मार्ली अन मी, हे पुस्तक मी क्रॉसवर्ड मध्ये केव्हाच पाहिले होते. तशी बरेचदा काही काही पुस्तके मला खुणावत राहतात, त्यातलेच ते एक होते. अगदी त्याच्या लेखकाविषयी मला काहीही माहीत नसून. नाव सुद्धा ऐकले नव्हते मी त्याचे. अन हो, त्यावर न्युयॉर्क टाईम्स बेस्ट सेलर चा शिक्का होता, पण त्याचाही काही संबंध नव्हता. कश्शाचा काही संबंध नसताना काही काही पुस्तके मला खुणावत राहतात, घे घे म्हणतात, त्यातलेच होते ते एक. पण जवळ जाऊन बघितले तर एक तर ते "हार्ड बाउंड" होते त्यामुळे किंमतही खूप होती. चटकन मी, घरी पडून असलेल्या अन न वाचलेल्या पुस्तकांचे गठठेच्या गठठे नजरेसमोर आणले अन महत्प्रयासाने मनावर काबू मिळवला. अर्थातच काही काळ, म्हणजे एखाद दुसरा महिना गेल्यावर, नेहेमीप्रमाणेच मनाने माझ्यावर विजय मिळवला, अन आता पेपर बँक आवृत्ती आहे, किंमत कमी आहे इत्यादी इत्यादी स्वतःला ऐकवत घेतले बाई ते एकदाचे विकत! अगदी अधाशासारखे झडप घालून अन त्यातल्या जरा ( की चांगल्याच? ) बारीक अक्षरांकडे काणाडोळा करत.शिवाय या वेळेस एक अजून जबरदस्त कारण होते, ते म्हणजे आमचा "स्पाईक"! खूप तीव्र लढा देऊन (अजून कोणाशी? समजून घ्या ना जरा! ) शेवटी एकदाचे घरात आणलेले बॉक्सर जातीचे कुत्र्याचे पिल्लू. त्याच्या थोडया (? ) विध्वंसक प्रवृत्ती बघून अन मार्ली असाच "बँड डॉग " होता हे वाचून मला ते पुस्तक वाचायची खूप उत्सुकता होती.
स्पाईकला आणण्याआधी आम्ही एक रस्त्यावरून उचलून आणलेले मांजराचे पिल्लू पाळले होते. दिसायबिसायला खूप गोंडस होते. पण त्याला फिटस येत असत. अनेक पशुवैद्यक, सत्राशेसाठ औषधे, हॉस्पिटलच्या वाऱ्या असे खूप काही करूनही ते सुधारले नाहीच. त्यामुळे कुत्रा घेण्याआधी तो अगदी चांगल्या कुलशीलाचा (पेडीग्री ) आहे ना हे बघणे माझ्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. शिवाय बाकी आखूड शिंगी बहुदुधी अशा, म्हणजे किंमत कमी, फार केसाळ नको, अति मोठा होणारा नको असल्या बऱ्याच मागण्या होत्याच. तशात मुलाने त्याच्या ओळखीतून हे पिल्लू घेऊ या असा प्रस्ताव मांडला. किंमत अगदी किरकोळ, घराणे चांगले ( "अग आई, त्याचे आईवडिल बघ ना, चँपियन आहेत " ) एवढेच बघून हो म्हटले. बाकी या जातीच्या कुत्र्यांच्या उपजत सवयी काय, त्यांची काय काय खास काळजी घ्यावी लागते वगैरे मुदद्यांकडे आमची बुद्धी वळलीच नाही. त्यात घरात "एक तर मी या घरात राहीन नाहीतर कुत्रा तरी! " असल्या बाणेदार उद्गारांशी सामना करायचा होताच ना! मुलाची दृष्टी फक्त " अग आई, तो माझ्याच वाढदिवसादिवशी जन्मलाय, कित्ती छान ना! " या कडेच होती. यात छान काय ते मला अजूनही समजलेले नाहीच. तर अशा सगळ्या गदारोळात एकदाचा स्पाईक घरी आला. त्याच्या नावावरून सुद्धा इतकी चर्चा झडली, अन मोबाईल कंपन्यांचा इतका काही फायदा झाला की शेवटी ठेवा बाई एकदाचे काय हवे ते, असे म्हणून त्याचे नामकरण "स्पाईक" असे केले. "अय्या, तो त्याच्या बास्केटमध्ये कध्धी शू करत नाही, धडपडत बाहेर येतो" असल्या उद्गारांनी त्याच्या शहाणपणावर शिक्कामोर्तब झाले. हळू हळू मोठे होत होत मात्र तो आपल्या मूळ वळणावर जाऊ लागला.
