नॉस्ट्राडेमसच्या हिंदू विश्वनेत्याची रोजनिशी (भाग - १)

१२ सप्टेंबर २००१

आजही सकाळी उठायला उशीर झाला. त्यामुळे सहाजिकच बँकेत पोहोचायला देखील उशीर झाला. मला वाटत होतं की आजही अकौंटंटच्या शिव्या खायला लागणार. पण आज मजाच झाली. काल न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याबद्दलच दिवसभर बँकेत गप्पा चालल्या होत्या. अकौंटंट सुद्धा दिवसभर त्याच खमंग विषयाची चर्चा करत बसला होता. त्यामुळे मी उशीरा पोहोचलेलो फारसं कुणाच्या लक्षातही आलं नाही.  

नाहीतरी उशीरा पोहोचलो काय किंवा वेळेत पोहोचलो काय, फारसा काय फरक पडतो? आणि बाकीचे लोक तरी मारे वेळेत येऊन काय मोठे दिवे लावतात? साला बँक सरकारी आहे म्हणून फावतं या लोकांचं.   आणि मला शिव्या घालणारा अकौंटंट तरी काय असा मोठा शहाणा लागून गेलाय एवढा?   माझ्या हातात राज्य आलं ना की या सगळ्या बँक कर्मचाऱ्यांना पहिला सरळ करीन मी.  

आजचं पूर्ण वर्तमानपत्र आणि टी व्ही वरची सगळी चॅनल्स आज दिवसभर फक्त वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्याचीच चित्र परत परत दाखवतायत. सारं भयानकच आहे ते. नुसतं बघूनही अंगावर काटा येतोय. आज दिवसभर बँकेतही तीच चर्चा होती. सगळा स्टाफ काम सोडून त्याच बातम्या चवीचवीनं एकमेकांना सांगत होता.  

दिलीप आज म्हणत होता की हल्ला होणार हे भाकित नॉस्ट्राडेमसनं पूर्वीच करून ठेवलं होतं. मी दिलीपची भरपूर टिंगल केली. पण लोकांनी मलाच वेड्यात काढलं. अरे लेको नॉस्ट्राडेमसनं जर पूर्वीच या हल्ल्याचं भविष्य वर्तवलं होतं आणि नॉस्ट्राडेमसचं भविष्य वेगवेगळ्या देशांमधून, कित्येक विचारवंतांनी, वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून अभ्यासलंय, तर हा हल्ला थांबवण्यासाठी या लोकांपैकी कुणीच काही कसं केलं नाही? एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर आम्ही हे आधीच सांगितलं होतं या म्हणण्याला फारसा काहीच अर्थ नाही.   पण आमच्या बँकेतले लोक मात्र मोठ्या उत्साहानं नॉस्ट्राडेमस बद्दल बोलत होते.  

अर्थात बँकेतल्या कारकूनांबद्दल काय बोलणार? बोलून चालून मेडिऑकरच ते.   त्यांची बुद्धीमत्ताही तितपतच. तो नॉस्ट्राडेमस एक मूर्ख होता, त्याची चुकीमाकीची भाषांतरं काढणारे शतमूर्ख आणि आंधळेपणानं या भाषांतरांवर विश्वास ठेवणारे याहूनही मोठे महामूर्ख! या सगळ्यांना बुद्धिवाद वगैरे म्हणजे गाढवापूढे वाचली गीता...!

जाऊ दे. दिलीप नॉस्ट्राडेमसवरचं पुस्तक मला देतो म्हणालाय.   ते वाचून बघू.   निदान त्यातला फोलपणा लक्षात येण्यासाठी तरी ते वाचलंच पाहिजे.   दिलीप विसरला तरी त्याच्या मागे लागून ते पुस्तक त्याच्याकडून घेतलंच पाहिजे.  

१३ सप्टेंबर २००१ 

आज नीता बँकेत आली होती. बँकेत आली तशीच सरळ माझ्या कौंटरपाशीच आली. काय दिसत होती. मी तर एकटक पाहतच राहिलो. नजरच हटवेना. पण जरा चुकलंच ते. असं बघायला नको होतं. काय वाटलं असेल तिला. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे ते विचारत होती. यात विशेष अवघड काय? एवढे दिवस बँकेत तिची खाती आहेत आणि एवढं साधंही तिला कसं माहिती नव्हतं? जाऊ दे म्हणा. त्यामुळेच तर मला तिच्याशी बोलायची संधी तर मिळाली. पण मी बहुतेक बोलताना काहीतरी गडबड केली असणार. जरा गोंधळ उडाला होता खरा पण मला नाही वाटत मी काही चुकीचं बोललो. माझ्याशी बोलून नंतर ती अकौंटंटकडे कशाला गेली कुणास ठाऊक? आणि नंतर ते दोघं मला वाटतं माझ्या बद्दलच काहीतरी बोलत होते.   बँकेतून बाहेर पडताना साधं बघितलंही नाही तिनं माझ्याकडे. अकौंटंटनं साल्यानं काहीतरी सांगितलं असणार माझ्याबद्दल. त्याला काय घेणं आहे नसत्या बाबतीत नाक खुपसायला? बँकेत आल्या आल्या ती माझ्याच काउंटरवर आल्यामुळे साला जळला असणार. या अकौंटंटला एक दिवस धडा शिकवावा लागणार.

घराच्या दरवाजाच्या चौकटीला भुंग्यांनी पोखरून पोखरून भोक पाडलंय आणि दोन भुंगे गुं... गुं करत त्याच्या अवती भोवती उडत राहतात.   दार उघडं राहिलं तर कधी कधी घरात पण घुसतात.   मागचे आठ दहा दिवस मला एक शंका येतीये.   एखादा बारिकसा भुंगा बहुतेक मी झोपेत असताना कधीतरी माझ्या कानातून आत शिरलाय आणि तिथून आत जाऊन त्यानं आतमध्ये मेंदूच्या खाली त्यानं त्याचं घर केलंय बहुतेक.   कानात आतमध्ये खोलवर त्याचा गुं... गुं असा आवाज येत राहतो.   एक दिवस साल्याला बाहेर काढायला पाहिजे.   हं... म्हणजे अकौंटंट आणि कानातून आत घुसलेला भुंगा दोघांचा काटा काढायचाय तर... ठीक आहे. बच्चमजी, बुद्धीवादी लोक काटा काढायचं कामही बौद्धीक चातुर्यानंच करतात म्हणावं.  

१४ सप्टेंबर २००१

आज दिलिपनं नॉस्ट्राडेमसवरचं पुस्तक दिलं.  उद्या बँकेला दांडी मारावी. दिवसभर बसून ते पुस्तक उडवून टाकू. दीड दोनशे पानांचं पुस्तक फस्त करायला माझ्यासारख्याला कितीसा वेळ लागणार? 

आज संध्याकाळी घरी येताना नीता दिसली.  शॉपर्स स्टॉप मधून बाहेर पडत होती.  भरपूर शॉपिंग केलेलं दिसत होतं.  ही मुलगी उद्या माझी बायको झाल्यावर कसं काय होणार? माझ्यासारख्या इंटलेक्चुअल्सना असं फाल्तू शॉपिंग बिपिंग करण्यात इंटरेस्ट नसतो हे सांगावं लागेल तिला. अर्थात तिच्याही लक्षात येईलच म्हणा ते.  त्यामुळे तीही मला असल्या गोष्टी करायला लावायची नाही.  तिचं तिला एकटीला शॉपिंग वगैरे करायचं असलं तर माझी काही हरकत नाही.  आणि हो, सर्वसाधारणपणे मुलींची बुद्धीमत्ता शॉपिंग सिनेमा आणि स्वयंपाक याच्या पुढे जाऊ तरी शकेल का?

आज दोन तीन वेळा त्या कानातून आत घुसलेल्या भुंग्यानं सतावलं.  त्याचा एकदा नीट बंदोबस्त करावाच लागणार.  

१५ सप्टेंबर    

आज नॉस्ट्राडेमसवरचं पुस्तक वाचायचं होतं म्हणून बँकेला पण दांडी मारली.  पण वाचायला मूडच लागला नाही.  दिवसभर नुसताच पडून होतो.  नीताचे विचार अजिबात डोक्यातून हटतच नाहीयेत.  काय सुरेख दिसते ती.  तिच्या नुसत्या आठवणींनीही बेचैन व्हायला होतं. 

कानातून आत घुसलेल्या भुंग्यानं आज दिवसभर सतावलं.  सतत गूं... गूं आवाज येत होता.  पण त्याला गप्प करायची एक शक्कल सापडलीये.  आधी आधी डोक्यावर मागच्या बाजूस एक टप्पल मारली की तो शांत व्हायचा.  नंतर नंतर त्यालाही जुमानेसा झाला.  पण जोरात डोकं हलवून मागे एक टप्पल मारली की शांत बसतो तो.  आई पण जरा वेडपटच आहे.  मी असं डोकं हलवून हलवून टप्पल मारतो ते ती दरवाज्याच्या आड उभं राहून लपून बघत होती.  पण माझ्या लक्षात आलंच ते.  मी म्हटलं तिला, "अगं असं लपून काय बघतेस?  फारसं काही नाहीये, एक भुंगा कानातून आत जाऊन बसलाय.  त्याला असं डोकं हलवून टप्पल मारली की तो शांत बसतो."  हे ऐकल्यावर आईनं माझं डोकं तिच्या पोटाशी धरलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं.  मी म्हटलं तिला "तू कशासाठी रडतीयेस आई? ".  काहीच बोलली नाही ती त्याच्यावर.  पण खरं सांगू आईनं असं पोटाशी धरल्यावर किती बरं वाटतं... अगदी शांत शांत...

उद्या पण बँकेला दांडी मारावी लागणार.  नॉस्ट्राडेमसचं पुस्तक नाहीतर वाचूनच होणार नाही. आजचा दिवस भुंग्यानं वाया घालवला पण उद्या असं करून चालणार नाही.  

आजची तारीख नीटशी आठवत नाहीये.     

आजही बँकेला दांडी मारली.  सकाळीच आईनं विचारलं की मी बँकेत जाणार नाहीये का म्हणून.  आई बिचारी फार साधी सरळ आहे.  तिला काय कळणार बुद्धिजीवी वर्गाची मानसिक बैठक? मी तिला नीट समजावून सांगणार होतं तेवढ्यात भुंग्यानं गुणगुणणं चालू केलं.  त्यामुळे डोकं हलवून हलवून टपला मारण्यातच सारा वेळ वाया गेला आणि आईला समजावण्याचं राहूनच गेलं.  आईपण जास्त काही न बोलता देवासमोर जाऊन बसली. 

नॉस्ट्राडेमसचं पुस्तक वाचून झालं आज.  दिलीप म्हणत होता त्यात तथ्य आहे असं दिसतंय.  एकूणातच पुस्तक खूपच इंटरेस्टिंग वाटतंय.  अजून निदान एक दोन तरी पारायणं करणं आवश्यक आहे.  नॉस्ट्राडेमसनं त्याला जे दिसलं ते लिहून ठेवलंय, पण आम्हा लोकांची बुद्धीच तोकडी.  नॉस्ट्राडेमसनं वर्तवलेलं भाकित आम्हा लोकांना नीट उमजायला ती घटना घडून जावी लागते.  जाऊ दे. अर्थात सर्वसामान्यांकडून फार अपेक्षा करणंही चूकच आहे.  पण मला नॉस्ट्राडेमसचं भविष्य इतरांपेक्षा थोडं जास्तच लक्षात येतंय.  आज जे पुस्तक वाचलं त्या लेखकालाही नॉस्ट्राडेमस फारसा कळला आहे असं मला नाही वाटत. पण मला मात्र नॉस्ट्राडेमसच्या चार चार ओळींच्या काव्यपंक्त्तींमधल्या प्रत्येक ओळीचा अर्थ कळतोय.  इतकंच काय त्याचा अन्वयार्थ, दूरान्वयार्थ वगैरे वगैरे सारं काही लक्षात येतंय.       

एक गोष्ट खूपच लक्षणीय म्हटली पाहिजे, नॉस्ट्राडेमसनं ज्या हिंदू जगज्जेत्याबद्दल भाकित केलंय, त्यात त्यानं लिहून ठेवलेलं वर्णन मला किती तंतोतंत लागू पडतंय.  मला तर हे पुस्तक वाचल्यावर अशी खात्रीच वाटायला लागलीये की तो हिंदू जगज्जेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून मीच असणार.  नाहीतरी, उद्या मी सार्वभौम राजा झाल्यानंतर या संपूर्ण पृथ्वीचं राज्य कसं चालवायचं याचे आराखडे माझ्या डोक्यात केव्हापासूनच तयार आहेत.  किती विचार या साऱ्यावर या आधीच करून ठेवलाय मी.  आता या साऱ्या गोष्टींचा मी आधीच विचार करून ठेवलेला असावा आणि नॉस्ट्राडेमसनंही त्याच्या भविष्यकथनात माझंच वर्णन केलेलं असावं याला काही नुसताच योगायोयोग म्हणता येणार नाही.  मला तर वाटतं ही सारी दैवानंच आखलेली योजना आहे. 

नॉस्ट्राडेमसला अभिप्रेत असलेला विश्वनेता मीच असणार याबद्दल आता अगदी शंकाच नको.  त्यानं सांगितलं आहे ना की हा नेता हिंदू असेल.  मी हिंदू आहेच.  त्यानं सांगितलंय की हा नेता ओरिएंट मधला असेल.  आता ओरिएंट म्हणजे नक्की कोणता प्रदेश? पण ज्या अर्थी आपल्या भाष्यकारांनी ओरिएंट म्हणजे भारतच म्हटलंय, त्याअर्थी ओरिएंट म्हणजे भारतच असणार.  ते कशाला उगाच खोटं बोलतील? पण खरंतर चीनलाही ओरिएंट म्हटलं जातं.  आणि फ्रेंच भाषेत तर मला वाटतं ओरिएंट म्हणजे इजिप्तच्या आसपासचा प्रदेश.  म्हणजे आपले सगळे भाष्यकार काय मूर्ख? मी तर म्हणतो आपलेच काय नॉस्ट्राडेमसचे सगळेच भाष्यकार मूर्ख आहेत.  पण तरीही मी जगज्जेता होणार यात शंकाच नाही.  कारण नॉस्ट्राडेमसनं सांगितलेल्या इतर सर्व गोष्टी तर मला तंतोतंत लागू पडताहेतच शिवाय जगावर राज्य कसं करायचं याचा अगदी साद्यंत आराखडा माझ्या डोक्यात तयार आहे. शिवाय माझ्या सारखी अफाट बुद्धीमत्ता ही फक्त जगज्जेत्याच्याच ठायी असू शकते.  या सगळ्याला नक्कीच एक विशिष्ट अर्थ आहे.  

नॉस्ट्राडेमसनं या विश्वनेत्याला शायरॉन असं म्हटलंय.  हा पाच नद्यांच्या प्रदेशातला असेल असं म्हटलंय.  म्हणजे अपल्या मुळा, मुठा, इंद्रायणी आणि पवना.  आणि ... पाचवी नदी? हां, आपल्या मुठेचा डावा कॅनॉल आहे ना.  शिवाय नॉस्ट्राडेमसनं म्हटलंय हा शायरॉन अगदी लव्हड, फिअर्ड आणि अनचॅलेंज्ड असेल.  म्हणजे नक्कीच मी.  किती प्रेम करतात सगळे माझ्यावर. आईची तर अगदी जीवापाड माया आहे. पण त्याच बरोबर माझा दराराही आहे.  शिवाय बुद्धीचातुर्याबाबत कुणीही मला चॅलेंज करूच शकत नाही. नॉस्ट्राडेमसच्या पुस्तकात म्हटलंय की ही विश्वनेता चांद्रसेनीय असेल, गुरुवार त्याचा उपासनेचा दिवस असेल आणि सोमवार सुट्टीचा दिवस असेल.  सारं काही बरोब्बर मिळतं जुळतं आहे.  आमच्या अकौंटंटनं मला एक्सटेंशन कौंटरला टाकून मला रविवार वर्किंग आणि सोमवारी सुटी केली होती तेव्हा केवढा राग आला होता मला.  पण आता या साऱ्या गोष्टींचा उलगडा होतोय.  मला विश्वनेता बनवण्याच्या ईश्वराच्या योजनेतलाच हा एक भाग होता.

खरंच विश्वनियंत्या तू थोर आहेस ... नॉस्ट्राडेमस तूही थोर आहेस ... जय नॉस्ट्राडेमस!

आता झोपायला पाहिजे.  उद्या बँकेत जाणं आवश्यक आहे.  कानामागच्या भुंग्याचा त्रास वाढतोय.  हं ... 'कानामागून आला आणि तिखट झाला' अशा म्हणीऐवजी 'कानामागून आला आणि भुंगा झाला' अशी म्हण काढायला हरकत नाही.  उद्याचपासून साऱ्या जगभर ही म्हण प्रसारित करायला सुरवात करु.    

- क्रमशः