देशपांडे (भाग - अंतिम)

या लांबलचक विनोदाची, विनोदाची म्हणा किंवा विचित्रपणाची म्हणा, सुरुवात ही अशी झाली.  पुढल्या गोष्टी - म्हणजे देशपांड्यांचा स्वतःचं रुप पालटवण्याचा प्रयत्न, त्यांचं साधूसारखे लांब केस अन दाढी राखणं, डोळ्यावर चष्मा लावायला सुरुवात करणं वगैरे वगैरे - या साऱ्या आपोआप घडल्यासारख्या घडायला लागल्या.   कुणी ओळखू नये म्हणून देशपांड्यांनी वेगळं रूप धारण केलं.   पण नेमकं याच कारणानं त्यांनी स्वतःच्या परतीचे एक एक दोर पण कापले.   देशपांड्यांच्या स्वभावातला सुप्त आडमुठेपणा इथेही जागृत झाला.   "बघू बरं किती दिवस तिला आपली उणीव जाणवते. अगदी फार आजारी-बिजारी पडली तरच घरी जायचं".  आत्ताआत्ता पर्यंत देशपांड्यांना एकीकडे मनापासून वाटत रहायचं की झालं हे बास झालं, आता उद्या किंवा परवा घरी जाऊ.  पण आता मात्र ते थोडे निर्ढावले होते.  आता त्यांना वाटायचं 'छे, उद्याच कशाला?   पुढच्या आठवड्यात बघू या नं... '

बऱ्याच वेळेस मनाला एखादी गोष्ट आतून पटत नसते पण तरीही अहंमन्यता, भीती, राग आडमुठेपणा किंवा शुद्ध मूर्खपणा मनावर प्रभाव पाडतो आणि या प्रभावाखाली माणूस बेलगाम वागत राहतो.  आणि मग त्या गोष्टीची आवश्यकता आणि त्याचे परिणाम या साऱ्याचा गुंता करून टाकतो... कधीच न सोडवता येणारा गुंता...

देशपांड्यांना दहा वर्षांसाठी त्यांच्यावरच सोडून देऊ.  कारण या दहा वर्षात अमुक असं काहीच घडलं नाहीये.   दहा वर्षांनंतरचा एक दिवस...

ठाकूरद्वार जवळून तो पाहा एक वयस्कर मनुष्य चाललाय.   मोठे पाठीवर रुळणारे केस, वाढलेली दाढी, लहानसं कपाळ तेही सुरकुतायला लागलेलं, डोळ्यावर लावलेला गोल काड्यांचा चष्मा, पाठीत किंचीत पोक आणि खाली बघून एकेक मोजून टाकल्यासारखी पावलं टाकत चाललेला.   चेहेरा जाणून बुजून खाली ठेवतोय वाटतं तो.  किंवा तशी सवयच लागली असावी त्याला बहुदा... जगापासून तोंड लपवण्याची.   समोरच्या बाजूनंही ती पाहा तशीच एक वयस्कर स्त्री पण येतीये.   अगदी म्हातारी नाहीये पण काळाच्या ओझ्यानं थकल्यासारखी दिसतीये.   विधवा, साधी सुती साडी नेसलेली, डोळ्यांखाली सुरकुतल्या कातड्यांचे फुगवटे जमा व्हायला लागलेली, केस पांढरे झालेली... आणि अरेच्चा ते पाहा..  ठाकुरद्वारातल्या फुटपाथवरच्या चालणाऱ्यांच्या गर्दीनं श्री आणि सौ देशपांडे एकमेकांच्या समोरच आले की... क्षणभरच... आणि ज्या गर्दीच्या भोवऱ्यानं त्यांना समोरा समोर आणलं, त्याच भोवऱ्यानं तितक्याच तत्परतेनं त्यांना दूरही लोटलं.   एकच क्षण... फक्त एकच क्षण श्री आणि सौंची एकमेकाडे नजरा नजर झाली... का कुणास ठाऊक पण दूर लोटलं गेल्यावरही सौ देशपांड्यांनी पुन्हा एकदा मागे वळून बघितलं आणि पुन्हा आपल्या आधीच्याच चालीनं त्या पुढे चालत राहिल्या.   आणि श्रीयुत देशपांडे?   दहा वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांनी आपल्या बायकोला एवढ्या जवळनं आणि साक्षात समोर पाहिलं.   त्यांचा तर बराच वेळ आ बंदच होईना...   घाईघाईनं देशपांडे आपल्या खोलीत परत आले.   दरवाजा बंद करून घेतला वरचा बोल्ट पण लावला आणि पायातलं त्राण गेल्यासारखे मटकन गादीवर बसले.   त्यांच्या दुबळ्या मनासमोरून त्यांनी दहा वर्षं चालवलेल्या तऱ्हेवाईकपणाचा चित्रपट झर्रकन सरकून गेला.  "मी बिनडोक आहे... मी बिनडोक आहे... बिनडोक... " गादीवर डोकं टेकून रडत रडत देशपांडे परत परत म्हणत राहिले.  

मला वाटतं देशपांडे खरंच बिनडोक होते, कारण कुठचा डोकं शाबूत असलेला माणूस स्वतःच स्वतःवर असं विचित्र आयुष्य लादून घेईल?   आयुष्यानं दिलेले सगळे हक्क, सगळी स्वातंत्र्यं, सगळ्या सवलती सगळं स्वतःच डावलून द्यायचं आणि असं बुद्धिभ्रष्टासारखं रहायचं!   देशपांडे मुंबईतच भर वस्तीतच राहत होते पण तरीही अदृष्य मानव असल्यासारखे होते.   मुंबईतली गर्दी रोज त्यांच्या अंगावरून जायची पण गर्दीला ते दिसायचे नाहीत.   देशपांडे आपल्या बायकोच्या जवळच राहत होते पण बायकोच्या वात्सल्याची ऊब त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नव्हती.   एखादा संन्यासी वैराग्यापोटी स्वतःला संसारापासून दूर घेऊन जातो, त्याचं आयुष्यही असं आणि एवढं विचित्र नसतं.   

