ऊन प्यायला, पावसात वाळला कधी
कवी जगाला हवा तसा वागला कधी?
तुझ्याएवढा तुला कधी आवडेन का?
आवडेन मी तुझ्याएवढा मला कधी?
वरून पाहुन बरा वाटला की झाले
विचार त्याचा कळू नये आतला कधी
ओबामा की ओसामा ते बघा तुम्ही
काठ मला माझा सुद्धा लागला कधी?
असायची ही नशा असे की नसायची?
हिशोब त्याचा नशेमधे मांडला कधी?
हा गेला तो आला बस रेटारेटी
विचार माझ्या मनामधे थांबला कधी?
दोन पावले चालावे, चालवेचना
आयुष्याचा खिळा इथे लागला कधी?
फुले चांदणे शब्द तुझ्या गझलेला घे
निसर्ग माझ्यापुढे बरा वागला कधी?
पश्चिमेस लागलास सूर्या पळायला
तुझ्या दिशेने पाय तरी टाकला कधी?
नुसते भूषण गेला सांगत हसू नका
कोणी हेही सांगा की वारला कधी?