ह्यासोबत
मी अगदी लहान असताना कुठल्यातरी वर्तमानपत्रात - मला वाटतं महाराष्ट्र टाईम्स किंवा लोकसत्ता असेल बहुतेक - एक बातमी का एक गोष्ट असं काहीतरी वाचल्याचं आठवतं. एका माणसाची गोष्ट. असं समजा त्या माणसाला आपण देशपांडे म्हणू. देशपांडे - जो कित्येक वर्षं आपल्या बायकोपासून दूर राहिला. तसं पाहिलं तर यात काय विशेष? म्हणजे अगदी बातमी बनण्यासारखं काय? उलट आजकाल तर कुणी बायकोपासून अजिबात दूर गेला नाही तर अशा माणसाचीच बातमी होऊ शकेल कदाचित. पण देशपांडे बायकोपासून दूर तर राहिलेच आणि शिवाय बातमी बनण्यासारखे राहिले.
देशपांडे तसे मुंबईतले - गिरगावातले. पण एक दिवस कामासाठी बाहेर गावी जातो असं सांगून घरा बाहेर पडलेले देशपांडे भुलेश्वर जवळच खोली घेऊन बायको, मित्र, नातेवाईक कुणालाही न भेटता वीस वर्षं तिथे राहिले. बरं स्वतःला असं आपल्याच लोकांपासून तोडण्यामागे काही खास कारण होतं म्हणावं तर तसंही नाही. अर्थात या काळात देशपांडे साहेबांनी आपल्या घरावर अगदी रोजच्या रोज आणि आपल्या बायकोवर अधून मधून लक्ष ठेवलेलं होतंच. अहो भुलेश्वराहून गिरगाव असं कितीसं ते लांब? आणि वीस वर्षांनंतर - म्हणजे देशपांडे बाहेरगावी गेले ते नक्कीच मेले अशी लोकांची खात्री झाल्यावर, असलेल्या थोड्याफार प्रॉपर्टीची तजवीज वगैरे लागल्यानंतर, लोक सगळं काही विसरल्यानंतर आणि बायकोनं कुंकू लावणं सोडून कित्येक वर्षं गेल्यानंतर - एक दिवस संध्याकाळी देशपांडे परत हळूच घरात शिरले. आणि असे शिरले जणू काही त्याच सकाळी काहीतरी कामासाठी बाहेर पडले होते आणि मग पुन्हा मरेपर्यंत बायकोचा प्रेमळ नवरा बनून राहिले.
तसं बघायला गेलं तर ही सगळी एक साधीच घटना. पण अगदी विचित्र. या घटनेचं विचित्रपण, वेगळेपणच या घटनेवर आपल्याला विचार करायला लावतं. आपल्या सहानुभूतीपूर्ण मनाला स्पर्श करून जातं. आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती असतं की आपण असा वेडगळपणा करणार नाही, पण दुसऱ्यानं मात्र काहीतरी असं करावं असं आपल्याला मनापासून वाटतं. मी जेव्हा जेव्हा या घटनेचा विचार केलाय, तेव्हा तेव्हा माझी एका गोष्टीबद्दल खात्री झालीये की या कथेचा नायक म्हणजे आपले देशपांडे आणि त्यांची ही कथा हे सारं खरं असणार. एखादा विषय मनाला जर एवढा भावला तर मी त्या विषयाचा आधी मनसोक्त रवंथ करतो. हां, आता तुम्हालाही या विषयाचा रवंथ करायचा असेल तर जरूर करा. किंवा माझ्याबरोबर देशपांड्यांचा वीस वर्षाचा तर्हेवाईकपणा बघत हिंडायचं असलं तरीही चला. आणि मग अशा विचित्र घटनेची काही कारणमीमांसा करता येते का, किंवा काही त्यातून काही बोध तरी घेता येतो का, असाही एक प्रयत्न करून बघू. कारण माझं मत असं आहे की विचारांतून निष्कर्ष निघू शकतो, निष्कर्षातून कारणमीमांसा आणि अशा अनन्य साधारण घटनेतून काहीतरी बोध.
