वाटतो साऱ्या सुखांचा धाक आता
सुख म्हणाले की रगडतो नाक आता
प्रेम, माणुसकी, दया, शांती, अहिंसा
पाक गोष्टी कालच्या नापाक आता
स्वार्थ दिसता माणसाचे तत्व बदले
रोज येथे जन्मती चार्वाक आता
का असा हटवाद पाठीच्या कण्याचा?
विनवले कित्येकदा की वाक आता
दृष्ट ना लागो किती नाजूक, सुंदर
स्वप्न हळवे पापण्यांनी झाक आता
जर विकायाचाच आहे देश अवघा
का कुणी व्हावे शहिद हकनाक आता
'तो' नऊवेळा म्हणे येऊन गेला
पण कुणाची 'तो' न ऐके हाक आता