वेदनेच्या आतली सुविधा कळावी लागते
होत जख्मी वाट कवितेची मळावी लागते
देव का निर्जीव मूर्ती राहतो, सांगा बरे
जन्म घेण्याला इथे आई मिळावी लागते
प्रेम नुसते शपथ घेता पूर्ण होते का कुठे?
प्रेयसीची बेवफाई फळफळावी लागते
तू दिशा जाणून वळण्याचा न काही फायदा
वाट ज्यावर चालशी तू, ती वळावी लागते
फक्त गुणवत्तेमुळे ना पाझरे दुनिया कधी
अस्मिता लाचार होउन भळभलावी लागते
सांत्वने करणे जगाची हे कवीचे काम असे
आमच्यासाठी न दुनिया हळहळावी लागते
माणसाचे मूल्य सांगा काय या धरतीवरी?
कावळा शिवण्यासही चीता जळावी लागते ( चिता )
( मित्रांनो, 'गझल' या काव्यप्रकाराच्या तांत्रिक दृष्टीकोनातून कृपया याकडे पाहू नये. मी ही रचना कविता म्हणुन सादर करत आहे. माझ्या ज्या रचना 'गझल आहेत त्या इतरत्र पहावयास मिळतील ... अर्थातच, पहायच्या असल्यास... हा हा हा!)