त्याच्या जातीचा, किंवा त्याचा एक स्वभावविशेष म्हणजे अतोनात उत्सुकता. कुठे काय आहे, कशात काय ठेवले आहे, प्रत्येकजण हातात काय घेतो.. ते मला हवे, ही वृत्ती. अन दुसरी गोष्ट म्हणजे अति खेळकरपणा! प्रत्येक गोष्ट तोंडात धरून धावून धावून सतवायचे अन पाठलाग करणाऱ्याला हुलकावण्या द्यायच्या. याच उत्सुकते पोटी, दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जाऊन खाली काय आहे बघण्याच्या प्रयत्नात या महाशयांनी ( वय वर्षे तीन महिने ) खाली उडी मारली अन मग पडले दोन दिवस सगळा रागरंग हरवून निपचित, आमच्या तोंडाचे पाणी पळवून. हसला नाही, बोलला नाही, भुंकला नाही की गुरगुरला नाही. हूं कि चूं नाही. " ताई, हा मुका झाला का हो? " असा कामवालीचा प्रश्न. दोन दिवसांनी उठून मात्र पहिले पाढे पंचावन्न.
हे सगळे पाहून आपल्याला त्या ईश्वराने कसे निवडून निवडून प्राणी बहाल केलेत असे वाटून, बँड डॉग म्हणजे नक्की काय हे वाचण्यासाठी ते "मार्ली अन मी" हे पुस्तक घेण्याचा खटाटोप.
पुस्तक अतिशय सुंदर आहे. म्हणजे मला तरी अतिशय आवडले. वेगवेगळ्या ठिकाणी त्याची परीक्षणे आली आहेत की कुत्रे पाळणाऱ्यांना, प्राणी आवडणाऱ्यांना आवडेल, पण लेखक म्हणजे जॉन ग्रोगन ची भाषा व शैली इतकी काही सुरेख आहे की मला असे वाटते ते सर्वांनाच आवडेल. अर्थातच तो लेखक एका वृत्तपत्राचा सदरलेखक होता, त्यामुळे शैली, भाषा ही चांगली असणारच. थोडी नर्मविनोदी, किंचित उपरोधिक अशा शैलीमुळे पुस्तक खरंच वाचनीय आहे ( माझ्या मते हं.. ) आणि जरी ते "मार्ली" या लँब्राडॉर जातीच्या कुत्र्याबद्दल प्रामुख्याने असले तरी जॉन ग्रोगनच्या आयुष्यातले घडलेले काही प्रसंग, त्याची त्या प्रसंगांकडे बघण्याची वृत्ती, त्यावरची त्याच्या खास शैलीतली टिपण्णी यामुळे ते पुस्तक फक्त आणि फक्त कुत्र्याबद्दल आहे असे मला तरी वाटले नाही. अर्थातच, आता आम्ही एका कुत्र्याचे मालक झाल्याने, खरे तर इथे मला "proud owner" लिहायचे होते पण "proud" हे विशेषण वापरायला मन धजले नाही, या पुस्तकाशी जरा विशेषच नाळ जुळली. माझ्याबरोबर मुलांनीही एका बैठकीत ते वाचून काढले ( जॉन ग्रोगन की जय हो! ) पिल्लू निवडण्यापासून ते त्याच्या नामकरणापर्यंत, त्याला शू शीच्या सवयी लावण्यापासून ते इतर नियम शिकवण्यापर्यंत आमचे अनुभव अगदी एकाच जातीचे होते. अन स्पाईक हळू हळू मार्लीच्या पावलावर पाऊल ठेऊन जात असल्याने, या जगात आपण एकटेच नाही अशी सहानुभूतीही मिळत होती.
