अनेकदा मनात असलेल्या गोष्टी करावयाच्या राहून जातात आणि त्याची हुरहूर मात्र लागून रहाते.पुस्तकांच्या बाबतीत तर असे बरेचदा होते.एकादे पुस्तक वाचायचे असे आपण सारखे घोकत असतो आणि बरेच प्रयत्न केले तरी ते कधी कधी मिळत नाही.उलट कधी कधी मात्र ते मिळूनही वाचायला जमत नाही असेही घडते.लो.टिळकांच्या गीतारहस्याच्या बाबतीत माझे असे झाले.आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ते असल्यामुळे मी मोठ्या हौसेने वाचण्यासाठी म्हणून आणले पण शिकवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी वाचावयाच्या पुस्तकांच्या वाचनातून वेळ काढून ते पुस्तक वाचणे काही जमले नाही.आणि शेवटी ते न वाचताच परत करावे लागले.आणि अजूनही ते वाचायचे राहिलेच आहे.
.हे झाले मराठी पुस्तकांच्या बाबतीत. एका हिंदी भाषेतील पुस्तकाबाबतीत माझे असे झाले पण त्याचे फार मनावर घेण्याचे ते वय नसूनही त्यावेळी त्याचे वाईट वाटले पण वेगळ्याच कारणाने..त्यावेळी आम्ही शाळेत असताना राष्ट्रभाषा सभेच्या हिंदी परीक्षांचे खूपच अप्रुप होते.निदान आमच्या गावात तरी अगदी मोठी माणसेही त्या वेडाने झपाटलेली होती,त्यामुळे आम्हा शाळकरी मुलांपर्यंत ते लोण पोचणे स्वाभाविकच होते.मी तर नवव्या वर्गात येईपर्यंत हिंदी प्रवीण पर्यंत मजल मारली होती.त्यावेळी त्या परीक्षेसाठी पं. नेहरूंचे "हिंदुस्तानकी समस्यायें" हे पुस्तक नेमलेले होते पण त्यातील सर्व भाग परीक्षेसाठी नव्हता त्यामुळे अभ्यासक्रमात दिलेल्या प्रकरणांचाच मी अभ्यास केला,पण प्रत्यक्षात आमच्या हाती अभ्यासक्रमाची जुनी प्रत आली होती की काय नकळे कारण परीक्षेत प्रश्न वेगळ्याच प्रकरणावर विचारले गेले.त्यावेळी सगळे पुस्तक अभ्यासायला हवे होते असे वाटून गेले पण त्यामुळे निकालावर फारसा परिणाम झाला नाही कारण "हिंदुस्तानकी समस्यायें" पं.नेहरूंइतक्याच आम्हालाही जाणवत होत्या आणि अजूनही जाणवतच आहेत.
इंग्रजी पुस्तक वाचनाबाबतीत वेगळीच तऱ्हा होती. दुर्दैवाने बाळासाहेब खेरांच्या आठवीपर्यंत इंग्रजी न शिकवण्याच्या काळात शिकावे लागल्याने इंग्रजी पुस्तक हाती आले तरी ते वाचण्याचा उल्हास फारच कमी असे.त्यामुळे अकरावीपर्यंत पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इंग्रजीचे एकही अक्षर वाचले गेले नव्हते. शिक्षणाचा गोंधळ करण्याची परंपरा आपले शासन अगदी तेव्हांपासून नित्यनियमाने पाळत आले आहे.त्यावेळी प.महाराष्ट्रात अकरावी ला एस.एस.सी.म्हणत आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळे तर विदर्भात मात्र दहावीनंतर तो मिळे.मराठवाड्यात तर आणखीच वेगळा प्रकार होता म्हणजे दहावीपर्यंत दुय्यम शालेय शिक्षण हा एक प्रकार आणि त्याशिवाय ११ वी मल्टिपर्पज असा आणखी एक प्रकार असे आणि या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक विषय म्हणजे मशीन ड्रॉइंग हा असे.प.महाराष्ट्रात त्यावर्षी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्याही परीक्षा विद्यापीठाकडून घ्यायचा निर्णय झाला आणि त्याला पदवीपूर्व (predegree)असे नाव देण्यात आले.त्यापूर्वी पहिल्या वर्षाची परीक्षा महाविद्यालयेच घेत.