वीस वर्षांचा हा काळ म्हणजे काही फार मोठा काळ नाही. देशपांड्यांनी आधी ठरवल्याप्रमाणे देशपांडे एक आठवड्याने परत आले असते किंवा वीस वर्षांनी परत आले असते तरीही परिस्थितीत फार मोठा असा गुणात्मक फरक काहीच पडणार नव्हता.   किंवा असं म्हणूया की एक आठवड्यात देशपांडे कुटुंबाच्या संदर्भात काळ जेवढा पुढे सरकला असता, वीस वर्षातही त्या तुलनेत काही फारसा पुढे सरकलेला नव्हता.   फक्त एकच गोष्ट पुढं सरकली होती - आणि तिला कुणी थांबवूही शकत नव्हतं - आणि ती म्हणजे श्री आणि सौ देशपांड्यांची वयं.   मध्यम वयात घराबाहेर पडलेल्या आणि उतारवयात परत आलेल्या नवऱ्याचं स्वागत त्याची विधवा बायको चुंबन देऊन करू शकली असती?

वीस वर्षं अशीच लोटली अन एक दिवस संध्याकाळी रोजच्या प्रमाणेच फिरत फिरत देशपांडे त्यांच्या गिरगावातल्या घरापाशी आले.   अजूनही त्याला ते 'आपलं घरच' म्हणायचे! जून महिन्यातली ती संध्याकाळ होती. आकाश पूर्ण झाकोळलेलं होतं आणि बिल्डिंगच्या दरवाजाशी पोहोचे पोहोचे पर्यंत ताड ताड ताड असा आवाज करत आभाळ फुटावं असा धो धो पाऊस चालू झाला.   क्षणभरातच देशपांड्यांचा डोकं, चेहेरा, सदरा सारं भिजून गेलं.   घाईघाईनं आडोश्याला म्हणून देशपांडे बिल्डिंगमध्येच शिरले आणि अनाहूतपणे पायऱ्या पण चढायला लागले.   देशपांडे... देशपांडे... अहो काय करताय काय हे...? अहो या जिन्याच्या वरच्या टोकाला तुमचं घर आहे, बायको आहे.   देशपांड्यांचा पुन्हा गोंधळ उडाला... पुन्हा द्वंद्व... काय करावं? वर जावं?... की इकडंच कुठेतरी आडोश्याला थोडावेळ थांबून आपलं खोलीकडे परत जावं?.... काय करावं बर?   पण हा पाऊस इतक्यात कुठचा उघडणार.... आडोश्याला किती वेळ उभं राहावं लागेल कुणास ठाऊक... नको पण इतक्यातच घरी नको... छे, आज इकडे गिरगावात यायलाच नको होतं... विचारांची आवर्तनं जोर जोरात या टोकाकडून त्या टोकाकडे झोके घेत होती.... अन नकळत देशपांडे जिन्याची एक एक पायरी पण चढत होते.   अन देशपांड्यांच्या लक्षात आलं की ते त्यांच्याच दरवाज्यात उभे होते.   काय करू?... परत फिरायचं?... नको सरळ दरवाजा उघडून आत जाऊया... अन दोन सेकंदात देशपांड्यांचं ठरलं.   वीस वर्षांपूर्वी जसे हसत देशपांडे घराबाहेर पडले होते, थेट तसेच हसत देशपांड्यांनी दरवाजा लोटला अन घरात पाऊल टाकलं.   हे तेच हसू होतं ज्यानं त्यांच्या बायकोच्या आयुष्याची किंमत देऊन एक क्रूर थट्टा केली होती.  

हा आनंदी क्षण - आपण तरी याला आनंदीच म्हणू - देशपांड्यांच्या नशीबात येऊ शकला तो सुद्धा धड विचार न करताच.   देशपांड्यांच्या उंबरठ्याच्या आत आपण त्यांचा पाठलाग करणं योग्य होणार नाही.   पण आत जाता जाता देशपांडे तुमच्या आमच्या विचारशक्तीला भरपूर खाद्य देऊन गेलेत.   याचा अगदी मनसोक्त रवंथ करा.   आणि बघा कदाचित यातलाच एखादा घास साक्षात्कारासारखा आपल्याला या घटनेच्या बोधाचा स्वादही देऊ शकेल किंवा किंवा त्याचा झणझणीतपणा डोळ्यात पाणीही आणू शकेल. या आपल्या गूढ जगात आणि या साऱ्या कोलाहालात माणूस वेगवेगळ्या नात्यांशी,  वेगवेगळ्या संस्थांशी, संस्कृतींशी, ही नाती या संस्था या संस्कृती हे सारं एकमेकांशी आणि सगळं काही सगळ्यांशी असं काही जखडलं गेलंय आणि हा सारा गुंता एवढ्या मोठ्या प्रचंड  अनामिक वेगानं फिरतोय की माणसानं या साऱ्यातून पाऊल बाहेर टाकायचं ठरवलं तर क्षणात तो लांब बाहेर फेकला जाईल... अगदी लांब... कदाचित पार या विश्वच्याही बाहेर...

- समाप्त.