पत्करायला अमेरिकेची कुठचीही हरकत नव्हती.

आजची जॉर्जबरोबरची मिटींग त्या दृष्टिनं अगदी महत्त्वाची ठरली.   उद्या आता जगभरातले सगळे प्रेसवाले मथळेच्या मथळे भरून या भेटीची साद्यंत हकीकत छापणार आणि राजकीय तज्ञ त्यांची समीकरणं पण मांडणार... बावळट कुठचे!

आई जॉर्जला बाहेर त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला गेली होती.  मी खिडकीतून बघितलं, जॉर्जच्या गाडीजवळ ते दोघं बराच वेळ गंभीरपणे काहीतरी चर्चा करत उभे होते. आईला काळजी वाटणं सहाजिकच आहे. पण आईला सांगावं लागेल की तिसरं महायुद्ध झालं तरीही तसं काळजी करण्याचं कारण नाही. कारण शेवटी विश्वनेता मीच होणार आहे. आणि नॉस्ट्राडेमसनंही तसं अगदी स्प्ष्ट शब्दात लिहून ठेवलंय. उगाच नाही अमेरिकेनं माझं मांडलिकत्व एवढ्या सहजा सहजी पत्करलं.   जय नॉस्ट्राडेमस...!

आज चार पाच तारखा एकाच दिवशी आल्यायत

आज सकाळी नीताचा पत्ता शोधत शोधत तिच्या घरी जाऊन पोहोचलो.   दारावरची बेल वाजवली आणि काय आश्चर्य... जॉन मेजर! इंग्लंडचे पंतप्रधान... त्यांनीच येऊन दार उघडलं.   मी मनात म्हटलं हा लेकाचा नीताच्या घरी काय करतोय?   अच्छा... आलं लक्षात... माझं वाढत चाललेलं महत्त्व ओळखून नीताच्या मदतीनं मला पटवण्याचा डाव आहे वाटतं याचा.   पण मला वाटतं जॉननं मला ओळखलं नाही.  मला म्हणाला

"येस?  कोण पाहिजे?"

मी अर्थातच लगेच सांगितलं "जॉन मला ओळखलं नाहीस?  मग इथं नीताशी साटंलोटं करायला कशासाठी आला होतास? चल नीघ इथनं."

त्यावर तो मला म्हणतो "तुम्ही काय बोलताय काही कळत नाहीये मला.  तुम्हाला कोण पाहिजे?"

मनात म्हटलं ' बाळ, कालच जॉर्जनं माझं मांडलिकत्व पत्करलंय.  आता नंबर तुझाच लागणार आहे.  पेपर वाचला नाही वाटतं यानं आजचा'.  तेवढ्यात नीताच दरवाज्यापाशी आली. 

"कोण आहे?" अन मला बघून ओळख दर्शक हसली.  नशीबच म्हणायचं माझं.  "पप्पा, अहो हे इथल्या बँकेत क्लार्क आहेत."

पप्पा...? जॉन मेजरनं नीताला लगेघ आपली मुलगीच करून टाकलंय वाटतं... काय काय खेळी खेळतात हे लोक.  मी नीताला मग सरळच सांगितलं, म्हटलं

"तू ब्रिटनच्या पंतप्रधानांना वडिल मानायला लागली असलीस तरीही मला आत्ता तुझ्याशी काही फार महत्त्वाचं बोलायचंय आणि त्या गोष्टी इतक्यातच ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कानावर जाव्यात असं मला वाटत नाही.  कारण त्यामुळे सगळीच जागतिक समीकरणं बदलतील.  आताच्या घडीला तर हे सारं जास्तच महत्त्वाचं आहे कारण तिसऱ्या महायुद्धाचे नगारे वाजायला लागलेत."

नीता आणि जॉन मेजर दोघंही माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहत होते.  मला वाटत होतं की माझं बोलणं ऐकल्यावर जॉन आम्हाला दोघांना सोडून निघून जाईल, पण तो तिथनं हलायचं नावच घेईना. मग मात्र मला स्पष्टच सांगावं लागलं.  मी म्हटलं

"जॉन तू त्वरित लंडनला परत जावंस हेच ठीक.  मला आणि नीताला आता खाजगी वेळाची निकड आहे."

त्यावर तो म्हणाला "काय? कोण आहात तुम्ही...? आणि काय वेड्यासारखी बडबड लावलीये...?"

मग मात्र माझ्याच्याने राहवेना.  मी सरळ नीताचा दंड पकडला आणि तिला आतल्या दालनाकडे घेऊन जायला लागलो.  नीताला हे सारं अचानक काय घडतंय ते कळल्यानं ती ओरडायला लागली.  जॉननं माझ्या शर्टाची कॉलर पकडली.  ब्रिटनबरोबर माझं युद्ध नाहीतरी एक दिवस होणारच होतं.  नॉस्ट्राडेमसनं तसं लिहूनच ठेवलंय.  त्यामुळे जॉनची आणि माझी तुंबळ मारामारी झाली.  आजच्या लढाईत कुणालाच स्प्ष्ट विजय मिळाला नाही.  पण याचा दुसरा अर्थ ब्रिटनबरोबर आणखी एक दोन लढाया कराव्या लागणार.  जॉर्जनं जेवढ्या सहजा सहजी माझं मांडलिकत्व पत्करलं, तितक्या सहजतेनं ब्रिटीश नमणार नाहीत असं दिसतंय.  हरकत नाही.  त्यांना अजून कदाचित माहिती नसेल की अखेरीस सर्वोच्च सार्वभौम राजा मीच होणार आहे.  नॉस्ट्राडेमसची थोडी पुस्तकं ब्रिटीशांकडे पाठवून द्यायला हवीत.  म्हणजे तरी डोळे उघडतील यांचे.  