मी अकरावीनंतर फर्गसन महाविद्यालयात पदवीपूर्व विज्ञानसाठी प्रवेश घेतला तरी इंग्रजी हा एक विषय होताच(शिवाय मराठीसुद्धा होता).आणखी त्यासाठी गोल्डन ट्रेझरी काव्यसंग्रह, याशिवाय मॅक्मिलन संपादित इंग्रजी गद्य वेचे संग्रह अभ्यासक्रमात होता.त्यावेळी तो शिकवायला प्रा.ग.प्र. प्रधानांसारखे प्राध्यापक आम्हाला होते.पण त्यांच्या शिकवण्यामुळे पुस्तकातील त्यांनी शिकवलेला भाग आवडला तरी आणखी काही वाचावे अशी इच्छा मात्र कधी होत नसे.काव्याची मूळ आवड कमीच असल्यामुळे गोल्डन ट्रेझरीमधील प्रा.कामत शिकवत असलेल्या काही भागांचे पाठांतर करूनच परीक्षेस तोंड दिले.त्यामुळे गोल्डन ट्रेझरी सगळे वाचण्याचा प्रश्नच नव्हता.त्यावेळी शिकलेल्या कवितांमधील "ला बेल देम सांस मर्सी" (La Belle Dame Sans Merci)या कीटस् च्या कवितेचीच काय ती आठवण येते. ती केवळ त्या विचित्र नावामुळेच.
पूर्वी शाळेतही सुलभ वाचनमाला किंवा तत्सम नावाचे पुस्तक पुरवणी वाचन म्हणून असे पण त्यावर परीक्षा नसे त्याच धर्तीवर या पहिल्या वर्षाला इंग्रजी गद्य आणि गोल्डन ट्रेझरी या पद्यसंग्रहाव्यतिरिक्त बरोबर एच्. जी.वेल्स यांचे टोनो बंगे हे पुस्तक रॅपिड रीडिंगसाठी नेमले होते पण त्यावर परीक्षेत प्रश्न मात्र येणार होते, मात्र कोणी ते शिकवत नव्हते.आधीच्या वर्षीपर्यंत प्रथम वर्षासाठी सायलस मार्नर हे पुस्तक होते.पण तेव्हां पहिले वर्ष म्हणजे आराम असा प्रकार होता कारण परीक्षा नावालाच असे. सायलस मार्नरचे मराठी रूपांतर गोड गोष्टी च्या एका भागात साने गुरुजींनी मनूबाबा या नावाने केलेले मी वाचले होते त्यामुळे ते पुस्तक जर नेमले गेले असते तर कदाचित मी ताबडतोब वाचायला सुरवात केली असती.मजा म्हणजे त्यावेळी टोनो बंगे हे पुस्तक अवघड असल्याने पुन्हा सायलस मार्नरच नेमणार आहेत अशी अफवा होती,त्यामुळे टोनो बंगे जवळ असूनही मी ते वाचायला सुरवातही केली नव्हती आणि सायलस मार्नर नेमलेले नसल्यामुळे ते माझ्याजवळ नव्ह्तेच.एच.जी.वेल्स हे नावाजलेले लेखक होते आणि त्यांच्या बऱ्याच विज्ञानकाल्पनिका गाजल्या आहेत आणि आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून ते पुस्तक आम्हाला नेमण्यात आले असावे.सायलस मार्नर नेमतील अशी बरीच वाट पाहून शेवटी ते नेमण्याचा पत्ता नसल्यामुळे मी टोनो बंगे वाचायला सुरवात केली.विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे विज्ञान, रसायन, वनस्पती आणि शरीरशास्त्र आणि गणित या विषयांच्या अभ्यासानंतर टोनो बंगेचा नंबर कधीतरी रात्री लागायचा आणि त्यामुळे मी त्या पुस्तकाचे पहिले पान वाचू लागताच झोपेने माझ्यावर अंमल गाजवायला सुरवात केलेली असे.त्याबरोबर आपोआपच पुस्तक मिटून मी झोपी जात असे.