ग्रोगनने मार्लीच्या मोठं होण्यातले काही प्रसंग सुरेख वर्णन केले आहेत, त्यात सोफे फाडणे, वादळ होताना तोडफोड करणे, दागिना गिळून टाकणे ( या प्रसंगाचे वर्णन ग्रोगनने फारच बहारदार रीत्या केले आहे ), हॉटेलमधले टेबल ओढून नेणे इत्यादी प्रसंग आहेत.
आमच्या स्पाईकच्या मोठे होण्यामध्येही तमाम कुत्रे कुळाला जागून फर्निचर अन चपला कुरतडणे हे तर आहेच आहे, पण पळवून नेऊन तोडलेल्या वस्तूंच्या यादीत मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, चश्मा, पेन, पेन्सिलींचे बॉक्सेस, तऱ्हेतऱ्हेची झाडे, आणि... सर्वात मला लाज वाटायला लावण्यासारखे म्हणजे लायब्ररीतून आणलेली पुस्तके! आयुष्यात कधीही मला ग्रंथपालांची क्षमा मागण्याचा प्रसंग आला नव्हता, तो या साहेबांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत बरोब्बर चार वेळा आला. केवढे हे लाजिरवाणे दुर्भाग्य!
ग्रोगनने लिहिलेला मार्लीने टेबल खेचून नेण्याचा प्रसंग, बऱ्याच वाचकांना अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण स्पाईकची शक्ती अन जिद्द बघून माझा तरी पूर्ण विश्वास बसला. पूर्वी त्याचा गावठी दोस्त "शिरो" दिसला की अन अलिकडे त्याचे जन्मजात शत्रू म्हणजे मार्जारकुलोत्पन्न दिसले की त्याला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही रोज फिरायला जातो तेव्हा लोकांना एक फुकटात करमणुकीचे दृश्य असते. रस्सीखेच, आरडाओरड हे बघून लोक चक्क रस्त्यात उभे राहून तमाशा पाहतात. एकदा तर एकाने, ( तो एक अन तीन मुले असे चारजण ), स्कूटरवरून जाताना ती थांबवून आमची मज्जा बघितली, वरून काहीतरी ओरडून शेराही मारला. मला ते या धांदलीत नीट ऐकूच न आल्याने संभाव्य अपमानापासून बचाव झाला आपोआप. आमच्या फिरायच्या वाटेवर एका ठिकाणी बरीच मांजरे
अससतात अन तिथे आले की याची नजर एकदम शोधक बनते. तीच गोष्ट उंदीर घुशींची. त्याला तऱ्हतऱ्हेने सांगून बघितले, " अरे, तुला अजून मुनिसिपालिटीने उंदीर पकडायच्या कामावर नेमलेले नाही, अन तोवर तुला पगार मिळणार नाही बाळा ", " अरे, माणसाने ( आमच्याकडे माणसात कुत्र्याचा समावेश होतो बरं का! ) नेहेमी क्षमाशील असावे, आपल्या शत्रूवर दया करावी... ", पण छे, याच्या डोक्यात काही शिरेल तर शपथ! " आई, कशाला तू त्याला एवढे मुल्याधिष्ठित शि़क्षण देते आहेस? " - इति कन्यका. अर्थात ती एवढे शुद्ध मराठीत नाही सांगत. तिच्या बोलण्यात बरेचसे इंग्लिश शब्द मराठीचा थोडा शिडकावा घालून येतात. मात्र "अलिकडची" मराठी भाषा तिला बिनचूक येते " काय ग हे आई, कसली ही चिंधीगिरी करतेस तू! " किंवा " आई, ढापूगिरी नको हं प्लिझ! ".. असो, तो एक वेगळाच अन स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
शेवटी या रोजच्या खेळाला कंटाळून त्याच्या प्रशिक्षकाला यावर उपाय काय, असे विचारल्यावर त्याने सांगितले, बरोबर बिस्किटे न्या अन ती हळूहळू देत देत त्याचे लक्ष मांजराकडून दुसरीकडे वळवा. समजले ना आता, लाचचलुचपतीचा जन्म कसा होतो ते? अर्थात हे अति हुश्शार श्वानमहाराज, दोन्ही साधून घेण्यात प्रवीण झालेले आहेत, बिस्किटेही अन मांजरांचा पाठलागही!