तर, आपले देशपांडे इतर कुठल्याही सर्वसाधारण देशपांड्यांसारखेच एक देशपांडे. म्हणजे मध्यम वयाचे, साधा सुती सदरा घालणारे अन सुतीच धोतर नेसणारे, आठवड्यातून एकदाच दाढी करणारे, चेहेऱ्यावरची माशीही न हलणारे आणि कुठल्याही जास्त उलाढाल्या न करणारे, उलट थोडे आळशीच, बायकोशी सुद्धा एकनिष्ठ असणारे... म्हणजे थोडक्यात 'ठेविले अनंते... ' वगैरे वगैरे अशी वृत्ती असणारे. साधारणपणे सगळे देशपांडे समजतात तसंच आपलेही देशपांडे स्वतःला बुद्धीवादी समजायचे. पण यांचा क्रियाशील बुद्धीवाद मौज अन केसरी चाळण्यापलिकडे कधी फारसा गेला नाही. नुसतंच पडून राहून विचार करायला देशपांड्यांना फार आवडायचं. अमुक एका विषयावर विचार असं काही नाही. नुसतंच वाऱ्याबरोबर वाळलेली पानं जशी इतस्ततः भरकटत राहतात, तसं मन भरकटेल तसं भरकटू द्यायचं. बरं याचा अर्थ सुंदर स्वप्नरंजन म्हणावं तर देशपांड्यांना तेही जमायचं नाही. आता असा माणूस ज्याच्या मनाचा स्वत्वाबद्दल गोंधळ उडाला नाही, ज्याची कुठल्याही गोष्टीबद्दल आतल्या आत तडफड झाली नाही, असा माणूस असलं काही तर्हेवाईक कृत्य करू शकेल असं कुणाच्या ध्यानी मनी तरी येऊ शकलं असतं का? देशपांड्यांच्या मित्राला किंवा नातेवाईकांना जर कुणी विचारलं असतं की आख्ख्या मुंबईत सगळ्यात निष्क्रिय मनुष्य कोण तर प्रत्येकानं निर्विवाद देशपांड्यांचंच नाव घेतलं असतं. अर्थात सौ. देशपांडे मात्र याच्याशी अगदी पूर्ण सहमत होत्याच असं नाही. इतर कुठल्याही पत्नीप्रमाणेच त्यांनीही आपल्या पतिराजांना नीटसं ओळखलंच नव्हतं. लग्नानंतरचा आपल्या नवऱ्याचा थंड स्वार्थीपणा, पतिप्रेमापोटी सौ देशपांड्यांच्या लक्षातही राहिला आणि आवडलाही. नाही म्हणायला आणखी एक गोष्ट लक्षात राहिली होती ती म्हणजे देशपांड्यांची 'काहीतरी करून दाखवायची' खुमखुमी. अर्थात पुढे कालौघात ही खुमखुमी विरून गेली. चार सांसारिक गुपितं मनात लपवण्यापेक्षा अधिक काही देशपांडे 'करून' दाखवू शकले नाहीत. सौ देशपांडे तर नेहमीच म्हणायच्या की त्यांचे हे तसे फाssरच चांगले वागायचे. आता '''तसे फाssरच चांगले' या बायकी विधानाला काही नक्की अर्थ असतो का!
तर असे हे आपले देशपांडे, एक दिवस संध्याकाळी बाहेर गावी जायची तयारी करतात. अर्थात तयारी म्हणजे फक्त एक वळकटी, त्यात अंथरुण-पांघरुण, थोडेसे कपडे आणि एक छत्री. "रात्रीच्या गाडीनं सोलापूरला जातोय" असं बायकोला त्रोटकंच सांगतात. खरं तर बायको त्याना विचारणार असते की सोलापूरात कुणाकडे उतरणार किंवा पाण्याचा गडू घेतला का - इत्यादी इत्यादी. पण निघताना वेगवेगळे प्रश्न विचारलेले नवऱ्याला आवडायचं नाही म्हणून ती गप्प बसते. श्रीयुतांच्या डोळ्यातच तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळतात!! "दोन तीन दिवसात येईन. उशीरात उशीर शुक्रवार रात्रीपर्यंत नक्कीच". देशपांड्यांनी मात्र पुढे काय करायचं हे मनात पक्कं योजलेलं असतं. आता एकदम आठवड्यानं परत यायचं आणि बायकोला पुरतं गोंधळात टाकायचं, असा निश्चय करून आणि एका हातात वळकटी आणि दुसऱ्या हातात छत्री घेऊन देशपांडे जायला निघतात.
दरवाजातून बाहेर पडायच्या आधी नेहमीसारखंच बायको त्यांच्या जवळ येते, नेहमीसारखंच देशपांडे बायकोचं उत्तेजनार्थ चुंबन घेतात आणि नेहमीसारखंच बायको उत्तेजनार्थ लाजते. दरवाजातून बाहेर पडताना दिसलेलं आपल्या ह्यांचं हसरं रुप बायको अंतरी अगदी साठवून घेते. हे अंतरी हसरं रूप साठवून घेणं बिणं जरी तसा किरकोळ प्रसंग वाटला तरी याला पुढे फार महत्त्व आहे. कारण देशपांड्यांच्या बायकोपेक्षा त्यांची विधवा म्हणून जास्त वर्षं काढाव्या लागलेल्या सौंना, नंतर कधीही देशपांड्यांची आठवण झाली तर हेच हसरं रूप त्यांच्या डोळ्यासमोर यायचं. वेगवेगळ्या कल्पना करीत बसलं की त्यांचं हे हसरं रूप आणि इतर काही स्वप्नं यांचं मिश्रण होऊन विचित्र आणि कधी कधी भेसूर चित्रं दिसायची. म्हणजे उदाहरणार्थ मृत देशपांड्यांना तिरडीवर ठेवलंय, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तेच दरवाजातलं हसू दिसतंय. किंवा स्वर्गात अप्सरा त्यांच्या भोवती नृत्य करतायत पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तेच हसू आहे. अशा कितीही कल्पना डोक्यात आल्या किंवा इतर लोकांना देशपांडे मेले असणारच अशी खात्री झाली तरीही सौ देशपांड्यांना कित्येक वेळा प्रश्न पडायचा की मी नक्की विधवा आहे का?
पण ते सगळं जाऊ दे. आपल्याला श्रीयुत देशपांड्यांशी कर्तव्य आहे. त्यामुळे पटकन चला, नाहीतर या मुंबईच्या भाऊगर्दीत आपली अन त्यांची चुकामुक व्हायची. भुलेश्वरच्या या जुनाट बिल्डिंगमध्ये ते पाहा एका छोट्याश्या खोलीत ते पाहा देशपांडे येऊन पोहोचलेत. वळकटी सोडून आत काहीतरी शोधतायत. बहुतेक रात्री घालायची चट्ट्यापट्ट्याची चड्डी. अशा तऱ्हेनी देशपांड्यांच्या सोलापूर प्रवासाची इथे भुलेश्वरच्या खोलीत सांगता झाली. "इकडे येताना कुणी बघितलं तर नसेल? भुलेश्वरच्या मार्केटाच्या गर्दीत भराभर चालता पण येईना. खालच्या नाक्यावरून इकडे वळताना कुणीतरी हाक पण मारत होतं 'देशपांडे... देशपांडे' म्हणून". देशपांड्या मूर्खा स्वतःला किती मोठा समजशील? विश्वाच्या तुलनेत तुझ्या आणि मुंगीच्या आकारात फारसा काहीच फरक नाहीये बाबा. शहाणा असशील तर आता झोप आणि सकाळी घरी जाऊन बायकोला खरं खरं सगळं सांगून टाक. तिच्या निष्कलंक हृदयात तुला अढळपद आहे ते तसंच टिकव. मानवी हृदयातल्या सौहार्दावर असा चरा उमटवणं चांगलं नाही.
आपणच करत असलेल्या विनोदावर एकीकडे देशपांड्यांना थोडंसं कानकोंडं झाल्यासारखं वाटत होतं. नवीन जागा, वेगळी गादी, एकट्यानंच झोपायचं... देशपांड्यांचा डोळा लागेना. "जाऊ दे उद्या आपलं घरी जावं... " सकाळी जरा लवकरच उठून देशपांडे परत विचार करायला लागले. नक्की काय करावं? परत जावं? की काढावेत एक दोन दिवस अजून असेच? देशपांडे असेच होते. घरातून तर ते बाहेर पडले होते. काय करायचं हे ठरवून हे बाहेर पडले होते. पण आपण हे नक्की का करतोय हे मात्र त्यांना ठाऊक नव्हतं. एखाद्या कामाच्या उद्दिष्टाबद्दल विचार न करता नुसती ढोर मेहेनत करणं म्हणजे माणसाच्या मनाच्या दुबळेपणाचं अगदी ठळक लक्षण.
घरी जावं की जाऊ नये या द्वंद्वात देशपांड्यांनी मग ठरवलं की "आधी नुसतंच लांबनं घराकडे बघून तर येऊ. जरा अंदाज घेऊ आणि येऊ परत". पुन्हा तेच. हे करून नक्की काय साधणार होते देशपांडे? आणि 'जरा अंदाज' म्हणजे तरी नक्की काय? सवयीनंच - देशपांडे सवयीचे गुलाम असणार यात काय नवल - देशपांड्यांच्या बोटाला धरून त्यांना अगदी पार त्यांच्या बिल्डिंगच्या जवळ नेऊन सोडलं आणि सवयीनंच आता ते बिल्डिंगमध्ये शिरणार, एवढ्यात देशपांडे अडखळले. देशपांडे कुठे शिरताय?... परत द्वंद्व चालू....सीसॉच्या फळीची दोन्ही टोकं एकाच वेळेला खाली किंवा एकाच वेळेला वरती कशी असू शकतील? मुळात द्वंद्व आहे म्हणून तर सीसॉ आहे. पण हे सगळं कळत असतं तर देशपांडे, देशपांडे कशाला झाले असते!
आणि मग एकदम मागे वळून देशपांडे घाईघाईनं परत भुलेश्वरच्या दिशेनं निघाले. नाक्यावरून वळताना हळूच त्यांनी आपल्या घराकडे नजर टाकली. खिडकीतनं दिसलं, बायको धुणं वाळत घालत होती. "अरे बापरे, तिनं बघितलं वाटतं माझ्याकडे... अं... छे, एवढ्या गर्दीत मी कुठचा ओळखू येतोय.... नक्कीच ओळखणार... नवरा आहे मी तिचा... अं... पण ती तर मला वाटतं या दिशेला बघतच नव्हती". धडधडत्या छातीनं देशपांडे तरातर भुलेश्वरकडे वळले. अगदी शेवटी पुन्हा एकदा एक चोरटी नजर त्यांनी घराकडे टाकलीच. देशपांडे, हजारो लाखो मर्त्य बिंदूंमधलेच तुम्ही एक.... तुम्हाला या प्रचंद सागरातून कोण वेगळं हुडकून काढणार आहे?
- क्रमशः