नशिबात पाहिजे ना

जग जिंकण्यास सारे सेना हवी कशाला?
ही जिंकण्याची वृत्ती रक्तात पाहिजे ना

फसवा मला कितीही मी त्याचसाठी आहे
वेडा कुणीतरी या दुनियेत पाहिजे ना

कुणी ज्योतिषी कुणाच्या नशिबास काय बदले?
त्याचेच आधी त्याला माहीत पाहिजे ना

मदिरा खराब आहे तुम्ही सांगता कुणाला?
कुणी ऐकण्यास तुमचे शुद्धीत पाहिजे ना

या चुंबनांची गोडी आता तिला समजली
घेण्यामधील इच्छा देण्यात पाहिजे ना

असलो जरी मी पापी करी काय देव माझे?
आधी रिकामी जागा नरकात पाहिजे ना

कोणी मला विचारे जगतोस तू कशाला?
म्हणलो जिवंत कोणी तुमच्यात पाहिजे ना

विसरेल ती कशी रे सांगा तुम्हीच मजला?
विसरायला तिच्या ते लक्षात पाहिजे ना

तो यायलाच माझा मृत्यू तयार नाही
दुर्दैव हेही त्याच्या नशिबात पाहिजे ना

मित्रांनो, माझे या कवितेचे गाऊन प्रत्यक्ष व्हिडिओ सादरीकरण आपण यू ट्यूब वर 'नशिबात पाहिजे ना', 'भूषण पोएट' वगैरे क्लिक करून पाहू शकता. तो कार्यक्रम 'साहित्य परिषद - पुणे' येथे झाला होता.