जॉन मेजर बरोबरच्या युद्धात मला बऱ्याच जखमा झाल्यात.  डोक्यालाही खोक पडलीये.  पुढच्या युद्धात याचा वचपा काढावा लागणार.  माझ्या डोक्यावरची खोक आणि कपड्यांवरचं रक्त बघून आई चिंताग्रस्त झाली.  तिनं माझ्या सगळ्या जखमा धुवून काढल्या आणि त्यावर पट्टी बांधली.  आईच्या डोळ्यातून अश्रूंची संतत धार चालू होती.  मी हलकेच आईच्या गालावरचे अश्रू पुसले अन म्हटलं "आई, माझ्यामुळे खूप त्रास होतो ना गं तुला? " तर त्यावर ती रडत रडत म्हणाली "नाही रे ... राजा... तू फक्त बरा हो... तुझा चांगला संसार होऊ दे... त्यासाठी मी कितीही त्रास सहन करायला तयार आहे... " आई बिचारी किती चांगली आहे.  मी जगज्जेता झाल्यावर आईसाठी एक चांगला मोठ्ठा महाल बाधून देणार आहे.  

७३ मारोबर १००१     

आज सकाळी जॉर्ज आला होता.  जॉर्ज म्हणजे जॉर्ज बुश.  तो आल्या आल्या आम्ही एकमेकांशी हस्तांदोलन केलं.  मग आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलप्रमाणं त्यानं माझी जीभ आणि डोळे तपासले.  तसंच मीही त्याची जीभ आणि डोळे तपासले.  त्यानं मग माझ्या सगळ्या जखमा बघितल्या आणि हे काय झालं म्हणून मला विचारलं.  ब्रिटननं केलेली आगळीक मी त्याच्या कानावर घातली.  मी जॉर्जला सांगितलं की तू जॉन मेजरला सांग की तू आमचं मांडलिकत्व पत्करलंयस.  त्यामुळे उद्या ब्रिटनबरोबर जर आम्हाला युद्ध आघाडी उघडावी लागली तर अमेरिकन सैन्य आमच्या बाजूनंच या युद्धात उतरेल.  आणि मग हिटलरनंही केली नव्हती अशी लंडनची राख रांगोळी आम्ही करून टाकू.  मी म्हटलं की त्यांना सांग की अजून वेळ गेलेली नाहीये.  तुमच्या अविचारीपणानं निष्पाप नागरिकांचा बळी देऊ नका.  त्यापेक्षा गुपचूप येऊन आमचं सार्वभौमत्त्व मान्य करून टाका. 

मला वाटतं आजकाल जॉर्ज बुशची सगळी मस्ती उतरलीये.  तो अगदी गयावया करत म्हणाला की तो जॉन मेजरशी बोलेल.  इतकंच नाही तर जॉनला माझ्यासमोर अगदी गुडघे टेकायला लावेल.  पण इतक्यात कुठचीही युद्ध आघाडी उघडू नये अशी त्यानं मला गळ घातली.  युनायटेड नेशन्सचं डेलिगेशन येऊन मला युएन मध्ये घेऊन जाईल आणि युएनच्या व्यासपीठावरून सर्वच देशांना आपण माझं नेतृत्व मान्य करायला लावू असं जॉर्जचं म्हणणं आहे.  युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी कौंन्सिलची मिटींग होईपर्यंत आणि सर्व देशांनी सार्वभौमत्वाबद्दल त्यांचं मत देईपर्यंत मी शांत रहायचं ठरवलंय.  

नेहमीप्रमाणे आई जॉर्जला सोडायला त्याच्या गाडीपर्यंत गेली.  मी खिडकीतून बघत होतो.  ते दोघंही बराच वेळपर्यंत गंभीर चेहऱ्यानं एकमेकांशी काहीतरी बोलत होते.  आई घरात आली तेव्हा कसाबसा चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण खरं तर तिच्या चेहऱ्यावरची काळजी आणि भीती लपत नव्हती.  तरीही मी आईला सांगायचा प्रयत्न केला की तिसरं महायुद्ध अटळ आहे आणि त्यातला भारताचा विजयही अटळ आहे आणि म्हणजेच पर्यायानं मी जगज्जेता होणार हेही अटळच आहे.  हे सारं नॉस्ट्राडेमसनंच लिहून ठेवलंय त्यामुळे ते घडणारच.  अगदी निश्चित... जय नॉस्ट्राडेमस! जय नॉस्ट्राडेमस!

- क्रमश: