नॉस्ट्राडेमसच्या हिंदू विश्वनेत्याची रोजनिशी (भाग - ३)

मोकळी तारीख

तारीख, वार, महिना, वर्ष, इसवी सन, हिंदू वर्ष, हिजरी वर्ष या सगळ्यांचा घोळ फारच वाढलाय.  मी सत्तेवर आल्यावर प्रथम म्हणजे हे सारं बंद करून टाकणार आहे.  प्रत्येकानं स्वतःच्या सोयीचं कॅलेंडर करावं.  ज्यांना याची आवश्यकता वाटत नाही अशांनी तारीख, वार, वेळ, महिना या कशाचाच वापर नाही केला तरीही चालेल. पण कुणी कुणाच्या घोळात अडकायला नको.  ही नवीन पद्धत चालू होईपर्यंत सध्यातरी सगळ्या तारखा मोकळ्याच आहेत. 

आज सकाळी युएनचं डेलिगेशन आलं.  मला ते त्यांच्या बरोबर घेऊन गेले.  मी बाहेर पडत असताना आई स्फुंदून स्फुंदून रडत होती.  ते बघून मलाही गदगदून आलं.  पण या युएनच्या अधिकाऱ्यांसमोर मला ते दिसू द्यायचं नव्हतं.  हे डेलिगेशन मोठी मोटार घेऊन आले होते.  आम्ही सरळ मोटारीनंच युनायटेड नेशन्सच्या मुख्य कार्यालयात जाऊन धडकलो.  कार्यालयाच्या मुख्य फाटकातून आत शिरताच आतलं मोठ्ठं आवार दिसलं.  आधी मुख्य इमारतीत जाऊन मी माझं नाव नोंदवणं वगैरे असले सोपस्कार उरकले. मी खरं तर सिक्युरिटी कौंन्सिलच्या बैठकीच्या खोलीत जायला उत्सुक होतो.  पण त्या आधीच मला एका मोठ्या हॉल मध्ये सोडण्यात आलं.  तिथं सगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी आधीच उपस्थित होते.  तिथलं वातावरण म्हणजे युद्धभूमीच असल्यासारखं वाटत होतं.  सगळ्या प्रतिनिधींनी डोक्याचं मुंडण केलेलं दिसत होतं. 

आणि अचानक, काही लक्षात येण्याच्या आत तिथं युद्धाचा भडका उडाला.  नॉस्ट्राडेमसनं त्याच्या श्लोकांमधल्या दुसऱ्या शतकातल्या एकोणतीसाव्या श्लोकात सांगितलेली परिस्थिती मी माझ्यासमोर साक्षात अनुभवत होतो.  युरोपवर मुस्लीम राष्ट्रांनी आक्रमण केलं होतं.  इटली आणि ग्रीसचा धुव्वा उडाला होता.  संपूर्ण युरोपभर हाःहाःकार उडाला होता.  मला कार्यरत होण्याची हीच वेळ होती.  तिसरं महायुद्ध पेटलं होतं आणि यात मला सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावायची होती.  जगातला संहार संपवून रामराज्य आणायचं होतं.  माझ्या साऱ्या योजना तयार होत्या.  एका बाजूला माझे सरसेनापती माझ्या ऑर्डरची वाट पाहत तयारीत उभे होते.  सेकंदभर डोळे बंद करून मी नॉस्ट्राडेमसचं स्मरण केलं.  जय नॉस्ट्राडेमस! अन पंजाब बॉर्डरवरून मी आणि माझं सैन्य पाकिस्तानवर तुटून पडलो.  मुरारबाजी करी कारंजी पुरंधरावर रुधिरांची... तद्वतच आम्हीही रुधिरांची कारंजी उडवली.  माझं सैन्य अतुलनीय मर्दुमकी गाजवत होतं.  पाकिस्तानचा धुव्वा उडायला फार वेळ लागला नाही.  माझ्या अर्ध्या सैन्याला मी अफगाणिस्तान काबिज करून रशियातून युरोपवर धडक मारायला पाठवलं.  आणि मी स्वतः मध्य पूर्वेचे देश काबिज करत इजिप्तकडे मुसंडी मारली.  न भूतो न भविष्यती असं रणकंदन चालू झालं.  मी आणि माझं सैन्य अद्वितीय असा पराक्रम गाजवत होतो.  हे सारं अगदी नॉस्ट्राडेमसनं लिहून ठेवल्याप्रमाणे तंतोतंत घडत होतं. जय नॉस्ट्राडेमस!

एवढ्यात युएनचे सैनिक युद्धभूमीवर घुसले आणि अचानक युद्धबंदी झाल्याप्रमाणे एकदम युद्ध थांबलं.  सगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी युद्ध करायचं सोडून दुसरंच काहीतरी करायला लागले.  मी मात्र अजूनही चढाईच्याच आवेशात होतो.  युएनचं सैन्य अर्थात माझ्याच मदतीसाठी आलंय हे मला माहितीच होतं.  पण झालं मात्र उलटंच. हे सैनिक माझ्यावरच चालून आले.  मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकेचनात, तेव्हा मात्र मी त्यांच्यावर हल्ला चढवला.  संपूर्ण ताकतीनिशी मी त्यांच्यावर तुटून पडलो.  त्यांनी त्यांच्या हातातल्या दंडुक्यांनी माझ्यावर प्रहार करायला सुरुवात केली. 