मात्र एका गोष्टीत स्पाईकने मार्लीवरही कुरघोडी केलीय. तोंडाचा अन नाकाचाही वापर करून अन अर्थात हातापायाच्या नखांचाही वापर करून हे श्वान महाशय कपाटे उघडायचा प्रयत्न करतात. अथक परिश्रमांच्या जोडीला हाती घ्याल ते तडीस न्या, फिरून यत्न करून पाहा ही वृत्ती ठेवून, यशस्वीही होतात. चपलांचे कपाट तर आवडीचे, पण खाऊचे कपाट उघडून लाडूंचा चटटामटटा करायची जादूही त्याने करून दाखवली आहे. काही दिवस शोकेसमध्ये, कदाचित आतून फारसे वास न आल्याने असेल, त्याला विशेष रस नव्हता. पण मग शेवटी मोर्चा वळलाच तिथेही. मुकाटयाने सगळ्या जिवापाड साठवलेल्या मोलाच्या वस्तू वर उचलून ठेवल्या अन सगळीकडे कुलूप पद्धतीचा अंगीकार केला.
कुत्र्यांच्या जातीला कलंक लागावा असे त्याचे वर्तन म्हणजे लोणी, तूप, तळलेले पदार्थ अन गोडधोड हे विशेष आवडीचे. अन हो अजून एक सांगायचे म्हणजे, त्याला आणण्याआधीचा लढा तसाच चालू राहिलाय, पण राजकारण्यांनी पक्ष बदलावेत तसे आमच्याकडे पक्ष बदलले गेले. " एक तर मी तरी किंवा कुत्रा तरी" ही घोषणा साफ विसरली गेली. इतके लाड अन सतत "गरीब बिचारा", असे म्हणण्यापर्यंत हृदयपरिवर्तन घडून आले अन मला विरुद्ध ( नेहेमी विरुद्धच पक्ष असणार ना, मी तरी काय परत परत लिहितेय असे! ) प़क्षात जाऊन, " अरे तो तुझे मूल, नातवंडे असे काही नसून आपल्या घरातला कुत्रा आहे फक्त" असे वारंवार सांगायची वेळ आली. "आता याच्यासाठी फक्त डायनिंग टेबल वर स्वतंत्र पान मांडून खुर्ची द्यायची बाकी आहे " हे वाक्य घरात माझ्या तोंडून वरचेवर निघू लागले, एकूणात काय जीवन हा सततचा संग्राम आहेच. बाकी त्याला सारखे "गरीब बिचारा" असे म्हटले जाते, तेव्हा मला आपले पर्ल बकच्या गुड अर्थ मधली "poor fool" आठवते. पण स्पाईक मात्र तशा अर्थाने मुळीच गरीब नाही हो. चांगलाच हुश्शार ( आपला तो बाब्या, या चालीवर.. ) अन बदमाश ( विरुद्ध पक्षीय नेता या भुमिकेतून ) आहे. पण गुणी आहे बिचारा! ( सतत ऐकून ऐकून हा परिणाम.. )
मार्लीने केलेल्या नासधुशीबद्दल ग्रोगनने बरेच लिहिले आहे, त्यापुढे मात्र स्पाईकची मोडतोड बरीच कमी म्हणावी लागेल. पण एकूणात हिशेब करता, जमीन जशी किंमतीत वाढत जाते, तशी त्याची मूळची किरकोळ किंमत वाढून, ही मोडतोड जमेस धरता बरीच झाली आहे असे म्हणावे लागेल. मला प्रेझेंट आलेले एक सुरेखसे बांबूचे मोठठे वळणावळणाचे झाड त्याने अख्खेच्या अख्खे खाऊन टाकले, अन दुसऱ्या दिवशी त्रास होऊन घरभर गरागरा फिरून घर घाण केले. अमूलचे मोठेच्या मोठे पाकीट चूपचाप खाले ओढून निम्म्याहून अधिक चाटून टाकले. केस बांधायचे बँडस तर कितीतरी गिळंकृत केले.