परीक्षा जवळ येईपर्यंत हा क्रम असाच चालू राहिला,टोनो बंगे ही औषध कंपनी आहे असे वाटते पण माझ्या बाबतीत ते पुस्तकच झोपेचे औषध ठरले. टोनो बंगे हा काय प्रकार आहे हे कळण्यापूर्वीच अचानक विद्यापीठाकडून टोनो बंगे ऐवजी सायलस मार्नर पण परीक्षेसाठी चालू शकेल असा फतवा निघाला (म्हणजे गोंधळात गोंधळ).काही कारणाने मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा लागला असावा त्यामुळे टोनो बंगे वाचण्याचा माझा उत्साह पारच मावळला आणि कमाल म्हणजे मी सायलस मार्नरही वाचण्याचे श्रम न घेता पूर्वी वाचलेल्या मनूबाबाच्या वाचनाच्या आधारावरच परीक्षा दिली. थोडक्यात टोनो बंगे आणि सायलस मार्नर ही दोन्ही पुस्तके वा निदान एक तरी वाचणे आवश्यक असून ती वाचली गेली नाहीत.ही रुखरूख राहून गेली.
त्याच काळातील आणखी एक मौज म्हणजे महाविद्यालयाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वीस वीस मुलांच्या तुकड्या करून काही प्राध्यापकांकडे त्या सोपवल्या होत्या आणि त्यानी आठवड्यातून दोनदा त्या विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करावे किंवा त्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी अपेक्षा होती.पण अडचणी परक्या माणसापुढे सांगणे हे आम्हाला अवघड वाटत असल्यामुळे आणि एकूणच प्राध्यापकांना त्याविषयी काय करावे याच्या सूचना नसल्याने ते आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने या वेळेचा उपयोग करत. आमच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी त्यांच्या दृष्टीने योग्य म्हणजे म्हणजे आमच्याकडून जेन ऑस्टिनची प्राइड अँड प्रेज्युडिस ही कादंबरी वाचून घ्यायचे ठरवले आणि त्याचीही गत जी टोनो बंगे ची झाली तीच झाली.त्यातील
IT is a truth universally acknowledged, that a single man in possession of
a good fortune must be in want of a wife.एवढेच काय ते आमच्या लक्षात राहिले. त्यात परत आमच्यापैकी कोणीच a single man in possession of
a good fortune या सदरात बसत नसल्यामुळे पुढे आयुष्यातही तो अनुभव आला नाही.
याउलट कधीकधी अगदी हौसेने घेतलेले पुस्तकही आपण वाचत नाही असेही होते.एमिल ब्रॉन्टेच्या वुदरिंग हाइट्स या पुस्तकाच्या बाबतीत माझे असे झाले.तोपर्यंत इंग्रजी पुस्तक वाचनाचा माझा वेग बऱ्यापैकी वाढला होता.आणि टॉलस्टॉय यांच्या ऍना कॅरेनिना किंवा विल्यम शिररच्या राइज अंड फॉल ऑफ थर्ड राइश सारख्या एक हजाराहून जास्त पृष्ठे असणाऱ्या पुस्तकांचेही मी वाचन केले होते.त्यामानाने ही आकाराने अगदीच किरकोळ कादंबरी होती पण का कोणास ठाउक ती माझ्या मनाचा ठाव घेऊ शकली नाही आणि बरेच दिवस मी वाचू शकलो नाही. ती घेतल्यानंतर जवळजवळ सात आठ वर्षे माझ्या कपाटात पडूनच होती. शेवटी एकदा ती पूर्ण करायचीच असा निश्चय करूनच ती मला संपवावी लागली.त्याच प्रकारे सलमान रश्दीची मिडनाइट्स चिल्ड्रेन वाचण्यासाठी विकत घेऊनही अजून माझ्या कृपाकटाक्षाची वाट पहातच आहे.