"मूर्खांनो, मला ओळखलं नाही का?  मलाच काय मारताय? मी... मी नॉस्ट्राडेमसचा हिंदू जगज्जेता... " मी ओरडून ओरडून सांगत होतो.  पण त्यांनी माझं एक ऐकलं नाही.  त्यांचे वार साऱ्या शरीरावर पडत होते.  शेवटी माझा प्रतिकार थंड झाला.  त्यांनी माझी उचलबांगडी करून मला एका खोलीत नेऊन डांबलं.  सारं शरीर वेदनेनं तळमळत होतं.  अंगावर जागोजाग माराचे वळ उठले होते.  हातापायांना सूज आली होती.  आई... आई... तू कुठे आहेस आई... आईच्या आठवणीनं मला ओक्साबोक्शी रडू आलं...

संध्याकाळी जॉर्ज बुश मला भेटायला आला होता.  मी त्याला त्वरित निघून जायला सांगितलं.  मला त्याच्याशी एक अक्षरही बोलायची इच्छा नव्हती.  संपूर्ण युएनला यानं वेठीला धरलंय.  याच्या सांगण्यावरनंच युएनचं सैन्य माझ्यावर उलटलं असणार.  जॉर्ज निघून गेला पण पुन्हा एकदा युएनचे सैनिक आले.  त्यांनी मला उचलून एका मोठ्या खोलीत नेलं.  तिथे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते.  त्यांनी एका मोठ्या कॉटवर मला झोपवलं आणि माझे हातपाय बांधून टाकले.  माझ्यात प्रतिकार करण्याची ताकत अजिबात उरली नव्हती.  पुन्हा एकदा जॉर्ज बुश आला. त्यानं माझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण मी तिकडे पूर्ण दुर्लक्ष केलं.  त्यांनंतर माझ्या त्या बांधलेल्या अवस्थेत त्या सगळ्यांनी मिळून माझे अनन्वित छळ केले.  मला इंजेक्शन दिलं. त्यानंतर विजेचे झटकेही दिले.  ते यातनागृहच होतं.  माझी तर अक्षरशः बोबडीच वळली होती. 

देवा... हे कुठे नरकात आणून टाकलंस मला...?  जगज्जेता होण्यासाठी ही सारी अग्निपरीक्षा द्यावीच लागत असणार...

या जगातल्या सगळ्या तारखा माझासाठी संपून गेल्या आहेत...         

गेले कित्येक दिवस हे लोक माझा अनंत छळ करतायत.  रोज मला विजेचे झटके देतात.  जेवा-खायलाही धड मिळत नाही.  आता हे सारंच सहन करण्याच्या पलिकडे गेलंय.  मृत्यू आता समोर दिसतोय.  पण नॉस्ट्राडेमसचा हा हिंदू जगज्जेता असा तसा मरणार नाही.  त्याला वैकुंठाला न्यायला पुषपक विमान आलंय.  त्यावर स्वार व्हावं... शरीराचं वजन नाहीसं झाल्यासारखं वाटतंय... उंच आकाशात जाऊन सारी पृथ्वी एकाच दृष्टिक्षेपात सामावून घ्यावी.... या अत्त्युच्च बिंदूवरून पृथ्वी किती लोभसवाणी दिसते....  ही... ही खाली दिसतीये ती माझी सारी कर्मभूमी ... तो युरोप... ती मध्यपूर्वेतली संस्थानं... तो मी पराजित केलेला पाकिस्तान... आणि तो ... तो... ओहोहोहो... तो तर माझा भारत.... माझा... माझा प्यारा भारत... मेरा भारत महान... आणि ते त्यातलं माझं गाव... निरागस सुंदर.. छोटी छोटी घरं... आणि ते... ते माझं घर... आणि आई? ती काय... ती काय घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात मुसमुसून रडत बसलीये... ती माझी बिचारी आई... आई... आई... आई रडू नकोस... आयुष्यभर तुला खूप त्रास झाला... पण रडू नकोस... बघ आता सारा त्रास संपला... कायमचा... बघ मी तर जगज्जेत्याहूनही अतिउंचावर जाऊन पोहोचलो... मला एकदा जवळ घे आई... अगदी जवळ... तुझ्या कुशीत... माझ्या मुंडण केलेल्या डोक्यावर तुझे दोन अश्रू पडू देत... माझं डोकं तुझ्या मांडीवर मला ठेवू देत... आई, रडू नकोस... आई...

नॉस्ट्राडेमस, तुझं भविष्य थोडसं चुकलंच.  तुझाजगज्जेता हिंदू शायरॉन जगज्जेता झाला खरा, पण गादीवर बसण्यापूर्वीच मरण पावला...

- समाप्त