मार्लीला शिस्त लावण्यासाठी शाळेत दाखल केल्याचे धमाल वर्णन ग्रोगनने केले आहे. आणि न ऐकण्याबद्दल अन गैरशिस्तीबद्दल त्याला त्या शाळेतून कसे हाकलून दिले जाते, त्याचंही मस्त वर्णन दिले आहे. आपल्याकडे अशा काही शाळाच नसल्याने आम्ही सहीसलामत बचावलो आहोत. पण स्पाईकसाठी प्रशिक्षक ठेवूनही काही फारसा फायदा झालेला नाहे. "तो ऐकत नाही, सतत खोडया करतो "
वगैरे तक्रारी आम्ही त्याच्याकडे केल्या की आमच्यावर "तुम्हीच त्याला फार लाडावून ठेवले आहे" असा आरोप होतो. शिवाय अशा खोडया काढणे अन अति सळसळता उत्साह हा बॉक्सरचा जन्मजात गुण आहे असेही आम्हाला सांगितले जाते. अगदी ग्रोगनने म्हटल्याप्रमाणे आमची कुत्र्याची निवड ही " non research based " असल्याने आम्ही अळी मिळी गुप चिळी करून बसतो बापडे! त्याचा पशुवैद्यही त्याला " live wire" या विशेषणानेच संबोधतो.
परवाच येऊन मुलीने मला म्हटले की " आई, लोक रस्त्यात मला एकदा धरून मारणार आहेत. " " का ग बाई? " असे विचारल्यावर ती म्हणते " अग, हा बघ ना, बस स्टॉपवर बसलेल्या ( अलिकडचे नवीन बस स्टॉप बघितलेत ना, मस्त बसायला जागा वगैरे आहे ) लोकांच्या पार्श्वभागाजवळ जाऊन वास घेतो. कित्ती खेचले तरी येत नाही पटकन! " जोरात खेचावे तर अजून जोरात पळून तो तिला मस्तपैकी पाडतो अन ती उठेपर्यंत मात्र स्वतः शांत उभा राहतो. तेवढी तरी अक्कल आहे म्हणायची दिलेली देवाने! कसे कोणास ठाऊक, त्याला घरातली मुले कोण, मोठी माणसे कोण हे बरोब्बर समजते, अन कोणाबरोबर किती मस्ती करावी याचे उपजतच ज्ञान आहे त्याला.
"मार्ली अँड मी", हे पुस्तक अगदी अथपासून इतिपर्यंत म्हणजे मार्लीला आणण्यापासून ते थेट त्याच्या करूण अंतापर्यंत असल्याने बऱ्यापैकी मोठे आहे. अतिशय आजारी झाल्याने, मार्लीला शेवटी दयामृत्यू द्यावा लागतो. हे बऱ्याच जणांना न पटून ग्रोगनवर सडकून
टीकास्त्रही सोडले गेलेले आहे. पण बरे-वाईट, चूक-बरोबर या वादात न पडता, ग्रोगनच्या भावना समजून घेऊन हे पुस्तक वाचले तर ते सुंदरच आहे यात शंका नाही. आता त्यावर चित्रपटही येतोच आहे.
स्पाईक आत्ताशी कुठे जेमतेम दोन वर्षांचा झालाय. अजून तर बरीच मस्ती करायची बाकी आहे त्याची!